समूह : आपल्या नेहमीच्या संभाषणात ‘समूह’ हा शब्द काहीशा सैल आणि संदिग्धपणाने वापरला जातो. ‘एकत्र आलेली माणसे’ एवढाच अर्थ अनेकदा ‘समूह’ ह्या शब्दातून सूचित केला जातो. तथापि सामाजिक मानसशास्त्राच्या आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने एकत्र आलेल्या माणसांना (ही माणसे संख्येने दोनही असू शकतात.) ‘समूह’ ही संज्ञा प्राप्त होण्यासाठी त्यांची काही वैशिष्टये असावी लागतात : त्यांच्यात परस्परावलंबित्वाचे नाते असावे लागते त्यांच्यात काही दळणवळण (कम्यूनिकेशन) असणे आवश्यक असते आणि त्यांच्यात काही आंतरक्रियाही (इंटरॲक्शन) व्हायला हवी असते. समूहातल्या व्यक्ती एकाच मतप्रणालीच्या असतात, म्हणजे त्यांची मूल्ये, विश्र्वास, जगण्याचे संकेत सारखे असतात. त्यामुळे एक समूह दुसऱ्या समूहांपेक्षा वेगळा दिसतो. हे निकष वेगवेगळ्या समूहांना लागू पडतात. उदा., कुटुंबे, मित्रवर्तुळे, राजकीय वा इतर प्रकारचे-उदा., धार्मिक, शैक्षणिक, इ. समूह. स्थिरता प्राप्त झालेल्या आणि निश्र्चित स्वरूपाची बांधणी वा संरचना असलेल्या समूहांमध्ये समूहाची वैशिष्टये अधिक लक्षणीयपणे प्रत्ययास येतात.

समूहाची संरचना हे समूह आकाराला आल्यानंतर जाणवणारे त्याचे पहिले वैशिष्टय होय. ह्या संरचनेमध्ये समूहाचे सदस्य परस्परांशी काही नात्याने बांधले जातात. त्या संरचनेत प्रत्येकाचे विशिष्ट स्थान असते. एखादी व्यक्ती समूहात विशेष प्रभावी ठरते. ह्यातून त्या व्यक्तीला त्या समूहात वर्चस्व प्राप्त होते आणि समूहात यथावकाश वर्चस्वाचा एक श्रेणीबंध तयार होतो. समूहात एखादया वादगस्त विषयावर चालू असलेली चर्चा ऐकली, तर संभाषणावर कोण प्रभाव टाकतो, कोण विशेष बुद्धीमान आहे, कोण मुकाट्याने ऐकून घेतात हे लक्षात येते. समूहांमध्ये एकेका सदस्याला जे स्थान असते, त्यानुसार त्या सदस्याचे वर्तन होत असते.

समूहाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि व्यक्तीचे वर्तन ती कोणत्या समूहाशी निगडित आहे, ह्यावरून ठरते. प्राथमिक आणि दुय्यम, असे समूहाचे दोन प्रकार काही अभ्यासकांनी मानलेले आहेत. काही समूह-उदा., कुटुंब-व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव टाकीत असतात. कुटुंबात व्यक्तींचा परस्परांशी सततचा, निकटचा आणि समोरासमोर असा संबंध येत असतो. अशा समूहांना ‘प्राथमिक’ म्हटले जाते. दुय्यम समूहांत असा सततचा आणि निकट संबंध नसतो. तिथे प्रेम, ममता ह्यांपेक्षा काही वेगळ्या अपेक्षेने-उदा., सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करणे, माहिती, पैसा, सेवा मिळविणे इ.-माणसे एकत्र येऊन समूह बनवितात. काही विशिष्ट व्यवसायातल्या लोकांनी निर्माण केलेले ‘क्लब’ हेही अशा समूहाचे उदाहरण होय. औपचारिक आणि अनौपचारिक असेही समूहांचे प्रकार त्यांच्या संरचनेच्या आधारे मानता येतील. काही योगायोगाने तयार झालेल्या समूहांची संरचना असली, तरी ती तशी सैल असते. त्यांत एक प्रकारची अनौपचारिकता असते. मात्र दुय्यम समूहांसारख्या समूहांची संरचना स्थिर आणि काहीशी गुंतागुंतीचीही असते. असे समूह औपचारिक समूहांत मोडतील. औपचारिक समूहांमध्ये प्रत्येक सदस्याला त्या समूहाच्या उद्दिष्टांशी आणि सदस्यांच्या अपेक्षांशी सुसंगत असे निश्र्चित स्थान वा भूमिका देण्यात आलेली असते. ह्यातून त्या समूहाचे स्थैर्य आणि परिणामकारकता वाढते. संरचनेच्या ह्या स्थैर्यामुळे एका जागी दुसरा सदस्य आला, तरी त्या समूहाच्या उद्दिष्टांमध्ये आणि स्थिर स्वरूपामध्ये काही फरक पडत नाही.

