संभळ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यातील एक शहर. ते मुरादाबादच्या नैऋर्त्येस सु. ३५ किमी. अंतरावर राज्य महामार्गावर वसले आहे. उत्तर रेल्वेचे ते एक स्थानक (हतीमसरई) आहे. त्याचे क्षेत्रफळ ६.२२ चौ. किमी. असून लोकसंख्या १,०८,२३२ (१९८१) होती. संभळ तहसीलाचे हे मुख्य ठिकाण आहे.
संभळचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. पुराणकथेनुसार कलियुगाच्या अखेरीस कल्कीचा अवतार या गावी होणार असल्याचे म्हटले जाते. इ. स. अकराव्या-बाराव्या शतकांत हा प्रदेश तोमर आणि चाहमान (चौहान) वंशांच्या अखत्यारीत होता. कनोजचा गाहडवाल राजा जयचंद आणि पृथ्वीराज (कार. ११७७-९२) यांत संभळनजीक युद्ध होऊन जयचंदाचा पराभव झाला. पुढे हे शहर दिल्लीच्या सुलतानांच्या अंमलाखाली आले. अफगाण मुसलमानांच्या आक्रमणाला ते १३४६ मध्ये बळी पडले. पंधराव्या शतकात चार वर्षे येथे सिकंदर लोदीची राजधानी होती. बादशहा हुमायूनने ते सुरी राजांकडून १५५६ मध्ये जिंकून बैरामखानास (अकबराचे गुरू) आंदण दिले. पुढे शाहजहानने मुरादाबाद ही नवीन नगरी वसविल्यानंतर संभळचे महत्त्व कमी झाले. पेंढारी नेता अमीरखान (१७६८-१८३८) याची संभळ ही जन्मभूमी असून, त्याने यशवंतराव होळकरांच्या मदतीने टोंक संस्थान स्थापिले. त्यास ब्रिटिशांनीही मान्यता दिली. त्याचा मुलगा वझीर मुहम्मद याने १८५७ च्या उठावात इंग्रजांना सहकार्य केले. भारतीय स्वातंत्र्यापर्यंत हे शहर ब्रिटिशांच्या अंमलाखाली होते.
शहरात मध्ययुगीन किल्ल्याचे अवशेष आढळतात. किल्ल्यात हरिमंदिर होते. अबुल फज्ल याने आईन-इ-अकबरी मध्ये उल्लेखिलेले विष्णुमंदिर ते हेच असावे. त्या ठिकाणी एक मशीद असून तिचा घुमट कलाकुसरयुक्त आहे. शहराच्या सुरथल भागात भोलेश्वर व बिटकेश्वर नामक दोन टेकडया आहेत. सराई तरीन भागात शाहजादा अर्बियन याने १५५९ मध्ये बांधलेली जामा मशीद असून, जवळच जुनी भव्य विहीर व तिला लागून फत्तेह-उल्लह शाह या मुस्लिम साधूचे थडगे आहे. तिथे वार्षिक उरूस भरतो. दुसरी एक मशीद नवाब अमीनुद्दौला यांनी सराई भागात १७५४ मध्ये बांधली होती.
देशपांडे, सु. र.