योगसार : अपभ्रंश भाषेतील एक ग्रंथ. जैन दृष्टिकोणातून आत्म्याविषयीचे विवरण देणाऱ्या ⇨परमप्पपयासु ह्या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता ⇨जोइंदु हा योगसाराचाही कर्ता होय. १०८ दोहे असलेल्या ह्या ग्रंथातही अध्यात्मचर्चा आलेली आहे. बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा असे आत्म्याचे त्रिविध वर्गीकरण करून ग्रंथकर्त्याने परमात्म्याच्या ध्यानावर विशेष भर दिला आहे. पुण्य केल्याने जीव स्वर्गाला जातो व पापामुळे नरकात पडतो पण मोक्षप्राप्तीसाठी (शिववास) पाप आणि पुण्य ह्या दोन्हींचा त्याग करून आत्मज्ञान करून घेतले पाहिजे, असे तो म्हणतो.

जोइंदू हा जैन असल्यामुळे त्याने जैनपंथीय परिभाषा ह्या ग्रंथात स्वीकारलेली असली, तरी पंथातीत अध्यात्मवाद्यांप्रमाणे शिव, बुद्ध, जिन व सिद्ध त्याने समान मानले आहेत.

जोइंदूचा हा ग्रंथ, त्याच्या परमप्पपयासूच्या तुलनेत अधिक सुबोध आणि काव्यमय आहे. शास्त्राध्ययन, कर्मकांड, तीर्थयात्रा इत्यादींची निष्फळता दाखवून आध्यात्मिक क्षेत्रात मानवी समानतेचे प्रतिपादन ह्या ग्रंथाने केले. रामसिंह-देवसिंहादि उत्तरकालीन ग्रंथकारांना हा ग्रंथ स्फूर्ती देणारा ठरला. डॉ. आ. ने. उपाध्ये ह्यांनी संपादिलेल्या परमप्पपयासूच्या आवृत्तीत योगसाराचाही समावेश आहे.

तगारे, ग. वा.