काही समूहांचे सदस्यत्व विशिष्ट व्यक्तींपुरतेच मर्यादित राहते. हे समूह ‘वर्जक’ (एक्स्क्ल्यूझिव्ह) म्हणता येतील. उदा., काही अभियंत्यांनी बांधलेली संघटना ह्या संघटनेचा प्रत्येक सदस्य अभियंता असायलाच हवा. हेच महिलांच्या संघटनेबाबतही म्हणता येईल. अशा संघटनांची बांधणी त्यांच्या विशेष क्षेत्रांतील माहिती, कौशल्ये ह्यांच्या आदान-प्रदानार्थ करण्यात आलेली असते. समानशीलत्वाचा व त्यातून निर्माण होणाऱ्या आकर्षणाचा संबंध येथे लावता येईल. वरवरच्या स्वरूपापेक्षा काही अंतःस्थ आणि अप्रकट हेतूंनीही समूह तयार होतात. पंथीय, जातीय आणि धार्मिक उद्दिष्टे बाळगून केलेल्या समूहांच्या बाबतींत ही गोष्ट अनेकदा प्रत्ययास येते.

ह्याउलट समावेशक समूह त्याचे सदस्यत्व सर्वांना खुले असते. राजकीय पक्ष, समाजकल्याणार्थ आणि सांस्कृतिक उद्दिष्टांनी केलेल्या संघटना-उदा.,‘रेडक्रॉस’ आणि ‘ॲमनेस्टी इंटरनॅशनल’ ही समावेशक समूहांची उदाहरणे होत.

अनेकदा वर्जक समूह हे ‘आतला’ आणि ‘बाहेरचा’ असे भेद करून माणसा-माणसांमध्ये भिंती उभ्या करतात. प्रत्येक सदस्याला आपल्या समूहाबद्दल निष्ठा, अभिमान हवा त्यांनी समूहाशी पूर्णपणे एकरूप झाले पाहिजे, अशी वर्जक समूहांची अपेक्षा असते. समूहाबाहेरच्या लोकांशी संबंध ठेवण्यावर ते बंधने आणि मर्यादा घालतात.तसेच आपल्यात कोणीही ‘बाहेरचा’ येऊ नये, ह्यासाठी दक्ष असतात. ‘आतल्यां’चे हितसंबंध एकमेकांत गुंतलेले असतात, हे ह्याचे एक महत्त्वाचे कारण होय.

