सर्कस : कसरतपटू, विदूषक, प्राणी इत्यादींचे साहसी व कौशल्य- युक्त नानाविध खेळ असलेला मिश्र रंजनप्रकार. त्यात उंच टांगत्या झुल्यांवरील झोके व कसरती, ताणलेल्या उंच दोरावरील वा तारेवरील तोल सांभाळून चालण्याची व अन्य कौशल्याची कामे, जमिनीवरील कोलांटया व इतर प्रकारचे ⇨ कसरतीचे खेळ, हातचलाखीचे प्रयोग, प्रशिक्षित प्राण्यांचे कौशल्यपूर्ण खेळ, विदूषकांचे अंगविक्षेपयुक्त विनोद, बँडवरील वादयसंगीत अशा अनेकविध रंजनघटकांचा अंतर्भाव सर्कसच्या प्रयोगात असतो. सर्कसचे प्रयोग मोकळ्या मैदानात उंच व विस्तीर्ण तंबू उभारून त्या तंबूमध्ये गोलाकार रिंगणात केले जातात. या रिंगणाचा व्यास सु. ४२ फुट (सु. १३ मी.) असतो. मुळात हे रिंगण घोडदौडीचा वा घोडे पळविण्याचा धावमार्ग म्हणून योजले जात असत. सर्कसमधील कसरतपटू-खेळाडूंचे रोमहर्षक व चित्तथरारक विविध खेळ हत्ती, घोडे, उंट, माकडे, कुत्री, पोपट, वाघ, सिंह इ. प्रशिक्षित प्राण्यांची कौशल्याची कामे विदूषकांचे विनोद, बँडचे तालबद्ध वादयसंगीत इ. अनेकविध करमणुकींच्या प्रकारांचा समावेश असल्याने सर्कसची लोकप्रियता आबालवृद्धांमध्ये शतकानुशतके टिकून आहे.

सर्कसचा उगम व इतिहास : ‘सर्कस’ या शब्दाचे मूळ ‘सर्क्यूलस’ (सर्कल म्हणजे रिंगण) ह्या लॅटिन शब्दामध्ये आढळते. सध्याच्या सर्कसमधील काही खेळ प्राचीन काळापासून रूढ होते. उदा., ⇨ अश्वारोहण व घोडदौडीचे नानाविध खेळ, उंच तारेवरून वा दोरावरून चालणे, कोलांटया व कसरतींचे विविध प्रकार, रथांच्या शर्यती, हातचलाखीचे खेळ, ⇨ पशूंच्या झुंजी तसेच मानवाच्या आणि कूर श्वापदांच्या झुंजी, द्वंद्वयुद्धे इत्यादी. यांतील काही कूर व ओबडधोबड प्रकार पुढे जास्त परिष्कृत, सौम्य व सफाईदार स्वरूपात सर्कशीत समाविष्ट झाले. प्राचीन काळी हे प्रकार गोलाकार रिंगणात वा ⇨ रंगमंडला त (अँफिथिएटर) केले जात. मध्यभागी रिंगण (ॲरीना) व त्याच्या सभोवताली बैठकी असलेले प्रेक्षागार अशी त्याची रचना असे. प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतींत अशी अनेक रंगमंडले बांधली गेली. उदा., प्राचीन ग्रीक ‘हिप्पोड्रोम’ या विस्तीर्ण प्रेक्षागारात अश्वारोहणादी घोडदौडीची कौशल्याची कामे, रथांच्या शर्यती, मानवी शरीरसौष्ठवाचे प्रयोग इ. चालत. गीकांची ही रंजन-परंपरा रोमनांनी पुढे चालवून तिला अधिक प्रेक्षणीय व रोमहर्षक तसेच हिंस्र द्वंद्वांची जोड दिली. रोमनांनी गीकांच्या धर्तीवर भव्य रंगमंडले उभारली. उदा., सर्कस मॅक्झिमस, सर्कस फ्लॅमिनस, सर्कस मॅक्झेंटियस इत्यादी. ⇨ कॉलॉसिअम हे प्राचीन रोममधील सर्वांत भव्य व प्रसिद्ध रंगमंडल (इ. स. ७०-८०) असून त्यात सु. ५०,००० प्रेक्षक बसू शकत. ह्या रंगमंडलांत ⇨ रोमन ग्लॅडिएटर ची द्वंद्वयुद्धे, गुलाम, गुन्हेगार, युद्धकैदी यांच्या हिंस्र श्वापदांबरोबरच्या झुंजी यांसारखे कूर, रक्तरंजित व रानटी प्रकार चालत. त्याचबरोबर उच्च प्रतीची साहसयुक्त शारीरिक कौशल्ये आणि सहनशक्ती पणाला लावणाऱ्या मर्दानी व व्यायामी कसरती यांचे प्राचीन रोमनांना खास आकर्षण होते. प्राचीन रोममधील रथांच्या शर्यतींना अनुलक्षून ‘सर्कस’ (रिंगण) हा लॅटिन शब्द वापरात होता. इ. स. ४७६ मध्ये रोमचा पाडाव झाल्यानंतर पुढे मध्ययुगीन काळात रोमन रिंगणांमध्ये पूर्वी केले जाणारे कसरती खेळ व त्यांची रंजन-परंपरा पुढे नेण्याचे कार्य भटक्या कसरतपटूंनी, पशुशिक्षकांनी, जादूगार, डोंबारी इ. खेळियांनी गावोगावी भटकून चालू ठेवले.

