संशयवाद : (स्केप्टिसिझम). मानवाला कोणत्याही प्रकारचे सर्वमान्य, विश्वसनीय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, अशी भूमिका घेणारी तत्त्वज्ञानातील एक विचारप्रणाली. स्केप्टिकोस (skeptikos) ह्या ग्रीक शब्दावरून ‘स्केप्टिसिझम’ हा शब्द आलेला आहे. स्केप्टिकोसचा अर्थ ‘चिकित्सक ’ वा ‘ शोधक’ असा आहे. माणसाने निरनिराळ्या ज्ञानक्षेत्रांत जी कामगिरी केलेली दिसते, तीतून मिळालेल्या ज्ञानाच्या विश्वसनीयतेबाबत संशयवादी (स्केप्टिक्स) हे संशय व्यक्त करतात. त्या दृष्टीने प्रश्न उपस्थित करतात. संशय व्यक्त करण्यासाठी विचारावयाच्या प्रश्नांसाठी संशयवादयांनी युक्तिवादांचे पद्धतशीर संच तयार केलेले आहेत. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांच्या काळापासून संशयवादयांनी आपल्या संशयांच्या पुष्टीसाठी मांडलेल्या युक्तिवादांनी पश्चिमी तत्त्वज्ञांच्या समोर आलेल्या समस्यांना आकार दिला.

संशयवादाचे आत्यंतिक (एक्स्ट्रीम) संशयवाद व मर्यादित (लिमिटेड किंवा मिटिगेटेड) संशयवाद असे दोन ठळक प्रकार करता येतात. आत्यंतिक संशयवाद एकंदर ज्ञानाच्या शक्यतेवरच आक्षेप उपस्थित करतो. ज्ञानाच्या शक्यतेबाबत संशय घेतल्याने ज्ञानाचा विषय असलेल्या एकूणच वास्तव जगाच्या अस्तित्वाबाबतही संशय उपस्थित होतो. पण संशयवादी हा ज्ञानाच्या एखादया मर्यादित क्षेत्रातील प्रस्थापित किंवा सर्वमान्य सिद्धांताबद्दल आक्षेप घेत असेल, तर त्या आक्षेपांना मर्यादित संशयवाद म्हणता येईल. बाह्य जगाचे अस्तित्व, कार्यकारणभाव, अन्य मनांचे अस्तित्व, वैश्विक सामान्य नियम यांसारख्या विशिष्ट सर्वमान्य समजुतींबाबत काही तत्त्वचिंतकांनी आक्षेप घेतले आहेत. ही मर्यादित संशयवादाची रूपे होत.

संशयवादी प्रवृत्ती ⇨ सॉक्रेटीस-पूर्व काळातही आढळतात. जे आहे ते प्रवाही, गतिशील आहे, आपण एकाच नदीत दोनदा पाऊल टाकू शकत नाही. या ⇨ हेराक्लायटस (इ. स. पू. सु. ५३६-४७०) याच्या विचारांचा विकास कॅटिलस (इ. स. पू. पाचवे-चौथे शतक) याने केला व असे प्रतिपादन केले, की एकाच नदीत आपण दोनदा पाऊल टाकू शकत नाही कारण नदीचा प्रवाह क्षणोक्षणी बदलतो, एवढेच नसून पाऊल टाकणारे आपणही क्षणोक्षणी बदलतो हेही आहे. आपण क्षणोक्षणी बदलत असल्याने, पर्यायाने वक्ता व श्रोता तसेच वक्त्याचे शब्दही बदलत असल्यामुळे खऱ्या अर्थाने संप्रेषण साधणेही शक्य नाही. त्यामुळे तात्त्विक चर्चाही निरर्थक ठरते. विश्वासंबंधीचे वस्तुनिष्ठ ज्ञान आपल्याला होऊ शकते किंवा असे ज्ञान असते, ही गोष्ट ⇨ सॉफिस्टांनी नाकारली होती. उदा., प्रोटॅगोरस या प्रसिद्ध सॉफिस्टाचे ‘माणूस हीच सर्व वस्तूंची मोजपट्टी आहे’, हे वचन प्रसिद्ध आहे. ⇨ प्लेटो च्या संवादांतून या वचनाचा असा अर्थ लावला गेला, की निरपेक्ष यथार्थ ज्ञान शक्य नाही. वास्तवाबद्दलचा प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन सारखाच बरोबर असतो.