व्यक्ती ज्या समूहाची सभासद असते, केवळ त्याच समूहाकडून तिचे वर्तन प्रभावित होते असे नाही तर इतर समूहांकडूनही तिचे वर्तन प्रभावित होत असते. असे का होते याचे स्पष्टीकरण ‘संदर्भ-समूह’ या संकल्पनेतून मिळू शकते. एखादी व्यक्ती स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या समूहाचा संदर्भ घेते, त्याला ‘संदर्भ-समूह’ असे म्हणतात. अशा संदर्भ समूहाच्या आधारे व्यक्ती स्वत:च्या श्रद्धा, अभिवृत्ती, मूल्ये इत्यादींचे मूल्यमापन करीत असते, तसेच त्याप्रमाणे आपल्या वर्तनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहते (पण ती व्यक्ती त्या समूहाची सभासद नसते). उदा., एखादया कनिष्ठवर्गीय व्यक्तीने मध्यमवर्गीय समूहाचे सभासदत्व मिळविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असणे, यासाठी मध्यमवर्गाची मूल्ये व दृष्टिकोण यांचा स्वीकार करणे. अशा व्यक्तीचे वर्तनही मध्यमवर्गीय समूहाव्दारे प्रभावित झालेले असते. हा प्रभाव तिचा पेहराव, भाषाशैली, विचार इत्यादींतून दिसून येतो. म्हणजेच मानसिक पातळीवर तिचे या समूहाशी पूर्णपणे तादात्म्यीकरण (आयडेंटिफिकेशन) झालेले असते. व्यक्तीच्या वर्तनप्रकियेत ‘संदर्भ-समूह’ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अनेक संशोधनांत आढळून आले आहे.

व्यक्ती कोणत्याही समूहातली असो तिथे असण्याचा तिच्या वर्तनावर निश्र्चितपणे परिणाम होतो कारण त्या समूहाची उद्दिष्टे, मूल्ये, विश्र्वास इ. तिने स्वीकारलेली असतात. पण एखादया समूहाचे प्रत्यक्ष सदस्यत्व जवळ नसतानाही काही व्यक्ती त्या समूहाची उद्दिष्टे, मूल्ये इ. स्वीकारतात आणि त्याचाही त्यांच्या वर्तनावर परिणाम होतो. उदा., मूळची पांढरपेशी नसलेली माणसे पांढरपेशांच्या जीवनाकडे आकर्षित होऊन त्यांच्या वर्तनशैलीने जीवन जगताना अनेकदा दिसतात.


 बाह्य परिस्थितीच्या रेटयने माणसे एखादया समूहात जातात, हेही दिसते. एका जीवशास्त्रीय योगायोगाने एखादी व्यक्ती एखादया विशिष्ट कुटुंबाची सदस्य होते. युद्धकाळात सक्तीची लष्करभरती असेल, तर सैन्यात जावे लागते. राजकीय पक्ष, कामगार संघटना, गुन्हेगारांची टोळी अशा ठिकाणी माणसे जातात, तीही अनेकदा परिस्थितीच्या दडपणामुळे. ते काहीही असले, तरी समूहात असल्याने काही अडचणींतून सुटका होते, काही गरजा भागतात काही वास्तव वा काल्पनिक संकटांची धास्ती कमी होते.

माणसे समूहात आली की, त्यांचा परस्परांशी संपर्क आणि संवाद होऊ लागतो. सदस्य म्हणून त्यांना परस्परांबद्दल आणि त्यांच्या समूहाबद्दल आत्मीयता वाटू लागते. समूहाच्या एकतेबद्दलची जाणीव तीव होत जाते. व्यक्तींना विशिष्ट समूहाचे सदस्य होण्यासाठी त्यांच्या ज्या गरजा प्रेरक ठरलेल्या असतात, त्यांचे समाधान किती प्रमाणात होते, ह्यावर समूहाची एकता अवलंबून असते. अनेकदा काही बाह्य दबावाखाली ही एकता राहते. हा दबाव नाहीसा झाला की, समूह भंगतो. समूहातली ‘आम्ही’ पणाची भावना तीव असेल, तर समूहाची एकता टिकते. ही भावना घट्ट असलेले समूह त्याचे सदस्य नसलेल्यांना आत प्रवेश करू देत नाहीत.