आधुनिक सर्कस : आधुनिक सर्कशीचा उदय व विकास अठराव्या शतकात झाला. इंग्लिश अश्वारोहणपटू फिलिप ॲस्ट्ली (१७४२-१८१४) हा आधुनिक सर्कसचा जनक मानला जातो. रिंगणात कौशल्यपूर्ण कसरती व घोड्यांवरील खेळ करून दाखविणारा तो पहिला खेळाडू होय. रिंगणात घोडे पळविण्याची प्रथा ॲस्ट्लीनेच प्रथम सुरू केली. त्याला असे आढळून आले, की विशिष्ट आकाराच्या वाटोळ्या रिंगणात घोडा पळविताना त्याच्या पाठीवर तोल सांभाळून उभे राहणे हे केंद्रोत्सारक प्रेरणेमुळे जास्त सुलभ होते व त्यावर कसरती करणेही सहज शक्य  होते. असे काही प्रयोग केल्यावर त्याने सर्कशीच्या रिंगणाचा आकार (सु. १३ मी.) निश्चित केला व तोच आता सर्वत्र प्रमाणभूत मानला जातो. १७६८ मध्ये ॲस्ट्लीने लंडन येथे अश्वारोहण विदयालय सुरू केले. आपल्या संस्थेची जाहिरात करण्यासाठी त्याने खुल्या रिंगणात घोडयांवरील कसरतींचे खेळ करून दाखविण्यास सुरूवात केली. त्याचे हे जाहीर प्रयोग अत्यंत यशस्वी ठरले व त्यांना अमाप लोकप्रियता लाभली. ॲस्ट्लीने आपल्या घोडयांच्या खेळांना हळूहळू इतर प्रकारांची जोड दिली. उदा., इतर कसरतींचे व हातचलाखीचे खेळ, उंच ताणलेल्या दोरावरचे वा तारेवरचे तोल सांभाळून चालण्याचे प्रयोग, श्वानपथकाची नृत्ये इ. रंजनप्रकार त्याने आपल्या खेळात समाविष्ट केले. ह्या गोलाकार रिंगणात एक रंगमंचही असे व त्यावर गाणी, नाच, मूकनाटये इ. होत. ॲस्ट्लीच्या यशाने प्रोत्साहित होऊन त्याचा सहकारी चार्ल्स ह्यूझ यानेही अश्वारोहण विदयालय स्थापन केले. १७८२ मध्ये त्याने चार्ल्स डिब्डीन या नाटककाराच्या सहकार्याने ॲस्ट्लीप्रमाणे एक बहुरंगी, वैविध्यपूर्ण कसरती खेळ यांचा प्रयोग संघटित केला व त्याला ‘द रॉयल सर्कस’ हे नाव दिले. तेव्हापासून हा मिश्र रंजनप्रकार ‘सर्कस’ या नावाने ओळखला जाऊ लागला व तोच शब्द आजही रूढ आहे. दरम्यानच्या काळात ॲस्ट्लीनेही आपली सर्कस वाढवत व विस्तारत नेली. १७७४ मध्ये त्याने पॅरिस येथे आपल्या सर्कसचा प्रयोग केला होता. १७८२ मध्ये तो पुन्हा पॅरिसला गेला व तेथे त्याने रंगमंडल (ॲस्ट्ली अँफिथिएटर) स्थापन केले, तसेच लंडन येथे ‘ॲस्ट्लीज रॉयल अँफिथिएटर’ उभारले. त्याने इतर १८ सर्कशी यूरोपमध्ये स्थापन केल्या. अशा प्रकारे सर्कस यूरोपमध्ये सर्वदूर प्रसृत व लोकप्रिय होत गेली व अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतला एक प्रमुख रंजनप्रकार म्हणून त्यास लोकमान्यता लाभली. अठराव्या शतकाच्या अखेरीस यूरोपमधील निरनिराळ्या देशांत शंभराहून अधिक सर्कशीचे प्रयोग झाल्याचे उल्लेख आढळतात. रशियामध्ये सर्कसचा पहिला जाहीर प्रयोग क्रिस्तोफ डी बाख याने १८१० च्या सुमारास सादर केला, असे म्हटले जाते. रशियामध्ये सर्कसच्या वाढीस बाखचे प्रयत्न मुख्यत्वे कारणीभूत ठरले. अमेरिकेमध्ये जॉन बिल रिकेट्स या इंगज सर्कसचालकाने पहिली सर्कस १७९३ मध्ये उभारली. त्यासाठी त्याने ॲस्ट्लीच्या रंगमंडलाच्या धर्तीवर फिलाडेल्फिया व न्यूयॉर्क या शहरांत रंगमंडले बांधली. रिकेट्सचे सर्कसप्रयोग अमेरिकेत फार लोकप्रिय व यशस्वी ठरले.


