पुष्पदंत : (दहावे शतक). जैन महाकवी. त्याने अपभ्रंश भाषेत काव्यरचना केलेली आहे. तो विदर्भात जन्मला, असे म्हणतात. त्याच्या पित्याचे नाव केशवभट्ट आईचे मुग्धादेवी. तो मूळचा काश्यप गोत्री, शैव पंथीय ब्राह्मण. पुढे त्याने जैन धर्मातील दिगंबर पंथाची दीक्षा घेतली. ब्राह्मणी परंपरेनुसार सांख्य, वेदान्त, मीमांसा, बौद्ध इ. दर्शने, रामायण-महाभारत, पुराणे आदींच्या अध्ययनाचे संस्कार पुष्पदंतावर झाले असावेत, असे त्याच्या ग्रंथांच्या अंतरंगावरून दिसून येते. ‘कव्व-पिसल्ल’ (काव्यपिशाच), ‘कव्व-रयणायर’ (काव्य रत्नाकर), ‘सरसइणिलउ’ (सरस्वती निलय) इ. उपाधी त्याने स्वतःस लाविल्या आहेत. पुष्पदंत हा प्रथम कोणा एका भैरव अथवा वीरराज ह्याच्या आश्रयास होता. तेथे अपमानित झाल्यामुळे तो स्थलांतर करीत राष्ट्रकूटांची राजधानी मान्यखेट येथे आला. तेथे राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण ह्याच्या भरत नावाच्या मंत्र्याचा आश्रय त्याला लाभला. भरताच्या सांगण्यावरून पुष्पदंताने ⇨ तिसट्टि-महापुरिस-गुणालंकार किंवा महापुराण ह्या महाकाव्याची रचना केली. जैन धर्मातील २४ तीर्थंकर, १२ चक्रवर्ती, ९ वासुदेव, ९ प्रतिवासुदेव व ९ बलदेव अशा एकूण ६३ महापुरुषांची (शलाकापुरुषांची) चरित्रे त्यात वर्णिली आहेत. ⇨ णायकुमारचरिउ हे पुष्पदंताने रचिलेले खंडकाव्य. धर्मप्रचार हे ह्या काव्याचे मुख्य उद्दिष्ट असून त्यात अलौकिक घटनांचा आणि चमत्कारांचा समावेश आढळतो. ⇨जसहरचरिउ हे काव्य अहिंसेची महती पटविण्यासाठी त्याने लिहिले. ओजस्वी, ओघवती, अलंकारप्रचुर आणि अर्थगौरवपूर्ण भाषा आणि रचनाकौशल्य ही पुष्पदंताच्या काव्यरचनेची वैशिष्ट्ये होत. हरिषेणादी उत्तरकालीन कवी त्याला सरस्वतीचा लाडका म्हणून गौरवितात.

तगारे, ग.वा.