फलप्रामाण्यवाद: (प्रॅग्मॅटिझम). फलप्रामाण्यवाद हे समग्र मानवी अनुभव, आणि व्यवहार यांचा एका प्रकारे अर्थ लावू पाहणारे सर्वस्पर्शी   तत्त्वज्ञा न म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या   तत्त्वज्ञा नाचा भाग असलेली सत्यतेच्या स्वरूपाविषयीची एक विशिष्ट उपपत्ती  ‘ सत्यतेची फलप्रामाण्यवादी उपपत्ती ’  म्हणून प्रसिद्ध आहे.

  

  तत्त्वज्ञा नाच्या क्षेत्रातील एक विशिष्ट आंदोलन म्हणून फलप्रामाण्यवादी   तत्त्वज्ञा न एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस उदयाला आले आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत ते विशेष प्रभावी होते.  हे आंदोलन ही अमेरिकेने तत्त्वज्ञा नाला दिलेली वैशिष्ट्यपूर्ण देणगी होय  पण तत्त्वज्ञा नात नेहमी आढळून येते त्याप्रमाणे फलप्रामाण्यवादाने पुरस्कारिलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना पूर्वीच्या तत्त्वतेत्त्यांच्या विचारांत कमीअधिक स्पष्टपणे सूचित झालेल्या आहेत.  ह्या दृष्टीने विशेषतः⇨ जॉर्ज बर्क्ली( १६८५- १७५३)  आणि⇨ इमॅन्युएल कांट( १७२४- १८०४)  हे फलप्रामाण्यवादाचे पूर्वसूरी मानता येतील.  त्याचप्रमाणे,  एक आंदोलन म्हणून फलप्रामाण्यवाद ओसरल्यानंतरही त्याच्यात प्रकट झालेल्या दृष्टिकोनाचा प्रभाव नंतरच्या काही तत्त्ववेत्त्यांच्या विचारांवरही दिसून येतो.

  चार्ल्स पर्स( १८३९- १९१४),  विल्यम जेम्स( १८४२- १९१०)  आणि जॉन ड्यूई( १८५९- १९५२)  हे अमेरिकन तत्त् व वेत्ते फलप्रामाण्यवादाचे प्रमुख पुरस्कर्ते होत.  ह्या वादात प्रतिपादिलेल्या दृष्टिकोनाला  ‘ प्रॅग्मॅटिझम ’  हे नाव देण्याचे श्रेय पर्स ह्यांच्याकडे आहे. विश्व आणि मानव यांच्या स्वरूपाविषयीचे काही विशिष्ट सिद्धांतांचे प्रतिपादन करणारे तत्त्वज्ञा न असे फलप्रामाण्यवादाचे स्वरूप नाही,  तर   तत्त्वज्ञा न आणि विज्ञान यांतील समस्यांविषयी विचार कसा करावा,  याविषयीच्या एका विशिष्ट पद्धतीची मांडणी आणि समर्थन करणारे ते तत्त्वज्ञा न आहे.  फलप्रामाण्यवादी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या व स्वतः ला फलप्रामाण्यवादी म्हणवणाऱ्या तत्त् व वेत्त्यांनी ही मांडणी भिन्नभिन्न प्रकारांनी केलेली असल्यामुळे फलप्रामाण्यवादाच्या सिद्धांतांत काहीशी संदिग्धता आणि विसंगती आढळून येते,  ही गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे.  पण मानवी अनुभव अधिक सुसंवादी बनविण्यासाठी आणि ह्या अनुभवाच्या अनुरोधाने चाललेला व्यवहार अधिक कार्यक्षम करण्यासाठी संकल्पनांची निर्मिती होते आणि हे कार्य पार पाडण्यात त्यांना मिळालेले यश हा त्यांच्या प्रामाण्याचा निकष असतो,  हे ह्या तिन्ही विचारवंतांना समान असलेले फलप्रामाण्यवादी सूत्र म्हणता येईल.

