सरव्हँटीझ, मीगेल दे : (२९ ? सप्टेंबर १५४७ – २३ एप्रिल १६१६). प्रसिद्ध स्पॅनिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी. जन्म अल्कला दे अनॉरस (स्पेन) येथे. त्याच्या जन्माची निश्चित तारीख ज्ञात नाही. त्याचे वडील शल्य-विशारद होते तथापि व्यावसायिक अपयशामुळे चरितार्थासाठी ते कुटुंबासह स्पेनमधील व्हॅलादोलिड, कॉर्दोव्हा, सेव्हिल, माद्रिद आदी शहरांतून हिंडले. त्यामुळे सरव्हँटीझचे शिक्षण विविध शिक्षणसंस्थांत झाले. सालामांका विदयापीठात कदाचित त्याने दोन वर्षे अध्ययन केले असावे. त्याने माद्रिद येथे ख्वान लोपेथ दे होयोस ह्या मानवतावादयाकडे अध्ययन केले (१५६८-६९). १५७० मध्ये तो सैन्यात भरती झाला. लेपांत्तोच्या नाविक लढाईत (१५७१) त्याने विशेष पराकम केला तथापि ह्या लढाईत त्याच्या छातीला इजा झाली आणि त्याचा डावा हातही निकामी झाला. तरीसुद्धा त्याने नंतर सैनिकी सेवा केली. आपला भाऊ रोद्रीगो ह्याच्यासह १५७५ च्या सप्टेंबरात तो समुद्रमार्गे स्पेनला जात असताना चाच्यांनी त्यांना पकडले. त्यानंतर गुलाम म्हणून त्यांना अल्जीअर्सला नेले. पुढे खंडणी घेऊन त्यांची मुक्तता करण्यात आली. स्पेनला परतल्यावर (१५८०) कुटुंबाची दयनीय स्थिती पाहून आपण केलेल्या लष्करी सेवेची जाण सत्ताधाऱ्यांना नसल्याचे त्याला दिसून आले. त्यानंतर त्याने लहानमोठया नोकऱ्या केल्या. पैशांच्या गैरव्यवहाराचे आरोप त्याच्यावर झाले त्याचे बँकांमधले पैसे बुडाले चर्चने त्याला बहिष्कृत केले आणि अनियमित आर्थिक व्यवहारांपायी त्याला किमान दोनदा तुरूंगवास घडला. १६०३ वा १६०४ मध्ये व्हॅलादोलिड येथे आपल्या बहिणींकडे तो राहावयास गेला. तिथे त्याच्या घरापुढे झालेल्या एका सरदाराच्या खुनाचा आरोप सरव्हँटीझवर व त्यांच्या कुटुंबावर आला. त्यातून त्यांची पुढे मुक्तता झाली. त्यानंतर सरव्हँटीझ माद्रिदला गेला आणि आयुष्याच्या अखेरीपर्यंत तो तेथेच होता. त्याच्या आयुष्याची अखेरची वर्षेही हलाखीतच गेली.
सरव्हँटीझला लाभलेली जागतिक कीर्ती हा मुख्यतः त्याच्या दोन किखोते (डॉन क्विक्झोट म्हणून जास्त प्रसिद्ध, दोन भाग, १६०५ १६१५) ह्या कादंबरीवर अधिष्ठित आहे. ही कादंबरी मध्ययुगीन शिलेदारीवर लिहिलेल्या कादंबऱ्यांवर टीका करण्यासाठी लिहिल्याचे दोन किखोतेच्या (पहिला खंड) प्रास्ताविकात त्याने म्हटले आहे. सोळाव्या शतकातील शिलेदारी साहसाच्या कादंबऱ्यांची लोकप्रियता सतराव्या शतकारंभी ओसरू लागली होती. सरव्हँटीझच्या ह्या कादंबरीचा नायक दोन किखोते हा शिलेदारी साहसाच्या कादंबऱ्यांच्या प्रभावामुळे, तशा कादंबऱ्यांतल्या एखादया सरदाराप्रमाणे त्याच्या भोवतीच्या जगातल्या अन्यायाविरूद्ध उभा राहतो. ह्या कामी त्याला सँको पाँझाची साथ मिळते. ह्या दोघांना सारखे अपयश येत असते, तरी ते चिकाटी सोडीत नाहीत. पण हळूहळू दोन किखोतेचा भमनिरास होत जातो. मृत्युपंथाला लागल्यानंतर त्याला आपण केलेली साहसे म्हणजे मूर्खपणा होता असे वाटू लागते.
दोन किखोते हा आदर्शवादी सुधारक, नीतिमान आणि निःस्वार्थी आहे. सँको पाँझा हा काहीसा स्वार्थी, पण आपल्या धन्याशी पूर्ण एकनिष्ठ असलेला, कादंबरीच्या अखेरीस आपल्या मालकाच्या मृत्युसमयी तो अत्यंत निराश होतो.