एखादया समूहाचे सदस्य या-ना-त्या कारणाने आणखीही काही समूहांचे सदस्य असतात. अशी स्थिती कोणत्याही समूहाच्या एकतेला प्रतिकूल ठरते. तसेच ज्या समूहाची स्वत:ची अशी संरचना विकसित झालेली नसते, उद्दिष्टे निश्र्चित झालेली नसतात पण कोणाच्या तरी वर्चस्वाला आज्ञाधारक प्रतिसाद देण्याच्या प्रवृत्तीतून जो समूह टिकून राहिलेला असतो, त्याची एकतेची जाणीव फारच क्षीण असते. काही योगायोगाने तयार झालेले समूह जोपर्यंत काही हेतू साध्य करीत राहतात, तोवरच टिकतात. अशा समूहांचीही एकता दृढ नसते.

समूहाने निश्र्चित केलेले वर्तणुकीचे आदर्श जेथे कटाक्षाने मानले जातात, तेथे समूहाची एकता घट्ट राहते. जेथे ह्या आदर्शांपासून दूर जाण्याची काही सदस्यांची वृत्ती दिसते, तिथे समूह आपली नाराजी तीवपणे प्रकट करतो, हे नित्याच्या जीवनात अनेकदा दिसते. अशा कारणावरून माणसे त्या समूहाकडून बहिष्कृतही होऊ शकतात. समूहात एकविधता असली पाहिजे, ह्यावर कटाक्ष असतो.

समूहाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समूहाचे नीतिधैर्य. समूहाच्या अन्य सदस्यांकडून आपण स्वीकारले गेलो आहोत समूहाची ध्येये आणि त्यांची इष्टता ह्यांवर विश्वास ठेवून आपण त्या ध्येयांना आपली निष्ठा वाहिलेली आहे, ही समूहाच्या प्रत्येक सदस्याची भावना हे नीतिधैर्य घडविते. समूहाच्या ध्येयांना साकार करण्यासाठी एकत्र येण्याच्या भावनेने आणि परस्पर-सहकार्याने काम करणे, त्या ध्येयांच्या पूर्ततेसाठी प्रगतीचे टप्पे ओलांडण्यात स्वारस्य असणे, हा समूहाच्या नीतिधैर्याचाच आविष्कार होय. ज्या समूहात एकता आणि नीतिधैर्य उत्तम असते, त्या समूहातले सामाजिक वातावरणही उत्तम असते. समूहातील विविध सदस्यांना कार्याच्या संदर्भात कोणत्या भूमिका दिल्या जातात आणि हे सदस्य त्या कशाप्रकारे पार पाडतात, ह्यावरही समूहातले वातावरण अवलंबून असते.

माणसाचे समूहजीवन त्याच्या कुटुंबापासूनच सुरू होते. शाळा आणि सतत विस्तारत जाणारे सामाजिक जीवन जगताना विविध वृत्तिप्रवृत्तींची आणि वर्तनांची माणसे भेटतात. आपल्या कुटुंबाबाहेरचे समूह त्यांचे आदर्श, त्यांची मूल्ये परिचयाची होतात. समवयस्कांच्या समूहांना विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यानंतर वाढत्या वयाबरोबर तो अन्य समूहांशी संलग्न होतो.

समूहांसमोर येणाऱ्या समस्यांना समूहांना सामोरे जावे लागते आणि त्या समस्या सोडविण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. अनेक मानवी समस्यांची सोडवणूक व त्यासाठी घ्यावे लागणारे निर्णय सामूहिक रीत्याच घेतले जातात, असे दिसून येते. संसद, विधिमंडळे, समित्या, उदयोगक्षेत्रातील संचालकमंडळे अशा ठिकाणी होणारे निर्णय ह्या संदर्भात पाहता येतात.

