समाजशास्त्र, अनुप्रयुक्त : समाजविज्ञानातील व्यावहारिक उपयोजिता विशद करणारे शास्त्र म्हणून त्यास उपयोजित समाजशास्त्र असेही म्हणतात. त्याचे स्वरूप धोरणात्मक व कृतिशील असून ते सर्वसामान्य लोक आणि लोकसमूह यांना आपण करीत असलेल्या कृतींच्या परिणामांविषयी विचार करण्यास प्रवृत्त करते. तसेच त्याचा उद्देश किंवा हेतू वर्धनक्षम सामाजिक रूपे निर्माण करून बदलत्या अंतरिक व बाह्य परिस्थितींना सामावून घेण्यास लोकांना सक्षम करणे हा आहे. उपयोजित समाजशास्त्राची बीजे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील लेस्टर वॉर्ड यांच्या डायनॅमिक सोशिऑलॉजी : ऑर ॲप्लायड सोशल सायन्स (१८८३) या गंथात आढळतात. या गंथाच्या प्रबंध संहितेत वॉर्डने अनुप्रयुक्त समाजशास्त्राचे मूलभूत घटक स्पष्ट केले आहेत. त्याच्या मते कार्यकारणासंबंधीच्या प्रकिया आणि त्या प्रकिया आणि त्या प्रकियांमध्ये प्रविष्ट झालेल्या सामाजिक प्रगतीला उत्तेजन देणाऱ्या कृती, या दोहोंमधील फरक समजावून घेणे, महत्त्वाचे होय. सांप्रत अनुप्रयुक्त समाजशास्त्र ही संकल्पना सर्व सामाजिक प्रयत्नांच्या क्षेत्रांत प्रागतिक किंवा उत्कर्षावस्थेत आढळते.

अनुप्रयुक्त समाजशास्त्राचे स्वरूप सहजरीत्या समजावून घेणे शक्य आहे. त्याकरिता मूळ (बेसिक) समाजशास्त्रापासून फरक निश्चित करणारी जी अनुप्रयुक्त समाजशास्त्राची विशिष्ट लक्षणे आहेत, ती तपासावी लागतील. त्यांचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल कारण समाज हा भिन्न प्रकारचा व रूचीचा असतो. तो त्यात गुंतलेला असतो. मूळ समाजशास्त्राचा ओढा जांच्याकडे समाजशास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीत विशेष गम्य आहे, अशांकडेच असतो. अशा लोकांच्या कामाच्या दर्जाचे प्रमाणभूत शास्त्रशुद्घ गुणधर्मांनुसार मूल्यमापन करण्यात येते. अनुप्रयुक्त समाजशास्त्राचा ओढा अधिकतर निर्णय क्षमता असणाऱ्या, कार्यकमांचे नियोजन व विकास साधणाऱ्याकडे असतो. किंवा जे कार्यकम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी पूर्ण जबाबदारी स्वीकारतात किंवा तिच्या निर्णय प्रकियेत निश्चित भूमिका बजावतात, अशांकडे हे समाजशास्त्र लक्ष देते. उपयोजित कामाच्या दर्जाचे दुहेरी (दोन पद्धतींनी) निकषांच्या गटानुसार मूल्यमापन केले जाते : (१) निर्णयांची लोकांना माहिती देणे, त्यांची रचना प्रकट करणे, कार्यकमांत स्थलकाल परिस्थित्यनुसार बदल वा सुधारणा करणे आणि बांधीलकीची भावना वृद्धीगंत करणे, आदी गोष्टी कितपत योग्यायोग्य आहेत, हे पडताळणे (२) अनुसंधानिक (इन्व्हेस्टीगेटिव्ह) प्रश्नांविषयी जी गृहीतके आणि पद्धती वापरण्यात येतात, त्या कितपत परिणामकारक आहेत, तेही पाहावे लागते.

