विजापूरकर, विष्णु गोविंद: (२६ ऑगस्ट १८६३−१ ऑगस्ट १९२६). धर्मसुधारक, थोर विचारवंत व राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते. कोल्हापूर येथे जन्म. देशपांडे हे यांचे मूळचे आडनाव. त्रिजापुर (कर्नाटक राज्य) येथील प्रदीर्घ रहिवासामुळे देशपांडे कुटुंबास ‘विजापूरकर’हे आडनाव मिळाले. वडील गोविंदराव अण्णा विजापूरकर हे माध्व वैष्णव संप्रदायी ब्राह्मण व प्राथमिक शिक्षक, तर आई-रूक्मिणीबाई-कोल्हापूरच्या तात्यासाहेब दिवाणाची सुकन्या होती.

विजापूरकरांचे प्रारंभिक शिक्षण माता-पित्यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राथमिक शिक्षण कागल (जि. कोल्हापूर) येथे, तर मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले. तत्कालीन मुंबई, प्रांतात ते मेट्रिकची परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. बी.ए. ही पदवी संस्कृत विषय घेऊन ‘भाऊ दाजी’ पारितोषिकासह (रूपये १७०) व पुढे त्याच विषयात एम्. ए. ही पदवी (१८९३) त्यांनी संपादन केली. प्राच्यविद्यासंशोधक रा. गो. भांडारकर यांचे विजापुरकर हे आवडते विद्यार्थी होते. पुण्याचे डेक्कन कॉलेज (१८८६-८८), अहमदाबाद विद्यालय आणि कोल्हापुरचे राजाराम महाविद्यालय येथे त्यांनी अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली (१८९४−१९०४).

सनातनी व सुधारक मतांत समन्वय घडवून आणण्याचा विजापूरकरांचा प्रयत्न होता. साधी राहणी, उच्च विचारसरणी, नम्रता, निस्वार्थी वृत्ती, राष्ट्रनिष्ठा, समाजसेवेची आवड व निस्सीम ध्येयवाद असा त्यांचा बाणा होता. ज्ञानेश्वरी त्यांच्या जीवनाचा दीपस्तंभ होता. एकनाथ, तुकाराम, समर्थ रामदास, कबीर इत्यादींचे वाङ्मय तसेच एडमंड बर्क (१७२९−९७) या राजकीय विचारवंताचे फ्रेंच राज्यक्रांतीवरील लेख, राल्फ वॉल्डो एमर्सन यांचे वैचारिक निबंध, बायबल इ. पाश्चिमात्य साहित्याने त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. बालविवाह-प्रथा बंद होऊन तीऐवजी पुनर्विवाह पद्धतीच्या अवलंबनासाठी त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. वस्तुनिष्ठ सिद्धांताऐवजी उपयुक्ततेच्या तत्त्वावर स्त्रीशिक्षण दिले जावे, असे विजपूरकर यांचे मत होते. या सुधारणावादी धोरणातही त्यांचा जातिनिष्ठेवर विश्वास होता. पाश्चिमात्य शिक्षण विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक जीवन व संस्कृती ह्या मूल प्रवाहापासून विभक्त करते, असे विजापूरकरांचे मत होते. म्हणून त्यांनी प्रामुख्याने भारतीय विद्यापीठंच्या स्थापनेवर भर दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रनिष्ठा, जीवन व संस्कृतीचा वारसा लाभेल तसेच समाज, साहित्य यांच्या संगोपनाचा व अध्यायनाचालाभ होईल, असे त्यांचे मत होते. परदेशी वस्तूंवर बहिष्कार, स्वदेशी वस्तूंचा वापर व राष्ट्रीय शिक्षणाचे संवर्धन या त्रयींवर त्यांची राष्ट्रभक्ती आधारलेली होती. शैक्षणिक धेरणातील बदल, विदेशी वस्तूंवरील बहिष्कार व स्वदेशी वृत्तपत्रांचा प्रसार यांपासूनच स्वातंत्र्याचा लढा सुरू होतो सर्वसामान्य भाषामाध्यम राष्ट्रीय ऐक्य साधू शकते, यांवरही त्यांनी विशेष भर दिला. विणकाम, सूतकताई, लाकूडकाम, कुंभारकाम, काचनिर्मिती इ. उद्योगधंद्यांची उभारणी प्रगतीचे व आर्थिक विकासाचे साधन आहे त्या अनुषंगाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे धोरण ठरवावे, असे विजापूरकरांचे मत होते. उपनिषदे व समर्थ संप्रदाय यांची त्यांच्यावर विशेष छाप होती.

ग्रंथमाला (मराठी मासिक १८९४−१९०६), विश्ववृत्त (१९०६−०९), समर्थ (१८९८−१९०८) इ. मासिकांचे विजापूरकरांनी संपादन केले. समर्थमधून ते कोल्हापूर संस्थानच्या कारभारावर टीका करीत असत. स्वतः विजापूरकरांनी फ्रीमनकृत यूरोपचे संक्षिप्त इतिवृत्त हे भाषांतर ग्रंथमालेतून क्रमशः प्रसिद्ध केले. पारतंत्र्यातील नागरिकांची अंधश्रद्धा कमी होऊन विवेकशक्ती वाढावी, सारासार विचार त्यांच्या अंगी बाणावा, हा विजापूरकरांच्या ग्रंथमालेचा उद्देश होता. विश्ववृत्तातील ‘वैदिक धर्माची तेजस्विता’ या श्री. दा. सातवळेकरांनी लिहिलेल्या लेखावरून संपादक म्हणून त्यांना तीन वर्षांची शिक्षा झाली. विविध लेखांचे संपादन, ग्रंथपरीक्षणही त्यांनी केले. बनारसच्या सामाजिक परिषदेतून (१९०५), तळेगाव-दाभाडेच्या नवीन समर्थ विद्यालयातून (१९१८) धर्मातील शिक्षण व स्त्रीशिक्षण या विषयांवर त्यांनी दिलेली व्याख्याने अतिशय गाजली. परतंत्र भारतीय युवकांत राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राइज ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एसेज-मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या न्यायमुर्ती रानडे यांच्या ग्रंथाचा हा मराठी अनुवाद ग्रंथमालेतून त्यांनी प्रसिद्ध केला. विजापूरकर हे ‘राष्ट्रीय शिक्षणाचे शिवाजी’ म्हणून ओळखले जाते. पारतंत्र्यकालीन भारतात राष्ट्रीय शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यात विजापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे.

संदर्भ: देशपांडे, मु. गो., संपा., प्रो. विजापूरकर यांचे लेख, पुणे, १९६३.

मिसार, म. व्यं.