फिरत्या सर्कशी : अठराव्या शतकातील यूरोपीय सर्कशींचे प्रयोग एकाच ठिकाणी, रंगमंडलांत वा बंदिस्त रंजनगृहांत केले जात. मोठया कायमस्वरूपी इमारतींमध्येही त्यांचे प्रयोग केले जात. अमेरिकन सर्कसचालकांनी सर्कशीचे प्रयोग गामीण भागात नेण्यासाठी फिरत्या सर्कसकंपन्यांची प्रथा सुरू केली. ह्या सर्कसमंडळ्या त्यांच्या साऱ्या लवाजम्यासह एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास ववाहतुकीद्वारा नेल्या जात. ह्या सर्कसकंपन्यांचा प्रवास व वाहतूक सुरूवातीच्या काळात चाकांच्या डब्यांतून (कॅरव्हॅन), चारचाकी मालगाडयांतून (वॅगन) केली जात असे. नंतर अशा फिरत्या सर्कसकंपन्यांचा प्रवास रेल्वेतून होऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभकाळापासून सर्कशीमध्ये प्रशिक्षित प्राण्यांच्या खेळांचा समावेश केला जाऊ लागला व त्यांचा शिकारखाना (जनावरखाना) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेल्वे डब्यांतून वा वाघिणींतून (वॅगन) नेला जाऊ लागला. फिरत्या सर्कसकंपन्यांचे सुरूवातीच्या काळातले खेळ ओबडधोबड, अनाकर्षक व कंटाळवाणे असत. पण कालांतराने त्यांना शिकारखाना व प्राण्यांची कौशल्याची कामे, कसरतींचे चित्तथरारक प्रयोग, हातचलाखी वा जादूचे प्रयोग आदी आकर्षणांची जोड मिळाल्याने ते गर्दी खेचू लागले व गामीण भागात विलक्षण लोकप्रिय ठरले. सर्कसमधील वन्य श्वापदांचे रोमहर्षक खेळ त्या काळात विशेष लोकप्रिय होते.

सर्कसचा तंबू : नॅथन हाऊ व आरॉन टर्नर यांनी आपल्या सर्कसचा प्रयोग १८२६ मध्ये प्रथमतःच कॅनव्हासच्या तंबूमध्ये केला. हे मोठे तंबू सुवाह्य असल्याने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येत असत, त्यामळे भटक्या सर्कशींना ते फार सोयीस्कर होते.

सर्कस-संचलने व अन्य नावीन्यपूर्ण उपक्रम : अमेरिकन सर्कसमध्ये एकोणिसाव्या शतकात सर्वप्रथम सर्कसच्या संचलनाचा (परेड) म्हणजे रस्त्यातून मिरवणूक काढण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला. सर्कसची चालती-बोलती जाहिरात करण्यासाठी सर्कसमधील कलाकार, विदूषक, प्राणी यांची बँडच्या साथीने मिरवणूक काढण्याची प्रथा आता सर्वत्र रूढ झाली आहे. त्याची सुरूवात ऑलबनी, न्यूयॉर्क येथे १८३७ मध्ये पहिल्या सर्कस संचलनाने झाली. अशा भव्य प्रेक्षणीय मिरवणुका व त्यायोगे केल्या जाणाऱ्या जाहिरातींचे व्यावसायिक फायदे लगेचच दिसून आल्याने १९२० च्या दशकापर्यंत सर्कस संचलनांना चांगलीच लोकप्रियता लाभली. रंगीबेरंगी सजविलेल्या मोठया वॅगनसह सर्कसचा लवाजमा रस्तारस्त्यांतून जात असे, त्याला बँडच्या वादयसंगीताची साथ असे. ह्या भव्य, प्रेक्षणीय व भपकेबाज मिरवणुकांमुळे सर्कसची प्रसिद्धी व जाहिरात होऊन सर्कसचे उत्पन्न मोठया प्रमाणात वाढत असे.

