समलिंगीकामुकता : ( होमो-सेक्शुॲलिटी ). कामुकतेचा एक वैशिष्टय्पूर्ण प्रकार. त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक – लैंगिक समस्येकडे पहायचा दृष्टिकोण गेल्या काही वर्षांत बदलल्यामुळे, काल पर्यंत एक मानसिक विकार मानल्या गेलेल्या ह्या अनैसर्गिक कामुकतेला, लैंगिक अपमार्गण म्हणावे, लैंगिक विभिन्नता म्हणावे की, ती एक नुसती वाईट सवय समजावी ह्यांबद्दल अभ्यासकांत बरेच मतभेद आहेत. अत्याधुनिक समाजनीतीनुसार मुक्ताचाराला मुभा देणाऱ्या काही पर्श्र्चीमात्य देशांत तर अशा संबंधांना कायदेशीर संमतीही दिलेली आहे. तसेच अमेरिकेतील एका राज्यात एका समलिंगी जोडप्याच्या ‘ लग्नाची ’ कायदेशीर नोंदही झालेली आहे. अशा संबंधांना अजूनही काही देशांत कायदेशीर बंदी आहे व शिक्षाही कडक आहे.
मानसचिकित्साशास्त्रातील १९८० च्या अमेरिकन वर्गीकरणानुसार समलिंगी कामुकतेला व्यक्तित्व विकारासमान लैंगिक अपमार्गण विकारातील, लैंगिक प्राङ्मुखीकरण समस्या असे मानले जाते [→ लैंगिक अपमार्गण]. १९९४ च्या वर्गीकरणात समलिंगी कामुकता असा उल्लेखसुद्धा नाही.
समलिंगी कामुकतेचा समाजातील प्रादुर्भाव नीट समजण्यास जी आकडे-वारी उपलब्ध आहे ती विश्र्वसनीय नाही कारण रोगपरिस्थितिविज्ञान पहाणीत, अनेकजण आपली समलिंगी कामुकता दडवून ठेवतात. ह्याचे कारण समाजात अजून ह्या अपसामान्य लैंगिकतेबद्दल घृणा व वैमनस्य आढळून येते. मानवी लैंगिक वर्तनाचे सखोल अभ्यासक ⇨ ॲल्फेड चार्ल्स किन्से ह्यांच्या अमेरिकेतील गोऱ्यांच्या लैंगिक जीवनाच्या पहाणीत (१९४८) ४% पुरूषांत पूर्ण व नियमित समलिंगी कामुकता आढळली आणि १०% पुरूषांनी जीवनातला तीन वर्षांवरील काळ नियमित समलिंगी संबंधांत काढलेला आढळला तसेच जीवनात केव्हातरी समलिंगी संबंधांमुळे सुख मिळाल्याची कबुली ३७% पुरूषांनी दिली. तेथील स्त्रियांत हे प्रमाण पुरूषांच्या निम्म्याने आढळले. आदिम समाजाच्या पहाणीत ( बीच १९५१) ६४% समुदायात समलिंगी कामुकता सामान्य व समाजमान्य धरली जाते.
किन्सेने केलेल्या सात आकडी निर्धारणक्रमानुसार, ० क्रमांक पूर्ण परलैंगिकत्वाला ( हेटरो – सेक्शुॲलिटी ) दिलेला असून टप्प्याटप्प्याने शेवटचा क्रमांक ६, पूर्ण समलैंगिकत्वाला दिलेला आहे. मधला ३ हा क्रमांक परलिंगी व समलिंगी कामुकतेची समान आवड व निवड असलेल्यांना दिलेला आहे. ह्या विषयावरील मतभेदामुळे समलिंगी कामुकतेची औपचारिक व्याख्या करणे कठीण झाले आहे. परंतु सर्वांत जास्त शास्त्रज्ञांची अनुमती मिळवलेल्या संकल्पनेप्रमाणे ज्यांना समलिंगी व्यक्तीबद्दल उत्कट कामुक आकर्षण असून जे त्यांच्याशीच पूर्ण वेळ व नियमित लैंगिक संबंध ठेवतात अशांनाच खऱ्या अर्थाने समलिंगी कामुक म्हणता येईल ( हॅबिच्युअल होमो – सेक्शुअल ).
