समाजशास्त्र : मानवी समाजाचा आणि मानवा-मानवांत होणाऱ्या सामाजिक आंतर क्रियांचा व आंतरसंबंधांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास. ‘ समाजशास्त्र ’ ही संज्ञा ऑग्यूस्त काँत (१७९८- १८५७) याने रूढ केली तथापि तत्पूर्वी समाज व व्यक्ती यांच्या परस्परसंबंधांविषयी विश्र्लेषण व विवेचन करण्याचा प्रयत्न अनेक तत्त्ववेत्ते आणि विचारवंत यांनी केलेला आढळतो. समाजशास्त्रीय विचारांची मुळे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जाऊन पोहोचतात. सेंट सायमन (१७६०-१८२७) याने प्रथमत: समाजाचा अभ्यास शास्त्राच्या पातळीवर नेण्याची आवश्यकता प्रतिपादिली. प्रबोधनकाळ आणि तद्नुषंगाने नव्याने पुढे आलेले विचार, तत्कालीन सामाजिक प्रकिया, चळवळी या सर्वांनी समाजशास्त्राच्या प्रगतीला मोठी प्रेरणा दिली. त्याकाळच्या परिस्थितीवरील प्रतिकिया म्हणून अनुभववाद पुढे आला. ऑग्यूस्त काँत याने समाजशास्त्राचे नामकरण केले आणि समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धत वापरण्यावर भर दिला. तत्कालीन समाजरचना हा सामाजिक उत्कांतीच्या विकासाचा उच्च्बिंदू असल्याने कांतिकारक बदल अनावश्यक आहेत, असे त्याचे मत होते. त्याने समाजशास्त्राचा अभ्यास हा प्रत्यक्ष सत्तावादाच्या भूमिकेतून करावयास पाहिजे असे प्रतिपादिले. त्याच्या मते समाजशास्त्रसुद्धा इतर शास्त्रांसारखे निश्र्चित स्वरूपाचे करता येईल. शास्त्रज्ञांच्या मते ज्या पद्धतींनी शास्त्रीय अभ्यास करता येतो, त्याच पद्धतीचे अवलंबन या शास्त्राच्या अभ्यासात सुद्धा करता येईल व केले पाहिजे. या त्याच्या भूमिकेतूनच जीवन नियतिवाद, यांत्रिक नियतिवाद आदी विचार मांडले गेले. समाजाला शरीराची उपमा दिली गेली व ज्या पद्धतीने शरीराचे आकलन करता येते, त्याच पद्धतीने समाजाचेही आकलन करता येईल, असा सिद्धांत पुढे आला. साहजिकच समाजरचनेसंबंधी जो जीवात्मक सिद्धांत मांडला गेला, त्याचे मूळ या संकल्पनेत आहे. पुढे स्पेन्सरने (१८२०-१९०३) त्याच्या उत्कांतिवादी सिद्धांतामध्ये जैविक सेंद्रियवादाच्या मांडणीत आणि व्यापक सामाजिक जीवनाचे जीवशास्त्रीय संकल्पनांच्या साहाय्याने विश्लेषण करून काँतच्या कल्पनेस आणखी मूर्त स्वरूप दिले परंतु समाजशास्त्रामध्ये भरीव योगदान ⇨एमील द्यूरकेम (१८५८-१९१७) ह्या फेंच शास्त्रज्ञाने केले. समाजशास्त्राला एक अनुभवनिष्ठ शास्त्र म्हणून प्रस्थापित करण्याचे श्रेय द्यूरकेमला देता येते. सामाजिक रचना व सामाजिक शक्ती ह्या व्यक्तीपेक्षा बाह्य आहेत, असे त्याने मत मांडले. प्रत्येक समाज सर्वसाधारणपणे प्रचलित झालेल्या सामूहिक संकल्पनांवर ( उदा., कायदा, धर्म, नीती इत्यादी ) आधारलेला असतो. या सामुदायिक संकल्पना मानवी जाणिवेवर सामाजिक पर्यावरणामुळे लादल्या जातात. प्रत्येक समाज सामाजिक एकतेने बांधलेला असतो. संस्कृतीच्या प्रारंभिक अवस्थेत एकता यांत्रिक असते, तर प्रगत अवस्थेत ती सेंद्रिय असते. आधुनिक समाजात दुर्बल होणाऱ्या सामाजिक जाणिवा द्यूरकेमच्या मते नीतीची बांधणी करून सुधारता येतात.
