विक्रमशिला विद्यापीठ : बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ. तिबेटी परंपरेनुसार मगधचा पालवंशी राजा धर्मपाल (कार. ७८०−८१५) याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता आणि त्याने विक्रमशिला विहाराची स्थापना केली. या विहाराला विक्रम नावाच्या यक्षाचे नाव देण्यात आले. या विहाराची पुढे प्रसिद्धी ‘विक्रमशिला विद्यापीठा’त परिणती झाली. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव विक्रमशीला ठेवण्यात आले. या विद्यापीठाच्या निश्चित स्थानाविषयी विद्वानांत मतभेद संभवतात. तथापि ते प्राचीन मगध देशात गंगेच्या काठी एका टेकडीवर, प्रामुख्याने भालपुरजवळ, पाथरघाट टेकडीवर, वसले होते, असे आता निश्चित झाले आहे. फणींद्रणाथ बोस यांच्या मते ते भागलपूर परगाण्यात एका टेकडीवर असावे. नंदलाल डे आणि प्राच्याविद्यापंडित अ. स. अळतेकर, अंग राज्याची राजधानी असलेल्या चंपनगराच्या पूर्वेला ३८ किमी. दूर असलेले पाथरघाटनामक स्थान म्हणजेच विक्रमशिला असावे, या मताचे आहेत. या ठिकाणाला १८९१ साली बुचानन याने प्रथम भेट दिली. सतीशचंद्र विद्याभूषण यांनी मात्र सुलतानगंज (मागलपूर जिल्हा) हे स्थान म्हणजेच विक्रमशीला हे निश्चित केले आहे. पाटणा विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास व संस्कृती या विभागाने १९६० ते ६९ मध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अँटिकच येथे उत्खनन केले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यानेही १९७२-७३ पासून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून विक्रमशीला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. तेथील भव्य मठ, पाषाणाच्या बुद्धप्रतिमा, मोहोरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात.

धर्मपाल राजाने महाविहार बांधून बौद्ध धर्मांच्या ४ प्रमुख पंथांचे प्रत्येकी २७ असे एकशेआठ अध्यापक चार विभागांत नेमले आणि महाविहारास देणग्या दिल्या. नंतरच्या पाल राजांनीही विद्यापीठास उदारपणाने आर्थिक साहाय्य केले. इतर धनिकांनीही त्यास देणग्या दिल्या. महाविहारासभोवती तटबंदी असून चार दिशांना महाद्वारे होती. प्रत्येक प्रवेशद्वारावर एक प्रवेशपरिक्षागृह होते. राजा देवपाल याने (कार. ८१५−८५५) आणखी दोन प्रवेशपरिक्षागृहे बांधली. या प्रत्येक द्वारावर विद्वान पंडिताची नेमणूक केलेली होती. रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे यांपैकी काही विद्वान पंडित होते. हे सहा विहारांचे प्रमुख आचार्य होते. या आचार्यांपैकी काही विख्यात नैयायिक होते. विहाराच्या मध्यभागी महाबोधीची कलाकृती असलेले देवालय व अन्य १०८ देवालये होती. केंद्रस्थानी असलेल्या विहारास ‘विज्ञानगृह’ म्हणत. यांशिवाय येथे एक विशाल सभाभवन होते. त्यात एका वेळी आठ हजार व्यक्तींची बसण्याची सोय होती. प्रवेशद्वारात उजव्या बाजूस नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुनाचे चित्र होते, तर डाव्या बाजूस याच विद्यापीठाचे प्रमुख ⇨अतीश दीपंकराचे चित्र होते. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांची येथे विनामुल्य निवासभोजनाची व्यवस्था असे. विद्यापीठात परदेशांतून तसेच भारतातील विविध भागांतून अध्ययनासाठी विद्यार्थी येत. द्वारस्थ आचार्यांकडून परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना प्रवेश मिळे. तिबेटी भिक्षू येथे अध्ययन करून संस्कृत ग्रंथांचा तिबेटी भाषेत अनुवाद करीत. विद्यापीठीय परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांस पंडीत, महापंडित इ. पदव्या राजदरबारात देण्यात येत व अशा पंडितांना ‘राजपंडित’ हे बिरूद मिळे. अशा प्रख्यात राजपंडितांमध्ये आचार्य रत्नकीर्ती, जेतारी, ज्ञानश्रीमित्र, अतीश दीपंकर, रत्नवज्र, वागीश्वरकीर्ती इत्यादींचा अंतर्भाव होता. येथील ग्रंथालय समृद्ध होते. बौद्ध धर्मातील विविध संप्रदाय, वेद, अध्यात्मविद्या, व्याकरण, न्यायशास्त्र इ. विषयांचे येथे अध्यापन होई. तंत्रमार्गाच्या अध्यापनावर, विशेषतः वज्रयान व सहजयान यांवर, येथे विशेषभर होता. कारण इ. स. दहाव्या-अकराव्या शतकांत तंत्रमार्ग आणि तांत्रिक साधना हे बौद्ध धर्माचे प्रमुख अंग बनले होते. शिवाय न्यायशास्त्रातही ते प्रावीण होते. विद्यापीठाचे प्रशासन महाधिपतींकडे असून त्यांच्या मदतीला सहा आचार्यांचे मंडळ असे. काही काळ नालंदा विद्यापीठाचा कारभारही या मंडळाच्या नियंत्रणाखाली होता. तेथील प्रशासन उत्कृष्ट होते. ह्यूएनत्संग (सु. ६०२-६६४) व इत्सिंग (सू. ६३४−७१३) ह्या चिनी प्रवाशांच्या वृत्तांतून या विद्यापीठाचे कार्य व प्रगती यांबाबत माहिती मिळते.

खल्जी घराण्यातील महम्मद बिन बख्तियार याने बाराव्या शतकाच्या अखेरीस बिहारवर स्वाऱ्या केल्या, पाल राजा गोविंद याचा पराभव करून त्याची राजधानी ओदंतपुरी ही जिंकून घेतली. विक्रमशिला विहाराभोवतालच्या भिंती बख्तियारला किल्ल्याचा तट वाटल्यामुळे त्यांवर हल्ला करून त्याने संपूर्ण ग्रंथालय जाळले व तेथील ब्राह्मणांना व भिक्षूंना कंठस्नान घातले (११९२). तसेच त्याने विक्रमशिला आणि नालंदा या विद्यापीठांचा विध्वंस केला.

संदर्भ : 1. Altekar, A. S. Education in Ancient India, Banaras, 1934.

            2. Majumdar, R. C. Ed. The Age of Impertal Kanauj, Bombay, 1964.

            3. Mookerji, Radha Kumud, Ancient Indian Education, Delhi, 1960.

           4. Rawat, P. L. History of Indian Education, Agra, 1968.

          ५. तवकर, ना. गो. प्राचीन भारतीय विद्यापीठे, मुंबई, १९५०.

          ६. देशपांडे, के. ना. माळी, आ. ल. प्राचीन काळातील शिक्षण, पुणे, १९८४.

देव, शां. भा.