अमेरिकन सर्कशीत १८५३ मध्ये आणखी एका नावीन्यपूर्ण उपक्रमाची भर पडली. तो उपक्रम म्हणजे सर्कसच्या रिंगणाभोवती तयार केलेला, घोडे पळविण्यासाठीचा लंबगोलाकार धावमार्ग (हिप्पोड्रोम ट्रॅक) होय. घोडयांच्या शर्यतींच्या रिंगणासारखाच (रेसकोर्स) हा धावमार्ग होता. त्यावरून प्रेक्षणीय घोडदौडी व भव्य मिरवणुका निघत, त्यांत सर्कसमधले सर्व कलावंत, कसरतपटू, विदूषक, प्राणी इ. सामील होऊन प्रेक्षकांना मानवंदना देत. तसेच ह्या धावमार्गावरून रथांच्या शर्यतीही होत असत.

झुल्यावरील कसरती : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कसरतीच्या खेळांचे प्रयोग जास्त लोकप्रिय होऊ लागले. झ्यूल लिओतार्द (१८३०-७०) या फ्रेंच कसरतपटूने १८६० च्या सुमारास टांगत्या झुल्यांचा (फ्लाइंग ट्रॅपीझ) शोध लावला व झुल्यावरील कसरतींचे खेळ करून दाखविले. उंच अधांतरी टांगत्या झुल्यांवरचे झोके व एका झुल्यावरून दुसऱ्या झुल्यावर घेतली जाणारी उड्डाणे, तसेच विविध कसरतींचे व उड्डाणांचे झुल्यांवरचे प्रयोग अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाले. उडते झुले व त्यांवरील कौशल्याची कामे हे सर्कसच्या खेळाचे प्रमुख आकर्षण व महत्त्वाचे अंग बनले. झुल्यांचे प्रयोग हवेत १३ मी. ते १५ मी. उंचीवर होत असल्याने खेळांडूच्या सुरक्षिततेसाठी खाली जाड दोऱ्यांचे संरक्षक जाळे ताणून बांधलेले असते. या जाळ्यावरही झुल्यातील एखादा कसरतपटू उताणा पडून उशी घेतो व हवेत एक वा अनेक उलटसुलट कोलांट उड्या मारून दाखवितो. अशा चित्ताकर्षक व रोमहर्षक झुल्यांवरील खेळांमुळे आधुनिक सर्कसचे ते एक प्रमुख आकर्षण बनले आहे.

ताणलेल्या दोरांवरील व तारेवरील कसरती : दोरावरील कसरती प्राचीन काळापासून प्रचलित आहेत तथापि आधुनिक सर्कशींमध्ये या कसरतप्रकाराला एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जास्त महत्त्व आले. शार्ल ब्लोंदा (रूढ उच्चर-चार्ल्स ब्लाँडिन, १८२४-९७) हा फ्रेंच कसरतपटू ताणलेल्या दोरावरून तोल सांभाळून चालण्याच्या कामात व अन्य कसरतींत अत्यंत वाकबगार होता. १८६० साली त्याने नायगारा धबधब्यावरून उंच टांगता दोर बांधून, प्रथम डोळे बांधून व नंतर पाठीवर माणूस घेऊन चालून दाखविले. ह्या यशस्वी व चित्तथरारक प्रयोगानंतर सर्कसमध्येही अशाच प्रकारच्या दोरावरच्या व तारेवरच्या अनेक कौशल्यपूर्ण, साहसी कसरती केल्या जाऊ लागल्या.

तीन रिंगणी सर्कस : यूरोपमध्ये सर्कसचे खेळ सामान्यत: एकाच रिंगणात (वन रिंग) केले जात व ते सर्वत्र जास्त प्रचलितही होते. तथापि अमेरिकेत सर्कसचे खेळ जास्त भव्य व प्रेक्षणीय स्वरूपात आणि मोठया प्रमाणात सादर करण्यासाठी तीन रिंगणी सर्कसची (थ्री रिंग सर्कस) कल्पना प्रथमतः मूर्त रूपात अंमलात आणली गेली. त्यात एकाच वेळी तीन रिंगणांमध्ये सर्कसचे वेगवेगळे खेळ सादर केले जात. ही एक अभिनव व कांतिकारक कल्पना होती. यूरोपीय सर्कसमध्ये एकाच रिंगणात प्रयोग केल्याने सर्कसकलावंतांच्या व्यक्तिगत कौशल्ययुक्त आविष्काराला जास्त प्राधान्य मिळे, तर अमेरिकन तीन रिंगणी सर्कसमध्ये अनेक कसरतपटू व निरनिराळे प्राणी यांची कौशल्ये एकाच वेळी तीन रिंगणांत दाखविल्याने एक आगळावेगळा, भव्य व प्रेक्षणीय परिणाम साधला जाई. तीन रिंगणी सर्कसमधील सर्वांत लोकप्रिय ‘बार्नम अँड बेली’ सर्कस १८८१ मध्ये सुरू झाली. कालांतराने तीन रिंगणी सर्कसचा अवाढव्य व्याप व पसारा प्रवास व वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचा ठरू लागल्याने आणि एकंदरीत व्यवस्थापन जिकिरीचे व गैरसोयीचे ठरू लागल्याने तीन रिंगणी सर्कस मागे पडत गेली व तिची जागा पुन्हा एक रिंगणी सर्कशीने घेतली.