  

    चार्ल्स पर्स :  पर्स यांना अभिप्रेत असलेला फलप्रामाण्यवाद ही एक पद्धती आहे.  आपल्या भाषेच्या वापरामध्ये आणि संकल्पनांमध्ये स्पष्टता निर्माण करणे हे ह्या पद्धतीचे प्रयोजन आहे.  ह्या विचारपद्धतीचे  अधिष्ठान असलेले सूत्र पर्स यांनी असे मांडले आहे : ‘एखाद्या बौद्धिक संकल्पनेचा अर्थ निश्चित करण्यासाठी , ती संकल्पना जर सत्य असेल तर  त्या पासून कोणते व्यावहारिक परिणाम निष्पन्न होतील अशी कल्पना आपण करू शकतो ते ध्यानात घ्यावेत  ह्या सर्व परिणामांची बेरीज म्हणजे त्या संकल्पनेचा सबंध आशय होय .’ पर्स यांच्या मताप्रमाणे फलप्रामाण्यवाद ही कोणत्याही संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी नव्हे , तर  ‘ बौद्धिक संकल्पनां ’ चा किंवा  ‘ अमूर्त संकल्पनां ’ चा अर्थ स्पष्ट करण्यासाठी वापरावयाची पद्धती आहे .

  

   ह्या पद्धतीच्या उपयोगामुळे एकतर आपण वापरीत असलेल्या कित्येक संकल्पनांना स्पष्ट अर्थ देण्यात आलेला नसतो,  त्या  ‘ रिक्त ’,  अर्थशून्य आहेत ही गोष्ट उघड होईल.  विशेषतः  सत्ताशास्त्रात वा वस्तुमीमांसेत( ऑन्टॉलॉजी) वापरण्यात येणाऱ्या अनेक संकल्पना ह्या स्वरूपाच्या आहेत असे दिसून येईल,  असे पर्स यांचे म्हणणे होते.  उदा., ‘ अस्तित्व हे एक आहे की अनेक आहे?’  असा प्रश्न वस्तुमीमांसेत अनेकदा उपस्थित करण्यात येतो.  ह्या संदर्भात  ‘ अस्तित्व हे एक आहे( किंवा अनेक आहे)’  ही गोष्ट सत्य आहे असे मानले,  तर त्यापासून कोणकोणते व्यावहारिक परिणाम-  म्हणजे ज्यांच्यामुळे आपल्या अनुभवमालिकेमध्ये काहीना काही फरक घडविणारे परिणाम-घडून येतील असा प्रश्न केला, तर त्याचे उत्तर देता येत नाही हे दिसून येईल व यावरून  ‘ अस्तित्व एक( किंवा अनेक)  आहे ’  हे एक पोकळ विधान आहे ही गोष्ट स्पष्ट होईल.

  

   हे फलप्रमाण्यवादी पद्धतीचे निषेधक,  खंडनपर फलित होय.  तिचे दुसरे फलित अधिक विधायक आहे. ‘कठीण ’, ‘जड ’, ‘स्थितिस्थापक ’  ह्यांसारख्या संकल्पना घेतल्या, तर त्यांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी पर्स यांनी दिलेली रीत अशी: समजा  ‘ क्ष ही वस्तू स्थितिस्थापक आहे ’  ह्या विधानाचा अर्थ स्पष्ट करावयाचा आहे. तर क्ष खरोखर स्थितिस्थापक आहे की नाही हे ठरविण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीत आपण क्ष वर कोणकोणत्या प्रकारच्या कृती करू(उदा., क्ष ताणण्याची कृती, क्ष मुरडण्याची कृती, क्ष कठीण पदार्थावर आपटण्याची कृती इ.) आणि कोणते अनुभव आले तर क्ष स्थितिस्थापक आहे हे मानू हे स्पष्ट करावे लागेल. तेव्हा  ‘ क्ष स्थितिस्थापक आहे ’  ह्या विधानाचा फलप्रामाण्यवादी अर्थ  ‘ जर क्ष वर अमुक परिस्थितीत अमुक क्रिया केली तर अमुक परिणाम अनुभवाला येतील ’  ह्यासारख्या सोपाधिक(कंडिशनल) विधानांमध्ये सामावलेला असतो. ‘ह्या विशिष्ट वस्तूला उद्देशून  ‘ स्थितिस्थापक ’  ही संकल्पना लावणे का योग्य आहे?’ हा प्रश्न आणि  ‘‘ स्थितिस्थापक ’  ह्या संकल्पनेचा अर्थ काय ?’ हा प्रश्न परस्परसंबंधित आहेत. ‘ही वस्तू स्थितिस्थापक आहे ’  ह्या विधानाचा अर्थ वर दिलेल्या, त्या वस्तूवर कोणत्या परिस्थितीत क शी कृती केली असता कोणते अनुभव येतील हे सांगणाऱ्या विधानाद्वारा कशी स्पष्ट करता येतो. एखाद्या संकल्पनेचा अर्थ अशा सोपाधिक विधानाद्वारा स्पष्ट करता येत नसेल तर तिला फलप्रामाण्यवादी अर्थ नसतो,  तिचे उपयोजन करता येत नाही असा निष्कर्ष काढावा लागतो, असा पर्स यांचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत आणि⇨  तार्किक प्रत्यक्षार्थवादा ने पुरस्कारिलेला अर्थपूर्णतेचा निकष यांच्यामधील संबंध उघड आहे. पण पर्स संकल्पनेचा अर्थ किंवा भाषिक प्रयोगांचा अर्थ म्हणजे काय ह्याची सामान्य व्याख्या देत नाहीत. संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करण्याची एक पद्धत ते देतात.

