समवृष्टि रेषा : एखादया देशावर किंवा प्रदेशावर एखादया दिवसात किंवा महिन्यात/ऋतूत/वर्षात किती वृष्टी (वर्षण ) झाली यासंबंधी माहिती प्राप्त करून घ्यावयाची असेल, तर त्या देशात किंवा प्रदेशात निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या वृष्टींचा नकाशा तयार करणे आवश्यक असते. अशा नकाशावर प्रत्येक ठिकाणच्या वृष्टीची नोंद केली जाते. या नकाशावर वृष्टीचे एक ठराविक मूल्य असलेल्या ठिकाणांस जोडणाऱ्या रेषेस समवृष्टी रेषा असे म्हणतात. नकाशावर निरनिराळ्या मूल्यांच्या समवृष्टी रेषा काढून त्या प्रदेशावरील वृष्टीचे विश्लेषण केले जाते. अशा विश्लेषणावरून वर्षण सर्वांत जास्त वा कमी कोठे झाले आहे, हे कळून येते. विश्र्लेषण केलेल्या वर्षणाच्या चालू नकाशाची पूर्वीच्या अशाच नकाशांशी तुलना केली म्हणजे सर्वांत जास्त वर्षणाचे क्षेत्र कोणत्या दिशेकडे सरकत आहे, हे समजते. २४ तासांतील रोजच्या वृष्टीचे नकाशे तयार करून त्यांवर समवृष्टी रेषा काढून त्यांचे विश्लेषण केले जाते. एखादया पाणलोट क्षेत्रावर चक्री वादळ अथवा न्यूनदाब यामुळे पडणाऱ्या वृष्टीचा अभ्यास करण्यासाठी या क्षेत्राचे एक किंवा दोन/तीन दिवसांच्या वर्षणाचे नकाशे तयार करून, निरनिराळ्या मूल्यांच्या समवृष्टी रेषा काढून नकाशांचे विश्र्लेषण केले जाते. अशा विश्र्लेषणामुळे चक्री वादळ वा न्यूनदाब यांच्यामुळे पाणलोट क्षेत्रातील धरणात पाण्याची पातळी एक/दोन/तीन दिवसांत किती वाढू शकेल, याचा अंदाज घेता येतो.

गोखले, मो. ना. मुळे, दि. आ.