बार्नम सर्कस : अमेरिकन सर्कशीच्या इतिहासात पी. टी. बार्नम (१८१०-९१) या सर्कसचालकाचे योगदान फार महत्त्वाचे आहे. त्याने बुक्लिन येथे ‘द गेटेस्ट शो ऑन अर्थ’ (१८७१) या जगप्रसिद्ध सर्कस-खेळाची सुरूवात केली. जेम्स ए. बेली (१८४७-१९०६) या अमेरिकन सर्कस-मालकाच्या सहकार्याने बार्नमने ‘बार्नम अँड बेली’ सर्कसची स्थापना केली. ही जगातली सर्वोत्कृष्ट व अत्यंत लोकप्रिय सर्कस मानली जाते. बार्नमने लंडनच्या ‘रॉयल झूलॉजिकल सोसायटी’तून एक अवाढव्य, महाकाय आफ्रिकन हत्ती ‘जंबो’ आपल्या सर्कशीत आणला. पुढे १९०७ मध्ये बार्नम अँड बेली सर्कस रिंगलिंग बंधूंनी खरेदी केली. हे पाच बंधू असून त्यांची स्वत:ची सर्कस कंपनी होती. १९१९ पर्यंत या दोन्ही सर्कशीचे खेळ वेगवेगळे होत असत. १९१९ मध्ये ‘रिंग लिंग बदर्स’ आणि ‘बार्नम अँड बेली सर्कस’ यांचे विलीनीकरण होऊन एक भव्य सर्कस कंपनी (रिंगलिंगबदर्स-बार्नमअँडबेली सर्कस) नव्याने स्थापन करण्यात आली. या कंपनीने आपल्या सर्कसचे फिरते दौरे बंद करून १९५६ पासून एकाच ठिकाणी कायमस्वरूपी इमारतींमध्ये प्रयोग करण्यास सुरूवात केली. ब्रिटनमध्ये विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात सर्कसची लोकप्रियता हळूहळू ओसरू लागली. इंग्लिश नाटयव्यवस्थापक व निर्माता सर चार्ल्स ब्लेक कॉकरन (१८७२-१९५१) आणि इंग्लिश सर्कससंचालक बेर्ट्नॅम मिल्स (१८७३-१९३८) यांनी मोठया व विस्तृत स्वरूपात सर्कशीचे काही प्रयोग करून तिच्या पुनरूज्जीवनाचे प्रयत्न केले. तथापि ब्रिटनमध्ये पारंपरिक सर्कशीच्या लोकप्रियतेला आता ओहोटी लागली असून फार तुरळक प्रमाणात सर्कशी आढळतात.

