सकल-अरबवाद : मध्य – पूर्वेतील अरब राष्ट्रांच्या राजकीय ऐक्यासाठी छेडले गेलेले एक आंदोलन. उत्तर आफ्रिकेतील अरब राष्ट्रांचा या दृष्टीने मुख्यत्वे विचार झाला कारण सहारा वाळवंटाच्या उत्तरेकडील प्रदेश जरी भौगोलिक दृष्टया आफ्रिका खंडात असला, तरी शेकडो वर्षे त्या भूप्रदेशाचा संबंध भाषा, धर्म व संस्कृती यांमुळे आशिया खंडातील अरबी राष्ट्रांशी निकटचा होता. तेराव्या शतकापासून ऑटोमन तुर्कांनी या प्रदेशात सत्ता प्रस्थापित करून इस्लामी जगतात अरबांचे वर्चस्व संपुष्टात आणले होते तथापि अधूनमधून अरबांच्या ऐक्यासाठी बंडे उदभवत असत. ऐतिहासिक दृष्टया जवळजवळ पहिल्या महायुद्धापर्यंत बहुतेक अरब राष्ट्रांचा प्रदेश तुर्कस्तानच्या ऑटोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता. त्यामुळे आफ्रिका – आशियातील अरब राष्ट्रांत तुर्कांनी प्रसृत केलेल्या सकल-इस्लामवादाची प्रतिकिया म्हणून सकल – अरबवादाच्या नावाखाली एकात्मतेची भावना विसाव्या शतकात वाढीस लागली. तुर्की खलिफाने पहिल्या महायुद्धाच्या वेळी (१९१४) जिहादची (पवित्रयुद्ध) घोषणा करून क्रिस्ती राष्ट्रांविरूद्ध सर्व मुसलमानांना एकत्रित आणण्याचे अयशस्वी आवाहन केले आणि सकल – इस्लामवादाच्या राजकीय फोलपणाचे (नादारीचे) दर्शन घडविले. त्यामुळे सकल – अरबवादातील धर्मनिरपेक्ष तत्त्वे प्रकर्षाने दृष्टोपत्तीस आली कारण फ्रान्स – इंग्लंड आदी देशांनी जर्मनी – तुर्कस्तान या राष्ट्रांशी मुकाबला करण्यासाठी मक्केच्या इस्लाम धर्मीय अधिपती हशीम शेरिफ व त्याचे दोन मुलगे अब्दुल्ल व फैझल यांना हाताशी धरले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अरब राष्ट्रवादाला उत्तेजन दिले. या युद्धात तुर्कस्तानचा पराभव होऊन ऑटोमन साम्राज्य संपुष्टात आले. तेव्हा सकल – अरबवादाला पुन्हा प्रेरणा मिळाली. पुढे १९३० नंतरच्या दशकात पॅलेस्टाइनमधील ज्यू विरोधात सकल – अरबवाद आंदोलनाला विशेष गती प्राप्त झाली. सकल अरब राष्ट्रांच्या हितसंबंधांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अरब लीग या संघटनेची स्थापना झाली (१९४५). सर्व अरब राष्ट्रांनी इझ्राएलमधील अरब जनतेला पाठिंबा दयावा, असे या संस्थेच्या घटनेत नमूद केले. संयुक्त राष्ट्रांनी इझ्राएल या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती (१९४८) केल्यावर अरब लीगने इझ्राएल विरोधात कारवाया सुरू केल्या. तरीसुद्धा अरबांच्या ऐक्यासाठी अरब पोस्टल – संघ, अरब तार व दूरध्वनी मंडल व अरब आर्थिक महामंडळ यांसारख्या संस्था कार्यरत झाल्या. पुढे १९६२ मध्ये अरब सामायिक बाजारपेठेचीही स्थापना झाली. अरब लीगचे नेतृत्व ईजिप्तकडे गेले. ईजिप्तच्या नेतृत्वा-खाली ‘ अरब फेडरेशन ’ (१९५८), ‘ द युनायटेड अरब रिपब्लिक’, ‘ द अरब युनियन , ‘ द फेडरेशन ऑफ अरब एमिरेट ’ (१९७०) वगैरे अन्य संस्था अस्तित्वात आल्या. या चळवळीचे प्रचार – प्रसाराचे प्रमुख साधन म्हणजे बाथ हा राजकीय पक्ष असून त्याचा प्रभाव ईजिप्त, इराक, जॉर्डन, लेबानन, सौदी अरेबिया, सिरिया, येमेन वगैरे अरब राष्ट्रांत १९६० ते १९७० दरम्यान होता. ईजिप्तचे सर्वेसर्वा राष्ट्राध्यक्ष ⇨ गमाल अब्दुल नासर यांच्या मते या पक्षाची मूळ ध्येयधोरणे समाजवाद व अरब ऐक्य ही होती. इझ्राएलबरोबरच्या युद्धातील पराभव (१९६७) आणि नासर याचा मृत्यू (१९७०), यांमुळे या आंदोलनाची पीछेहाट झाली तथापि १९७० नंतर अरब राष्ट्रांतील, विशेषत: सौदी अरेबिया, कुवेत, इराक, लिबिया, अल्जीरिया यांतील खनिज तेलाचे उत्पादन वाढून ओपेकसारखी पेट्रोलचे भाव नियंत्रण करणारी संस्था स्थापन झाली आणि अरब देशांचे महत्त्व वाढले व जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडला. राजकीय शस्त्र म्हणून ते याचा वापर करू लागले पण अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी कुवेत, सौदी अरेबिया या देशांशी राजनैतिक संबंध दृढतर करून आर्थिक वर्चस्वाबरोबर त्यांना जणू आपले मांडलिक बनविले. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस इराक – अमेरिका युद्धामुळे सकल-अरबवाद हे आंदोलन (२००२) जवळजवळ संपुष्टात येऊन अरब राष्ट्रांत फाटाफूट झाली. त्यामुळेच इराकला कोणत्याच अरब राष्ट्राने मदतीचा हात दिला नाही.

संदर्भ : 1. Antonius George, The Arab Awakeing, 1965.

2. Fisher, E. M. Bassiouni, M. C. Storm Over the Arab World, 1972.

शिंदे, आ. ब.