समरकंद : मध्य आशियातील उझबेकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचे इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या ५,१५,००० (१९९१). पूर्व-पश्र्चिम अशा प्राचीन आंतरराष्ट्नीय व्यापारी मार्गावर ते वसल्यामुळे त्याचा सतत विकास होत राहिला. इ. स. पू. चौथ्या शतकात सॉग्डियाना या प्राचीन प्रदेशाची राजधानी येथे होती. अलेक्झांडर द गेटने इ. स. पू. ३२८ मध्ये बॅक्टि्नया व त्याच्या उत्तरेचा सॉग्डियाना हे प्रदेश जिंकले व तेथील राजकन्येशी विवाह केला. पुढे तुर्की व अरब लोकांनी त्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर नवव्या-दहाव्या शतकांत इराणच्या सॅमॅनीड राजघराण्याच्या आधिपत्याखाली ते होते. पुढे या प्रदेशावर चंगीझखानाने १२२० मध्ये अनेक स्वाऱ्या केल्या. तैमूरलंगाने १३७० मध्ये उझबेकिस्तान जिंकून समरकंद येथे आपली राजधानी वसविली. सोळाव्या शतकापासून येथील तुर्की-मंगोल लोक उझबेक या नावाने ओळखले जाऊ लागले. रशियन सैन्याने १८६५ मध्ये समरकंद घेतले. रशियन कांतीनंतर (१९१७) सोव्हिएट रशियाच्या संघराज्यात उझबेकिस्तान समाविष्ट झाले. त्याची समरकंद राजधानी होती. १९९१ मध्ये उझबेकिस्तान स्वतंत्र होऊन ताश्कंद ही त्याची राजधानी झाली. मात्र समरकंदचे व्यापारी महत्त्व अबाधित राहिले आहे.
भौगोलिकदृष्टया शहराची रचना चौरस असून त्याभोवती सु. १५ किमी. लांबीची तटबंदी आहे. शहराच्या मध्यभागास रिधिस्तान म्हणतात. या भागात मुख्यत्वे उलुघबेग, शिरदर व टिल्लकारी या नावांची तीन विदयालये असून यांतील उलुघबेग हे विदयालय तैमुरलंगाच्या नातवाने १४३४ मध्ये बांधले. रशियन शासनाने येथे समरकंद विदयापीठ सुरू केले. तेथील उझबेग शास्त्र अकादमी महत्त्वाची असून तीत शेती, व्यापार व वैदयक या विषयांच्या प्रगत अभ्यासाची सोय आहे. उझबेकिस्तानमध्ये कृषिव्यवसाय भरभराटीत असल्यामुळे समरकंदमधून कापूस, ताग , गहू , भात, बार्ली, तंबाखू , बटाटे, फळफळावळ, रेशीम इत्यादींची निर्यात होते. शेतीखालोखाल मेंढपाळी हा मोठा व्यवसाय असून काराकुल ही मेंढीची प्रमुख जात येथे आढळते. समरकंदमध्ये काराकुल मेंढ्यांच्या शास्त्रीय अभ्यासासाठी एक खास संस्था असून रशियाला लागणाऱ्या एकूण मेंढीच्या कातड्यापैकी ३३% कातडी उझबेकिस्तान पुरवितो. शहरात सिमेंट, धातुकाम, शेतीची अवजारे, कागद, कातडी, तेलशुद्धीकरण, गंधक, रसायने, कपडे, विणकाम, इत्यादींचे कारखाने आहेत. याशिवाय गालिचे विणणे, भरतकाम आणि इतर हस्तव्यवसायही चालतात. अलीकडे मोटारींचे सुटे भाग, ट्रॅक्टर, चित्रपटसामग्री यांचेही कारखाने निघाले आहेत.
देशपांडे, सु. र.