मानकीकरण : बाजारात एखाद्या वस्तूचे विविध प्रकार विक्रीसाठी ठेवल्यामुळे होणारा उत्पादन आणि वितरण खर्च कमी व्हावा म्हणून प्रकारांची अनावश्यक विविधता कमी करून काही मानक प्रकारांचेच उत्पादन व वितरण करण्याचे प्रयत्न. असे प्रयत्न निरनिराळ्या वर्गांतील वस्तूंच्या बाबतीत करता येतात. विशेषतः मानकांची निश्चिती खालील वर्गांसाठी करावी लागते : (१) पक्का माल (२) घटक अवयव (३) कच्चा माल आणि (४) यंत्रे किंवा उपकरणे.

पक्का माल : एखादा उत्पादक जर वस्तू अनेक प्रकारांत बनवीत असला, तर त्या प्रकारांपैकी काहींची विक्री जास्त, काहींची मध्यम वा काहींची अल्प असते. प्रत्येक प्रकाराच्या विक्रीतून किती नफा मिळू शकतो, हे त्याच्या विक्रीचे परिमाण, किंमत व उत्पादन खर्च विचारात घेतल्यास समजते. प्रकारांची विविधता कमी करण्यासाठी एकूण निव्वळ नफा ज्या प्रकारांच्या बाबतीत अल्पतम आहे व ज्यांच्या विक्रीमुळे स्थिर परिव्ययास फारशी मदत होऊ शकत नाही, अशा प्रकारांचे उत्पादन बंद करणे आर्थिक दृष्ट्या श्रेयस्कर असते. अनेक प्रकारांचे उत्पादन करीत राहण्यापेक्षा काही मानक प्रकारांच्या उत्पादनावरच लक्ष व साधनसामग्री केंद्रित करणे अधिक फायदेशीर होते. अर्थात एखाद्या कंपनीस आपली बाजारातील प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी व गिऱ्हाइकांनी नाखूष होऊ नये म्हणून काही कमी नफा देणाऱ्या किंवा कमी प्रमाणावर खपणाऱ्या प्रकारांचे उत्पादनही चालूच ठेवावे लागते. अशा परिस्थितीत त्या प्रकारांची किंमत मानक प्रकाराच्या किंमतीच्या मानाने वरचढ ठेवल्यास आपली विशिष्ट गरज भागविण्यासाठी आपणास मानक प्रकारापेक्षा जास्त किंमत द्यावी लागत आहे, हे गिऱ्हाइकांच्या लक्षात येते व हळूहळू ते मानक प्रकारांचीच मागणी करण्यास प्रवृत्त होतात. मानक प्रकारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य होत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनखर्चात बचत होते व उत्पादकाला त्या प्रकारांची विक्री – किंमत कमी करता येऊन आपणास होणाऱ्या फायद्यांमध्ये गिऱ्हाइकांना सहभागी करून घेता येते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्याने खालील फायदे मिळू शकतात : (१) उत्पादनाचा अधिकतर भाग यंत्रांवर सोपविता येतो. त्यामुळे श्रमिकांवरील खर्चाचे प्रमाण कमी करता येते. (२) यांत्रिकीकरणामुळे कुशल कामगारांचे प्रमाण कमी करता येऊन वेतनखर्च कमी होतो. (३) प्रकार कमी केल्यामुळे उत्पादन कार्यक्रम वारंवार बदलण्याचा त्रास व खर्च वाचतो. (४) उत्पादन अखंड चालू ठेवता येणे शक्य होऊन भांडारातील कच्चा माल, चालू काम व पक्का माल यांच्या संग्रहासाठी लागणारा खर्चही कमी करता येतो. (५) पक्क्या मालाचे प्रकार कमी केल्याने उत्पादन नियंत्रणाचे प्रश्न सोपे होऊन ते लवकर व कमी खर्चाने सोडविता येतात.

याउलट मानकीकरणामुळे काही तोटेही संभवतात : (१) आपणास हवा असलेला माल विशिष्ट प्रकारात उत्पादकाने उपलब्ध न केल्यास गिऱ्हाईक अन्य स्पर्धक उत्पादकाच्या मालाकडे आकर्षित होईल. (२) केव्हा ना केव्हा गिऱ्हाइकांना मानक प्रकारांचा कंटाळा येतोच. म्हणून अशा वेळी अन्य प्रकाराचे उत्पादन करावे लागल्यास मानक प्रकाराच्या उत्पादनात वापरली जाणारी विशेषीकृत यंत्रसामग्री बदलून नवी यंत्रे घ्यावी लागतात. याचाच अर्थ मानकीकृत उत्पादनात लवचिकपणे बदल करता येणे कठीण होते. (३) एखाद्या वस्तुचे अनेक प्रकार उपलब्ध करून विक्रीस ठेवणे म्हणजे एका प्रकारे विम्यासारखे संरक्षण मिळविण्यासारखे असते कारण काही प्रकार बाजारात नावडते ठरले, तरी इतर प्रकारांना मागणी येण्याची शक्यता असते. हे संरक्षण मानकीकरणाने नाहीसे होते व मानक प्रकार जर गिऱ्हाइकांस पसंत पडला नाही, तर विक्री उत्पन्नात मोठीच घट येते.

