संपदा व्यवस्थापन : (इस्टेट मॅनेजमेंट). संपत्तीच्या देखभालीची व्यवस्था म्हणजे संपदा व्यवस्थापन. इस्टेट ह्या इंग्रजी शब्दाचा विविध   अर्थाने उपयोग केलेला आढळून येतो. इस्टेट जनरल ह्या शब्दाला यूरोपच्या इतिहासाचा संदर्भ आहे. मध्ययुगात यूरोपमध्ये जमीनदारी पद्धत प्रचलित  होती. त्याकाळातील संपत्तीचे प्रमुख रूप म्हणजे जमीन. जमीनदारांकडे खूप जमीन असे त्यावर अनेक मजूर काम करत. लोकशाहीची सुरूवात  ह्या जमीनदारांनी राजाकडे केलेल्या मागण्यांमधून झाली. राजाला जमीन- दारांचे सल्लगार मंडळ नेमावे लागले. उमराव व जमीनदारांच्या ह्या प्राति-निधिक मंडळास इस्टेट जनरल म्हणत. म्हणजेच संपत्ती मालकांच्या प्रातिनिधिक मंडळास इस्टेट जनरल म्हणत.

इस्टेट हा शब्द ‘मळा’ (प्लँटेशन) ह्या अर्थानेही वापरलेला आढळतो. विशेषतः ऊसमळे, चहामळे, द्राक्षमळे, कॉफीमळे ह्या संदर्भातही इस्टेट  हा शब्द वापरला जातो. ह्या ठिकाणीही ‘इस्टेट’ ही जमीनस्वरूपातील आहे. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत यूरोपियन राष्ट्रांनी यूरोपेतर देशांत  वसाहती स्थापन केल्या. ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, हॉलंड, जर्मनी आदी देशांनी आशिया, आफिका व अमेरिका ह्या खंडांतील अनेक देश पादाकांत केले. तेथील लोकांच्या जमिनी बळकावल्या आणि त्यांचा उपयोग प्रामुख्याने  व्यापारी शेतीसाठी केला. ऊस, केळी, द्राक्षे, चहा, कॉफी, कोको, नीळ, रबर, मसाल्याचे पदार्थ ही पिके मळ्यात घेतली जात. मळे आकाराने मोठे असत काही हजार हेक्टर क्षेत्रफळ एका मळ्याखाली असे. बहुतेक ठिकाणी सर्व जमीन कोणत्यातरी एकाच पिकाखाली असे. मळ्याचा  मालक यूरोपियन असे. काही ठिकाणी मालकी व व्यवस्थापनासाठी  कंपनी तसेच संयुक्त भांडवल मंडळी स्थापन झाल्या. मळ्यात घेण्यात  येणारे पीक हे मुख्यत्वेकरून व्यापारी पीक असे. अन्नधान्य क्वचितच पिकविले जाई. एकोणिसाव्या शतकात खादयपेयांवर नियंत्रण मिळविण्यासाठी यूरोपियन देशांमध्ये तीव स्पर्धा सुरू झाली. चहा, कॉफी व कोको ही पेये यूरोपसारख्या थंड प्रदेशात येणे शक्य नव्हते. ऊस, केळी, कापूस पिकविणारे देशही मूलतः यूरोपेतर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात ह्या शेतीउत्पन्नांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने उष्णकटिबंधातील देशांवर व त्याव्दारे जमिनीवर यूरोपियन देशांनी मालकी हक्क मिळविले. ह्या प्रयत्नांतूनच वसाहती निर्माण झाल्या. मळा हा श्रमप्रधान व्यवसाय आहे. त्यासाठी खूप मोठया प्रमाणावर मजूर लागत [→ शेतमजूर]. ह्यातूनच ‘गुलामगिरी ’ ही संस्था अस्तित्वात आली. मजुरांचा बाजार भरू लागला. विशेषतः आफिकेतून गुलाम खरेदी करून ते अमेरिकेतील शेतमळ्यांवर कामासाठी वापरू लागले. गुलामांकडून सक्तीने श्रम करून घेतले जात. त्यामुळे मानवी मूल्यांची पायमल्ली होई. परंतु गुलामांशिवाय ह्या मळ्यांचे अर्थकारण अशक्यच होते. गुलामीला पर्याय म्हणून कंत्राटी कामगार हा प्रकार विशेषतः ब्रिटिश वसाहतीत प्रचलित झाला. ब्रिटिशांनी भारतातून अनेक मजूर त्यांच्या इतर वसाहतींतील मळ्यांवर नेले. श्रीलंका, मलेशिया, गुयाना, फिजी, मॉरिशस इ. प्रदेशांतील ब्रिटिश मळ्यांवर भारतीय मजूर ब्रिटनला नेणे शक्य झाले. ब्रिटनला हक्काचा श्रमपुरवठा भारतासारख्या वसाहतीपासून झाला. त्या कामगारांचे जीवनही अर्धगुलामां-प्रमाणेच होते. पुढे गुलामांच्या व्यापारावर जागतिक बंदी घालण्यात आली आणि सहज रीत्या उपलब्ध होणारा गुलामांचा पुरवठा खंडित झाला. मळ्यांच्या अर्थशास्त्राला धक्का बसला. यामुळे व शेतीव्यवस्थापनातील नवीन तंत्रज्ञानामुळे मळ्यांचे स्वरूप बदलले. ऊस, नीळ, मसाल्याचे पदार्थ, द्राक्षे ह्यांचे उत्पादन लहान शेतकृयांमार्फत होऊ लागले. सहकार युग सुरू झाले आणि जमीन ह्या संपत्तीचे व्यवस्थापन नव्या स्वरूपात होऊ लागले.