द्यूरकेम, मॅनहाइम तसेच माक्स वेबर यांच्या योगदानामुळे समाज-शास्त्राला वैचारिक तसेच शास्त्रीय अधिष्ठान मिळाले. मार्क्सच्या संघर्षातून सामाजिक बदलाच्या प्रकियेशी संबंध जोडणारे, तर द्यूरकेमच्या प्रमाण-शून्यतेच्या (Anomie) संकल्पनेतून सामाजिक एकसंधतेचा शोध घेणारे किंवा माक्स वेबरच्या, सत्तेच्या तीन प्रकारांमुळे [ अलौकिक (करिश्मॅटिक) व्यक्तित्वाची सत्ता, पारंपरिक सत्ता व वैधानिक सत्ता] मिळालेले मौलिक विचार समाजशास्त्राला दिशा देणारे ठरले.
समाजशास्त्र म्हणजे जागतिक आणि विशिष्ट पातळीवर सामाजिक व्यवस्थेची कार्यपद्धती आणि प्रगती यांना नियंत्रित करणाऱ्या नियमांचा सुसूत्रपणे अभ्यास करणारे शास्त्र. सामाजिक समूहांचा व गटांचा, त्यांच्या संस्था आणि संघटनांचा आणि त्यांच्यातील होणाऱ्या परिवर्तनाच्या कारण-परिणामांचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे समाजशास्त्र अशी व्याख्या करता येईल. समाजातील व्यवस्था, उपव्यवस्था, सामाजिक संबंध, सामाजिक घटना, लोकांच्या व्यवहारातील नियमन हेदेखील समाजशास्त्राच्या अभ्यासाचे प्रमुख घटक आहेत. अनेक व्यक्तींचे परस्परसंबंध, यातून निर्माण होणाऱ्या भूमिका, औपचारिक संघटना म्हणजेच अगदी कुटुंब, शाळा, धर्म यांपासून ते कारखाने, महामंडळे इत्यादींपर्यंत अनेक गट, संस्था व समुच्च्यांमध्ये कियाशील असणाऱ्या व्यक्ती, या सर्वांची चिकित्सा या शाखेत केली जाते. अशा समाजशास्त्रीय विश्लेषणातून अनेकविध गोष्टी, जसे व्यवस्थेची निर्मिती किंवा शोषण, अधिकार, सत्ता किंवा वर्चस्व, समन्वयता किंवा स्तरीकरणाची प्रकिया, संघटन वा संघटित कृती अशा अनेकविध प्रकिया व त्यांचे विविध पैलू इ. स्पष्ट होतात. समाजाचा एका व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास करणे समाजशास्त्रात अभिप्रेत आहे. त्यामुळे समाजाचा, त्यातील घटकांचा व त्यांच्यातील परस्परसंबंधांचा समग वा विशिष्ट अभ्यास हा या शास्त्राचा अभ्यासविषय ठरतो.
