सक्टोरिया : (आसिनेटा, चूषक उपवर्ग). अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचा एक उपवर्ग. इफेलोटा : (१) रिक्तिका, (२) संस्पर्शक, (३) लघुकेंद्रक, (४) बृहत् केंद्रक, (५) गुळुंब, (६) उपत्वचा, (७) देठ, (८) खडक.त्याचा समावेश आदिजीव संघात केला जातो. त्याची आठ कुले व दोनशे प्रजाती आहेत. त्याचा प्रसार समुद्राच्या पाण्यात व गोडया पाण्यात असतो. इफेलोटा, पोडोफिया, टोकोफ्रिया, स्फिरोफिया, डेंड्रोकोमॅटस या प्रजाती समुद्राच्या पाण्यात तर आसिनेटासारखे प्राणी गोडया पाण्यात आढळतात. समुद्राच्या पाण्यात त्यांची संख्या जास्त असते व गोडया पाण्यात कमी असते. ते एकएकटे किंवा समूहाने आढळतात (उदा., डेंड्रोसोमा). ते पाण्यातील खडक, शंख, पाणवनस्पती, मोठे प्राणी यांना चिकटलेले असतात. ते बाह्यसहभोजी असतात. काही प्राणी मुक्तजीवी आहेत.

या उपवर्गातील प्राण्यांचा आकार गोलाकार, अंडाकृती, शंक्वाकृती किंवा कपासारखा असतो. पूर्ण वाढ झाल्यावर त्याच्या कोशिकेवरील पक्ष्माभिका (आखूड, केसासारख्या वाढी) नाहीशा होतात. पाण्याच्या तळाशी योग्य अशा कठीण पृष्ठभागावर (उदा., खडक, शंखाचा पृष्ठ- भाग) हे प्राणी चिकटतात. कठीण पृष्ठभागावर पकड घेण्यासाठी त्यांना मुळासारखे अवयव फुटतात व त्यांचा देठ तयार होतो. या देठाच्या भागावर प्राण्याचे शरीर असते. शरीराभोवती उपत्वचा असते. तिचे आवरण चिवट व संरक्षक असते. हे आवरण बऱ्याच वेळा वाटीसारखे किंवा कपासारखे खोल असते व त्यात संपूर्ण प्राणी लपून बसतो. सक्टोरियाच्या मुख्य शरीरापासून व वाटीच्या वरील भागापासून लांबट संस्पर्शक बाहेर आलेले असतात. संस्पर्शक लांबट दंडाकृती असतात. त्याच्या अक्षीय भागात अर्धद्रवरूप ⇨जीवद्रव्य असते. बाहेरील भाग घट्ट (दाट) व प्रतिकारक्षम असतो. संस्पर्शकाचे आकुंचन होते, तसेच त्याचे प्रक्षेपणही करता येते. त्यांची संख्या खूप किंवा कमीही असते. प्रजातीप्रमाणे संस्पर्श-कांच्या लक्षणांत आश्र्चर्यकारक फरक आढळतात. त्यांच्या टोकास गुळुंब असून ते बहिर्द्रव्यापासून बनलेले असते. त्याच्या साहाय्याने भक्ष्य पकडून शरीरातील रस शोषून घेतला जातो.

सक्टोरियाच्या कोशिकेतील बृहत् केंद्रक (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा भाग) अंडाकृती, घोडयाच्या नालाच्या आकाराचा किंवा शाखित असतो. बहुधा लघुकेंद्रकही आढळतात. सक्टोरियाच्या शरीरात एक किंवा अनेक ⇨संकोचशील रिक्तिका असतात.

सक्टोरियाचे प्रजनन अलैंगिक व लैंगिक पद्धतींनी होते. यावेळी बृहत् केंद्रक आपला आकार बदलतो व तो गोल होतो. सर्व संस्पर्शक आत ओढून घेतले जातात. भक्ष्य पकडणे व त्याचे शोषण बंद होते. शरीराच्या वरील भागात उंचवटे तयार होण्यास सुरूवात होते. त्या उंचवटयांना मुकुल म्हणतात. ते हळूहळू मोठे होतात. बृहत् केंद्रक व लघुकेंद्रकाचे विभाजन होऊन त्याचा भाग प्रत्येक मुकुलाला मिळतो. त्याला पक्ष्माभिकांची एक किंवा दोन वलये फुटतात व तो वेगळा होतो, त्यास भूण म्हणतात. असे प्रजनन इफेलोटा मध्ये आढळते.

टोकोफ्रिया मध्ये शरीराच्या वरच्या भागात अंडकक्ष तयार होतो. त्याच्या वरच्या भागात मुकुल तयार होतो. विभाजनाने प्रत्येक मुकुलात एक बृहत् केंद्रक व लघुकेंद्रकाचा भाग मिळतो. पूर्ण वाढ झालेला भूण जनन छिद्रातून बाहेर पडल्यावर पक्ष्माभिकांच्या साह्याने पोहू लागतो. अल्प काळ मुक्त जीवन जगल्यावर तो कठीण पृष्ठभागास चिकटतो, तेव्हा पक्ष्माभिकांची वलये नाहीशी होतात. त्यास देठ व संस्पर्शक तयार होतात व तो स्थिर जीवनास सुरूवात करतो.

सक्टोरियाचे लैंगिक प्रजनन संयुग्मन पद्धतीने होते. दोन प्राणी एकमेकांजवळ येतात व आभासी पादाने जोडले जातात व त्यांची बृहत् केंद्रके नाहीशी होतात. यावेळी दोन्ही प्राण्यांचे लघुकेंद्रक एकत्र येतात. पुन्हा त्यांचे विभाजन होऊन दोन केंद्रके तयार होतात व प्रत्येक प्राण्यात एक केंद्रक जातो. त्यानंतर दोन्ही प्राणी वेगळे होतात. अन्नाची कमतरता असल्यास प्राणी स्वत:भोवती संरक्षक पुटी तयार करतो. अनुकूल परिस्थितीत पुटीतून सक्टोरिया बाहेर पडतो.

इ. स. १९३१ मध्ये कहाल या प्राणिवैज्ञानिकांनी सक्टोरिया हे प्राणी ⇨पॅरामिशियमा पासून निर्माण झाले असावेत, असे मत मांडले.

पहा : प्रोटोझोआ.

घोरपडे, य. रा.