कारणविज्ञान : समलिंगी कामुकतेच्या कारणांबाबतही विविध दृष्टिकोण व सिद्धांत आहेत, त्यांपैकी प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत :
(१) जीवशास्त्रीय दृष्टिकोण : काही संशोधकांच्या मते, समलिंगी कामुकतेच्या बुडाशी जननिक कारक असून रंगसूत्रांची विकृतीही सापडलेली आहे तसेच अर्भकीय अवस्थेत प्रवर्तकीय (हॉर्मोनल) विषमताही आढळलेली आहे. मात्र अजून ह्या सिद्धांताला आवश्यक असलेला संशोधनीय पुरावा नाही.
(२) मनोविश्र्लेषणीय दृष्टिकोण : ⇨ सिग्मंड फॉइड ने प्रत्येक मानवात उभयलिंगी वा व्दिलिंगी (बाय-सेक्शुअल ) कामुकता अर्भकावस्थेपासूनच असल्याचे सांगितले आहे तसेच बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत जातेवेळी प्रत्येक व्यक्तीला समलिंगी आकर्षण काही काळ होत असते. मात्र पुढे ह्या कामुकतेचे उन्नयन अथवा निरोधन होऊन परलिंगी कामुकता प्रस्थापित होते. परंतु काहीजणांत खच्चीकरणाच्या चिंतेमुळे (कॅस्ट्रेशन अँग्झायटी) प्रत्यावर्तन होऊन कामुकता पुन्हा समलिंगी होते. काहीजणांचा लैंगिक विकास समलिंगी कामुकतेवरच खुंटतो.
(३) अनुभविक ( एक्सपिरिएन्शियल ) दृष्टिकोण : व्यक्ती सामान्यत: परलिंगी असते पण कुमारावस्थेतील वाढलेल्या न्यूनतेमुळे व अलिप्तते मुळे इतर समलिंगीयांशीस्पर्धा करणे तिला असह्य होते. ह्या अपयशामुळे व त्यातून होणाऱ्या चेष्टेने आत्मप्रतिमा डागाळली जाऊन परलिंगी संबंधाबद्दल नैराश्य, भीती व पुढे नापसंती निर्माण होते.
(४) कौटुंबिक मनोगतिकी दृष्टिकोण : काही पालक मुलाच्या कळत-नकळत त्याचे अतिसंरक्षण करतात आणि त्याला बाहेरच्या सामाजिक वातावरणात जाऊन समवयस्कांच्या स्पर्धेत भाग घ्यायला मुभा देत नाहीत. त्यामुळे मुलाचे पुरूषी प्रतिपादन ( ॲसर्टिव्हनेस ) कच्चे रहाते आणि त्यातून वडिलांशी होणारे अभिनिर्धारणही ( आय्डेंटिफिकेशन ) क्षीण रहाते. शिवाय काही वडील त्रयस्थासारखे राहून मुलाला प्रेम देत नाहीत किंवा अपमानास्पद व दुष्ट वागणूक देतात. त्यामुळे मुलाला वडिलांबद्दल भीती व व्देष निर्माण होतो. अशाने मुलगा अभिनिर्धारणासाठी आईकडे वळतो. काही वेळा आई आवेशनीय असल्यास ह्या परिस्थितीचा, स्वत:चे वर्चस्व वाढविण्यासाठी, गैरउपयोग करते. त्याचे फाजील लाड करते व त्याला आपलासा करून घेते. तसेच कामुकतेला उत्तेजन देणारी जवळीकही करते. ह्या सर्वांमुळे त्याची पुरूषी वृत्ती क्षीण होऊन शेवटी लैंगिक सुखासाठी तो आईचीच भूमिका स्वीकारतो.
काही वेळा पालकांना मुलगी हवी असताना मुलगा झाल्यास, त्याला मुलीसारखे लेखून अथवा वाढवून त्याचे वडिलांशी जरूर असलेले अभिनिर्धारण कच्चे ठेवण्यास व त्याला समलैंगिकत्वाकडे झुकविण्यास पालक कारणीभूत ठरतात.
काही मुले बाल्यावस्थेपासून कुमारावस्थेच्या शेवटापर्यंत, कुटुंबातील संख्येने जास्त असलेल्या स्त्रियांच्या सतत सान्निध्यामुळे, बायकी बनतात व त्यांचे अभिनिर्धारण आई वा बहिणींशी होते व त्यातून समलिंगी कामुकता निर्माण होते.
