सरी, हेन्री हॉवर्ड : (१५१७ ?-१३ जानेवारी १५४७). इंग्रज कवी. जन्म हन्सडन, हर्टफर्डशर येथे. त्याचे वडील लॉर्ड टॉमस हॉवर्ड हे नॉर्फकचे तिसरे ड्यूक झाल्यानंतर हेन्रीला ‘अर्ल ऑफ सरी’ हा किताब मिळाला (१५२४). त्याचे जीवन वादळी आणि वादग्रस्त होते. इंग्लंडचा राजा आठवा हेन्री ह्याची कन्या मेरी हिच्याशी असलेल्या त्याच्या संबंधांची चर्चा त्याच्या विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही होत होती. १५३६ मध्ये रोमन कॅथलिकांनी इंग्लंडमध्ये केलेल्या बंडाच्या वेळी त्यांना गुप्तपणे पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून त्याला तुरूंगवास घडला होता (१५३७– ३९). त्यानंतर १५४२ मध्ये इंग्लंडने स्कॉटलंडविरूद्ध सुरू केलेल्या लष्करी मोहिमेत तो सहभागी झाला होता. त्याचप्रमाणे फ्रान्स आणि फ्लँडर्सविरूद्धही तो लढला होता (१५४३-४६). १५४४ मध्ये त्याला ‘फील्ड मार्शल’ करण्यात आले. तथापि १५४६ मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री मरणोन्मुख झालेला असताना हॉवर्ड कुटुंबीय हे त्याचा पुत्र एडवर्ड ह्याला बाजूला सारून इंग्लंडची गादी बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्याच्यावर आणि त्याच्या वडिलांवर आला. त्यातूनच सरीला लंडन येथे देहान्ताची सजा देण्यात आली (१५४७). त्याचे वडील मात्र ह्या आपत्तीतून वाचले.
सरीच्या मृत्यूनंतर साँग्ज अँड सॉनेट्स हे त्याच्या गीतांचे व सुनीतांचे संकलन ⇨ रिचर्ड टॉटल ह्या प्रकाशकाने प्रसिद्ध केले (१५५७). त्यात ⇨ टॉमस वायट ह्या कवीच्या कविताही आहेत. प्रबोधनकालीन इटालियन कवी ⇨ पीत्रार्क ह्याच्या सुनीतांचे इंगजी अनुवादही त्याने केले. त्याची नेटकी, नितळ सुनीतरचना इंगजी सुनीताच्या विकासात महत्त्वाची ठरली. प्रेम, मृत्यू, मैत्री, यौवन हे त्याच्या कवितांचे विषय आहेत. ⇨ व्हर्जिलच्या ⇨ ईनिड ह्या लॅटिन महाकाव्याचे दोन सर्गही (सर्ग दुसरा व चौथा) सरीने अनुवादित केले.
कुलकर्णी, अ. र.