  

    पर्स  यांच्या फलप्रामाण्यवादी तत्त्वज्ञा नाचा दुसरा भाग हा सत्यान्वेषणाविषयीचा,  सत्य काय आहे हे निश्चित करण्याची मानवी प्रवृत्ती आणि योग्य पद्धती यांच्या विषयीचा आहे.  माणसाच्या समजुती किंवा विश्वास  –  उदा.,  बटाटा उकडला की तो मऊ होतो – हे, विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट उद्दिष्टे साधण्यासाठी विशिष्ट पद्धतीने वागण्याच्या  त्याच्या सवयीतून व्यक्त होतात .  तेव्हा स्थिर विश्वास असणे ही संतोषदायक अवस्था असते . कारण आपल्या इच्छांचे समाधान करण्यासाठी कसे वागावे हे माणसाला माहीत असते .  उलट संशयाची अवस्था ही असमाधानकारक असते आणि तिच्याऐवजी विश्वासाची अवस्था प्राप्त करून घेण्याचा माणसाचा प्रयत्न असतो .  ह्या प्रयत् ना ला पर्स  ‘ अन्वेषण ’ वा  ‘ चौकशी ’  ( इन्क्वायरी )  म्हणतात .  आता पर्स यांचे म्हणणे थोडक्यात असे आहे ,  की संशयाचे निरसन करून स्थिर विश्वास प्राप्त करून घेण्याची सर्वांत चांगली पद्धती म्हणजे ⇨ वैज्ञानिक पद्धती होय . कारण ह्या पद्धतीने प्राप्त झालेले विश्वास एकमेकांशी आणि आपल्याला लाभणाऱ्या अनुभवांशी जुळविण्याची जास्तीत जास्त शक्यता असते   म्हणजे हे विश्वास किंवा विश्वासांचा हा व्यूह स्थिर राहण्याची संभवनीयता अधिकात अधिक असते . ह्या पद्धतीने विश्वासांच्या पूर्णपणे स्थिर असलेल्या व्यवस्थेच्या अधिकाधिक जवळ आपण जातो . [→ पर्स ,  चार्ल्स ,  सँडर्स ].


   विल्यम जेम्स:  फलप्रामाण्यवादाच्या तीन प्रमुख संस्थापकांतील सर्वांत प्रभावी आणि ढंगदार व्यक्ती म्हणजे विल्यम जेम्स होय. पर्स यांच्या तत्त्वज्ञा नाचे वळण तार्किक- वैज्ञानिक होते.  माणसांचे प्रत्यक्ष जीवन,  त्यांचे जिवंत,  साक्षात अनुभव आणि समस्या, त्यांची नैतिक धडपड हा जेम्स यांच्या आस्थेचा विषय होता.  त्यांचेतत्त्वज्ञा न हे जीवनविषयक तत्त्वज्ञा न होते  मानवी ज्ञानाचे तार्किक विश्लेषण करू पाहणारे तत्त्वज्ञा न ते नव्हते.  माणसाचे तत्त्वज्ञा न त्याच्या जीवनपद्धतीतून प्रकट होते. आणि ह्याच्यात तत्त्वज्ञा नाचे महत्त्व आहे,  अशी त्यांची भूमिका होती. विश्वाच्या स्वरूपाविषयीची एखादी विशिष्ट कल्पना जर खरी असली,तर तिच्यामुळे आपल्या जीवनाच्या कोणत्या विशिष्ट क्षणी कोणकोणते निश्चित फरक घडून येतील हे शोधून काढणे, हे तत्त्वज्ञा नाचे संपर्ण कार्य आहे असे त्यांचे म्हणणे होते.