(५) अध्यापन सिद्धान्तांवर आधारित दृष्टिकोण : काही मुलांना लैंगिक सुखाची ओळख व गोडी त्यांच्याच वयाच्या अथवा मोठया मुलांनी लावल्यास अभिजात अभिसंधारण ( क्लासिकल कंडिशनिंग ) होऊन पुरूष हेच लैंगिक सुखाचे उद्दिष्ट बनते.
निदान व लक्षणे : समलिंगी कामुकतेचे निदान करण्यासाठी खास मानसशास्त्रीय कसोटया नसल्याने रूग्णवृत्तांत किंवा लैंगिक वर्तनाचे निरीक्षण, यांवरूनच निदान केले जाते.
समलिंगी कामुकतेचे निदानीय ( क्लिनिकल ) प्रकार असे आहेत : (१) पूर्ण समलिंगी – जे परलिंगी संबंध कधीच ठेवत नाहीत, तसेच पर लिंगीयांशी आकर्षितही होत नाहीत, ते पूर्ण समलिंगी कामुक होत. त्या वर्गाचे तीन पोटप्रकार आहेत :
( अ ) अक्रिय समलिंगी किंवा पर्यस्त ( इन्व्हर्ट ). फेरेंझी यांच्या वर्णनाप्रमाणे, पूर्ण समलिंगी व्यक्ती स्त्रीलिंग प्रतिमा स्वीकारल्यामुळे समलिंगी संबंधात अक्रिय ( पॅसिव्ह ) भूमिका स्वीकारते आणि जास्त करून स्त्रियांचे अनुकरण करते. ( ब ) सक्रिय पूर्ण समलिंगी ही व्यक्ती आपल्या समलिंगी जोडीदाराशी संबंध ठेवताना पुरूषाची म्हणजे सक्रिय व पुढाकारी भूमिका घेते. ( क ) अक्रिय – सक्रिय पूर्ण समलिंगी व्यक्ती ह्या व्यक्ती सक्रिय व अक्रिय अशा दोन्ही भूमिका आलटून पालटून घेतात.
(२) उभयलिंगी कामुक – ह्या व्यक्तींना समलिंगी आणि विषमलिंगी असे दोन्ही प्रकारचे संबंध सारखेच पसंत असतात. अविवाहित पुरूषांना समलिंगी संबंध ठेवणे जास्त सोपे जाते पण विवाहित पुरूषांना नियमित लैंगिक सुख पत्नीपासून मिळत असल्याने, समलिंगी संबंध ठेवण्याची गरज व पाळी क्वचितच येते.
(३) मुख्यत: परलिंगी कामुक असलेले पुरूष – हे समलिंगी संबंधासाठी खास प्रयत्न करीत नाहीत परंतु तशी संधी मिळाल्यास किंवा परलिंगी संबंध ठेवणे कठीण झाल्यास समलिंगी संबंधाकडे वळतात. उदा., सैन्याच्या छावण्यांत, वसतिगृहांत वा लांबच्या प्रवासात असलेले पुरूष.
(४) तात्कालिक समलिंगी कामुक ( ॲक्सिडेंटल होमो-सेक्शुअल ) – समलिंगी संबंध ठेवण्याचा हेतू नसताना, परलिंगी कामुक हे एखादया समलिंगीयाच्या कामुक प्रयत्नांना बळी पडतात.
काही समलिंगी आपल्या कामुक जोडीदाराशी निष्ठावंत राहतात. विशेषत: स्त्रियांत निष्ठा जास्त आढळते परंतु बहुतेक समलिंगी पुरूष अशा संबंधात स्वैराचारीच असतात कारण स्त्री-पुरूष युगुलाप्रमाणे प्रेम करीत राहणे आणि संसार करणे दोघांच्याही पुरूषी वृत्तीमुळे अत्यंत कठीण जाते. शिवाय सामाजिक नापसंतीमुळे त्यांना संबंध चोरूनच ठेवावे लागतात उघडपणे वावरता येत नाही.
पुरूष समलिंगीयांची जोडीदार मिळवायची पद्धत विशिष्ट असते. ते काही सार्वजनिक ठिकाणी घिरटय घालतात व बोलक्या नजरेने एकमेकांना हेरतात, निवडतात आणि मग एकांतात भेटतात. अशी ठिकाणे म्हणजे बगीचे, स्टेशन परिसर, मुताऱ्या आणि पाश्र्चिमात्य देशांत काही ठरावीक बार ( मदयपान केंद्रे ) अशा बारमध्ये भेटणाऱ्यांचा एक समूहच बनतो. त्यांची समलिंगी कामुकता तीव्र असते.
