संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (यूनेस्को) : शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती संवर्धन यांच्या विकासार्थ एकसमयावच्छेदेकरून कार्य करणारी एक विशेष जागतिक संघटना. तिची स्थापना दि. ४ नोव्हेंबर १९४६ रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे झाली. तत्पूर्वीच १६ नोव्हेंबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या ३७ सभासद देशांनी लंडन येथे तिच्या घटनेवर शिक्कामोर्तब केले होते. तीत जागतिक शांतता व सुरक्षितता यांकरिता सर्वांगीण विकासाची निकड हे तत्त्व मान्य करण्यात आले. इ. स. २००६ मध्ये यूनेस्कोचे एकूण १९१ सभासद होते. सर्वसाधारण सभा, कार्यकारी मंडळ व सचिवालय अशा तीन स्वतंत्र भागांत यूनेस्कोच्या व्यवस्थापनाची विभागणी केलेली आहे. सर्वसाधारण सभा दोन वर्षांतून एकदा भरते आणि यूनेस्कोचे धोरण, योजनांची दिशा, अर्थसंकल्प निश्चित करते. प्रत्येक सभासदास एकच मत असते. कार्यकारी मंडळ सर्वसाधारण सभेतील प्रतिनिधींतून निवडले जाते. त्याचे ५८ सदस्य असतात. त्याच्या वर्षांतून किमान दोन बैठका होतात. ते योजनांवर देखरेख ठेवते, तसेच काही योजनांची शिफारस करते आणि सर्वसाधारण सभेसाठी कार्यसूची तयार करते. सचिवालय हा यूनेस्कोच्या ध्येयधोरणांची-योजनांची अंमलबजावणी करणारा सु. साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचा, मंत्रालयसदृश विभाग असून संचालक हा त्याचा प्रमुख असतो. त्याची नियुक्ती सर्वसाधारण सभेव्दारे सहा वर्षांकरिता केली जाते. यूनेस्कोचे मुख्य कार्यालय पॅरिस येथे असून शिवाय तेथे आठ प्रादेशिक कार्यालये आहेत.

दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५) यूरोप खंडात उध्वस्त झालेली विदयालये, संग्रहालये आणि गंथालये यांचे पुनरूज्जीवन व पुनर्निर्मिती करणे, हा सुरूवातीस संघटनेचा उद्देश होता. त्यानंतर कालांतराने तिचे कार्यक्षेत्र वाढले. यूनेस्कोने निरक्षरता निर्मूलन व मोफत शिक्षण यांसाठी होणाऱ्या राष्ट्रीय प्रयत्नांना साहाय्य, उत्तेजन देणे आणि पूरक गोष्टी करणे इ. धोरणांवर प्रथम अधिक भर दिला. शिवाय संघटनेच्या मूळ उद्देशांत नंतर सामाजिक शास्त्रे, संदेशवहन आणि सांस्कृतिक स्मारके यांचा अभ्यास, अभिवृद्धी आणि जतन यांचा अंतर्भाव करण्यात आला. ज्ञानाच्या मुक्त आदान-प्रदानासाठी भरणाऱ्या परिषदांना उत्तेजन देणे, तसेच प्रौढ शिक्षण आणि विशेषत: उच्च शिक्षणात स्त्रियांसाठी खास संधी व आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे, अशा बाबींवरही यूनेस्कोचा जोर आहे. यांकरिता यूनेस्कोने जागतिक प्रश्न व बौद्धिक देवाणघेवाण करण्यासाठी ‘ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी ’ जपानमध्ये स्थापन केली (१९७३). अलीकडे डाकार (सेनेगल) येथील चर्चापीठात (२००१) यूनेस्कोच्या ध्येयधोरणांची कार्यसूची निश्चित करण्यात आली. तीनुसार सहा प्रमुख उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली. त्यांपैकी २००५ पर्यंत शिक्षणातील लिंगभेद नष्ट करून सर्व मुलामुलींना समान तत्त्वावर शिक्षण दयावे आणि २०१५ पर्यंत प्राथमिक शिक्षण सर्व मुलांना उपलब्ध करावे, हे दोन महत्त्वाचे ठराव संमत झाले.

विसाव्या शतकाच्या मध्यास १९५०-६० दरम्यान अनेक अविकसित देशांनी संयुक्त राष्ट्रे (यूएन्) या संघटनेचे सदस्यत्व घेतले. त्या देशांना आधार देण्याचे उद्दिष्ट यूनेस्कोने ठरविले आणि तेथील शैक्षणिक व वैज्ञानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर विकसनशील देशांनाही सढळ हाताने साहाय्य केले परंतु साधारणत: १९८०-९० च्या दशकात अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि त्याची मित्र राष्ट्रे यांनी यूनेस्कोच्या आर्थिक धोरणावर व सांस्कृतिक मुदयां- बाबतच्या त्यांच्या पाश्चात्त्य विरोधी कार्यपद्धतीवर टीका केली. अमेरिकेने आपले सदस्यत्व काढून घेतले (१९८४). त्यानंतर ग्रेट ब्रिटन व सिंगापूर यांनीही आपले सदस्यत्व रद्द केले (१९८५) तथापि या आरोपांचे खंडन करून यूनेस्कोने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर ग्रेट ब्रिटन व सिंगापूरने सदस्यत्व पुन्हा स्वीकारले (१९९७) आणि अमेरिकेने २००३ मध्ये यूनेस्कोशी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन सदस्यत्वाचे नूतनीकरण केले.

