संगीतिका : नाटक आणि संगीत या दोन कलांचा एकात्म आविष्कार साधणारा नाट्यप्रकार. हा पूर्णतः वा बव्हंशी पद्यरूप व संगीतमय असतो. संगीतात रचनाबद्घ केलेली व गायकनटांनी सादर केलेली पद्यात्म नाट्यकृती म्हणजे संगीतिका, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पाश्चात्त्य ‘ऑपेरा’ या प्रकाराचे विवेचन ⇨ संगीतक  या नोंदीत आले आहे. तर प्रस्तुत नोंदीत भारतीय भाषांतील संगीतिकांचा आढावा घेतला आहे.  पाश्चात्त्य ऑपेराला ‘संगीतक’ ही संज्ञा बा. सी. मर्ढेकर यांनी योजिली. या संज्ञेमुळे पाश्चात्त्य ऑपेराचे स्वरूप संगीतिका, संगीत नाटक, संगीत सुखात्मिका, काव्यनाट्य या प्रकारांहून वेगळे आहे, हे सूचित व्हावे.

संगीतिकेत नाट्य व संगीत हे दोन्ही घटक अपरिहार्य व प्रयोगात ते अभिन्न, एकजीव होऊन येतात. याच्या उलट संगीत नाटकाचा मूलाधार गद्य भाग असतो. संगीत नाटकातील पदे मनोरंजन करतात, क्वचित नाट्य-संहितेच्या ओघाला मदत करतात. असे म्हणता येईल, की संगीतिकेत संगीताला मुख्य व साहित्याला दुय्यम आधारभूत स्थान तर संगीत नाटक, काव्यनाट्य आदी प्रकारांत साहित्याला मुख्य व संगीताला गौण स्थान प्राप्त झालेले कित्येकदा आढळून येते.

संगीतिकेत साहित्य, संगीत, अभिनय या तीन घटकांचा एकात्म आविष्कार व नाट्यात्म अनुभवाची तीव्रता ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. हा नाट्यानुभव एकस्रोती असतो, त्यामुळे तो काव्याकडे झुकणारा असतो व अनुभवाच्या तीव्रतेमुळे तो संगीतात्मक घाटाला जवळचा असतो. गद्य नाटकामध्ये नाट्यानुभव पात्रमुखातून अवतरताना जो पसरटपणा वा बोथटपणा संभवतो, तो संगीतिकेच्या मूल प्रकृतीला मानवणारा नव्हे. संगीत नाटकात संगीताचे कार्य नाट्यानुभवाला भारून टाकण्याचे, काहीसे साधनात्मक स्वरूपाचे असते तसे ते संगीतिकेत नसते. नाट्यानुभवातील उत्कटता, उत्स्फूर्तता, अनुभवाची तीव्रता व आविष्कारातील लयबद्घता ह्यांचे एकात्म, संश्लिष्ट रूप व त्यातून येणारी संगीतात्मकता हे संगीतिकेचे प्रधान वैशिष्ट्य होय. संगीतिकेतील आशयद्रव्यात कल्पकता, अनुभवाची स्वच्छंदता, प्रतीकात्मकता आढळते तसेच त्याचा आविष्कार एकाच वेळी आस्वादकाच्या दृष्टीस व श्रवणास आवाहन करणारा असतो. पात्रांचे संभाषण, आंगिक-वाचिक अभिनय आणि त्याला वादयमेळाची वा वृंदगानाची साथसंगत या सर्वांच्या एकात्म, सुसंघटित परिणामातून संगीतिकेतील नाट्यनुभव साकार व प्रत्ययकारी होतो. एखादया व्यक्ति-रेखेचे प्रतीक म्हणून संगीतिकेत संगीतरचना कार्य करते. त्यामुळे संगीतिकेत संगीत केवळ संगीत म्हणून न येता, नाट्यधर्मी होऊन अवतरते. संगीतात्मकतेचे दृक्श्राव्यात्म परिमाण नाट्यनुभवाला संगीतिकेचे रूप प्रदान करते.