घटक अवयवांचे मानकीकरण : पक्क्या मालाचे प्रकार बहुविध असले, तरी त्यांच्यासाठी लागणारे घटक अवयव समान असू शकतात. अशा समान घटक अवयवांचे मानकीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येते व त्यांपासूनही मानकीकरणाचे फायदे मिळू शकतात. या प्रकारच्या मानकीकरणाचा आणखी एक फायदा म्हणजे, वस्तूमध्ये काही बिघाड झाल्यास तिची दुरुस्ती करणे सोपे जाते. नादुरुस्त घटक अवयव काढून टाकून त्याच्या जागी मानक अवयव बसवून वस्तू पुन्हा कार्यक्षम करता येते ती टाकून द्यावी लागत नाही.

कच्च्या मालाचे मानकीकरण : कच्च्या मालाचेही अनेक प्रकार उपलब्ध असतात. उत्पादकाने पक्क्या मालाच्या मानकीकरणाचे धोरण स्वीकारले, तर कच्चा माल खरीदतानासुद्धा त्याला काही मानकीकृत प्रकारांचीच खरेदी करावी लागते. तसे न केल्यास उत्पादनात अडथळे उत्पन्न होऊन उत्पादन खर्च वाढेल आणि शिवाय पक्क्या मालाचा अपेक्षित दर्जा टिकविता येणार नाही. कच्चा माल मानक प्रकारांचाच खरेदी करावयाचे ठरविल्यास खरेदीचे व्यवहार सोपे होतात. माल एकदम मोठ्या परिमाणांत खरेदी केल्याने विक्रेत्याकडून सवलती मिळू शकतात. भांडारात माल ठेवणे सोपे व कमी खर्चाचे होते. मात्र मानक प्रकाराची निवड चुकीची केल्यास उत्पादन खर्च वाढण्याचा धोका संभवतो.

यंत्रांचे मानकीकरण : पक्क्या मालाचे मानकीकरण करावयाचे, तर यंत्रांचेही मानकीकरण साधावे लागते परंतु यासंबंधी विशेष आग्रह धरला जात नाही. प्रत्येक वस्तू योग्य व मानकीकृत यंत्रांवरच निर्माण करावयाचे ठरविल्यास यंत्रांचे एकूण प्रकार वाढून कारखान्यात यंत्रांची गर्दी होण्याचा संभव असतो. यांपैकी काही यंत्रे एखाद्या उत्पादन कार्यक्रमात निकामी राहण्याचीही शक्यता असते. त्यांचे संधारणही कठीण होते व सुट्या भागांचा संग्रहही फार मोठा ठेवावा लागतो. या अडचणी टाळण्यासाठी बहूद्देशीय यंत्र वापरणे सोईचे असते, म्हणून यंत्रांच्या मानकीकरणाचा विशेष आग्रह धरून चालत नाही.

वितरणाचे मानकीकरण : वस्तूंच्या उत्पादनात मानकीकरणाचा उपयोग केल्याने त्यांच्या वितरणाचे प्रश्नदेखील सोपे होतात. ते सोडविताना पुन्हा मानकीकरणाचा मार्ग अवलंबिता येतो व वितरण खर्चात काटकसर करता येते. त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढू शकते. शिवाय विक्री-किंमत कमी करून एकूण विक्री व एकूण निव्वळ नफा वाढविणे शक्य होते.

व्यवस्थापनाचे मानकीकरण : मानकीकरणाचा आणखी एक फायदेशीर परिणाम व्यवस्थापन क्षेत्रावर होतो. वस्तूंचे मानकीकरण साधल्यास व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले दैनंदिन निर्णय घेतानासुद्धा मानकीकरणाचे तत्त्व वापरता येते. मानकीकृत वस्तूंची खरेदी, विक्री, संग्रह, उत्पादन, वितरण इत्यादींबाबत उद्‍भवणारे प्रश्न मानकीकृत व्यवस्थापन पद्धतींनी हाताळणे सोपे होते. त्यामुळे व्यवस्थापकांवर दरवेळी नवीन समस्यांची उकल करण्यासाठी वेळ व व्यवस्थापकांना सामर्थ्य खर्च करण्याची पाळी येत नाही. व्यवस्थापक वर्गावरील खर्चही यामुळे कमी करता येतो आणि व्यवस्थापकांना आपला वेळ व आपले कौशल्य-नियोजन, विपणि-निरीक्षण, जनसंपर्क इ. क्षेत्रांसाठी वापरण्याची संधी मिळून उद्योगसंस्थेची अधिक भरभराट होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे एखाद्या मानकप्रकाराचा खप कामयचा कमी होण्याची चिन्हे दिसल्यास दुसरा एखादा मानकप्रकार शोधून काढून त्याचे उत्पादन सुरू करणे, हा होय. असे केल्यास मानकीकरणापासून उद्‍भवणारा धोका टाळता येणे शक्य होते.

संदर्भ : Radford, J. D. B., Richardson, D. B., The Management of Production, London, 1963.

घोंगडे, ए. रा.