यूनेस्कोचा प्रामुख्याने शैक्षणिक आणि वैज्ञानिक कार्यकमांवर भर असला, तरी पर्यावरण आणि सांस्कृतिक स्मारके (ऐतिहासिक वारसा) यांच्या जतन-संवर्धनावरही त्याने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ईजिप्तमध्ये बांधलेल्या आस्वान धरणामुळे त्याच्या नासर जलाशयामध्ये प्राचीन ईजिप्शियन स्मारके (विशेषत: जगप्रसिद्ध अबू सिंबेल) जाण्याचा धोका निर्माण झाला होता. हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा व प्राचीन सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी यूनेस्कोने ईजिप्त शासन आणि अन्य पन्नास देशांतील अभियंते व शास्त्रज्ञ यांच्या सहकार्याने त्या स्मारकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले (१९६४-६६). त्यानंतर लगेचच यूनेस्कोने १९७२ मध्ये एका आंतरराष्ट्रीय करारान्वये जगातील ऐतिहासिक-सांस्कृतिक स्मारके आणि महत्त्वाची निसर्गरम्य स्थळे यांची सूची तयार करण्याची योजना आखली आणि संबंधित देशांना अशा स्थळांचे संरक्षण व काळजी घेण्याचे आवाहन केले. या यादीत भारतातील आग्याचा किल्ल व ताजमहाल, अजिंठा लेणी, सांची स्तूप, वेरूळ, फतेपूर सीकी, कोणार्क (सूर्यमंदिर), खजुराहो इ. महत्त्वाच्या स्थळांचा आणि काझिरंगा राष्ट्रीय उदयान, मानस वाईल्ड लाइफ सँक्च्युरी, नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नॅशनल पार्क, सुंदरबन राष्ट्रीय उदयान आदींचा समावेश आहे तसेच विसाव्या शतकाच्या अखेरीस संगणकाच्या वापरामुळे माहिती व तंत्रज्ञान आणि संदेशवहन यांत आमूलाग्र प्रगती झाल्याने यूनेस्कोने त्याच्या अभ्यासकमावर भर दिला आणि संदेशवहन व माहितीचे स्वातंत्र्य हे मूलभूत मानवी हक्क ठरविले. त्यामुळे विकसित देश आणि विकसनशील देश यांतील आदान-प्रदानाची दरी कमी झाली.

यूनेस्कोला सामाजिक-आर्थिक तसेच सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्षेत्रांत जागतिक बँक, युनिसेफ, वर्ल्ड फुड प्रोगॅम, यूएन् रेलिफ अँड वर्क्स एजन्सी, जागतिक आरोग्य संघटना, अन्न व कृषी संघटना इ. संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारीतील अन्य संस्था सहकार्य करीत असतात. यांशिवाय सु. ४०० आंतरराष्ट्रीय स्तरांवर कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था प्रसंगोपात्त मदत करतात. यूनेस्कोच्या सभासद देशांनी स्थानिक तज्ज्ञांचे राष्ट्रीय आयोग स्थापन केले असून त्या त्या देशात हे आयोग शासकीय सल्लगार म्हणून काम पाहतात.

यूनेस्कोने तिसऱ्या जगातील विकसनशील देशांसाठी वैज्ञानिक धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार पर्यावरण आणि नैसर्गिक संपत्ती यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी तांत्रिक व वैज्ञानिक क्षेत्रांत संशोधन, सहकार्य आणि आदान-प्रदान यांना उत्तेजन देण्याचे धोरण ठरविले असून आवश्यक ते अर्थ साहाय्य दिले जाते. यूनेस्कोकडून त्सुनामी, भूकंप, दुष्काळ, अवर्षण आदी नैसर्गिक आपत्तींत मदत दिली जाते. जागतिक शांतता व मानवी हक्क यांबाबतीतही ही संघटना कृतिशील आहे. त्सुनामी लाटांमुळे डिसेंबर २००४ मध्ये हिंदी महासागराच्या किनारी भागांतील पीडित देशांचे पुनर्वसन करण्याच्या कामी यूनेस्कोने विधायक पावले टाकली होती. यूनेस्कोचा द्वैवार्षिक अर्थसंकल्प ६१० दशलक्ष अमेरिकी डॉलर होता (२००४-२००५).

द इंटरनॅशनल ब्यूरो ऑफ एज्युकेशन (जिनीव्हा), द यूनेस्को इन्स्टिटयूट ऑफ एज्युकेशन (हँबर्ग), द इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर एज्युकेशनल प्लॅनिंग (पॅरिस), द इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर कपॅसिटी बिल्डिंग इन् आफ्रिका (अदिस अबाबा), द इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर हायर एज्युकेशन इन् लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबियन (काराकास), द इन्स्टिटयूट फॉर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीज इन् एज्युकेशन (मॉस्को), द यूनेस्को इन्स्टिटयूट फॉर स्टॅटिस्टिक्स (माँट्रिऑल), द इन्स्टिटयूट फॉर वॉटर एज्युकेशन (डेल्फ्ट), द यूनेस्को इंटरनॅशनल सेंटर फॉर टेक्निकल अँड व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (बॉन), द इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स आणि द थर्ड वर्ल्ड ॲकॅडेमी ऑफ सायन्सीस (दोन्ही टीएस्ट) व यूरोपियन सेंटर फॉर हायर एज्युकेशन (बूकारेस्ट) अशा बारा यूनेस्कोच्या साहाय्यकारी स्वतंत्र संस्था असून, त्या विविध वैकासिक कार्यात कृतिशील आहेत. यूनेस्कोच्या कार्याची, धोरणांची सविस्तर माहिती म्यूझीयम इंटरनॅशनल, इंटरनॅशनल सोशल सायन्स जर्नल, द न्यू कुरिअर, प्रॉस्पेक्ट्स, कॉपिराइट बुलेटिन, वर्ल्ड हेरिटेज रिव्ह्यू आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध करण्यात येते.

देशपांडे, सु. र.