  

  आपल्या परिसराशी समाधानकारक संबंध जोडण्यासाठी आणि राखण्यासाठी माणूस विचार करतो,  तर्क बांधतो,  कल्पना लढवितो.  हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने ह्या कल्पना,  तर्क समजुती किती कार्यक्षम,  परिणामकारक ठरतात, व्यवहार्य आणि उपयुक्त ठरतात ह्यांवर त्यांची सत्यता अवलंबून असते,  हा जेम्स यांचा मूलभूत सिद्धांत होय.  बुद्धी किंवा विचार करण्याची शक्ती ही उत्क्रांतीच्या ओघात विकसित झालेली एक नैसर्गिक शक्ती आहे, माणसाच्या इतर शक्तींप्रमाणे परिसराशी यशस्वीपणे मुकाबला करण्याचे एक आयुध,  एक अवजार हेच तिचे स्वरूप आहे.  अंतिम सत्य शोधून काढणारी आणि त्याच्या चिंतनात मग्न होणारी तटस्थ आणि अलिप्त अशी ती शक्ती नाही, मानवी व्यवहाराचे मार्गदर्शन करणे हे तिचे योग्य असे कार्य आहे आणि म्हणून हे कार्य यशस्वीपणे साधण्यात विचारांचे,  संकल्पनांचे,  युक्तिवादांचे,  विधानांचे,  सिद्धांतांचे प्रामाण्य किंवा सत्यता सामावलेली असते, हे जेम्स यांच्या मते फलप्रामाण्यवादाचे सार आहे.

  

   ‘ आत्मा अमर आहे ’, ‘ ईश्वर आहे ’  ह्यांसारख्या श्रद्धेने स्वीकारण्यात येणाऱ्या धार्मिक सिद्धांतांचे समर्थन जेम्स यांनी याच दृष्टिकोनातून केले आहे.  अशा धार्मिक विश्वासांची काही वैशिष्ट्ये नमूद करता येतील: एकतर त्यांची सत्यता सिद्ध करणारा किंवा त्यांचे खंडन करणारा पुरेसा तार्किक पुरावा उपलब्ध नसतो.  केवळ तार्किक दृष्टीने पाहता त्यांची सत्यता सिद्ध झालेली नसते,  पण असत्यताही सिद्ध झालेली नसते.  दुसरी गोष्ट अशी, की त्यांच्या सत्यतेवर जर एखाद्याचा गाढ विश्वास असला,  तर त्याच्या जीवनाला एक खोल अर्थ प्राप्त होतो  ह्या अर्थाच्या प्रकाशात त्याच्या जीवनाला एक निश्चित दिशा लाभते  कठीण आपत्तींतून तगून जायला त्याला शांत धैर्य लाभते इत्यादी. तेव्हा जीवन चांगल्या प्रकारे जगण्याच्या दृष्टीने हे विश्वास अतिशय उपकारक  ठरतात . म्हणून जेम्स यांचा निष्कर्ष असा आहे , की अशा परिस्थितीत हे विश्वास मी सत्य म्हणून स्वीकारीन असा संकल्प करण्याच्या आणि त्याप्रमाणे ते सत्य म्हणून स्वीकारण्याचा माणसाला अधिकार आहे . केवळ तार्किक दृष्ट्या पाहता ते सत्य किंवा असत्य ठरलेले नसल्यामुळे , ते सत्य म्हणून स्वीकारावे की असत्य म्हणून त्यांना दूर सारावे , ही निवड करायला माणसाला मोकळीक आहे आणि ते सत्य म्हणून स्वीकारणे फलदायी असल्यामुळे तसे करण्याचा अधिकारही माणसाला आहे . जेम्स यांची ही भूमिका  ‘ विश्वास ठेवण्याचा संकल्प ’ – द विल टू बिलीव्ह  –  ह्या नावाने प्रसिद्ध आहे . पण पर्स आणि ड्यूई यांना ती नापसंत होती . माणूस विश्वास ठेवायला प्रवृत्त का होतो आणि त्याचा विशिष्ट विधानांवर किंवा सिद्धांतांवर विश्वास असण्याचे कोणते परिणाम त्याच्या जीवनावर घडून येतात , हे मानशास्त्रीय प्रश्न आहेत  उलट एखादा सिद्धांत सत्य म्हणून स्वीकारणे योग्य आहे की नाही , हा तार्किक प्रश्न आहे  आणि जेम्स या दोहोंत गल्लत करतात असे . जेम्स यांच्या ह्या भूमिकेविषयीचे त्यांचे मत आहे .