आकाशवाणीवरून ज्या संगीतिका ध्वनिक्षेपित केल्या जातात, त्यांचे श्राव्य गुणधर्म जास्त महत्त्वाचे ठरतात. त्यात सामान्यतः एखादया कथेचे गीतमालिकेत रूपांतर केले जाते. तसेच कथनपर संगीतमय लेखनाचाही त्यात अंतर्भाव होतो. अशा श्राव्य संगीतिकेत दृश्यात्म नाटय्गुण असलेच पाहिजेत, असे नाही. रंगभूमीवर सादरीकरण हे त्यांचे प्रयोजनही नव्हे. त्यामुळे अशी संगीतिका नाट्यपूर्ण असलीच पाहिजे, असे नाही आणि बहुशः श्राव्य स्वरूप अशीच त्या संगीतिकेची रचना असते. संगीतिकेत गद्य संभाषणे जवळजवळ नसतात. पात्रांचे संवाद काव्यमय असतात आणि ते गाऊन सादर केले जातात. त्यामुळे अशा संगीतिकेची जडणघडण नाट्यमय असण्यापेक्षा जास्त करून कथनात्मक असते. आकाशवाणी माध्यमाला इष्ट व अनुकूल असा, संगीत व काव्य यांचा मिलाफ असलेला संगीतिका हा श्राव्य प्रकार लेखकांनी निर्माण केला. आकाशवाणीवरून सादर केल्या जाणाऱ्या संगीतिकांचा कालावधी फार तर एक तास दीड तास इतकाच असतो. ह्या मर्यादित कालावधीत संगीतिकेचा एकसंध प्रयोग व परिणाम अपेक्षित असतो. भारतीय आकाशवाणीवर संगीतिका सर्व भाषांतून लिहिल्या गेल्या आहेत आणि प्रसारित झाल्या आहेत.

पाश्चात्त्य ऑपेराच्या प्रभावातून तसेच स्वतंत्र रीत्याही मराठीसह अन्य भारतीय भाषांत संगीतिका, संगीतके (ऑपेरा ), संगीतनाट्ये हे परस्पर-संलग्न प्रकार विकसित व समृद्घ होत गेले आहेत. पारंपरिक भारतीय मिथके, आख्यायिका, लोककथा यांतून कथाबीजे घेऊन, तसेच सद्यकालीन सामाजिक-राजकीय विषयांवर आधारित अशी अनेक संगीतके व संगीतिका लिहिल्या गेल्या आणि पारंपरिक लोकरंगभूमीचे विविध घाट, लोकनृत्ये, बॅलेसारखे नृत्यप्रकार अशा दृश्यात्म घटकांची जोड देऊन ही संगीतके व संगीतिका भारतीय रंगभूमीवर सादर केल्या गेल्या.

मराठी : मराठीमध्ये श्राव्य स्वरूपाच्या संगीतिका प्रामुख्याने आकाशवाणीसाठी सादर करण्यात आल्या. त्यांत दृश्य नाट्यत्मकता कमी व कथनात्मकतेवर जास्त भर होता. उदा., ⇨ गजानन दिगंबर माडगूळकर  यांची ऐका व्याध सांगती कथा  ही शिवलीलामृत  पोथीतील दुसऱ्या अध्यायावर आधारलेली संगीतिका. त्यात व्याध, हरिणी ही पात्रे आहेत पण ती रंगभूमीवर वावरण्यासाठी योजिलेली नाहीत. निवेदकाचे वनराजी, निसर्गरम्यता इ. वर्णन आहे. गीतमालिकेतून कथा सांगितली व संगीताच्या साहाय्याने ती आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली. अमृतवृक्ष   ही त्यांची दुसरी, वर्षप्रतिपदेला कडुनिंबाच्या वृक्षाची जी उपयुक्तता सांगितली जाते त्यावर लिहिलेली काल्पनिक संगीतिका. पारिजातक  ही त्यांनी लिहिलेली आणखी एक संगीतिका. ग. दि. माडगूळकरांचे चार संगीतिका (१९५६) हे पुस्तकही प्रकाशित झाले. मराठीत पहिल्यांदा संगीतके ⇨ बा. सी. मर्ढेकर  यांनी पाश्चात्त्य ऑपेरापासून स्फूर्ती घेऊन लिहिली. त्यांची कर्ण (१९४४), औक्षण (१९४६) आणि बदकांचे गुपित (१९४७) ही संगीतके आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आली. यांखेरीज गोविंदराव टेंबे (जयदेव, १९५५) राजा बढे  (कादंबिनी  ) पांडुरंग दीक्षित (सारीपाट ) मंगेश पाडगावकर (राधा आणि बिल्हण ) वसंत कानेटकर प्रभृतींनी लिहिलेल्या संगीतिकाही आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आल्या.

वसंत कानेटकर यांचे लेकुरे उदंड जाहली (१९६६) हे पाश्चात्त्य ऑपेराच्या धर्तीवर लिहिलेले संगीतक विशेष उल्लेखनीय आहे. विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल (१९७३) या नाटकात केलेला लोकसंगीताच्या विविध प्रकारांचा वापर अभिनव व वैशिष्ट्यपूर्ण ठरला. हे पात्रमुखी संगीत नव्हे, की पार्श्वसंगीतही नव्हे तर संपूर्ण नाटकव्यापी संगीत होय.