पर्यस्त वा अक्रिय समलिंगी हे रांगडे पुरूषच निवडतात, तर सक्रिय समलिंगी हे बायकी समलिंगी पुरूषाची निवड करतात. काही स्त्रिया त्यांच्या आवडीनुसार मायलेकींच्या प्रेमाचा आभास निर्माण करण्यासाठी आपल्या वयाप्रमाणे, लहानमोठी जोडीदारीण निवडतात. समलिंगी कामुकता समाजाच्या सर्व स्तरांत सापडते. अशा व्यक्ती वयाने १६ ते ६० वर्षांपर्यंतच्या असतात. उच्च्पदस्थ, विव्दान तसेच श्रेष्ठ कलाकारांतही समलिंगी संबंध आढळून आलेले आहेत.
लैंगिक संबंधांच्या पद्धती विविध असतात. उदा., उभयता केले जाणारे हस्तमैथुन, गुदमैथुन वा मुखमैथुन. अशा संबंधांमुळे हल्लीच्या काळात प्रसार वाढलेल्या … एच्आयव्ही संकमणामुळे … एड्स ह्या दुर्धर विकाराचे प्रमाण समलिंगी व्यक्तींत बरेच वाढलेले आहे.
समलिंगीयांतील इतर मनोविकारी लक्षणे म्हणजे ह्या नीतिबाह्य, अनिश्चित व चोरट्या संबंधामुळे उदभवलेली चिंता, अपराधी भावना व उदासीनता. काही वेळा एका विशिष्ट जोडीदाराने केलेल्या निराशेमुळे मत्सर किंवा दु:ख होते. ते तीव झाल्यास हत्येचे वा आत्महत्येचेही प्रयत्न केले जातात. हे भावनाविकार पुरूषांत जास्त आढळतात कारण स्त्रीयुगुलाकडे समाज सहसा वक्रदृष्टी ठेवत नाही.
उपचार व प्रतिबंधन : ज्या समलिंगीयांचे व्यक्तित्व परिपक्व असून संबंध समाधानकारक व अढळ असतात, अशांना उपचाराची गरजच नसते. परंतु ज्यांचे संबंध अनियमित व समाधानविरहित असतात त्यांच्यात आढळून येणाऱ्या चिंता, उदासीनता वगैरे लक्षणांचा उपचार सिद्घहस्त मार्गाने केल्यास ते आपले समलिंगी जीवन, तसेच इतर जीवन सुरळीतपणे जगू शकतील. मात्र त्यांच्या इच्छेविरूद्घ त्यांचे परिवर्तन घडवून आणणे अशक्यप्राय होते. उपचारास बहुधा उभयलिंगी किंवा तरूण अविवाहित समलिंगीच तयार होतात. पूर्ण समलिंगीयांचा उपचार यशस्वी होण्यासाठी त्यांची प्रेरणा प्रामाणिक हवी. ज्यांचे वडिलांशी नाते समाधानकारक असते व ज्यांना आकर्षक स्त्रियांकडे पहावेसे वाटते, त्यांना गुण यायचा संभव जास्त असतो.
उपचाराचे मुख्य प्रकार असे आहेत : (१) मनोविश्लेषण. पाश्चिमात्य देशांत अभिजात किंवा इतर मनोविश्लेषणीय प्रणालीनुसार मानसोपचार जास्त दिले जातात व ते परिवर्तन करण्यात यशस्वी झाल्याचाही अनुभव आहे.
(२) इतर मानसोपचाराला वाव आहे, तो समलिंगीयांतील दुय्यम भावनिक विकार दूर करण्यात आणि ज्यांची समलिंगी कामुकता मूळच्या अपर्याप्त व्यक्तिमत्त्वातील दोषांवर- विशेषत: एकंदर सामाजिक संबंध ठेवण्याविषयी आणि परलिंगीयांशी संपर्क साधण्याविषयी असलेल्या गैरविश्र्वास व न्यूनता या दोषांवर-आधारलेली आहे, अशांना परलिंगीयांशी संबंध ठेवण्यासाठी उत्तेजित करण्यात.