  

   जेम्स यांच्या तत्त्वज्ञा नाचा प्रभाव⇨ एफ.  सी. एस्.  शिलर( १८६४- १९३७)  ह्या इंग् लि श आणि जोव्हान्नी पापीनी( १८८१- १९५६)  ह्या इटालियन तत्त्व वेत्त्यांवर पडलेला आढळतो.  जेम्सच्या विचारांचे⇨ आंरी बेर्गसाँ( १८५९- १९४१) ह्या प्रसिद्ध फ्रेंच तत्त्व वे त्त्याच्या विचारांशी महत्त्वाचे साम्य असल्याचे आढळून येते. [→  जेम्स, विल्यम].

  

   जॉन ड्यूई:  फलप्रामाण्यवादाशी जी त्रिमूर्ती निगडित आहे तिचे हे तिसरे सदस्य आहेत. ‘ पर्स हे तर्कशास्त्रज्ञ म्हणून लिहितात आणि जेम्स हे मानवतावादी म्हणून लिहितात ’  असे आपल्या श्रेष्ठ सहकाऱ्यांचे वर्णन त्यांनी केले आहे. ह्या दोन्ही भूमिकांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न ड्यूई यांनी केला आहे.

  

   अन्वेषण वा चौकशी ही त्यांच्या तत्त्वज्ञा नातील मूलभूत संकल्पना आहे.  ह्या संकल्पनेचे स्पष्टीकरण थोडक्यात असे करता येईल:  जेव्हा एखादी समस्या आपल्यापुढे आहे असे आपण म्हणतो, तेव्हा आपली परिस्थिती कोणत्या तरी प्रकारे असमाधानकारक असते. तिच्यात काही उणिवा असतील किंवा तिचे घटक परस्परांशी विसंवादी असल्यासारखे दिसत असतील किंवा तिच्यात कोणत्या शक्यता दडलेल्या आहेत हे स्पष्ट नसेल म्हणून ती असमाधानकारक असेल.

चौकशीची प्रक्रिया अशा असमाधानकारक परिस्थितीपासून सुरू होते आणि ह्या असमाधानकारक परिस्थितीची पुनर्रचना करून तिचे समाधानकारक परिस्थितीत परिवर्तन करणे हे चौकशीचे उद्दिष्ट असते.  परिस्थितीचे वेगळ्या प्रकारे विश्लेषण करून, तिच्या घटकांत वेगळे परस्परसंबंध स्थापित करून,  तिच्यात गर्भित असलेल्या शक्यतांचा विकास करून,  चौकशी तिचे समाधानकारक परिस्थितीत परिवर्तन करण्याचे आपले उद्दिष्ट साधते.  समस्या कोणत्याही क्षेत्रातील असली- विज्ञान,  कला,  नीती, समाजकारण इ.-तरी चौकशीचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती सारखीच असतात.  चौकशीची प्रक्रिया ही बौद्धिक कृती असते आणि तिचे फलित अधिक समाधानकारक,  सुसंगत,  सुस्पष्ट,  सुरचित, जिच्यातील उणिवा भरून काढल्या आहेत अशी परिस्थिती निर्माण होण्यात असते.  म्हणून बौद्धिक कृती ही मूल्यनिरपेक्ष सत्य प्रस्थापित करू पाहणारी कृती असे मानणे गैर आहे.  सत्य आणि मूल्य असे द्वंद्व मानणे हेही गैर आहे. बौद्धिक कृती नेहमीच मूल्यावर आधारलेली,  मूल्यलक्ष्यी असते.  सत्य हे एक विशिष्ट मूल्य आहे.  पण मानवी अनुभवाला आणि परिस्थितीला नेहमीच नैतिक,  व्यावहारिक,  सौंदर्यात्मक अंगे असतात आणि ह्या सर्व मूल्यांच्या संबंधात अधिक समाधानकारक, सुसंगत आणि स्थिर अशी परिस्थिती निर्माण करणे हे बौद्धिक कृतीचे साध्य असते.

