समघटकीकरण : एकच रासायनिक संघटन असलेल्या परंतु अणूंची संरचना वा विन्यास (मांडणी) भिन्न असल्याने भिन्न भौतिकीय व रासायनिक गुणधर्म असलेल्या संयुगांना परस्परांचे समघटक म्हणतात. अशा एका समघटकाचे त्याच्या दुसऱ्या कोणत्याही समघटकात रूपांतर करण्याच्या रासायनिक प्रक्रियेला समघटकीकरण म्हणतात. हायड्रोकार्बनांच्या रेणूंमधील अणूंचा पुनर्विन्यास (फेरमांडणी) हे समघटकीकरणाचे उदाहरण होय. सर्व समघटकांमध्ये एकाच प्रकारच्या अणूंची संख्या तेवढीच असते. मात्र त्यांच्या रेणूंमधील या अणूंची मांडणी भिन्न प्रकारची असते. यामुळे त्यांचे रासायनिक वर्तन भिन्न प्रकारचे असते. औदयोगिक दृष्टीने समघटकीकरणाची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. खनिज तेल उत्पादने, प्लॅस्टिके, उच्च बहुवारिके (उदा., कृत्रिम रबर) इत्यादींच्या उत्पादनात ही प्रक्रिया वापरतात. यावेळी विशिष्ट क्रियांव्दारे अशाख शृंखलायुक्त हायड्रोकार्बन संयुगांचे सशाख शृंखलायुक्त हायड्रोकार्बन संयुगांत रूपांतर केले जाते. अमोनियम सायनेटाचे यूरियात रूपांतर ही महत्त्वाची समघटकीकरण प्रक्रिया आहे.
अल्किल गटाचे (CnH2n + 1) स्थानांतरण (सांगाडा समघटकीकरण), नॅप्थॅलिनांमधील एकट्या कार्बन बंधाचा स्थानबदल व ओलेफिनांमधील द्विबंधाचा स्थानबदल या समघटकीकरण प्रक्रिया खनिज तेल रसायनशास्त्रामध्ये व्यावहारिक दृष्टया महत्त्वाच्या आहेत.
अल्किल गटाचे स्थानांतरण या प्रकारात अधिक उच्च सशाख विन्यासासाठीचे समघटकीकरण व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण यामुळे मोटारगाडीसाठीच्या इंधनाच्या ज्वलनाची गुणवत्ता (जी ऑक्टेन अंकाने दर्शविली जाते) सुधारते आणि तृतीयक कार्बन अणूंच्या (इतर तीन कार्बन अणूंना एकबंधाने बांधल्या गेलेल्या कार्बन अणूंच्या) निष्पत्तीन रासायनिक विक्रियाशीलता वाढते. अशा प्रकारे व्यापारी दृष्टीने सशाख शृंखलायुक्त हायड्रोकार्बने ही त्यांच्या सरळ शृंखलायुक्त समघटकांपेक्षा अधिक चांगली मोटारगाडी इंधने आहेत. म्हणून सरळ शृंखलायुक्त समघटकांचे त्यांच्या समतुल्य सशाख शृंखलायुक्त समघटकांत रूपांतर करणे हा पेट्रोल निर्मितीमधील महत्त्वाचा टप्पा आहे. औदयोगिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या समघटकीकरणाच्या असंख्य विक्रिया आहेत. उदा., एका सरळ रेषेत जोडले गेलेले चार कार्बन अणू असलेल्या सामान्य ब्यूटेन (C4H10) या अशाख हायड्रोकार्बनाचे त्याच्या सशाख शृंखलायुक्त आयसोब्युटेन या समघटकात (यात तृतीयक कार्बन अणू असतो) करणारे समघटकीकरण व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया द्रवरूप वाबाष्परूप प्रावस्थेत हायड्रोजन क्लोराइडाने प्रवर्तित केलेल्या अल्युमिनियम क्लोराइड या उत्प्रेरकाच्या (विक्रियेत भाग न घेता तिची गती बदलणाऱ्या द्रव्याच्या) उपस्थितीत केली जाते. यावेळी तापमान १००° से.पेक्षा अधिक (१२००-१५०° से.) व दाब दर चौ. सेंमी.वर सु. ११-१४ किगॅ. असतो. ब्युटेन व आयसोब्युटेन या समघटकांचे गुणधर्म अगदी वेगळे असतात. उदा., ब्युटेन-०·५° से.ला उकळते व-०·१३८° से.लागोठते तर आयसोब्युटेन-११·७° से.ला उकळते व-१५९° से.ला गोठते.
विमानाचे इंधन असलेल्या गॅसोलिनात वापरण्यात येणारा आयसोपेंटेन [CH3CH(CH3)CH2CH3] हा उच्च ऑक्टेन अंक असलेला घटक व्यापारी दृष्टया सामान्य (n)पेंटेनाचे [CH3(CH2) 3CH3] समघटकीकरण करून बनवितात. उत्प्रेरकी भंजन व उत्प्रेरकी पुनर्रूपण (पुनर्विन्यास) यांमध्ये सांगाडा समघटकीकरण [⟶ समघटकता] ही महत्त्वपूर्ण द्वितीयक विक्रिया आहे. पॅराफिनांप्रमाणेच अरोमॅटिक संयुगे व ओलेफिने यांचेही समघटकीकरण होते.
नॅप्थॅलिनांच्या बाबतीत एकटया कार्बन बंधाचा स्थानबदल ही समघटकीकरण प्रक्रिया वापरतात. उदा., सायक्लोहेक्झेन (C6H12) व मिथिल सायक्लोहेक्झेन ( C7H14) ही संयुगे व्यापारी दृष्टया पाच कार्बन अणुयुक्त वलयी समघटकांचे द्रवरूप प्रावस्थेत समघटकीकरण करून तयार करतात. यासाठी हायड्रोजन क्लोराइडाने प्रवर्तित केलेले अल्युमिनियम क्लोराइड-हायड्रोकार्बन जटिल हा उत्प्रेरक वापरतात.
जेव्हा एखादया ओलेफिनाची रासायनिक संश्लेषणासाठी गरज असते, तेव्हा द्विबंध स्थानबदल ही समघटकीकरण प्रक्रिया उपयुक्त असते. अम्लीय उत्प्रेरकाच्या उपस्थितीत विवेचकपणे द्विबंध स्थानबदलाची अशी प्रक्रिया २३०° से.पेक्षा कमी तापमानाला घडते. उत्प्रेरकी भंजन व उत्प्रेरकी बहुवारिकीकरण या प्रक्रियांमध्ये या प्रकारचे समघटकीकरण द्वितीयक विक्रिया म्हणून घडते. याव्दारे गॅसोलिनांच्या उच्च ऑक्टेन कमांकाचे स्पष्टीकरण देता येते.
पहा : खनिज तेल समघटकता.
ठाकूर, अ. ना.