एलिसचा पिरो किंवा पिरॉन (इ. स. पू. सु. ३६०- सु. २७०) हा  ग्रीक संशयवादाचा संस्थापक मानला जातो. त्याचे लेखन उपलब्ध नाही परंतु त्याच्याबद्दल असे सांगितले जाते, की तो सद्वस्तूच्या स्वरूपाबद्दलच्या कोणत्याही तत्त्वविचाराला स्वतःला बांधून घेत नसे. इ. स. पू. तिसऱ्या शतकात प्लेटोच्या अकादमीचे नेतृत्व ज्यांच्याकडे गेले, त्यांनी संशयवादाचे एक तात्त्विक पद्धतीशास्त्र बनवले. त्यांनी प्लेटोचे तत्त्वमीमांसात्मक सिद्धांत नाकारले आणि सॉक्रेटीसच्या एका वचनावर भर दिला ‘मला जे काही माहीत आहे ते एवढेच, की मला काहीही माहीत नाही’ हे ते वचन होय. आर्केसिलॉस (इ. स. पू. सु. ३१६- सु.२४१) आणि कार्नीआडीझ (इ. स. पू. सु. २१४-१२९) ह्या संशयवादी तत्त्वज्ञांची नावे ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय होत. इ. स. पू. पहिल्या शतकापर्यंत अकादमीत संशयवादयांचे वर्चस्व होते.[⟶ अकादमी १].

सेक्‌स्टस एंपिरिकस (दुसरे वा तिसरे शतक) ह्या संशयवादयाच्या मते जे दिसते, त्याच्या पलीकडचे निर्णय घेण्याचा प्रयत्न जोवर माणसे आगहीपणे करतात, तोवर त्यांच्या पदरी वैफल्यच येते ती चिंताग्रस्त राहतात. तेव्हा तसे न करता, कोणत्याही श्रद्धेची वा विश्वासाची बांधीलकी न स्वीकारता माणसे जगतील, तर त्यांना मनःशांती लाभेल. आपल्या प्रतिपादनाच्या पुष्टयर्थ सेक्‌स्टस एंपिरिकसने युक्तिवादही (ट्रोप्स) दिले आहेत.

मध्ययुगात आणि प्रबोधनकाळातही संशयवादाचा काही प्रभाव होता. सेक्‌स्टस एंपिरिकसच्या लेखनाची काही भाषांतरेही झाली. रोमन साम्राज्याचे क्रिस्तीकरण झाल्यानंतरच्या काळात ⇨ सेंट ऑगस्टीन ने (३५४-४३०) आपल्या Contra Academicos ह्या गंथातून संशयवादाचे खंडन केले. त्याच्या मते श्रद्धा, ईश्वराविष्कार वा साक्षात्कार ह्यांतूनच संशयवाद पराभूत होऊ शकतो. इस्लामी तत्त्वज्ञांनी विवेकविरोधी (अँटिरॅशनल) संशयवाद पुरस्कारून धार्मिक सत्ये केवळ श्रद्धेने स्वीकारावीत, असे प्रतिपादन केले. फ्रांचेस्को सांचेस (सु. १५५०-१६२३) आणि ⇨ मीशेल एकेम द माँतेन (१५३३-९२) हेही संशयवादाचे प्रतिनिधी होत. ॲरिस्टॉटलीय अर्थाने, निसर्गातील घडामोडींची आवश्यक ती कारणे देणारे विज्ञान प्राप्त होऊ शकणार नाही, ही भूमिका मांडण्यासाठी सांचेसने अनेक युक्तिवादांचा अवलंब केला. ‘प्रत्येक वस्तूचे परिपूर्ण ज्ञान’ ही त्याची स्वत:ची विज्ञानाची कल्पनाही, वस्तूंचे आणि माणसाचे स्वरूप लक्षात घेता, प्रत्यक्षात आणणे मानवी शक्तीबाहेरचे आहे, असे त्याचे म्हणणे होते. वस्तूंमधील आंतरसंबंध, त्यांची अमर्याद संख्या आणि त्यांचे सातत्याने बदलणारे स्वरूप ह्यांमुळे त्यांचे ज्ञान शक्य होत नाही, असे त्याचे म्हणणे होते. सांचेसचा पहिला निर्णय असा होता, की सत्य हे केवळ श्रद्धेनेच प्राप्त होऊ शकते. सांचेसच्या दुसऱ्या निर्णयाने मात्र उत्तरकालीन विचारांच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने असे म्हटले, की अंतिम अर्थाने काहीही जपणे शक्य नसले, तरी ज्ञानसंपादनाचे सर्व प्रयत्न आपण सोडून दिले पाहिजेत असे नाही. जे शक्य ते ज्ञान मिळवावे. अर्थात निरीक्षणातून, अनुभवातून ज्या वस्तूंशी आपला परिचय घडतो, त्यांपैकी काही वस्तूंचे मर्यादित आणि अपूर्ण असे ज्ञान असेल. काहीही जाणता येणार नाही ही जाणीव अशा प्रकारे, काही विधायक परिणाम घडवून आणू शकेल. सांचेसचा हा विधायक वा सौम्य संशयवाद म्हणता येईल.