सर्कस-प्रयोगाची वैशिष्टये : सर्कस हा मिश्र रंजनप्रकार असल्याने त्यात विविध प्रकारांतील अनेक खेळ समाविष्ट असतात. एका सर्कसप्रयोगात पुढील खेळांचा साधारणपणे अंतर्भाव असतो : (१) सर्कसमधील कलावंत, कसरतपटू, विदूषक, विविधप्राणीवपक्षी (घोडे,माकडे, हत्ती, अस्वले, पाणघोडे, उंट, कुत्री कबुतरे, पोपट इ.), हिंस्रश्वापदे (वाघ, सिंह, चित्ते इ.) यांची बँडच्या लयबद्ध तालावर परेड म्हणजे रिंगणप्रदक्षिणा, (२) टांगत्या झुल्यावरील झोके व विविध कसरती, (३) अश्वारोहणाचे व घोडदौडीचे विविध खेळ, (४) कोलांट उडया व जमिनीवरील विविध कौशल्यपूर्ण कसरती, (५) शक्तिसौष्ठवाचे प्रयोग उदा., जमिनीवर झोपलेल्या पहिलवानाच्या शरीरावर फळी टाकून त्यावरून हत्ती चालविणे, (६) प्रशिक्षित पशुपक्ष्यांचे खेळ (कुत्री, माकडे, पोपट, अस्वल, पाणघोडे, हत्ती इत्यादींचे पशुशिक्षकांनी वा रिंगमास्टरनी करून घेतलेले कौशल्यपूर्ण खेळ) उदा., छोटया स्टुलावर हत्तीला उभे करून त्याच्याकडून करून घेतलेल्या कसरती, हत्तींनी केलेली गणेशपूजा इत्यादी, (७) उंच अधांतरी तारेवरील वा ताणलेल्या दोरावरील तोलाची कामे – उदा., तारेवरून एकचाकी सायकल चालविणे, (८) ताणफळीवरील कामे, (९) सायकली चालविण्याच्या विविध कौशल्यांचे खेळ, (१०) हातचलाखीचे व नजरबंदीचे खेळ, (११) शिडयांवरील, सरकत्या गोलदंडावरील कामे, (१२) आडवे दंड वा टांगत्या कडया यांवरील कसरती, (१३) मोटार-सायकल वा मोटार यांची चित्तथरारक उड्डाणे, (१४) पोलादी पट्टयंच्या मृत्युगोलात उभ्या-आडव्या दिशांनी अत्यंत वेगवान मोटारसायकलींच्या चकरा मारण्याची धाडशी कामे, (१५) खांद्यावर उभा बांबू ठेवून त्याच्या उंच टोकावर लहान मुलांनी केलेल्या कसरती, (१६) ⇨ विदूषका चे विनोदी खेळ – सर्कसच्या प्रयोगात विदूषकाचे स्थान फार महत्त्वाचे असते. सर्कसमध्ये ताणपरिहाराचे आवश्यक कार्य तो करीत असतो. साहसी व कसरती खेळांनी प्रेक्षकांच्या मनावर जो ताण येतो, तो हलका करण्याचे कार्य विदूषक प्रत्येक गंभीर खेळाच्या दरम्यान काही विनोदी चाळे करून पार पाडत असतो. विदूषक अनेक कौशल्यांच्या व कसरतींच्या खेळांत स्वतः सहभागी होत असल्याने तो उत्तम कसरतपटू व खेळाडू असणे गरजेचे असते. पी. टी. बार्नमच्या मते विदूषक हे सर्कस तंबूच्या खुंटयांप्रमाणे असून त्यांच्याच आधारावर सर्कस चालते. अत्यंत उंच व अत्यंत बुटके, जाडे, लुकडे दिसणारे रंगीबेरंगी ढगळ कपडे, उंच त्रिशंकू टोप्या वा हॅट घातलेले, अशी नानाविध विदूषकांची सोंगे पाहता क्षणीच प्रेक्षकांमध्ये हशा उत्पन्न होतो. त्यांच्या खेळांत वेडेवाकडे अंगविक्षेप, कोलांटया, गंमतीदार संभाषणे, पार्श्वभागी पोकळ बांबूने सटासट फटके मारण्याचे (स्लॅपस्टिक) विनोद आदींचा समावेश असतो. सर्कसमध्ये पशुपक्ष्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे खेळ करणाऱ्या पशुशिक्षकाची वा रिंगमास्टरची भूमिकाही फार महत्त्वाची असते. हिंस्त्र श्वापदांकडून साहसी व कौशल्याचे खेळ करून घेणे, हे धोक्याचे व जिवावरच्या जोखमीचे काम असते व ते त्याला प्रत्येक प्रयोगात पार पाडावे लागते. सर्कसच्या प्रयोगातील सर्व खेळ हे साधारणतः बँडच्या लयतालबद्ध वादयसंगीताच्या साथीने पार पाडले जातात. सर्कसची गावातून मिरवणूक काढून जाहिरात करण्यासाठीही बँडच्या पथकाचा उपयोग होतो.

भारतीय सर्कस : ब्रिटिश अंमलात अनेक यूरोपीय सर्कशी भारतात येत व प्रमुख शहरी खेळ करून जात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन व भारतीयांची स्वतंत्र सर्कस असावी, हा विचार मूर्त स्वरूपात आणून भारतातील पहिली सर्कस काढणारे आदय सर्कसचालक म्हणजे महाराष्ट्रातील ⇨ विष्णुपंत छत्रे (१८४०-१९०६) हे होत. त्यांनी १८७८ मध्ये सांगलीला छत्रे सर्कसची स्थापना केली. ते स्वत: उत्कृष्ट अश्वशिक्षक असून, घोडयांवरील कसरतींची अनेक कौशल्यपूर्ण कामे सर्कशीत करीत. त्यांनी १८८४ मध्ये विल्सन सर्कस खरेदी करून अनेक यूरोपीय कसरतपटू आपल्या सर्कशीत घेतले. त्यांनी आपल्या सर्कसला ‘गँड इंडियन सर्कस’ हे नाव देऊन भारतभर तसेच परदेशांतही दौरे काढले. छत्रे सर्कशीत असलेले सदाशिव कार्लेकर यांनी १८८३ मध्ये सांगली येथे ‘कार्लेकर गँड सर्कस’ची स्थापना केली. प्रचंड शिकारखाना हे छत्रे सर्कसचे प्रमुख वैशिष्टय तर त्या काळातील जेंकिन्स व फॅमिलीचे चित्त-थरारक मोटारसायकल उड्डाण हे कार्लेकर सर्कशीचे खास आकर्षण होते, १९४३ मध्ये ती बंद पडली. छत्रे यांच्या सर्कशीत नाव कमावलेले देवल बंधू यांनी आपली स्वतंत्र ‘देवल सर्कस’ १८९५ मध्ये काढून भारतभर व परदेशांतही दौरे करून चांगली नावारूपाला आणली. ही सर्कस ‘ग्रेट इंडियन सर्कस’ या नावाने प्रसिद्ध होती. १९५७ साली ती बंद पडली. शारीरिक कसरतींचे खेळ व पशूंची कौशल्याची कामे ही या सर्कसची लक्षणीय वैशिष्टये होती. काशिनाथ सखाराम ऊर्फ बंडोपंत देवल हे या सर्कसचे एक मालक भारतातील सर्वोत्कृष्ट विदूषक म्हणून ख्यातकीर्त होते. ‘द बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो.