  

  चौकशीमुळे मूळ समस्येचे किंवा संश या चे निरसन होते. जी नवीन बौद्धिक रचना साधून हे निरसन केले जाते तिला ड्यूई सत्य म्हणतात.  सत्य म्हणजे प्रमाणित प्रतिपादन-वॉरन्टेडे ॲ सर्शन- अशी त्यांनी सत्याची व्याख्या केली आहे. समस्येचे निरसन करण्याची ह्या रचनेची जी शक्ती सिद्ध झालेली असते, तिच्यात तिचे प्रमाण्य सामावलेले असते. म्हणजे संकल्पना, विधाने, अभ्युपगम इ.बुद्धीची जी रूपे असतात – ज्या रूपांची मिळून बौद्धिक रचना बनलेली असते-ती संशय किंवा समस्या यांचे निरसन करण्यासाठी वापरण्यात येणारी साधने वा आयुधे-इन्स्ट्रुमेन्ट्स- असतात. म्हणून ड्यूई आपल्या भूमिकेला  ‘ साधनवाद ’  वा  ‘ आयुधवा द ’– इन्स्ट्रुमेन्टॅलिझम – हे नाव देतात. [→ ड्यूई, जॉन].

  

  तत्त्वज्ञा नातील एक पंथ किंवा आंदोलन म्हणून फलप्रामाण्यवाद ओसरला आहे.  पण बौद्धिक व्यवहाराकडे आणि ह्या व्यवहाराचे माध्यम असलेल्या संकल्पना,  तत्त्वे इ.  गोष्टींकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी तत्त्वज्ञा नाच्या क्षेत्रात त्याने प्रचलित केली आहे. ह्या दृष्टीचे स्वरूप साधारणपणे असे स्पष्ट करता येईल:  संकल्पना आणि तत्त्वे यांच्या ठिकाणी आंतरिक प्रामाण्य नसते आणि जिच्या ठिकाणी असे आंतरिक प्रामाण्य आहे अशी संकल्पना आणि तत्त्वे यांची बौद्धिक रचना म्हणजे सत्य, ही सत्याच्या स्वरूपाविषयीची संकल्पनाही योग्य नव्हे.  तर आपल्या सामूहिक गरजा आणि उद्दिष्टे यांचे समाधान करण्याच्या दृष्टीने जी संकल्पनांची व्यवस्था उपयुक्त,  कार्यक्षम आणि सुकर ठरते ती आपण स्वीकारतो. संकल्पनांच्या अशा पर्यायी व्यवस्था असू शकतात आणि त्यांच्यामधून आपण जी निवड करतो ती वर उल्लेखिलेले व्यावहारिक निकष लावून करतो.  सर्वच बौद्धिक व्यवहार आणि रचना, विज्ञान व तत्त्वज्ञा न यांमधील संकल्पनात्मक रचना यांचे प्रयोजन आपला अनुभव आणि व्यवहार यांचे संघटन आणि नियंत्रण करणे हे असते. ⇨ फ्रँक प् ल म्टन रॅमझी( १९०३- १९३०),  सी.  आय्.  ल्यूइस( १८८३- १९६४), ⇨ रूडॉल्फ कारनॅप( १८९१-   ), ⇨  डब्ल्यू. व्ही.  ओ.  क्वाइन( १९०८-    )  इ.  तत्त्व वेत्त्यांच्या लिखाणातून हा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडलेला आढळतो.

  

  संदर्भ: 1 . Dewey, J. Logic : The Nature of Inquiry, New York, 1938.

           2 . Harishorne, Charies, Weiss, Paul, Ed. The Collected Papers of Charles Sanders Peirce, Vols. I-Vi, Cambridge, Mass. 1931-35.

           3 . James, W. Pragmatism, New York, 1897.

           4 . James, W. The Will to Believe, New York, 1907.

  

  रेगे, मे. पुं.