संस्थिति रक्षण : (अंगस्थिती रक्षण). शरीराच्या विविध कार्यक्रमांना अनुकूल अशी ⇨ अंगस्थिती (पवित्रा) घेण्यासाठी आणि टिकवून धरण्यासाठी तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) अनेक यंत्रणा विकसित झालेल्या आहेत. जाणिवपूर्वक केल्या जाणाऱ्या हालचाली आणि नेणीवेत घडून येणाऱ्या ⇨ प्रतिक्षेपी क्रिया यांच्या एकत्रित परिणामामुळे प्रसंगानुरूप संस्थिती निर्माण होत असते. उदा., उभे राहणे, बसणे, दबा धरणे, पळून जाण्यासाठी किंवा पाठलाग करण्यासाठी सिद्ध होणे, विश्रांतीसाठी आडवे होणे इत्यादी.

या सर्व हालचालींसाठी तंत्रिका तंत्राचे पुढील तीन घटक कार्यरत असतात : (१) परिघीय संवेदनांची निर्मिती व त्यांचे केंद्राकडे प्रक्षेपण होणे. (२) संवेदनांचा अर्थ लावणारी किंवा प्रतिक्षेपी पद्धतीने स्नायूंना आदेश देणारी केंद्रीय तंत्रिका जाले. मेरूरज्जू , लंबमज्जा, सेतू , लहान मेंदू (निमस्तिष्क) आणि मोठा मेंदू (प्रमस्तिष्क) यांमध्ये हे कोशिका समुच्च्य पसरलेले असून ते एकमेकांना जोडलेले असतात. (३) वरील समुच्च्यांपासून निघून स्नायूंकडे जाणारे निर्गमी मार्ग. यांतील तंतू प्रेरक किंवा निरोधक असे दोन्ही प्रकारचे संदेश नेत असतात. [⟶ तंत्रिका तंत्र मेंदू].

परिघीय संवेदना : संस्थितीचे आकलन होण्यासाठी, तसेच आसपासच्या परिस्थितीनुसार शारीरिक हालचाली घडवून आणण्यासाठी त्वचेतील स्पर्शाचे व तापमानाचे संवेदन गुरूत्वाकर्षणामुळे शरीराच्या भाराची जमिनीस टेकलेल्या भागास (उदा., तळपाय) होणारी भारसंवेदना डोळे, नाक, कान या ज्ञानेंद्रियांनी कळविलेले परिसराचे ज्ञान यांचा उपयोग होतो. स्नायूंच्या तंतूंची लांबी आणि ताणाची स्थिती जाणण्यासाठी व स्नायूंनी कंडरांच्या (स्नायुबंधांच्या) मदतीने चलनशील केलेल्या सांध्यांची स्थिती (मिटलेला, उघडलेला) अजमावण्यासाठी विशेष प्रकारचे संवेदक स्नायूंत व कंडरांत विकसित झालेले आहेत. आंतर-कर्णामधील श्रोतृकुहर हे इंद्रिय गुरूत्वाकर्षणाच्या संदर्भात डोक्याची स्थिती कशी आहे याचा अंदाज अत्यंत संवेदनशीलतेने घेत असते. त्यातील दोन द्रवयुक्त पिशव्यांमध्ये सु. २ मिमी. व्यासाची दोन संवेदक क्षेत्रे (बिंदू) असतात. एक जमिनीला समांतर (ताठ उभे असताना) आणि दुसरे जमिनीशी काटकोनात असल्यामुळे डोक्याची स्थिती व त्यात होणारे बदल अचूकपणे टिपले जातात. श्रोतृकुहराला जोडलेल्या तीन अर्धवर्तुळाकार नलिका एकमेकींशी काटकोनात असतात. त्यांच्या आतील द्रवाची हालचाल (डोक्याची कोणत्याही दिशेने होणारी हालचाल) हे देखील संस्थितीमधील बदलाची पूर्वसूचना देत राहणारे महत्त्वाचे संवेदन असते. [⟶ कान].

मध्यवर्ती प्रक्रिया : परिघीय संवेदनांचे प्रकियन विविध पातळ्यांवर होत असते. प्रत्येक पातळीवरील तंत्रिका कोशिकांच्या (मज्जा पेशींच्या) कार्यावर वरच्या पातळीवरून नियंत्रण होत असते.

