संपातचलन : खगोलावरील क्रांतिवृत्त व विषुववृत्त एकमेकांस ज्या दोन बिंदूंत छेदतात त्यांना अयनबिंदू , संपात अथवा संपातबिंदू म्हणतात. दोन संपातांपैकी ज्या बिंदूशी क्रांतिवृत्त (आयनिक वृत्त) विषुव-वृत्ताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते त्या बिंदूस मेषसंपात किंवा वसंत- संपात असे म्हणतात. याच्या समोरचा दुसरा छेदनबिंदू की, जेथे क्रांतिवृत्त विषुववृत्ताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाते त्याला तूळसंपात किंवा शरत् संपात असे म्हणतात. फार पूर्वी राशिचकारंभ बिंदू म्हणजेच मेषादिबिंदू व वसंतसंपात हे एकत्र होते, तेव्हा वसंतसंपातास मेषसंपात म्हणणे संयुक्तिक होते, पण संपातबिंदूंना विलोम (उलट) गती आहे, हे समजल्या- पासून वसंतसंपातास मेषसंपात म्हणता येत नाही व शरत् संपातास तूळसंपात म्हणता येत नाही.
अयनबिंदू हे क्रांतिवृत्तावरून मागे जात असावेत, म्हणजे त्यांना विलोम गती असावी असे प्रथम हिपार्कस या ग्रीक ज्योतिर्विदांना इ. स. १२५ मध्ये आढळून आले. त्यांच्या हिशोबी वसंतसंपात दरवर्षी क्रांतिवृत्तावरून ५९ विकला (सेकंद) इतका मागे जातो. अदययावत गणिताने ही गती ५०.२ विकला एवढी येते. सूर्य एखादया नक्षत्री असतो तेव्हापासून तो पुन्हा त्याच नक्षत्री येईपर्यंतच्या काळास नाक्षत्र वर्ष म्हणतात पण तो एका अयनबिंदूशी असताना पुन्हा त्याच अयनबिंदूशी येण्याच्या काळाला सांपातिक वर्ष म्हणतात. यांतील नाक्षत्र वर्ष हे सांपातिक वर्षापेक्षा २० मि. २३ सेकंदांनी मोठे असते. यावरून संपात- बिंदू (अयनबिंदू) कोणत्या तरी कारणाने मागे चळत असावे हे हिपार्कस यांना समजले, पण त्याचे कारण मात्र त्यांना सांगता आले नाही.
सांप्रत (२००० सालच्या सुमारास) राशींची नावे व राशिचकावरील नक्षत्रे यांचा संबंध पाश्चात्त्य ज्योतिषशास्त्रातही राहिलेला नाही. ४४४ साला-पावेतो मेषादि आणि वसंतसंपात हे एकत्र होते. भारतीय ज्योतिर्विदांना संपातचलन होते ही गोष्ट बरीच वर्षे ठाऊक नसल्याने, किंवा संपातचलन हिशोबात घेतले नाही तरी चालेल हा अपसमज दृढ असल्याने अजूनही आपण शुद्घ निरयन म्हणजे शून्य अयनांशाची पंचांगे वापरतो. पाश्चात्त्य कालगणना ही सायन म्हणजे वसंतसंपाताची गती हिशोबात धरणारी असते. त्यामुळे त्यांच्याही राशिचकात मेळ राहिलेला नाही. वसंतसंपात मीन राशीत २३° ४०‘ इतका मागे आला आहे म्हणजे नव्या मेष राशीत जुनी मीन रास व जुनी मेष रास यांचा अंतर्भाव झाला आहे. या २३° ४०’ या संख्येस अयनांश म्हणतात. यामुळे ४ फेबुवारी १९६२ रोजी भारतात अष्टग्रही निरयन गणना झाली, परंतु यूरोप व अमेरिका यांत कोठेही अष्टग्रहीचा उल्लेख नाही.
