सतार : एक भारतीय तंतुवादय. सितार, सेतार, सेतारा अशा विविध नावांनी हे वादय ओळखले जाते. या वादयाच्या उत्पत्तीसंबंधात अनेक मते आहेत. मध्यपूर्वेतील तंबूर व पंडोर या वादयांशी सतारीचे नाते जोडता येईल. चार हजार वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमियामधील पुतळ्यांवर व मुद्रांवर अशा वादयांच्या प्रतिमा आढळतात. गीकांनी या वादयाला ‘ पंडूरा ’ हे नाव दिले होते व ते सुमेरी ‘ पंत-उर ’ नावाचे रूप होते. अरबस्थानातील तंबूर ह्या वादयाला सतारीप्रमाणेच अर्धगोलाकार बूड, मान, लांब दांडा व त्यावर पडदे असतात. फार्सी भाषेत याला तार, दु-तार, सेह-तार (त्रितंत्री) इ. नावे आहेत.

भारतातही एक तीन तारांचे वादय होते. संगीत रत्नाकरा त यास त्रितंत्री म्हटले आहे. या प्राचीन त्रितंत्री वीणेची सतार ही सुधारित आवृत्ती असावी, असे मानले जाते. मुळात तीन तारा असलेल्या या वादयात सुधारणा होऊन, सध्याची प्रचलित सात तारांची सतार विकसित झाली. पर्शियन सेहतार वरून (तीन तारांचे वादय) सेतार, सितार ही पर्यायी नामरूपे आली असावीत, असेही मानले जाते. सेह या फार्सी शब्दाचा अर्थ तीन असा आहे. त्यावरून या वादयाला सितार हे नाव मिळले होते. संगीतसमयसार या गंथात सितार हेच नाव आहे. सेहतार (सेतार) या काश्मीरी वादयाशी प्रचलित सतारीचे बरेचसे साम्य आढळून येते. मूळच्या तीन ऐवजी सध्याच्या प्रचलित सात तारांमुळे ‘ सप्ततार ’ वरून सतार, अशीही उपपत्ती मांडली जाते. ‘ ऊद ’ या पर्शियन वादयाशी सतारीचे खूपच साम्य आढळते. या पर्शियन वादयाची एतद्देशीय वीणाप्रकाराशी सांगड घालून ⇨ अमीर खुसरौ या संगीतकाराने तेराव्या शतकात सतार निर्माण केली, अशी पारंपरिक समजूत रूढ असली, तरी त्याविषयी मतभेद आहेत. अमीर खुसरौशी नामसाधर्म्य असलेल्या खुसरौ खान (सुप्रसिद्ध सदारंग या गायकाचा बंधू) या अठराव्या शतकातील संगीततज्ज्ञाने सतारीचा शोध लावला, असेही एक मत आहे.