समाजव्यवस्थेतील निरनिराळे घटक आणि त्यातील सातत्य व बदल हा समाजशास्त्राचा अभ्यासविषय असल्यामुळे समाजात अस्थैर्य, ताण- तणाव, संघर्ष व सामाजिक बदल कसे होतात, ह्याचा शोध घेणे हा समाजशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा अपरिहार्य भाग बनला. शास्त्रीय दृष्टिकोनाला अनुसरून आणखी एक उपसिद्धांत पुढे आला. तो म्हणजे मानव हा एक बुद्धीवादी प्राणी आहे व त्याचे सर्व व्यवहार-व्यापार बुद्धीवादी दृष्टिकोना-तूनच होतात आणि प्रत्येक मनुष्य स्वत:च्या फायदयासाठी झटत असतो. या उपयुक्ततावादी तत्त्वज्ञानाचाही समाजशास्त्रावर परिणाम दिसतो. तसेच राज्य अभ्यासक समाज हा एक करार आहे, त्यात विविध व्यक्ती आपले हितसंबंध जपण्यासाठी हा करार करतात, यातून मुक्त होण्याचेही स्वातंत्र्य व्यक्तींना असले पाहिजे, असे आगही मत हॉब्ज, रूसो, लॉक प्रभृती तत्त्वज्ञांनी [⟶ सामाजिक कराराचा सिद्धांत]. अर्थशास्राच्या मते समाजाची धारणा ही अर्थशास्त्रीय तत्त्वांवरच होत असते. या संदर्भात कार्ल मार्क्स (१८१८-८३) याच्या विचारसरणीचा व सिद्धांताचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. कार्ल मार्क्स याने मांडलेल्या विचारांचा प्रभाव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे वैचारिक वाटचालीवर पडलेला दिसून येतो. मार्क्सने सामाजिक संरचनेला एक समग व्यवस्था किंवा सेंद्रिय संरचना म्हणून मानले. त्याच्या सामाजिक सिद्धांतात समाजाचे स्वरूप, त्याचे परिवर्तन आणि परिवर्तनाच्या प्रेरणा ह्यांचा निर्देश आहे. समाजाची आर्थिक संरचना म्हणजे पाया आणि त्या अनुषंगाने विकसित झालेल्या विधिव्यवस्था, राजकारण आणि त्यांना सुसंगत अशा धर्म, नीती, साहित्य, कला, तत्त्वज्ञान इत्यादींमधल्या जाणिवांचे संकुल म्हणजे इमला. ही सर्व क्षेत्रे परस्परांवर प्रभाव टाकणारी असली, तरी अंतिमत: पाया किंवा अर्थरचनेतील बदल प्रभावी ठरून सामाजिक रचना क्रांतिकारकतेने बदलत जाते. मार्क्सच्या मते श्रमविभागणी आणि खाजगी मालमत्तेचा अपरिहार्य परिपाक म्हणून जी परात्मता निर्माण होते, ती त्यांच्या पुनयार्ेजनेनंतरच नाहीशी होईल. मर्टनने हीच सैद्धांतिक चौकट वापरून प्रगत औदयोगिक समाजामधील परस्परकियांच्या विश्र्लेषणातून वरवर दिसणाऱ्या कियांचे कार्य अधिक खोलात जाऊन पाहिल्यास त्यांचा न जाणवणारा परंतु दूरगामी परिणाम कसा होतो, संस्थांचे कार्य व त्याच बरोबर अपकार्ये, संदर्भसमूह आणि सामाजिक विचलन इ. मध्यम पातळीचे ( middle–range ) सिद्धांत आणि संकल्पना मांडल्या. मार्क्सच्या सिद्धांतावर यांत्रिकतेचा आरोप झाला, तो दूर करण्याचा प्रयत्न लेनिन, ट्नॉटस्की, लुकाच, गामशी इ. मार्क्सवादी तत्त्वज्ञांनी केला.
संघर्ष सिद्धांत प्रामुख्याने फायदयाची किंवा नफ्याची होणारी वाटणी, या विचाराभोवती मांडला गेला परंतु पुढे त्यातून शोषण, सत्ता, अधिकार, वर्चस्व, धुरिणत्व इ. संकल्पनांचे अनेक सूक्ष्म पदर उलगडले गेले. हेबरमास, ॲल्थ्युझिअस तसेच ॲडोनार्े, हॉर्खिमिर इ. विचारवंतांनी चिकित्सक सिद्धांत विकसित केला. तसेच सी. राइट मिल्स, वेबलेन, डॉरेनडॉर्फ इत्यादींचे विकासविषयक योगदानही महत्त्वाचे ठरले.
सामाजिक बदलाचे ऑग्यूस्त काँत, स्पेन्सर, कार्ल मार्क्स यांनी मांडलेले सिद्धांत दिशात्मक स्वरूपाचे म्हणता येतील. पारेअतो (१८४८-१९२३) याने त्याऐवजी चकात्मक स्वरूपाचा सिद्धांत मांडला. अभिजनवर्गाचे अतार्किक अशा जनसमुदायावर असणारे प्रभुत्व आणि सत्ता काबीज करण्यासाठी अभिजनवर्गाचेच एका अर्थाने होणारे अभिसरण, ह्या कल्पनेतून सामाजिक बदलांचा सिद्धांत त्याने मांडला.