संपातचलन का होत असावे याचा विचार करताना, सर आयझॅक न्यूटन आणि तत्कालीन गणिती यांना असे दिसून आले की, याचा संबंध सूर्य व चंद्र यांच्या पृथ्वीवर असलेल्या गुरूत्वाकर्षणाशी असावा. पृथ्वी पूर्वी गोलाकार असली, तरी अनेक कोटी वर्षांच्या भ्रमणाने तिचा विषुव-वृत्तीय भाग फुगला असून ती धुवांकडे चपटी झाली आहे. त्यामुळे चांद्रसौर संकृष्टीचा (ओढीचा) परिणाम विषुववृत्तीय भागावर जास्त होतो. पृथ्वीचा आस हा क्रांतिवृत्ताच्या लंबाशी २३° ३०’ इतका कोन करीत असल्याने, या संकृष्टीचा परिणाम पृथ्वीच्या विषुववृत्ताची पातळी उचलून ती क्रांतिवृत्ताच्या पातळीत आणण्याकडे होत असतो. म्हणजेच आकाशातील शाश्वतिक बिंदू कदंबाकडे (आयनिक उत्तरधुवाकडे) खेचण्यात होतो. परंतु पृथ्वीची भ्रमणगती वेगळी असल्याने प्रत्यक्षात असे न घडता अयनबिंदू मात्र क्रांतिवृत्तावरून मागे जातो. यालाच चांद्रसौर-प्रतिगमन असे म्हणतात.
हे कसे घडते ते फिरत्या भोवऱ्याकडे पाहिल्यास सहज समजते. ज्या वेळी भोवरा जमिनीवर फिरतो तेव्हा त्याची आर जमिनीवर स्थिर असते परंतु त्याचा आस मात्र ओळंब्याशी तिरकस असतो. भोवऱ्याचा आस भूलंबरेषेभोवती शंक्वाकार गतीने घिरटया घालीत असतो व त्याच वेळी भोवऱ्याचा पिंड आसाभोवती वाटोळा फिरत असतो. यात पुन्हा भोवऱ्याच्या वजनामुळे त्याचा अक्ष भूपातळीकडे ओढला जात असतोच. त्यामुळे भोवऱ्याचे डोके अक्षाभोवती पिंगा घालते ते वेगळेच. अगदी असाच प्रकार पृथ्वीच्या आसावर होतो. त्यामुळे पृथ्वीचा आस खगोलास जेथे मिळतो तो शाश्वतिक बिंदू कदंबाभोवती २३° ३०’ त्रिज्येच्या लघुत्रावरून फिरू लागतो. फक्त त्याची दिशा भोगांश दिशेच्या उलट असते. यामुळे अयनबिंदू क्रांतिवृत्ताची एक प्रदक्षिणा २५,७८० वर्षांत पूर्ण करतात. प्रत्यक्षात हे वर्तुळ नसून नागमोडी आकाराचे वर्तुळ आहे. म्हणजे वर्तुळपरिघावर काढलेला हा ‘ ज्या ’ वक आहे. याचाच अर्थ कदंबापासून धुवाचे अंतर २३° ३०‘ अलीकडे-पलीकडे कमी-जास्त होते. या परिणामास अक्षांदोलन म्हणतात. [→ अक्षांदोलन].
संपातचलनाचा परिणाम भोगांश, विषुवांश व कांती यांवर होतो [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. क्रांतिवृत्त विभाग म्हणून मानलेल्या राशी आणि ग्रीक किंवा भारतीय राशिचकांत नक्षत्रभूत मानलेल्या राशी यांचा मेळ बसत नाही. ज्यास आपण धुवतारा म्हणतो त्याजवळ असलेला शाश्वतिक बिंदू १२,००० वर्षांनी अभिजित नक्षत्रा-जवळ येईल. संपातचलनासाठी मराठी विश्र्वकोशा च्या चौथ्या खंडातील ‘क्रांतिवृत्त’ या नोंदीतील (पृष्ठ क. ४४७ वरील) आकृत्या पहाव्यात.
भारतीय पंचांगे निरयन राहिल्याने व पाश्चात्त्यांची पंचागे सायन राहिल्याने आज भारतात निरयन, टिळक व शुद्ध सायन अशी अनेक पंचांगे उपलब्ध झाली आहेत. फलज्योतिषातही अनेक घोटाळे यामुळे निर्माण झाले आहेत.
पहा : अक्षांदोलन क्रांतिवृत्त संपात.
फडके, ना. ह.