३) कुटुंबोपचार : ( फॅमिली थेरपी ). ज्या कुमार अथवा तरूण समलिंगीयाचे पालक त्याच्या विकृतीला अप्रत्यक्ष रीत्या कारणीभूत असतात, त्यांच्यावर व समलिंगी मुलावर एकत्र समूही मानसोपचार केल्यास मुलाचे अभिनिर्धारण सुधारून त्याच्या कामुकतेचे परिवर्तन होऊ शकते.
(४) अध्ययनोपचार ( लर्निंग थेरपी ) वा वर्तनोपचार ( बिहेवियर थेरपी ) : ह्या सिद्धान्तानुसार दिल्या जाणाऱ्या आणि आज प्रचलित असलेल्या विमुखता- अभिसंधान ( ॲव्हर्सिव्ह कंडिशनिंग ) उपचारात समलिंगी कामुकतेला उत्तेजक अशी त्या विशिष्ट व्यक्तीच्या आवडीची चित्रे किंवा स्लाइड्स दाखविली जातात आणि त्यांच्याबरोबर विजेचे हलके परंतु वेदनामय झटके देणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने हाताला अत्यंत अप्रिय अशी तीव संवेदना दिली जाते. त्यामुळे पुढे त्या वेदनेचे अभिसरण होऊन त्या चित्रांची गोडी कमी होते व पुढे त्या झटक्यांच्या अप्रियतेचे, त्या चित्रावर व पर्यायाने समलिंगी कामुकतेवर, स्थानांतरण होते. ह्याच तत्त्वावर आधारलेल्या काल्पनिक विमुखता अभिसंधान ( कोव्हर्ट कंडिशनिंग ) ह्या दुसऱ्या उपचारात रूग्णाला प्रिय अशा समलिंगी कामुकतेच्या अनुभवाचे वर्णन करीत असताना अचानक, अत्यंत अप्रिय अशा अनुभवाचे वर्णन करतात. उदा., उलटी होणे, घाणेरडा वास येणे. वरील उपचाराच्या पूर्ण व यशस्वी कार्यकमानंतर पुढे काही महिने अधूनमधून पुनरावृत्त उपचार ( बुस्टर डोस ) करणे आवश्यक असते अन्यथा विकार उलटतो.
प्रतिबंधनासाठी प्रभावी असा एकमेव सामाजिक मानसचिकित्सेचा कार्यकम म्हणजे पालक, शिक्षक व कुटुंबाचे डॉक्टर ( फॅमिली डॉक्टर ) यांना समलिंगीपूर्व मन:स्थितीची माहिती देऊन कुमारावस्थेतील, भावी समलिंगी मुलांना ओळखून त्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याची क्षमता प्राप्त करून देणे. जरूरीप्रमाणे अशा कुटुंबांना मानसोपचारी मार्गदर्शनासाठी मानसचिकित्सकांकडे पाठवण्याचे आवाहन केले जाते. कायद्याने बंदी घालून वा शिक्षा करून ही समस्या जात नसते. उलट बिकट बनते, असा आजवरचा सार्वत्रिक अनुभव आहे.
समलिंगी कामुकतेची ऐतिहासिक पार्श्वभूमी बरीच प्राचीन आहे. गीक व रोमन साहित्यांत अशा कामुकतेचे निर्देश आढळतात परंतु हा विषय उघड चर्चेत आणण्याचा प्रयत्न एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. एकीकडे काही समलिंगी कामुक आपली वा आपल्या वर्गात मोडणाऱ्यांची बाजू मांडू लागले, तर दुसरीकडे ह्या विषयावर काही प्रगल्भ अभ्यासक लेखन-संशोधन करू लागले. ह्या विषयाकडे अशा प्रकारे वळणाऱ्यांत हॅवलॉक एलिस, वेस्टरमार्क, एडवर्ड कार्पेंटर, फ्रॉइड, हर्शफेल्ट ह्यांसारख्यांचा समावेश होतो. समलिंगी कामुकतेचे उदात्तीकरण करणाऱ्यांत एडवर्ड कार्पेंटर हा विशेष निर्देशनीय होय.
शिरवैकर, र. वै.