 त्याशिवाय पशुशिक्षक, रिंगमास्टर, जग्लर (हातचलाखीचे खेळ करणारा) अशा विविध भूमिकांतून त्यांनी सर्कसमध्ये सु. चाळीस वर्षे कारकीर्द केली. देवल, कार्लेकर व ‘परशुराम लायन’ ह्या त्या काळातल्या भारतातल्या सर्वांत मोठया तीन सर्कशी होत्या. ‘परशुराम लायन सर्कस’ ही परशुराम माळी यांनी १८९० च्या सुमारास तासगावला सुरू केली. लोकमान्य टिळकांनी परशुराम माळी यांना ‘द लायन ऑफ द सर्कसेस’ ही मानाची पदवी दिली व त्यावरून त्यांच्या सर्कसला ते नाव पडले. ह्या सर्कशीत वाघ, सिंह, हत्ती, घोडे इ. जनावरांचा मोठा भरणा होता. परशुराम माळी स्वतः उत्कृष्ट पशुशिक्षक होते. ते वाघ-सिंहांची व विशेषतः हत्तींची कामे फार सुंदर करून घेत. त्या मानाने कार्लेकर सर्कसमध्ये जनावरे कमी पण खेळाडूंचा भरणा जास्त होता. त्यांतही यूरोपीय, चिनी, जपानी खेळाडू संख्येने अधिक होते. परशुराम लायन सर्कस १९५५ ला मिरज येथे बंद पडली. कार्लेकर सर्कशीतील शेलार यांनी स्वत:ची ‘शेलार्स रॉयल सर्कस’ १९१० मध्ये सुरू केली. ताराबाई शिंदे (सु. १८७५-१९८५) ही भारतातील पहिली महिला सर्कसपटू मल्ल् होती. कार्लेकर गँड सर्कसमध्ये शक्तिप्रदर्शनाची व साहसाची कामे ती करीत असे, तसेच वाघ-सिंहांबरोबर कुस्तीसारखे धाडसी खेळ, झुल्यावरील कसरती इ. करीत असे. तिने स्वतःची ‘ताराबाई सर्कस’ स्थापन केली होती. नारायणराव वालावलकर यांनी ‘दि ग्रेट’ भागिदारीत सुरू केली. ती भारतात व परदेशांतही प्रेक्षणीय खेळ करून दाखवित असे. महाराष्ट्राच्या ज्या भागात सर्कस जन्मली, वाढली व फोफावली तो भाग म्हणजे सांगली जिल्ह्यातील तासगाव, म्हैसाळ हा परिसर. तासगाव ही तर महाराष्ट्रातील सर्कसव्यवसायाची प्रमुख बाजारपेठच होती. तासगावच्या एकूण पंधरा एक सर्कशी होत्या. त्यांपैकी परशुराम सर्कस ही सर्वांत मोठी. जी. ए .सर्कस, भोसले सर्कस, पाटील-कुलकर्णी सर्कस ह्या अन्य काही उल्लेखनीय सर्कशी. म्हैसाळ हीदेखील सर्कसची जन्मभूमी. सुप्रसिद्घ देवल सर्कस व द ग्रेट बाँबे सर्कस ह्या म्हैसाळच्या नावाजलेल्या सर्कशी होत. यांखेरीज वडगाव