समाजातील संस्कृतीच्या अभ्यासावर लेव्ही-स्त्राऊस, टोनिकस, रेडफील्डसारख्या शास्त्रज्ञांनी भर दिला. टोनिकसने गेशेलशाफ्ट ( Gesellschaft ) व गमेनशाफ्ट ( Gemeinschaft ) या संरचनात्मक–सामाजिक स्वरूपाच्या ऐतिहासिक विकासाच्या अवस्थांचे संशोधनही उपयुक्त ठरविले. रॅडक्लिफ-बाऊन व मॅलिनोस्की, लेव्ही-स्त्राऊस, टोनिकस, रेडफील्डसारख्या मानववंशशास्त्रज्ञांनी संस्कृतीच्या अभ्यासावर भर देऊन त्यासाठी समाजातील संस्था व त्यांतील व्यक्तींच्या परस्परसंबंधांचे संरचनात्मक विश्र्लेषण केले. फेझर, मॉस, मॅलिनोस्की इत्यादींच्या विचारांच्या अनुषंगाने पुढे विनिमयात्मक आंतरकियांविषयी सिद्धांत मांडला गेला. होमान्स,पीटरब्लाअू सारख्यांनी विनिमयात्मक आंतरकियांतून पुढे व्यापक तळी वर निर्माण होणारे संबंध,संस्थांची निर्मिती इत्यादीं बाबत विचार मांडले.
सोरोक्यिन याचे सामाजिक-सांस्कृतिक चलनासंबंधीचे विचार किंवा टॅलकॉट पार्सन्झसारख्यांनी मांडलेला व्यवस्था सिद्धांत, हे व्यापक स्वरूपाचे सिद्धांत म्हणता येतील. कार्यवादी सैद्धांतिक परिदर्शन द्यूरकेमनंतर आणखी पुढे विकसित करण्यास टॅलकॉट पार्सन्झ, रॉबर्ट मर्टन इत्यादींचे संशोधन साहाय्यभूत ठरले. मूलभूत मूल्यव्यवस्थेशी बांधीलकी आणि नियमने, मूल्ये, गट, संस्था ह्या बाबींवर त्यांनी भर दिला. अमेरिकेत संरचनात्मक कार्यवादी परिदर्शन एका कालखंडात समाजशास्त्रात प्रभावी ठरले होते. पुढे मार्क्सवादी विचारप्रणालीतील अभ्यासामुळे त्याची पीछेहाट झाली. माक्स वेबरने जे पायाभूत स्वरूपाचे योगदान केले होते, त्या आधारे नवे सैद्धांतिक विचार विकसित होण्यास मदत झाली.
माक्स वेबर या समाजशास्त्रज्ञाने समाजाच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून आधुनिक समाजात दर्जा, अधिकार वा पक्ष यांवर आधारित वर्ग निर्माण होतात, अशी अधिक समावेशक स्वरूपाची मांडणी केली. पाश्चात्त्य औदयोगिक समाजांमध्ये झालेला भांडवलशाहीचा विकास व प्रॉटेस्टंट हा धर्मपंथ यांचा संबंध, विधिनिष्ठ-विवेकपूर्ण कियांमुळे नोकरशाहीचा झालेला विकास इ. विषयांवरील वेबरने केलेली मांडणी समाजशास्त्रासाठी मौलिक योगदान ठरले. समाजशास्त्रामध्ये शास्त्रीय अधिष्ठानाचा आगह धरताना केवळ भौतिक आणि आर्थिक घटनांना महत्त्व न देता त्याने विचारप्रणाली, संवेदनशीलता, मूल्यव्यवस्था हे घटकही महत्त्वपूर्ण मानले. जॉर्ज सिमेल, वेबर तसेच मीड यांनी मांडलेल्या मानवी कियांच्या उद्दिष्टपूर्ण अर्थगहनतेबाबतच्या विचारांचा अप्रत्यक्ष परिणाम पुढे प्रतीकात्मक आंतरकियावाद ( सिम्बॉलिक इंटरॅक्टिव्हिझम ) विकसित होण्यावर झाला. बर्जर आणि लकमान, झुटझ्, गारफिंकल आदी विचारवंतांनी व्यक्तीच्या दैनंदिन जगाची बांधणी, ज्ञानाचे एक ‘ वास्तव ’ म्हणून अस्तित्वात येणे इ. विषयांवर लिखाण केले. मानसघटनाशास्त्र ( फेनॉमेनॉलॉजी ) आणि मानवजातिपद्धतीशास्त्र ( इथ्नॉमेथडॉलॉजी ) ह्या समाजशास्त्रातील नव्या परिदर्शनांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरले.
