सरिकेट : (मीरकॅट किंवा स्लेंडरटेल्ड मीरकॅट). या प्राण्याचे शास्त्रीय नाव सरिकेटा सरिकेट्टा असून याचा समावेश मांसाहारी गणाच्या व्हायव्हेरिडी कुलात होतो. याच कुलात मुंगसाचाही समावेश होतो. सरिकेटा प्रजातीत स. सरिकेट्टा ही फक्त एकच जाती असून तिचा प्रसार दक्षिण आफिकेत, बहुधा ऑरेंज नदीच्या दक्षिणेस आहे. याच्या पायांना पाचाऐवजी चार नखर (नख्या) असतात, हा मुंगुस व सरिकेट यांच्यामधील फरक आहे.
सरिकेटाच्या शरीराची डोक्यासह लांबी २५-३५ सेंमी. व निमुळती होत जाणाऱ्या शेपटीची लांबी १७-२५ सेंमी. असते. याचा रंग फिकट करडा किंवा अंशतः करडा असून पाठीच्या खालच्या भागावर आडवे काळे पट्टे असतात. डोके बहुधा पांढरे, कान आखूड व काळे आणि शेपटी पिवळसर असून टोकाला काळी असते. डोळ्यांभोवती काळा ठिपका असतो. केस लांब व मऊ असतात. त्यांच्याखालील फर तांबूस किंवा फिकट तपकिरी तांबडी असते.
सरिकेटांच्या वसाहती असतात. ते स्वत: तयार केलेल्या बिळांत व खडकांतील कपारींत राहतात. ते फक्त दिवसाच क्रियाशील असतात व ऊन खाणे त्यांना आवडते. ते विविध अवस्थांत लोळत पडलेले किंवा ढुंगणावर बसलेले बहुतकरून आढळतात.
पिवळ्या मुंगसाच्या जोडीने पुष्कळदा सरिकेट आढळतात आणि ते जमिनीवरील खारीबरोबर उंदीर व जरबिलांच्या शोधात असतात. ते सर्वभक्षी आहेत म्हणजे त्यांच्या आहारात शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा समावेश असतो. त्यांच्या आहारात कंदमुळांचे प्रमाण अधिक असते. त्याच्या जोडीला कीटकांच्या जमिनीतील अळ्या ते उकरून खातात टोळ पकडतात आणि इतर कीटक व वाळवी खातात तसेच मध्यम आकारमानांचे साप व त्यांची अंडी, सरडे, लहान सस्तन प्राणी आणि पक्षी व त्यांची अंडी यांवर ते उपजीविका करतात
नोव्हेंबर व फेब्रूवारीत सरिकेटांच्या गाभण माद्या नजरेस पडतात. मादीला एका वेळेला दोन-चार पिले होतात. सरिकेट लवकर माणसाळतात. मालकाच्या अंगाला बिलगणे त्यांना आवडते. दक्षिण आफिकेत घरातील उंदीर, घुशी मारण्यासाठी सरिकेट पाळतात त्यांना थंडी सोसत नाही. ते विविध प्रकारांचे आवाज एकसारखे काढून वटवट करतात व त्यांची पिरपीरही सुरू असते व धोका असल्यास ते भुंकतात. सरिकेटांमुळे मूळ वन्य प्राण्यांचा नाश होण्याचा धोका असल्यामुळे अमेरिकन शासनाने त्यांच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत.
पहा : मुंगुस.
जमदाडे, ज. वि.