सरदार पटेल विदयापिठ : गुजरात राज्यातील एक विदयापिठ. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘चारूतर विदयामंडळ’ नावाची एक शिक्षणसंस्था खेडा जिल्ह्यात १९४६ मध्ये स्थापन झाली. तिने आणंद शहरीनजीकच्या ग्रामीण भागात कला, विज्ञान, वाणिज्य व अभियांत्रिकी विषयांची महाविदयालये सुरू केली. वल्लभ विदयानगर म्हणून ओळखला जाणारा हा परिसर हळूहळू महाविदयालयांनी व्यापून गेला. सरदार वल्लभभाई पटेल या थोर नेत्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील महाविदयालयसमूहास सरदार पटेल विदयापिठ हे नाव १९५५ मध्ये देण्यात आले आणि त्यासंबंधीचा अधिनियम संमत करण्यात आला.

या विदयापिठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून विदयापिठाच्या कक्षेत विदयापिठ कार्यालयाच्या आठ किमी. त्रिज्येच्या परिघातील सर्व महाविदयालये येतात. विदयापिठाचे संविधान इतर विदयापिठांप्रमाणेच असून कुलगुरू व कुलसचिव हे सवेतन सर्वोच्य अधिकारी प्रशासनव्यवस्था पाहतात. विदयापिठात सहामाही परीक्षापद्धत आहे. मानवविदया व वाणिज्य विषयातील पदवी-अभ्यासक्रमासाठी गुजराती किंवा इंग्रजी भाषा माध्यम असून पदव्युत्तर अभ्यासक्रम व विज्ञानविषयांसाठी इंगजी माध्यम आहे. विदयापीठात मानव्यविदया, सामाजिक शास्त्रे, तंत्रज्ञान व विज्ञान (संगणक शास्त्रासह) वगैरेंच्या विदयाशाखा आहेत. विदयापीठीय बारा महाविदयालये असून सात घटक महाविदयालये होती (१९९८). याशिवाय पदविका अभ्यासक्रमाची चार महाविदयालये तसेच संशोधन संस्थाही आहे.

विद्यापीठाचे गंथालय सुसज्ज असून त्यात १,०५,२५८ गंथ आणि ५३६ नियतकालिके होती (१९९८). विदयापीठाने अंतर्गत मूल्यमापन पद्धती स्वीकारली असून त्यासाठी विदयार्थ्यांची मौखिक चाचणी तसेच लेखी परीक्षा घेतली जाते. याशिवाय विदयापीठात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, सेवायोजन, रोजगार इत्यादींसंबंधी माहिती व मार्गदर्शन देणारी केंद्रे आहेत.

देशपांडे, सु. र.