वॉर्ड म्हणतो, “आपण जर केवळ निर्भेळ संशोधन आणि शुद्ध आचरण यांमधील निरंतर प्रकियेविषयी तर्क केला, तर अनुप्रयुक्त समाजशास्त्र मध्यवर्ती स्थान पटकावेल”. अनुप्रयुक्त समाजशास्त्रज्ञ आणि व्यावसायिक हे एकमेकांच्या सहकार्याने वर्तनपद्धतीचे (वर्तणुकीचे) स्पष्टीकरण देतात किंवा वेगवेगळ्या वर्तन प्रकारांवर होणाऱ्या प्रवृत्तीला सैद्धांतिक बैठक देण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी एका बाजूने त्या स्थानाचा (अवकाशाचा) विस्तार झालेला आढळतो मात्र अनुप्रयुक्त समाजशास्त्रज्ञ आणि मूलभूत समाजशास्त्राचे अभ्यासक एकमेकांच्या सहकार्याने अप्रतिरूप उपपत्तीचे, ती अधिक उपयुक्त करण्यासाठी, सुलभीकरण करतील, त्यावेळी तिची दुसरी बाजू विस्तारलेली आढळते, असे पी. एफ्. लॉझर्सफेल्ड आणि जे. जी. रिट्झ म्हणतात.

अनुप्रयुक्त समाजशास्त्राच्या सीमा सामाजिक कृतींची गणना करून त्या तपशीलवार विशद केल्या पाहिजेत कारण या कृती मध्यवर्ती भूमिका बजावतात आणि अनुप्रयुक्त समाजशास्त्रज्ञ पुढील कार्यवाही करतात. एच्. इ. फीमन आणि पी. एच्. रोझी या दोन अनुप्रयुक्त समाजशास्त्रज्ञांनी १९८४ मध्ये या संदर्भात तीन कृती सुचविलेल्या आहेत. त्या अशा : (१) पद्धतशीर आखणी करणे (मॅपिंग) आणि सामाजिक निर्देशकांचे संशोधन करणे, (२) सामाजिक दृष्य-देखाव्यांचे प्रतिमान निश्र्चित करणे आणि (३) सहेतूक कृतीचे किंवा हेतूपूर्वक केलेल्या कृतीचे मूल्यमापन करणे. या तीन कृतींमध्ये आणखी एक कृती घालण्यात आली. ती म्हणजे (४) पर्यायी सामाजिक रूपांची संकल्पनात्मक, अभ्यासपूर्ण आणि सुलभ रीत्या जुळणी करणे.

अनुप्रयुक्त समाजशास्त्रात सामाजिक कार्याला-कृतीला अनन्यसाधारण महत्त्व असून व्यक्ती व समाज यांचे संबंध सुविहित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून समाजकार्याच्या विचारांचा व वृत्तीचा उदय झाला आहे. सामाजिक कार्य हे स्वतंत्र असे विज्ञान आहे, हे अनुप्रयुक्त समाजशास्त्राने दाखवून दिले आहे. समाजशास्त्रीय तत्त्वांचा आणि सिद्धांताचा उपयोग समाज कार्यकर्त्याला होतो, हे मान्य करावे लागते. व्यक्तिविकास हे मध्यवर्ती सूत्र समाजकार्यकर्ता मानतो. व्यक्तीच्या सभोवतालची परिस्थिती तिच्या प्रगतीला पोषक होण्यास मदत करणे, त्यातील संघर्ष कमी करणे, मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवणे इत्यादींबाबतीत अनुप्रयुक्त समाजशास्त्र दक्ष असते. त्यामुळे या सर्वांची, त्याचबरोबर अनुप्रयुक्त समाजशास्त्राची उपयुक्तता पटून त्याचे क्षेत्र व्यापक झाले आहे.

संदर्भ : 1. Coleman, J. S. Policy Research in the Social Sciences, Morristown, 1972.

2. Lazarsfeld, P. F. Reitz, J. G. An Introduc tion to Applied Sociology, New York, 1975.

3. Oslen, M. E. Micklin, M. Handbook of Applied Sociology, New York, 1981.

देशपांडे, सु. र.