मानवी समाज हा व्यक्तींचा बनलेला असला, तरी या व्यक्तिसमूहाला संस्कृती असते. व्यक्ती व समूह यांतील परस्परसंबंध हेसुद्धा संस्कृतीवर आधारलेले असतात. व्यक्ती व समाज यांच्या परस्परसंबंधांतून मूल्ये निर्माण होतात. त्याचे पालन करणे, हे त्या समूहातील व्यक्तींना आवश्यक ठरते. व्यक्तींच्या गरजा भागविण्यासाठी सामाजिक संस्थांची जरूरी भासते मात्र व्यक्तींच्या परस्परसंबंधांवर व वर्तनावर नियंत्रण घालणे, हे सामाजिक संस्थांचे महत्त्वाचे कार्य होय. व्यक्तीच्या व समाजाच्या गरजानुसार सामाजिक संस्थाही अनेक प्रकारच्या असतात. या निरनिराळ्या संस्था एकत्र येऊन समाजरचना निर्माण होते. समाजशास्त्राचा अभ्यास करताना सामाजिक संस्था व समाजरचना यांचा संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन व विश्र्लेषण पद्धती लक्षात घ्यावयास पाहिजेत कारण समाजशास्त्रज्ञांच्या मते संरचना-त्मक कार्यवादी पद्धतीने अभ्यास केल्यास, ते विवेचन जास्तीत जास्त वास्तववादी होईल. समाज सुसंगत चालण्यासाठी काही गोष्टी अपरिहार्य असतात : (१) परिस्थिती नियंत्रणात ठेवून साधने उपलब्ध करून देणे, (२) उद्दिष्टपूर्ती ( गोल ऑफ अटेनमेन्ट ), (३) समाजात स्थैर्य राखून त्याची घडी बिघडू न देणे ( पॅटर्न ऑफ मेन्टेनन्स ), (४) विविध घटकांमधील व बाहेरच्या समाजाशी संबंध दृढतर करून समतोल राखणे ( इंटिगेशन ). समाजरचना, तिचे कार्य व स्वरूप यांचे विश्लेषण, हा समाजशास्त्राचा प्रमुख हेतू असतो. समाजरचना ही समाजसंस्थांच्या परस्परसंबंधांतून निर्माण होते. त्यामुळे त्यांचेही विश्लेषण करणे तेवढेच आवश्यक असते. या संदर्भात समाजव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी पार्सन्झ यांनी सुचविलेल्या कमश्रेणीचा फार उपयोग होतो. नियुक्त कार्यभूमिका ( रोल ) व स्थान ( स्टेटस ) या दोन कल्पना या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या ठरतात. समाजातील प्रचलित मूल्यांमुळे व्यक्ती व समष्टी यांच्या संबंधांविषयी योग्यायोग्य, संमत असंमत अशा प्रकारच्या कल्पना प्रस्थापित होतात. मूल्ये, अपेक्षित वर्तन, समष्टी व नियुक्त कार्यभूमिका ही जी श्रेणी कल्पिलेली आहे, तिच्यामुळे सामाजिक मूल्ये व व्यक्तींचे वर्तन यांची सांगड घालणे सोपे जाते. व्यक्तीचे वर्तन व अन्योन्य संबंध हेसुद्धा पुष्कळ अंशांनी सामाजिक संस्थांमुळे सुनियंत्रित होतात.