एकोणिसाव्या शतकात वाफेच्या एंजिनाचा शोध लागला आणि औदयोगिक कांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. उदयोगधंदयांचे स्वरूप बदलले, कारखानदारीचा प्रचार झाला, मोठया स्वरूपात बाजारपेठांसाठी वस्तुनिर्मिती होऊ लागली. इतके दिवस निसर्गनिर्मित जमिनीसारखी संपत्ती व त्याचे व्यवस्थापन एवढेच प्रश्न होते. औदयोगिक कांतीनंतर मानवनिर्मित संपत्ती मोठया प्रमाणावर निर्माण होऊ लागली आणि त्याच्या व्यवस्थापनाचे नवे पर्श्र्न निर्माण झाले.

ह्या नवनिर्मित औदयोगिक व व्यावसायिक सेवारूपातील संपदा (संपत्ती) हे नव्या काळाचे वैशिष्टय आहे. संपदा विविध प्रकारची असू शकते चल व अचल, वस्तूरूप व सेवारूप, सरूप व अरूप. पैसा, धनादेश, हुंडी इ. चल संपत्ती आहे तर जमीन, इमारत, यंत्रसामग्री इ. अचल रूपातील संपत्ती आहे. वाहतूक, विमा, कचेरी-व्यवस्थापन, कायदा, न्याय, जमाखर्च नोंदी, हिशेब, बँका ही सेवारूपातील संपत्ती आहे व त्यांना दृश्य-लांबी-रूंदी असलेले रूप नाही. मालकीहक्कानुसार ह्या संपत्तीचे वर्गीकरण केले जाते. खाजगी व सार्वजनिक संपत्ती असेही संपत्तीचे दोन प्रकार आढळतात.

पूर्वीच्या काळात मानवनिर्मित संपत्तीचे प्रमाण कमी होते व त्याची बाजारपेठही नव्हती. आधुनिक काळात मानवनिर्मित संपत्तीचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्याची खरेदीविक्री होते, तसेच मालकीहक्कही बदलतात. आधुनिक काळात स्वातंत्र्य, विशेषतः शासकीय नियंत्रणापासून मुक्ती ह्या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी संपत्तीचा मोठा उपयोग होतो. संपत्तीमुळे व्यक्तीला स्वातंत्र्य टिकविता येते, म्हणून बहुतेक सर्वत्र संपत्तीवरील अधिकार हा मूलभूत अधिकार मानला जातो. ह्यामुळेच संपत्तीची मालकी, तिचे संपादन,तिची विक्री,संपत्तीचे वारसा व विक्रीव्दारे हस्तांतरण, संपत्तीचा उपभोगह्यांसंबंधात प्रत्येक समाजात कायदे केले जातात व सामाजिक शांतता राहील, ह्याची काळजी घेतली जाते.