महिलांतील समरतिप्रवृत्ती : ( लेस्बियन ). दोन महिलांमधील प्रच्छन्न समलिंगरती अनुबंध. त्यांमध्ये जेव्हा तीव भावनात्मक संबंध दृढतर होतात आणि सामान्यत: एकमेकींबद्दल कामातुर अवस्था निर्माण होते, त्यास समरतिप्रवृत्ती असे म्हणतात. लेस्बियन हा शब्द लेझ्बॉस या ग्रीक बेटाच्या नावावरून इंगजीत प्रविष्ट झाला व त्यावरूनच समरतिवाद ( लेस्बियनिझम) ही संज्ञा प्रथम सोळाव्या शतकात महिलांच्या समरतिप्रवृत्तीस व वर्तनासाठी वापरली गेली तज्ञांच्या मते ही प्र प्रावृत्तीचीन मानवी सभ्यतेच्या- संस्कृतीच्या- उदयाबरोबरच कृतिशील झाली असावी. तिचा प्रथम लिखित उल्लेख ⇨सॅफो ( इ. स. पू. ६१०-५८०) या लेझ्बॉस बेटावर राहणाऱ्या गीक कवयित्रीच्या प्रेमकाव्यात आढळतो. तिचे वाङ्मयप्रेमी मैत्रिणींचे एक वर्तुळ होते. त्यात समरतिप्रवृत्तीच्या मैत्रिणी होत्या. त्या तिचे काव्यवाचन करीत असत. पराकोटीच्या आत्मपर अशा ह्या कवितांतून कोमल प्रेमभावना आढळतात. सॅफोने प्रामुख्याने लेस्बियन आईओलिक ( गीक मूळाक्षरे असलेल्या ) बोली भाषेमध्ये आपल्या मैत्रिणींच्या परस्परांमधील अतूट प्रेमसंबंधांवर विशेषत: कामातुर आकर्षणावर काव्य रचले आहे. भारतात प्राचीन काळी कामकलेवर, विशेषत: कामशास्त्रावर विपुल गंथलेखन झाले. त्यांपैकी सात अभिजात संस्कृत गंथ प्रसिद्घ असून त्यांपैकी वात्स्यायनाचा ⇨कामसूत्र ( इ. स. तिसरे-चौथे शतक ), दामोदरगुप्ताचा कुट्टनीमत ( सु. आठवे शतक ), कोक्कोकचा रतिरहस्य ( सु. बारावे शतक ), कल्याणमल्लचा अनंगरंग ( सोळावे शतक ) इ. गंथ प्रसिद्ध असून त्यांतून समरतिप्रवृत्तीचे अनेक उल्लेख व वर्णन आढळते. याशिवाय भारतीय मंदिरशिल्पांतूनही याचे दर्शन घडते. दक्षिण अमेरिकेतील मेक्सिकोच्या खोऱ्यातील ॲझटेक जमातीतील महिलांमध्ये समरतिप्रवृत्ती रूढ असल्याचे दाखले मिळतात. त्या जमातीचे १२०० ते १५२१ या काळात या खोऱ्यात प्राबल्य होते. कोलंबियाच्या कौका व्हॅलीत काही समरती संघटना आढळतात. अँतोनिओ बेतोंनियो या समाजशास्त्रज्ञास आयारामनामक लोकांमध्ये काही समरती महिला संघ आढळले. अलीकडे एकोणिसाव्या शतकानंतर समरती महिलांच्या संघटना ( मंडळे ) यूरोप-अमेरिका खंडांत सर्वत्र विखुरलेल्या असून दिवसेंदिवस त्यांची वाढ होत आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात या महिलांना अशा प्रकारच्या प्रवृत्तीस विधियुक्त मान्यता मिळावी म्हणून चळवळ आरंभली आहे. अगदी अलीकडे ( जून २००८) कॅलिफोर्निया ( अ.सं.सं.) राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने अशा महिलांना विधिवत मान्यता दिली असून लग्नाची मुभाही दिली आहे.