हिंदी : उर्दू-हिंदीमध्ये नाट्य, काव्य, संगीत व नृत्य या घटकांचे मिश्रण असलेला ‘रहस’ ( रासलीला ) हा रंजनप्रकार ⇨वाजिद अली शहाने १८४३ मध्ये प्रथमतः निर्माण व सादर केला. हे संगीतिकेचे आद्यरूप म्हणता येईल. वाजिद अली शहाच्याच आदेशावरून आगा हसन अमानत याने इंदरसभा (१८५६) हे उर्दू हिंदी भाषेत संगीतप्रधान नाटक लिहून रंगभूमीवर आणले. परंपरेने ती भारतातील पहिली हिंदी संगी-तिका मानली जाते. आधुनिक हिंदी साहित्याचे जनक ⇨ भारतेंदु हरिश्चंद्र (१८५०-८५) यांनी भारत जननी हे संगीत नाटक लिहिले. ⇨जयशंकर ‘प्रसाद ’  यांचे करूणालय हे पद्यनाटक आद्य आधुनिक हिंदी संगीतक मानले जाते. ⇨ मैथिलीशरण गुप्त  यांनी अनघा (१९२५) व लिला (१९६१) ही छंदोबद्ध पद्यमय संगीतके लिहिली.   ⇨ सुर्यकांत त्रिपाठी- ‘निराला ’ (१८९९–१९६१) यांनी रामायणातील शूर्पणखा प्रकरणावर आधारित पंचवटी प्रसंग ही पाच भागांची संगीतिका मुक्तछंदात लिहिली. ⇨उदयशंकर भट्ट   यांनी मत्स्यगंधा (१९३७), विश्वामित्र (१९३८), राधा  (१९४१), कालिदास  (१९५०), नहुषनिपात  (१९६१) यांसारखी पद्यमय भावनाट्ये लिहून हिंदी संगीतिकांत मोलाची भर घातली. काव्य व नाट्य यांचा उत्कृष्ट मिलाफ त्यांत आढळतो. या संगीतिकांना भट्ट यांनीच ‘भावनाट्य’ ही संज्ञा वापरली. ⇨ भगवतीचरण वर्मा   यांनी द्रौपदी (१९४५), कर्ण (१९५३) व महाकाल  ही संगीतमय नभोनाट्ये लिहिली, ती त्रिपथगा (१९५६) या संग्रहात एकत्रित केली आहेत. त्यांची तारा (१९५०) ही संगीतिका कलात्मकदृष्ट्या यशस्वी मानली जाते. ⇨ सुमित्रानंदन पंत  यांनीही आकाशवाणीसाठी श्राव्य घटकावर भर देणाऱ्या काही संगीतिका लिहिल्या, त्यांपैकी ज्योत्स्ना  (१९३४) व शिल्पी (१९५२) ह्या वाङ्‍मयीन मूल्यांच्या दृष्टीने सरस आहेत. ⇨ रामधारी सिंह  ‘दिनकर’  यांची उर्वशी (१९६१) ही सर्व पद्यरचनाप्रकारांचा संयोग साधणारी कलात्मक संगीतिका प्रसिद्घ आहे. ⇨ धर्मवीर भारतींचे अंधायुग (१९५५) हे मुक्तछंदात्मक शैलीतील पद्यनाट्य संगीतिका या प्रकाराला नवी दिशा देणारे ठरले.