मेरूरज्जूच्या पातळीवर परिघीय संवेदनांमुळे-विशेषतः त्वचा व स्नायूं-कडील – प्रतिक्षेपी आवेग निर्माण होऊन स्नायूंच्या ताणात एकमेकांस पूरक असे बदल होतात. उदा., एका बाजूचे स्नायू शिथिल झाल्यास शरीर कलंडू नये म्हणून दुसऱ्या बाजूचे स्नायू ताणले जातात. उंदरासारख्या चतुष्पादाला पाठीवर झोपविले, तर तो त्वरित सुलटा होऊन चारी पायांवर उभा राहतो (अंगस्थिती पुनःस्थापन प्रतिक्षेप). गुरूत्वाकर्षणातील अकस्मात होणारे बदल [ उदा., उद्‌वाहकाची (लिफ्टची) हालचाल, अवकाशयानाचा प्रवास] सहन करण्यासाठीही अनेक स्नायूंच्या प्रतिक्षेपी हालचाली मेरूरज्जूतून निर्माण होतात.

मेंदूच्या तळाशी असलेल्या मस्तिष्क स्तंभाच्या प्रदेशात सेतू व लंबमज्जा यांचा समावेश होतो. श्रोतृकुहरातून येणारी श्रोतृकुहर तंत्रिका (आठव्या तंत्रिकेचा एक भाग) या क्षेत्रातील तिच्या केंद्रात प्रवेश करते. जालिकाकेंद्रे म्हणून ओळखली जाणारी आणि लहान मेंदू व मोठा मेंदू यांच्यापासून संदेश प्राप्त करणारी केंद्रेही येथेच असतात. या सर्वांपासून निघणारे तंत्रिका मार्ग मेरूरज्जूतून खाली जातात आणि पाठीचे स्नायू व हातापायांचे स्नायू नियंत्रित करतात. गुरूत्वाकर्षणाच्या विरूद्ध दिशेने क्रिया करून संस्थिती सांभाळण्याचे कार्य हे स्नायू करतात.

मस्तिष्क स्तंभाच्या पातळीवर परंतु डोक्याच्या मागच्या बाजूस असलेला लहान मेंदू (निमस्तिष्क) हा भाग मुख्यतः स्नायूंच्या हालचालींना सुसूत्रता आणण्याचे काम करतो परंतु त्याचाच एक भाग संस्थिती रक्षणात महत्त्वाचे कार्य करतो. कारण त्यात मोठया मेंदूतील प्रेरक क्षेत्रांपासून मेरूरज्जूमधील संवेदनागाहक क्षेत्रापर्यंत जवळजवळ सर्व ठिकाणांशी जोडणारे तंत्रिका मार्ग – दोन्ही दिशांनी संदेश नेणारे – आढळतात.

मोठया मेंदूच्या पातळीवर संस्थिती रक्षणाचे कार्य त्यामानाने कमी प्रमाणात होत असते. जाणीवपूर्वक एखादा पवित्रा घेणे, आज्ञापालन, बारकाईने निरीक्षण करणे, उपद्रवकारक किंवा क्लेशदायक, न आवडणाऱ्या संवेदनापासून सुटका मिळविणे इ. हेतूंची पूर्तता करण्यासाठी असे कार्य होते.

स्नायूंकडे निर्गमी संदेश : हे पाठविण्याचे कार्य वर उल्लेखिलेल्या सर्व केंद्रांकडून होत असते. हे सर्व संदेश मेरूरज्जूमधील प्रेरक कोशिकांच्या (अगशृंग कोशिकांच्या) प्रतिक्षेपी कियांमध्ये योग्य त्या दिशेने बदल घडवून आणत असतात.

श्रोतृकुहराची सूज, मेंदू आणि मेरूरज्जूला अपघातामुळे होणारी इजा, विषाणुजन्य विकारांमुळे तंत्रिका तंत्रात उदभवणारे दोष आणि आजारातून उठल्यावर स्नायूंमध्ये राहणारा अशक्तपणा या कारणांमुळे संस्थिती रक्षणात काही काळ कमतरता भासते. अशा प्रसंगी काठीसारख्या आधाराची गरज जाणवते.

पहा : अंगस्थिति कान तंत्रिका तंत्र प्रतिक्षेपी क्रिया भोवळ मेंदू.

संदर्भ : Guyton, A. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1996.

श्रोत्री, दि. शं.