खरे ज्ञान केवळ श्रद्धा आणि साक्षात्कार ह्यांतूनच प्राप्त होईल, असे माँतेननेही आगहाने प्रतिपादिले. पूर्वकालीन संशयवादयांच्या अनेक युक्तिवादांचा माँतेनने उपयोग करून घेतला आणि काही नवी उदाहरणेही दिली. इंद्रियानुभवांच्या विश्वासार्हतेबाबत निर्णय घेण्यात संशयवादयांच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी त्याने स्पष्ट केल्या. त्याने दाखवून दिले, की व्यक्तिगत, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक माणसांच्या निर्णयांवर प्रभाव टाकीत असतात. ईश्वरानेच आपल्या मनःशक्तीला काही संशयातीत आदितत्त्वे (फर्स्ट प्रिन्सिपल्स) दिली नाहीत, तर आपण निर्णयांसाठी म्हणून जे निकष वा मानदंड वापरतो त्यांच्याबद्दलच संशय घेता येतो. ईश्वराचे साहाय्य नसेल, तर माणसाने प्राप्त केलेले सर्व काही संशयास्पद ठरते. ह्यात वैज्ञानिकांची म्हणून म्हटली जाणारी कामगिरीही आलीच. आपली निर्णयशक्ती बाजूला ठेवून निसर्ग आणि लोकरीतींना अनुसरून जगणे आणि ईश्वर आपणासाठी जे काही अविष्कृत करील ते स्वीकारणे एवढेच आपण करू शकतो. फ्रेंच वैज्ञानिक, गणिती आणि तत्त्वज्ञ ⇨प्येअर गासँदी (१५९२-१६५५) ह्याने ॲरिस्टॉटलच्या जवळपास सर्वच विचारांना आव्हान दिले. ‘ कोणतेही विज्ञान शक्य कोटीतले नाही आणि ॲरिस्टॉटलच्या अर्थाने तर नाहीच नाही ’ हे सांगण्यासाठी त्याने संशयवादयांच्या अनेक युक्तिवादांचा अवलंब केला मात्र त्याने एक विधायक सूचन केले : वस्तूंचे खरे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दृश्य जगाचा अनुभवाधिष्ठित अभ्यास करावा. मेरसेन मारँ (१५८८-१६४८) ह्या फ्रेंच गणितज्ञाने प्रबोधनकालीन व्याज -वैज्ञानिकांवर संशयवादी पद्धतीने हल्ला चढवला. उदा., किमयागार (ॲल्केमिस्ट) परंतु त्याने आपल्या संशयवादाची तीव्रता कमी केली. वस्तूंच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान मूलभूत अर्थाने शक्य नसले, तरी दृश्य जगाविषयीची माहिती आपणासही जगायला मार्गदर्शक ठरते, असे त्याने सांगितले. गासँदीनेही पुढे विधायक संशयवादाचा स्वीकार केला.