महिलांतील समरतिप्रवृत्तीवर विपुल लेखन झाले आहे तथापि पुरूषांमधील समलिंगी कामुकतेच्या तुलनेत महिलांमध्ये ही प्रवृत्ती-भावना फार कमी आढळते. ॲल्फेड चार्ल्स किन्से या अमेरिकन कामशास्त्रज्ञाने आपल्या सर्वेक्षणात्मक-संशोधनात्मक अहवालात असे नमूद केले आहे की, पुरूषांच्या तुलनेत समरतिसंबंधात गुंतलेल्या महिलांची संख्या एक तृतीयांशाहूनही कमी आहे. याची कारणमीमांसा करताना किन्से व दुसरा एक आंतरराष्ट्नीय कीर्तीचा काम-मानसशास्त्रज्ञ ⇨ हेन्री हॅवलॉक एलिस म्हणतात की, स्त्रियांच्या कामेच्छा पुरूषांपेक्षा कमी निकडीच्या, सौम्य आणि सहजासहजी दडपून टाकल्या जाणाऱ्या किंवा संयमित असतात. तसेच महिला या पुरूषांपेक्षा अधिक विवेकी, समंजस व सुज्ञ असतात. अर्थात एखादी अपवादात्मक तीव कामेच्छा असणारी स्त्री समलिंगरती ऐवजी आपल्या इच्छापूर्तीसाठी एखादा पुरूष शोधते. मुळात समरतिप्रवृत्ती वा भावना महिलांमध्ये का उत्पन्न होते, याची कारणे कामशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांपैकी पुरूषवर्चस्वाचा तिरस्कार, स्वच्छंदी व स्वैर जीवनाविषयीची तीव उत्कटता, सुप्त इच्छा-आकांक्षांची पूर्ती आणि पुरूषजातीविषयीची एकूण घृणा, ही काही ठळक कारणे होत.
समरतिप्रवृत्तीच्या महिलांचे प्रश्न समलिंगी कामुकतेची प्रवृत्ती असलेल्या पुरूषांपेक्षा फारसे वेगळे नाहीत तथापि अशा महिलांपैकी काही विवाहित असून त्यांना मुले झालेली असतील, तर त्यांच्या संगोपनाचा प्रश्न त्यांना भेडसावितो किंवा मूल नसल्यास, दत्तक मूल घ्यावयाचे असल्यास, कायदेशीर कटकटींना त्यांना तोंड द्यावे लागते. तसेच आरोग्यविषयक तकारी असल्यास, योग्य ती सेवा मिळत नाही. अशा समरती मंडळांमध्ये काही महिला जोडीदारीण निवडून तिच्याशी लग्न करतात आणि आपल्या कामेच्छा शमवितात. अजून अशा महिलांकडे समाज काहीशा तुच्छतेने पाहतो. त्यामुळे अनेक समरती महिला संघ उघडपणे आपल्या हक्कांसाठी, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत आणि त्यांच्या मागण्यांना एकविसाव्या शतकात अंशत: यशही प्राप्त होत आहे. आजपर्यंत महिलांच्या समरप्रवृत्तीविरूद्ध एकही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्यांच्यापैकी कुणालाही अटक झालेली नाही कारण दोन महिलांमध्ये नैसर्गिक रीत्या संभोगाचा संबंध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरूषांच्या समलिंगी कामुकतेविषयी जेवढया तकारी झाल्या, तशी एकही तकार महिलांच्या संदर्भात अजून झालेली नाही.
देशपांडे, सु. र.
पहा : मानसचिकित्सा मानसोपचारपद्धती लैंगिक अपमार्गण लैंगिक वर्तन.
संदर्भ : 1. Bell, Alan P. Weinberg, Martin, Homosexualities : A Study of Diversity Among Men and Women, New York, 1978.
2. Bell, Alan P. Weinberg, Martin Smith, Hammer Sue Kiefer, Sexual Preference : Its Development in Men and Women, 1981.
3. Brown, W. P. The Pathology and Treatment of Sexual Deviation, London, 1964.
4. Campbell, R. J. Psychiatric Dictionary, Oxford, 2004.
5. Dynes, Wayne R. Ed. Encyclopaedia of Ho-mosexuality, 2 Vols., Garland, 1989.
6. Ellis, Albert Abarbance, Albert, Ed. The Encyclopaedia of Sexual Behaviour, 2 vols., London, 1961.
7. Ellis, Henry Havelock, Studies in the Psycho-logy of Sex, 7 vols., London, 1897–1928.
8. Godpaille, W. J. Comprehensive Textbook of Psychiatry, Baltimore, 1989.
9. James, B. Symptoms of Psychopathology, New York, 1970.
10. Koertge, Noretta, Ed. Nature and Causes of Homosexuality : A Philosophic and Scientific Inquiry, New York, 1981.
11. Marmot, Judd, Ed. Homosexual Behaviour : A Modern Appraisal, New York, 1980.