समूह व्यक्तींचा बनतो, पण जे काम समूह करू शकतो आणि एक व्यक्तीही करू शकते, ते अधिक चांगल्याप्रकारे कोण करू शकते? समूह की व्यक्ती ? संशोधनांती असे दिसते की, काही विशिष्ट परिस्थितीत समूह असे काम करू शकतो, तर अन्य काही परिस्थितींत एक व्यक्ती ते काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. वास्तव जीवनात अनेकदा असेही दिसून येते की, काही प्रश्न समूहातल्या काही व्यक्तीच विचारपूर्वक सोडवतात. समूहातल्या अन्य व्यक्ती आपल्या काही वैयक्तिक लाभासाठी आणि प्रश्र्न सोडविल्याचे श्रेय आयते घेण्यासाठी ह्या कार्यक्षम व्यक्तींच्या भोवती जमतात. समूहामध्ये नेतृत्वाचा प्रश्न फार महत्त्वाचा असतो, असे अनेक प्रयोगांती सिद्ध झालेले आहे. समूहासमोरील विशिष्ट समस्या सोडविण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण असलेला आणि लोकशाही मनोवृत्तीचा नेता समूह-सदस्यांकडून जितकी चांगली कामे करून घेऊ शकतो, तेवढी अप्रशिक्षित व्यक्ती करून घेऊ शकत नाही. समूहातल्या सर्व व्यक्तींना समजून घेणे आणि प्रत्येकाला समस्या सोडविण्याच्या प्रयत्नांत अर्थपूर्ण सहभाग घेण्याची संधी देणे, येथे महत्त्वाचे ठरते. समूहातील व्यक्तींची बौद्धीक पातळी, वस्तुस्थितीचे विश्र्लेषण करण्याची क्षमता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमधले सशक्त आणि दुबळे घटक ह्यांचाही परिणाम समूहाच्या कामगिरीवर होत असतो.

संवाद-संपर्काची एक व्यवस्था म्हणून समूहाचा विचार केला, तर असे दिसते की, ही व्यवस्था जितकी प्रभावी, तितकी त्या समूहाची कामगिरी प्रभावी. ही व्यवस्था सदोष असेल, तर तिचे प्रतिकूल परिणाम होतात. समूहाचे काही सदस्य सतत परस्परांच्या संपर्कात राहून त्यांच्यात संवाद–संपर्क सातत्याने ठेवतात. तसेच काही समूहांची संरचना इतकी औपचारिक स्वरूपाची असते की, दर्जा आणि अधिकार ह्यांच्या आधारे त्या समूहात निर्माण केलेल्या श्रेणिबद्ध रचनेलाच तिथे महत्त्व येते आणि संवाद-संपर्क विशिष्ट वाहिन्यांमधूनच करावा लागतो. जिथे व्यवस्था अधिकारशाहीवर आधारलेली असते, तिथे नेता सर्वांवर नियंत्रण राखून असतो. समूहातल्या कोणाशीही तो संपर्क-संवाद करू शकतो पण समूहातल्या अन्य सदस्यांना त्याच्याशी संपर्क-संवाद करण्याचे स्वातंत्र्य नसते.

काही समूहांमध्ये नेता केंद्रस्थानी असतो, तेथे परिघावरचे असे सदस्य असतात की, त्यांना मध्यस्थांमार्फत नेत्याशी संपर्क साधावा लागतो. अशा समूहव्यवस्थेची संरचना हळूहळू घडत जाते पण एकदा ती प्रस्थापित झाली की, तिची स्थिरता बरीच टिकून राहते. अधिकारशाहीवर आधारलेल्या उपर्युक्त दोन व्यवस्था परिणामकारक कामगिरी करू शकतात.