समाजशास्त्र व तत्त्वज्ञान यांचे परस्परसंबंध लक्षात घेता समाजशास्त्रात तात्त्विक विवेचनावर भर दिला जातो, हे लक्षात येते. तव्दतच भौतिक शास्त्रे व त्यांच्यातील पद्धती यांचाही परिणाम समाजशास्त्र पद्धतीवर दिसून येतो. निरनिराळ्या सामाजिक शास्त्रांतील पद्धतींचाही समाजशास्त्राच्या अभ्यास पद्धतीवर परिणाम दिसून येतो. मानवशास्त्र व समाजशास्त्र यांतील साधर्म्य लक्षात घेता, सामाजिक कार्यवादी पद्धतीचा पगडा समाजशास्त्राच्या अभ्यासपद्धतीवर दिसून येतो मात्र समाजशास्त्रज्ञ असे म्हणतात की, केवळ रचनात्मक किंवा कार्यवादी दृष्टिकोनातून समाजाचा अभ्यास करणे, योग्य ठरणार नाही. अशा प्रकारे समाजशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्रांशी घनिष्ठ संबंध आहे.
विदयमान काळामध्ये यूरोपियन समाजशास्त्रीय संरचना व कारकत्व ( एजन्सी ) या विषयांत मोठय प्रमाणात रस घेतला जाऊ लागला. बोर्द्यूचे सांस्कृतिक पुनरूत्पादन, विचारांच्या संरचना इ. विचार तसेच फुकाचे सत्तेच्या वर्तमानाच्या इतिहासाबाबतचे विचारही नव्या संशोधनाच्या दृष्टीने प्रभावी ठरलेले दिसतात. आधुनिकीकरण ह्या संकल्पनेच्या पुढे जाऊन उत्तर-आधुनिकीकरणवाद आधुनिकतेवरील मर्यादा दाखवून देणारा परंतु विचारांच्या अनेक अस्पष्ट रेषा असणारा सिद्धांतही प्रचलित झाला. अर्थात प्रत्येक कालखंडात समाजात होणारी उलथापालथ समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या केंद्रबिंदूमध्येही बदल घडवून आणते. जागतिकीकरणाच्या रेटयमध्ये काही सामाजिक समूहांना बाहेर फेकण्याची होणारी प्रकिया किंवा जनुकशास्त्राच्या सामाजिक परिणामांचा अभ्यास, हे त्याचे उदाहरण देता येईल. मूल्यव्यवस्था रूजण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या ऐतिहासिकतेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न यूरोपियन आणि पौर्वात्य समाजशास्त्रामध्ये, त्या त्या समाजांच्या स्वरूपामुळे जास्त प्रमाणात दिसून येतो.
भारतामध्ये समाजशास्त्रीय विचार अगदी कौटिलीय अर्थशास्त्रा पासून श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोश गंथांपर्यंत आढळत असले, तरीही समाजशास्त्र हा विषय मुंबई विदयापीठात १९१९ मध्ये स्थापन झाला. मुंबई व कलकत्ता ही सुरूवातीच्या काळात त्यांची प्रमुख केंद्रे राहिली. गो. स. घुर्ये, राधाकमल मुखर्जी, इरावती कर्वे इ. अनेक भारतीय समाजशास्त्रज्ञांनी भारतीय समाजशास्त्राचा पाया घातला. पुढे इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चतर्फे समाजशास्त्रातील विविध शाखांमध्ये झालेल्या संशोधनाचे अहवाल प्रसिद्घ करण्यात आले. सोशॅलॉजिकल बुलेटिन हे सुरूवातीचे महत्त्वाचे संशोधन-पत्र असले, तरी समाजशास्त्रीय संशोधनपर लेख प्रसिद्ध करणाऱ्या संशोधन-पत्रिकांची संख्याही लक्षणीय आहे. महाराष्ट्नामध्येही १९८३ मध्ये ‘ मराठी समाजशास्त्र परिषदे ’Mr स्थापना झाली. बदलत्या काळानुसार भारतीय संदर्भात निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रकियांचा अभ्यास करण्याकडे भारतीय समाजशास्त्रज्ञांचा कल दिसून येतो.
संदर्भ : 1. Abraham, M. F. Modern Sociological Theory, Oxford, 1982.
2. Broom, Leonard and Others, Essentials of Sociology, 1984.
3. Coser, Lewis A. and Others, Introduction to Sociology Harcourt, 1986 .
4 . Giddens, Anthony, Sociology : A Brief But Critical Introduction, Harcourt, 1982 .
5 . Sanders, William Pinhey, Thomas, The Conduct of Social Research, Holt, 1983 .
6. Stewart, E. W. Glynn, J. A. Introduction to Sociology, New York, १९८५.
शिरवाडकर, स्वाती दामले, य. भा.