(जि. नगर) येथील मोरे गँड सर्कस, पटवर्धन सर्कस, सँडो सर्कस, लेडीज सँडो सर्कस ह्या काही उल्लेखनीय सर्कशी होत. शंकरराव थोरात यांनी वडगाव येथे स्थापन केलेली ‘गँड इंडियन सर्कस’ हीदेखील त्याकाळात नावाजलेली होती. शेलार सर्कशीत आपल्या कादकिर्दीची सुरूवात केलेले दामू गंगाराम धोत्रे (१९०२-७३) हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पशुशिक्षक होते. सुरूवातीला त्यांनी शेलार सर्कशीतून सायकलवरील कसरतीची कामे केली व त्या सर्कशीतच त्यांनी पशुशिक्षक म्हणून नाव कमावले. अमेरिकेतील ‘रिंगलिंग बदर्स’ ह्या प्रख्यात सर्कशीतही त्यांनी पशुशिक्षक म्हणून उत्तम प्रकारे पशूंचे खेळ करून जागतिक कीर्ती मिळविली. वन्य श्वापदांबरोबरच्या आपल्या रोमहर्षक व साहसी अनुभवांचे कथन त्यांनी वाघसिंह माझे सखे-सोबती या पुस्तकात केले आहे.

महाराष्ट्रातील सर्कशी जसजशा बंद पडू लागल्या, तसतसे सर्कस व्यवसायाचे केंद्र केरळकडे सरकू लागले. केरळमध्ये तेल्ल्चेरी येथे सर्कस व्यवसायाची बाजारपेठ उभी राहिली. तेथून अनेक कलावंत, कसरतपटू सर्कस व्यवसायात शिरले. केरळी सर्कशीच्या प्रगतीसाठी त्यांनी व्यावसायिकांच्या संघटना उभारल्या. केरळ शासनानेही सर्कस-व्यवसायाला उत्तेजन दिले. कलाकारांना संरक्षण दिले. सर्कस-व्यवसायाच्या हितार्थ कायदेकानू केले. दामोदरन यांनी स्थापन केलेली सुप्रसिद्घ ‘कमला थी रिंग सर्कस’, ‘जेमिनी’, ‘ग्रेट बाँबे’, पी. त्यागराज यांची ‘ग्रेट प्रभात सर्कस’, ‘न्यू प्रकाश’, ‘रेमन’ इ. केरळी (मलबारी) सर्कशी प्रसिद्घ असून त्या सर्व केरळीयांच्या मालकीच्या आहेत. कमला सर्कसप्रमाणेच सहदेवन यांची जेमिनी सर्कस ही अत्यंत भव्य व मोठी असून फार प्रख्यात आहे. आंध प्रदेशातील प्रा. राममूर्ती यांची सर्कसही फार नावाजलेली होती. राममूर्ती हे प्रख्यात मल्ल असून सर्कशीत शक्तीचे अचाट प्रयोग करीत असत.

सध्याच्या काळात दूरदर्शन, चित्रपट अशा जास्त आकर्षक, सहजसुलभ व प्रभावी रंजनमाध्यमांचा प्रसार सर्वदूर वाढला असल्याने, सर्कशीच्या लोकप्रियतेला ओहोटी लागून सामान्य प्रेक्षक सर्कसपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे सर्कस व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न घटले आहे. सर्कसचा प्रचंड लवाजमा पोसण्यासाठी येणारा अवाढव्य खर्च, सर्कस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी लागणारा वाहतूक-खर्च अशा खर्चांच्या वाढत्या प्रमाणामुळे सर्कस व्यवसाय एकूणच तोटयत आला आहे. सर्कस-व्यवस्थापनही फार जिकिरीचे व अडचणीचे होत चालल्याने त्याचाही सर्कस व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होतो आहे. त्यामुळे अनेक सर्कशी बंद पडल्या आहेत. सर्कसमधील प्राण्यांच्या वापराविरूद्घ, प्राणि-दयावादी संघटनांनी व प्राणिहक्करक्षक कार्यकर्त्यांनी विरोधी आंदोलने करून कायदेशीर बंधने घातली आहेत. काही स्थानिक प्राधिकरणांनी तर त्यावर बंदीही आणली आहे. अशा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे व निर्बंधांमुळे एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा रंजनप्रकार आता हळूहळू अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. रशिया व चीन येथे मात्र सर्कशीची लोकप्रियता अद्याप टिकून आहे.

संदर्भ : 1. Speaight, G. The History of the Circus, 1980.

             २. कार्लेकर, शि. शं. गॅण्ड सर्कस, मुंबई, १९६४. 

             ३. देवल, बंडोपंत, सर्कसबरोबर चाळीस वर्षे, मुंबई, १९८२. 

             ४. शिरधनकर, भानू, सर्कसचे विश्व, पुणे, १९६६.

इनामदार, श्री. दे.

विदूषकाचे अंगविक्षेप मानवी कसरती
पाणघोडे व माकड यांचे खेळ एकचाकी सायकलवरील कौशल्यपूर्ण खेळ
हत्तींचे खेळ गोलाकार रिंगणातील खेळ