सत्तांतरोत्तर पदपुरस्कार पद्धती : (स्पॉइल्स सिस्टिम). अधिकारारूढ पक्षाने आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची – अनुयायांची उच्च शासकीय पदांवर नियुक्ती करण्यासाठी उपयोजलेली एक पद्धती. ‘ स्पॉइल्स सिस्टिम ’ ही संज्ञा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या शासनयंत्रणेत एकोणिसाव्या शतकात प्रविष्ट झाली. या संकल्पनेचा- संज्ञेचा – अधिकृत प्रथमोच्चर सेनेटर विल्यम ल. मार्सी याने ‘ शत्रूच्या लुटेचे धनी जेतेच असतात ’ या विधानाने अँड्रू जॅक्सन (कार. १८२९ -३७) या राष्ट्राध्यक्षाने नेमलेल्या मार्टिन व्हॅन ब्यूरेन या मंत्र्याच्या नियुक्तीच्या बचावात्मक भाषणात केला (१८३२) पण तत्पूर्वी ही पद्धती टॉमस जेफर्सन (कार. १८०१ -०९) याच्या वेळी कार्यवाहित होती. त्याने आपल्या कार्यकर्त्यांना अनेक पदांची खैरात केली. पुढे राष्ट्रीय स्तरावर या पद्धतीचा विकासवृद्धी फेडरल व डेमॉकटिक रिपब्लिकन या दोन राजकीय पक्षांच्या सत्तारूढ राष्ट्राध्यक्षांनी केली. साहजिकच आपल्या कार्यकर्त्यांना राजकीय आश्रय देण्यासाठी अमेरिकेत ती सर्रास उपयोगात आली. अँड्रू जॅक्सन याने पहिल्या अध्यक्षीय भाषणात, ‘ अनुभवांचे विनाकारण स्तोम माजविले जाते. शासकीय काम एवढे सामान्य दर्जाचे असते की, कोणतीही सुबुद्ध व्यक्ती ते सहज निभावून नेईल ’ असे शिक्कामोर्तब त्यावर केले. परिणामत: शासनव्यवस्थेत अयोग्य, अप्रामाणिक व सामान्य कुवतीच्या व्यक्तींची भरती होऊन लोकक्षोभ वाढला. पक्षहिताबरोबरच व्यक्तिगत स्वार्थ, भष्टाचार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली. तिचा प्रसार मध्यवर्ती केंद्रसत्तेपासून राज्ये, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व स्तरांवर झाला होता. यादवी युद्धानंतर (१८६१ -६५) त्याला उधाण आले तेव्हा देशहिताच्या दृष्टीने ही पद्धती अव्यवहार्य व घातक असल्याची जाणीव सुजाण नागरिकांना झाली. त्यामुळे शासनास नागरीसेवा आयोगाची १८७१ मध्ये स्थापना करावी लागली. अखेर १८८३ मध्ये पेंडल्टन फेडरल सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट या कायद्याने त्यास पायबंद घालण्यात आला आणि गुणवत्तेवर कार्यक्षम कर्मचाऱ्यांची-अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ लागली. पुढे या कायदयात अनेक सुधारणा होऊन ९० टक्के संघराज्यातील शासकीय पदे गुणवत्तेवर भरण्यात येऊ लागली. विसाव्या शतकात ही पद्धती जवळजवळ संपुष्टात आली तथापि राष्ट्राध्यक्ष अदयापि काही महत्त्वाची पदे आपल्या विशेष अधिकारा-खाली आपल्या मर्जीतील पक्षकार्यकर्त्यांना देताना दिसतात. ‘ स्पॉइल्स सिस्टिम ’ ही मुख्यत्वे अमेरिकन राजकीय संकल्पना – संज्ञा असली, तरी तिचा राजकीय व्यवहारात, विशेषत: पक्षीय हितासाठी कमीअधिक प्रमाणात इतर देशांतही उपयोग केलेला आढळतो.
संदर्भ : Hoogenboom, A. A. QutLawing the Spoils, London, 1968.
शहाणे, मो. ज्ञा.