आधुनिक काळात ⇨ बाजारपेठ ह्या संकल्पनेस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ह्यामुळे संपदा व्यवस्थापनात संपत्तीचे मूल्यांकन महत्त्वाचे आहे. दोन हेक्टर जमीन, एक घर व एक मोटार ह्या तिघांची मिळून एकूण संपत्ती किती, हे जाणून घ्यायचे असेल, तर एखादया समान संदर्भ असणाऱ्या मापन संकल्पनेची आवश्यकता आहे. ती पैसा ह्या संकल्पनेने पूर्ण होते. संपत्तीचे पैशाच्या रूपात रूपांतर केले जाते. एखादया संपत्तीचे मूल्यमापन करावयाच्या विविध पद्धती आहेत. उदा., खरेदी किंमत. संपत्ती निर्मितीसाठी किती खर्च आला वा त्याची खरेदी कोणत्या किंमतीला केली, ह्यावर त्याची किंमत ठरविली जाते. हे त्या संपत्तीचे वास्तव मूल्य होय. हे मूल्य स्थिर असते व त्यात बदल होत नाही. त्यामुळे अनेकवेळा ते कालविसंगत ठरते. संपत्तीचा काही भाग दरवर्षी उपभोगला जातो. तेवढ्या प्रमाणात संपत्तीचे मूल्यही कमी होते. मूळ किंमतीतून त्यावर्षीची झीज (उपभोग) वजा करून आलेली किंमत, ही निव्वळ मूल्य म्हणून समजले जाते. अनेक ठिकाणी संपत्तीचा उपयोग काही उत्पन्न मिळविण्यासाठी केला जातो. अशा वेळी संपत्तीचे मूल्यमापन हे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पटीत केले जाते. व्यापारीतत्त्वावर उभारलेल्या इमारती वा कंपनीचे शेअर्स इत्यादींचे मूल्यांकन ह्या पद्धतीने करतात. मूल्यांकन बाजारातील किंमतीवर अवलंबून असते. ह्याला बाजारमूल्य असे म्हणतात. संपत्तीसाठी असलेली मागणी व त्याचा पुरवठा ह्यांवर बाजारमूल्य अवलंबून असते. ही बाजारकिंमत सतत बदलत असते. मागणी व पुरवठा ठरविणारे घटकही सतत बदलत असतात. त्यामुळे अनेकवेळा काही तात्कालिक कारणांमुळेही मूल्यमापन वेगळे होऊ शकते. उदा., महागाई. काही बाबतींत संपत्तीची खरेदी किंमत वा निर्मिती किंमत आणि बाजारमूल्य ह्यांत मोठा फरक पडतो. उदा., पेंटिंग्ज, जुनी दुर्मिळ पुस्तके, दागिने इत्यादी. अनेकवेळा संपत्तीच्या किंमतीत काळानुसार होणारा बदल मोठा असतो. उदा., नवीन झालेल्या बाजारामुळे, रस्त्यांमुळे वा तेथील नवीन वस्तीमुळे त्या ठिकाणच्या जमिनीची किंमत भरमसाठ वाढते. अशावेळी ह्या वाढलेल्या किंमतीचा फायदा संपत्तीचा मालक व समाज ह्यांनी कसा वाटून घ्यायचा, हा वादाचा विषय होतो.

नदी, डोंगर, आकाश, समुद्र इ. संपत्तीचे मूल्यमापन करणे कठिण असते. ह्यांची खरेदीविक्री होत नाही. त्यामुळे त्याचे बाजारमूल्य ठरविता येत नाही. त्यांच्या निर्मितीचा खर्च म्हटल्यास शून्य, म्हटल्यास अफाट आहे. डोंगर, नदी, नाले इ. सार्वजनिक संपत्ती ही कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नसते. तिचा उपभोग सर्वांना घेता आला पाहिजे. त्यामुळे तिचे व्यवस्थापन समाज करतो. सार्वजनिक पैशातून व्यवस्थापन केले जाते व लाभ सर्वांना मिळेल याची व्यवस्था केली जाते.

लौकिकमूल्य (गुड्‌विल) हीदेखील एक संपदा आहे पण ती अमूर्त स्वरूपात आहे. त्याचे मूल्यमापन करणे कठिण असते. व्यवसायात लौकिकमूल्य ही संपत्ती म्हणून दाखविली जाते. त्यासाठी जी किंमत दिली असेल, त्या किंमतीस हिशेबात लौकिकमूल्य दाखविण्याची प्रथा आहे. धंदयाचा जरी लौकिक मोठा असला, तरी त्यासाठी जर किंमत दिली नसेल,  तर संपत्ती हिशेबात धरत नाहीत. ð व्यापारचिन्हे व व्यापारनामे, प्रकाशन अधिकार, बौद्धीक संपदा हे अमूर्त संपत्तीचे प्रकार आहेत. नव्या  जगात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः आयुर्वेदा- सारख्या पुरातनकालीन बौद्धीक संपदांचे संरक्षण करणे, ही सार्वजनिक जबाबदारी आहे.