संशयवादी वातावरणात वाढलेला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक ⇨ रने देकार्त (१५९६-१६५०) ह्याने मात्र प्रमाण ज्ञानाचे संशयातीत असे निकष प्राप्त करणे शक्य आहे आणि त्यांच्या आधारे संशयातीत असे प्रमाण ज्ञानही प्राप्त करून घेणे शक्य आहे, अशी भूमिका घेतली. परिणामत: गासँदी, मेरसेन मारँ ह्यांसारख्या संशयवादयांनी निकराने त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. ⇨ प्येर बेल (१६४७-१७०६) हा फ्रेंच तत्त्वज्ञ संशयवादी होता आणि मानवी अनुभवाच्या कोणत्याही क्षेत्राचा अर्थ लावण्यासाठी  निर्माण करण्यात आलेल्या कोणत्याही बौद्धीक रचनेची चिकित्सा केल्यानंतर ती आत्मविसंगत, अपुरी आणि तर्कविपरित असल्याचे दिसून येते, असे त्याचे प्रतिपादन होते. आपल्या कौशल्यपूर्ण युक्तिवादांनी त्याने क्रिस्ती धर्मशास्त्रावर, तसेच प्राचीन आणि आधुनिक तत्त्ववेत्त्यांवर चिकित्सकपणे टीका केली. धार्मिक सत्ये ही श्रद्घेनेच स्वीकारावी लागतात बौद्धीक युक्तिवादांनी ती सिद्ध करता येत नाहीत, असा त्याचा निष्कर्ष होता.

अठराव्या शतकातील बौद्धीक वातावरणातही ⇨ डेव्हिड ह्यूम (१७११-७६) हा संशयवादी विचार मांडीत होता. सतराव्या शतकापासून निरीक्षण आणि प्रयोग ह्यांवर आधारलेली विज्ञाने विकसित होऊ लागली. त्यामुळे विशेषत: विज्ञानात वापरल्या जाणाऱ्या अनुमानप्रकारांची चिकित्सा तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक करू लागले. त्यातून विगामी तर्कशास्त्र आकारास आले. विज्ञानाच्या रीतीत विगमनाचा उपयोग केला जातो. ह्यूमने विगमना-बद्दलच प्रश्न निर्माण केले. निसर्गाची एकविधता (यूनिफॉर्मिटी ऑफ नेचर) हा विज्ञानाचा पाया होय तथापि ह्यूमने तार्किक आधार अमान्य केला आणि अनुभवाच्या आधारावर सार्वत्रिक निसर्गनियम सिद्ध करता येत नाहीत, असा निष्कर्ष काढला. उदा., अ नंतर ब ही घटना आजवर सातत्याने घडत आल्याचे दिसते पण भविष्यकाळात नक्की तसे घडेल, असा निष्कर्ष काढता येणार नाही. अ ही घटना घडली पण त्यानंतर ब ही घटना घडली नाही अशी कल्पना करणे तर्कत: शक्य आहे कारण आतापर्यंत अ ही घटना घडल्यावर ब ही घडल्याचे आढळले, एवढाच अनुभवजन्य पुरावा असतो.

