संदेशरासक : अपभ्रंश भाषेतील रास प्रकारातील एक प्रसिद्ध धर्मनिरपेक्ष संदेशकाव्य वा खंडकाव्य. ते इ. स. बाराव्या शतकात मुसलमान कवी अद्दहमाण (अब्दल रहमान किंवा अब्दुल रहमान) याने रचले असावे. हे काव्य केव्हा रचले असावे, यासंदर्भात विद्वानांत मतभिन्नता आढळते. अब्दुल रहमान हा मीरसेन नावाच्या एका मुसलमान कोष्टयाचा मुलगा. मीरसेन भारताच्या पश्र्चिम भागात राहात असे. अब्दुल रहमान याला मातृभाषेव्यतिरिक्त संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषा उत्तमप्रकारे अवगत होत्या आणि भारतीय संस्कृतीविषयीचा त्याचा अभ्यासही सखोल होता. त्याने संदेशरासक हे २२३ श्लोकांचे संदेशकाव्य रचले असून त्याचे तीन स्वतंत्र विभाग (प्रकम) पाडले आहेत. पहिल्या विभागात त्याने काव्याची रूपरेषा (ओळख) स्पष्ट केली असून दुसऱ्या विभागात विजयानगर किंवा विकमपूर (जुन्या जैसल- मीर संस्थानातील) येथील शोकाकुल अवस्थेतील विरहिणीने खंबायत (स्तंभतीर्थ) येथे पैका मिळविण्यासाठी गेलेल्या पतीला पाठविलेल्या निरोपाचा हा हृद्य वृत्तांत आहे. ह्यात तिच्या मनोव्यथा व्यक्त करणारा भावोत्कट संदेश आहे कारण पती जाऊन काही वर्षे लोटली होती. हा निरोप घेऊन जाणारा जासूद हा एक मुलतानहून (मूलस्थान) खंबायतकडे जाणारा प्रवासी आहे. शेवटच्या तिसऱ्या विभागात कवीने सहा ऋतूंचे वर्णन नायिकेच्या विरहावस्थेच्या संदर्भाचा धागा पकडून खुमासदार केले आहे. हा संदेश देऊन प्रवासी परत येत असता, त्या दरम्यान तिला आपला पती दक्षिणेकडून परत येताना दिसतो.

जायसी मलिक मुहंमद याच्या पद्मावत (पदुमावती) या हिंदी काव्यावर विशेष प्रभाव पाडणाऱ्या या लौकिक रासगंथाचा कवी मुसल- मान असला, तरी या कवीने निर्मिलेला अपभ्रंश भाषेतील हा काव्यगंथ एक अभिजात साहित्यकृती होय. नायिकेची विरहावस्था आणि तिच्या मनोविकारांचे-भावनांचे कवीने शब्दबद्ध केलेले वर्णन अकृत्रिम व प्रतिभा- संपन्न असून त्यात सर्वसामान्य अनुभूतीचे प्रतिबिंब उमटले आहे. विविध ऋतूंच्या वर्णनांतून कवीची निसर्गाविषयीची विलक्षण ओढ प्रकट होते. तव्दतच तत्कालीन गामीण जीवनाचीही कल्पना येते. निरनिराळ्या वृत्तरचनांतून केलेली वर्णने हृद्य व प्रत्ययकारी आहेत. ⇨ कालिदासा च्या मेघदूत या संस्कृत काव्याच्या धर्तीवर हे काव्य रचलेले असावे.

संदर्भ : श्रीमुनिजिनविजयजी भायाणी, ह. व. संपा. संदेशरासक, मुंबई, १९२३.

तगारे, ग. वा.