 जेथे लोकशाही स्वरूपाची संरचना असते, तेथे संवाद-संपर्क व्यवस्थेत प्रत्येकाला समान महत्त्व असते. तथापि ह्या संरचनेत सदस्यांना आपला नेता शोधण्यास विलंब लागतो, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. असे असले, तरी ही व्यवस्था लवचीक असते. जबाबदारी वाटून घेऊन एखादया समस्येच्या सोडवणुकीसाठी काम करणे, ह्या लवचीकतेमुळे समूहसदस्यांना शक्य होते. दैनंदिन जीवनात सामान्यतः असा अनुभव येतो की, समूहामध्ये एखादया व्यक्तीने एखादी नवी, धाडसी कल्पना मांडल्यास तिला प्रतिकूल अशीच अन्य सदस्यांची प्रतिकिया असते. पण चर्चा, विचारमंथन झाले की, समूह ही कल्पना स्वीकारण्यात काही धोका असला तरी तो स्वीकारतो. ह्याचे दिले जाणारे एक स्पष्टीकरण असे की, समूहात घेतल्या गेलेल्या निर्णयांची व्यक्तिगत जबाबदारी कमी असते. त्यात इतरही सहभागी असतात. आणखी एक स्पष्टीकरण असे की, एखादी नवी कल्पना जेव्हा समूहासमोर येते, तेव्हा सदस्यव्यक्तीला त्या कल्पनेच्या फायदया-तोटयांचा विचार करता येत नाही. पण त्यावर सर्वांशी चर्चा झाल्यावर त्या कल्पनेचे तो अधिक स्पष्टपणे मूल्यमापन करू शकतो. असेही म्हटले जाते की, एखादी धाडसी कल्पना स्वीकारण्याचे धैर्य आपल्यातही आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न व्यक्ती करीत असतात.

जेव्हा समूहाच्या उद्दिष्टांच्या सिद्घीसाठी सदस्य एकमेकांबरोबर काम करतात, तेव्हा स्थूलमानाने त्यांच्या वर्तनाची दोन रूपे दिसतात : सहकार्य आणि स्पर्धा. परस्परांना मान्य अशा उद्दिष्टांसाठी एकत्रितपणे काम करण्याची प्रकिया म्हणजे सहकार्य, असे म्हणता येईल. अनेकदा समूहात समान स्थान नसलेल्या व्यक्ती एकमेकांना सहकार्य देतात, तेव्हा उच्च स्थानावरील व्यक्तीचे कनिष्ठ स्थानावरील व्यक्तीने केलेले आज्ञापालन असे स्वरूप त्यांच्यातल्या आंतरकियेला येते. समान दर्जा असलेल्या व्यक्तींमध्येच सहकार्य घडू शकते, असे काहींचे मत आहे. अधिकारवादी वृत्तीची व्यक्ती आणि तिच्या हाताखालची कनिष्ठ व्यक्ती ह्यांच्या संदर्भात असे म्हणता येईल पण जिथे लोकशाही पद्धतीची रचना आहे, तिथे ‘सहकार्य’ म्हणणेच योग्य ठरेल.

जिथे स्पर्धेला पोषक अशी समूहाची बांधणी असते, तिथे व्यक्ती आपल्या व्यक्तिगत उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतात. समूहाच्या इतर सदस्यांपेक्षा आपला व्यक्तिगत लाभ अधिक असावा, ही वृत्ती जिथे लाभक्षेत्र अगदी मर्यादित आहे, तिथे घडण्याची शक्यता अधिक असते. एखादे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण अधिक पोषक की, सहकार्याचे, ह्या प्रश्र्नावर अभ्यासकांचे मतभेद आहेत.

संदर्भ : 1. Bales, Robert F. Interaction Process Analysis: A Method for the Study of Small Groups, Reading, Mass. 1950.

          2. Banner, Hubert, Group Dynamics: Principles and Applications, New York, 1959.

          3. Cartwright, Dorwin Zounder, Alvin, Ed. Group Dynamics:  Research and Theory, Evanstm, Ill, 1960.

          4. Rosenbaum, Max Berger, M. Ed. Group Psychotherapy and Group Function, New York, 1963.

कुलकर्णी, अ. र.