व्यवहारात उत्पन्न आणि संपत्ती ह्यांतील फरक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हा फरक सहज लक्षात येत नाही. आपल्याजवळील शंभर रूपये हे भांडवल (संपत्ती) आहे का उत्पन्न आहे, हे न समजल्याने माणसाच्या हातून संपत्तीचा उपयोग दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केला जातो व मोठी  अडचण निर्माण होते. उदा., बँकेतील ठेव ही आपली संपत्ती आहे व त्यावरील व्याज हे उत्पन्न आहे. व्यक्ती, व्यावसायिक संस्था व समाज हे सतत काळजी घेतात की, त्यांची संपदा सतत वृद्धीगत होईल.

आधुनिक जगात इमारत, यंत्रसामग्री अशा वस्तुरूप संपत्तीप्रमाणेच मानवी श्रम हीदेखील महत्त्वाची संपत्ती समजली जाते. व्यापारी संस्था व शासन ह्यांनी मानवी संपत्तीत सतत वाढ व्हावी, म्हणून स्वतंत्र विभाग (ह्यूमन रिर्सोसेस डेव्हलपमेंट) सुरू केलेले आहेत.

शिक्षणाच्या व्दारे मानवी संपत्तीचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न होत आहेत. मानवी संपत्तीचे व्यवस्थापन करताना मानवी इच्छा, आकांक्षा, भावना ह्यांचाही विचार करावा लागतो. यंत्र, इमारतरूपी संपत्ती यांच्या व्यवस्थापनात भावनांना महत्त्व नसते. ह्यांमुळेच मानवी श्रमरूपी संपत्तीचे जतन व वृद्धी अवघड होते.

खनिज तेल, कोळसा, लोखंड ह्यांसारखी नैसर्गिक संपत्ती जगात एकदाच निर्माण झालेली आहे. त्याचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे त्यांचा उपभोग विचारपूर्वक केला पाहिजे. वरील वस्तू एकदा संपल्या म्हणजे परत निर्माण होणार नाहीत. लोखंड, तांबे यांसारख्या धातूंचा साठा मर्यादित आहे परंतु त्यांचा परत परत उपयोग करता येतो. खनिज तेल, कोळसा ह्यांचा साठा मर्यादित तर आहेच पण त्यांचा पुनर्वापर करता येत नाही. शिवाय काही प्रकारच्या संपत्तीचा उपभोग घेत असताना, प्रदूषणाचा त्रास संभवतो. पारा, पेट्रोल, रॉकेल, कोळसा, युरेनियम इ. संपत्तींपासून निर्माण होणारे धोके लक्षात घेता त्यांची साठवण, उपभोग, त्यांवरील प्रक्रिया ह्यांबाबत अत्यंत काळजी घेणे जरूरीचे असते व त्यांच्या व्यवस्थापनाबाबत सरकारने समाजाच्या वतीने नियंत्रण ठेवावयास पाहिजे.

संपत्ती ही नाशवंत आहे. इमारत, यंत्रसामग्री ह्यांचा काही काळ उपभोग घेतल्यानंतर त्यांची उपयुक्तता कमी होत जाते व त्या संपत्तीची देखभाल करण्यासाठी करावा लागणारा खर्च वाढत जातो. त्यामुळे जुनी वस्तू टाकून दयावी लागते व नवीन वस्तू घ्यावी लागते किंवा निर्माण करावी लागते. ह्यासाठी दरवर्षी उपभोगांच्या प्रमाणात काही रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते, म्हणजे मूळ वस्तूऐवजी नवीन वस्तू घेणे अडचणीचे होत नाही. प्रत्येक मालमत्तेचे आयुर्मान व उपभोगाचे प्रमाण ठरवून दरवर्षीची झीज ठरविली जाते.

पहा : औदयोगिक क्रांति जमीन भूधारणपद्धती.  

बापट, नी. गं.