सतार : विविध प्रकार.सतारीचा आकार साधारणपणे ⇨ तंबोऱ्या सारखा असतो संगीतसार या गंथात निबद्ध (स्वरांचे पडदे असलेला) तंबूर (तंबोरा) म्हणजेच सितार होय, असे म्हटले आहे. तंबोऱ्याप्रमाणेच सतारीला एक भोपळा, गळा व एक लाकडी पोकळ दांडी असते. दांडी वरच्या बाजूला चपटी व खालून गोलाकार असते. तिची लांबी सु. ३ फुट (सु. ९० सेंमी.) व रूंदी सु. ३ इंच (सु. ७.५ सेंमी.) असते. या दांडीवर वकाकार, पितळी वा पंचरसी धातूचे १९ ते २१ पडदे असतात. तारांच्या आधारासाठी हस्तिदंती पट्टी व घोडी, तसेच स्वरमेलनासाठी खुंटया असतात. वादनासाठी असलेले पितळी पडदे हे ⇨ वीणे प्रमाणे अचल (स्थिर) नसून, ते चल म्हणजेच वेगवेगळ्या थाटांनुसार खालीवर सरकवून बदलण्याजोगे – सरकते असतात. सतारीच्या सात तारा पुढीलप्रमाणे असतात: डावीकडून पहिली, पोलादाची असते व ती मध्यमात लावतात. डाव्या तर्जनीने व मध्यमेने या तारेवर योग्य पडदयावर दाब देऊन किंवा तार खेचून बहुतेक सर्व वादन करतात. दुसरी व तिसरी (किंवा जोडी) पितळेची असून त्या षड्ज, मध्यमात मिळवतात. चौथी व पाचवी ह्यादेखील पितळेच्याच असून त्या पंचमात लावतात. सहावी व सातवी या शेवटच्या दोन तारांना चिकारीच्या तारा म्हणतात आणि त्या तारा षड्जात असतात. वादनाची लय ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. सतारीच्या रचनेवरून तिचे साधी व तरफेचे असे दोन प्रकार पडतात. साध्या सतारीला फक्त सात तारा असतात तर तरफेच्या सतारीत पडदयावर उमटणाऱ्या स्वरांचे प्रतिध्वनी व साहाय्यक असे ध्वनी (अनुखन) निर्माण करणाऱ्या पोलादी तरफा लावलेल्या असतात. तरफांची संख्या ११ ते १३ असते. तरफांच्या तारा दांडीच्या बाजूला असणाऱ्या लहान खुंटयांना बांधलेल्या असतात. त्या त्या स्वरांचा झणत्कार होऊन स्वरभरणा होण्यासाठी तरफांचा उपयोग होतो. तरफदार सतारीत जोड व गतकाम उत्तम होऊ शकते. स्वरभरणा वाढविण्यासाठी क्वचित वीणेप्रमाणे जादा भोपळाही बसविलेला असतो. १९ पडदयाच्या सतारीला चल थाटाची व २१ पडदयाच्या सतारीला अचल थाटाची सतार, असे म्हणतात.

सतारीवर विविध प्रकारे स्वर निर्माण करता येत असल्याने हे वादय सध्या अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. मात्र सतारवादनात प्रभुत्व मिळविणे, अत्यंत कष्टसाध्य आहे. उजव्या हाताच्या तर्जनीवर घातलेल्या मिझराबाने (नखीने) तार छेडतात. उजव्या हाताचा अंगठा खालच्या भोपळ्यावर दाबून धरल्याने उजवा हात स्थिर राहतो. सतारीच्या वादनात आलाप, जोड व झाला हे कमाने वाजवून शेवटी गत वाजवितात. चिकारीच्या तारेवर पहिल्या बोटाने किंवा करंगळीने झणत्कार निर्माण करणे, त्यास ‘ झाला ’ असे म्हणतात. गत वाजविताना तबल्याची साथ योजतात. त्याच्यावर अतिशय द्रूतगतीचे व मींडयुक्त स्वरांचेही वादन करता येते. सतारवादनाच्या अनेक पद्धती किंवा बाज प्रचारात आहेत.

सतारवादकांची फार मोठी परंपरा भारतात पूर्वापार चालत आली आहे. फिरोझखाँ व मसजिदखाँ ही अमीर खुसरौंची दोनही मुले सतारवादनात पारंगत होती. आधुनिक काळात ⇨ विलायतखाँ व पंडित ⇨ रवि शंकर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सतारवादकांनी देश-विदेशांत सतारवादनाचे कार्यकम करून या वादयास अमाप लोकप्रियता मिळवून दिली. अमेरिकेतही या वादयाचा प्रसार झाला आहे. विलायतखाँनी सतारीच्या रचनेत तिची वादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण बदल केले. मसजिदखाँ, बरकतउल्ल, इनायतखाँ, अब्दुल हालीम जाफरखाँ, निखिल बॅनर्जी इ. अन्य सतारवादकांनीही या वादयाच्या लोकप्रियतेत व प्रसारात मोलाची भर घातली आहे.

संदर्भ : 1. Ravi Shankar, My Music, My Life, Calcutta, 1968.

२. तारळेकर, ग. ह. भारतीय वादयांचा इतिहास, पुणे, १९७३.

३. देव, बी. चैतन्य अनु. पारधी, मा. कृ. भारतीय वादये, मुंबई, १९७६.

मुजुमदार, आबासाहेब