ह्या कादंबरीतून सरव्हँटीझने अनेक लहानमोठया व्यक्तिरेखा जिवंतपणे उभ्या केल्या. त्याची शैली साधी पण डौलदार आहे. सरव्हँटीझच्या समकालीनांपेक्षा उत्तरकालीनांनी ह्या कादंबरीची विशेष दखल घेतली. विशेषत: स्पेनबाहेर. गद्य महाकाव्याच्या माध्यमातून केलेले भष्ट शिलेदारी युगाचे प्रभावी विडंबन म्हणून ह्या कादंबरीकडे पाहिले गेले. ह्या कादंबरीचे वेगवेगळे अन्वयार्थ लावले गेले. आधुनिक कादंबरीच्या इतिहासात ह्या कादंबरीचे स्थान मोठे आहे. डेफो, फील्डिंग, स्मॉलिट, स्टर्न ह्यांच्या कादंबऱ्यांवर दोन किखोतेचा प्रभाव प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे आढळतो. एकोणिसाव्या शतकातील स्कॉट, डिकिन्झ, फ्लोबेअर, डॉस्टोव्हस्की इत्यादींच्या कादंबऱ्यांचेही दोन किखोतेशी असलेले नाते जाणवते. सरव्हँटीझने ह्या कादंबरीच्या लेखनाच्या निमित्ताने कादंबरी ह्या साहित्यप्रकाराच्या शक्यतांचा घेतलेला शोध अधिक महत्त्वाचा आहे. सतराव्या शतकापासून ह्या कादंबरीची नाटयरूपांतरे, तिच्यावर आधारलेल्या संगीतिका, नृत्ये इ. रंगमंचावर येत राहिली. चित्रपट, दूरचित्रवाणी ह्या माध्यमांनी ह्या कादंबरीचा उपयोग करून घेतला. पिकासो, गोया ह्यांच्यासारख्या चित्रकारांनाही ह्या कादंबरीने स्फूर्ती दिली आहे. ह्या कादंबरीचे जगातील अनेक भाषांत (पूर्णतः वा अंशतः एकूण साठ भाषांत) अनुवाद झाले आहेत. डॉन क्विक्झोट या नावाने दा. न. शिखरे यांनी या कादंबरीचा दोन भागांत मराठी अनुवाद केला आहे (१९७४-७५).
सरव्हँटीझच्या कवितांत ‘जर्नी टू पारनॅसस’ ही दीर्घकविता उल्लेखनीय आहे. ह्या कवितेत त्याने त्याच्या काळातील प्रमुख कवींचा गौरव केला आहे.
नाटककार म्हणून सरव्हँटीझची कीर्ती मुख्यतः त्याने लिहिलेल्या छोटया विनोदी नाटकांवर आधारित आहे. त्याने १५८२-८७ दरम्यान सु. २० किंवा ३० नाटके लिहिली. त्यांपैकी थोडीच उपलब्ध आहेत. ‘दसीज ऑफ न्यूमेन्शिआ’ (इं. शी. १५८५-८७) आणि ‘द ट्रॅफिक ऑफ अल्जीअर्स’ (इं. शी. लेखन १५८० नंतर) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय नाटयकृती. नवअभिजाततावादी नाटकांचा आदर्श ठेवून लिहिलेल्या द सीज … ह्या नाटकाने उत्कृष्ट शोकात्मिकेचा आदर्श निर्माण केला. जिवंत संवाद, वास्तवदर्शी व्यक्तिरेखा आणि उपरोध व्यक्त करतानाही कधीच कडवट न होणारा विनोद, ही त्याच्या नाटकांची वैशिष्ट्ये होत. द मार्व्हल्स पपेट शो हे अशा विनोदी नाटकांपैकी सर्वोत्कृष्ट मानले जाते. ह्या उपरोधप्रचुर नाटकात आपल्या वंशाच्या शुद्धतेसाठी ढोंगे करणारी, एका स्पॅनिश शहरातील माणसे दाखविली आहेत.
पेरीसिलिझ अँड सिगिसमुंडा ही कादंबरी त्याची अखेरची कृती होय. रोमान्स ह्या साहित्यप्रकाराशी नाते सांगणारी ही साहित्यकृती आहे. साहसावर आधारित अशा ह्या त्याच्या साहित्यकृतीत मिथकात्मकता आणि प्रतीकात्मकता यांचा प्रभावी उपयोग करून घेण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूच्या अवघ्या चार दिवस आधी त्याने ही साहित्यकृती पूर्ण केली. आणखी विशेष म्हणजे तिच्या प्रास्ताविकात त्याने आपल्याला मृत्यूची चाहूल लागल्याचे दर्शवून ह्या जगाचा निरोप घेण्याची भाषा केली होती.
माद्रिद (स्पेन) येथे तो निधन पावला.
संदर्भ:1.Allen,JohnJ.DonQuixote:HeroorFool, 2Vols.Florida,1979.
2. Bleznick, D. W. Studies on Don Quijote and otherCervantine Works, 1984.
3. Byron, William, Cervantes: A Biography, London, 1979.
4. Cascardi, Anthony J. The Bounds of Reason: Cervantes, Dostoevsky, Flaubert, 1986.
5. Nabokov, Vladimir, Lectures on Don Quixote, 1984.
6. Suffar, Ruth E. Critical Essays on Cervantes, 1986.
कुलकर्णी, अ.र.