एकोणिसाव्या शतकात अस्तित्ववादी विचारवंत ⇨ सरेन किर्केगॉर (१८१३-५५) ह्याने, विश्व म्हणजे बुद्धीप्रणीत तत्त्वांचा मूर्त आविष्कार  असून बुद्धी हेच माणसाचेही स्वरूप आहे ह्या ⇨ हेगेल च्या (१७७०-१८३१) भूमिकेविरूद्ध बंड केले आणि मानवी अस्तित्वाविषयीचे सत्य वस्तुनिष्ठ नसते, तर ते व्यक्तिनिष्ठ असते, असा विचार मांडला. आपला जीवनमार्ग अनेक पर्यायांमधून आपल्याला स्वत:लाच निवडावा लागतो आणि ही निवड बुद्धीनिष्ठ निकषांच्या आधारे केलेली नसते. अस्तित्वाचे स्वरूप मानवी बुद्धीला परके असल्याने ते श्रद्धेने स्वीकारावे लागते, असे त्याचे प्रतिपादन आहे. माणसाभोवती पसरलेले विश्व माणसाला परके असून ते ईश्वरनिर्मित नाही, त्यात बुद्धीप्रणीत तत्त्वांचाही आविष्कार झालेला नाही, त्यामुळे ते निरर्थक आहे, असा विचार ⇨ आल्बेअर काम्यू (१९१३-६०) ह्याने मांडला.

भारतातही ज्ञानाच्या शक्यतेला आव्हान देणारे विचार नागार्जुन (इ. स. दुसरे-तिसरे शतक), जयराशिभट्ट (इ. स. आठवे शतक) व ⇨ श्रीहर्ष (इ. स. तेरावे शतक) या दार्शनिकांनी व्यक्त केलेले दिसतात. ही आत्यंतिक संशयवादाचीच रूपे मानता येतील कारण यात प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द अशी कोणतीच प्रमाणे सिद्ध होत नाहीत. तसेच या प्रमाणांचे विषय, ‘ प्रमेय ’ असेही काही सिद्ध होत नाही, असे प्रतिपादन केलेले आहे. अर्थात नागार्जुनाने विगहव्यावर्तनी त मांडलेले प्रमाणविरोधी आक्षेप त्याच्या शून्य-वादाचा भाग बनले. जयराशीने तत्त्वोपप्लवसिंह या गंथातील प्रमाण-विरोधी युक्तिवादांतून परलोकविरोधी लोकायतमताचे पोषण केले तर श्रीहर्षाचे खंडनखंडखादया तील प्रमाणखंडन हे अव्दैतवेदान्ताच्या समर्थनाचा भाग बनले.

संशयवादावर नेहमीच टीका होत आलेली आहे आणि त्याचे खंडन करण्याचे प्रयत्नही झाले आहेत तथापि सेक्‌स्टस एंपिरिकसपासून आज-वरच्या संशयवादयांनी असे प्रतिपादिले आहे, की संशयवाद हा समर्थनीय आहे, की नाही ह्यावर त्याचे सामर्थ्य अवलंबून नाही तर आपल्या मतप्रणालींबद्दल दुरागह धरणाऱ्या तत्त्वज्ञांविरूद्ध संशयवादी युक्तिवादांचा रोख आहे. अशा तत्त्वज्ञांना लिहिलेले ‘ निनावी पत्र ’ असे संशयवादाचे वर्णन केले जाते. तुमची तात्त्विक भूमिका खरोखरीच निर्दोष आहे का ? तीत काही विसंगती, त्रूटी नाहीत ना ? हे प्रश्न हे निनावी पत्र त्यांच्या समोर उभे करते. माणसे ज्या गोष्टी खऱ्या म्हणून स्वीकारत असतात, त्या खरोखरीच तशा आहेत काय, हे चिकित्सकपणे तपासून पाहिले पाहिजे, ही जाणीव संशयवाद निर्माण करतो आणि वैचारिक क्षेत्रात ही जाणीव आवश्यक आणि उपयुक्त असल्यामुळे संशयवाद एक सकारात्मक भूमिका बजावत असतो, असे म्हणता येईल.

पहा : ज्ञानमीमांसा.

संदर्भ : 1. Boas, Georg, Dominant Themes of Modern Philosophy, New York, 1957.

    2. Edwards, Paul, The Encyclopedia of Philosophy, Vol. 7, New York, 1967.

    3. Hallie, Philip P. Ed. Scepticism, Man and God, Selections from the Major Writings of Sextus Empiricus, Middletown (Conn.), 1964.

    4. Maccoll, Norman, The Greek Sceptics from Pyrrho to Sextus, London, 1869.

कुलकर्णी, अ. र.