बंगाली : पाश्चात्त्य ऑपेराच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या प्रभावातून बंगाली संगीतकांची जडणघडण झाली. कोलकातामधील ‘ ऑपेरा हाउस ’ नाट्यगृहात यूरोपमधून आलेल्या नाटकमंडळींचे ऑपेरांचे प्रयोग होत असत. ‘ऑपेरा कॉमिक’ वा ‘ऑपेरा बूफा’ या प्रकारांच्या प्रभावातून बंगाली भाषेतील प्रारंभीची संगीतके निर्माण झाली. त्यांत संगीत व विनोद यांचे मिश्रण असे. क्षिरोदप्रसाद विदयाबिनोद यांच्या अलिबाबा मध्ये गंभीर प्रसंगही विनोदी शैलीत हाताळले गेले. बंगालीमध्ये ‘ कॉमिक ऑपेरा’ व भव्यगंभीर ‘गँड ऑपेरा’ अशा दोन्ही प्रकारची संगीतके प्रथमतः निर्माण करण्याचे श्रेय रामतरण सन्याल या नाटककाराकडे जाते. राष्ट्रीय बंगाली रंगभूमीचे जनक ⇨ गिरीशचंद्र घोष (१८४४–१९१२) हे सन्याल यांचे समकालीन होत.  त्या काळी ऑपेराच्या धर्तीची संगीतप्रधान बंगाली ‘गीतिनाट्ये ’ विशेष प्रचलित होती. त्या प्रभावातून गिरीशचंद्रांनीही काही गीतिनाट्ये लिहिली. त्यांतील आनंद रहो   हे  मौलिक नाटक असून त्यावर ⇨ ज्यातिरिंद्रनाथ टागोरां च्या अश्रूमती नाटका चा (१८७९) प्रभाव होता. त्या काळी नगेंद्रनाथ बॅनर्जींचे सती की कलंकिनी (किंवा कलंक-भंजन ) हे संगीत-नाट्य रंगभूमीवर अतिशय लोकप्रिय ठरले. ⇨रवींद्रनाथ टागोरांची संगीत नाटके म्हणजे पाश्चात्त्य ऑपेराचा मूर्तिमंत बंगाली अवतार. मायार खेला (१८८८) हे पूर्णतः पद्यमय संगीतक तर वाल्मिकीर प्रतिभा (१८८१) हे गद्यमिश्रित संगीत नाटक यांचा उल्लेख करता येईल.     एकोणिसाव्या शतकात पारंपरिक ⇨ बंगाली जात्रा  या संगीतप्रधान लोकनाट्यप्रकाराला आधुनिक रूप देऊन ‘गीताभिनय’ हा संगीतक-प्रकार निर्माण करण्यात आला व तो खूपच लोकप्रिय ठरला.

पंजाबी : ‘किस्साखानी’ या पारंपरिक रंजनप्रकारातून पंजाबी संगीत रंगभूमी उत्कांत झाली. पद्यरूपाने पौराणिक कथा सांगून, तिचा पंजाबी गद्यात साभिनय अर्थ सांगणे, असे किस्साखानीचे स्वरूप असे. पौराणिक कथांप्रमाणेच हीर-रांझा, सोहनी-महिवाल, झुलेखा इ. प्रेमकथाही किस्साखानीचे विषय असत. १९३९ नंतर पंजाबी रंगभूमीवर नवयुग अवतरले. तत्कालीन लेखकांपैकी शीला भाटिया या लेखिकेने लिहून सादर केलेली हीर-रांझा (१९५७) ही पहिली आधुनिक पंजाबी  संगीतिका मानली जाते. ह्या संगीतिकेच्या रचनेत लेखिकेने जवळजवळ ३५ लोकधुनी वापरल्या होत्या व त्याला सुशीलदास गुप्तांनी संगीत दिले होते. त्यात पंजाबी लोकगीते, गिद्दा, टप्पा इ. लोकनृत्ये यांच्या मिश्रणातून दृक्श्राव्य परिणाम साधला होता. शीला भाटियांच्याच सुलगदे दर्या ( प्रयोग १९८१) या संगीतिकेत बुले शाहच्या ४० ‘ काफी ’ रचना तसेच शाह हुसेन व बाबा फरिद यांची काव्ये संगीतबद्घ केली होती. १९५० चे दशक व नंतरच्या काळात तारासिंग चन्न ( आखरी परह, साझीश, लक्कड दी लत्त, नील दी शाहजादी, अमर पंजाब इ.) जोगिंदर बहाराला ( धरती दे बोल, हर्री सौनी, डॉलर दा वंजरा ) जगदीश राय फिरादी ( जत्ती हीर, शहीद भगतसिंग, मिर्झा साहिबाँ ) प्रभृतींनी दर्जेदार संगीतिका लिहून या प्रकारात मोलाची भर घातली.

काश्मीरी : दीनानाथ नादिम (१९१६–     ) यांनी लिहिलेल्या बोंबुर त यंबरझल (१९५३) या संगीतिकेने काश्मीरी ऑपेराची सुरूवात झाली. कामिलची बोंबुर त लोलर (१९६०) ही संगीतिकाही दर्जेदार होती. हीमाल नागराय ही काश्मीरी आख्यायिका रोशन व नादिम यांच्या संगीतिकांचा विषय झाली. मोतीलाल साकी (१९३६–     ) याच्या हयतन झियुन, माझ काश्मीरी, गाशी आगूर या काश्मीरी संगीतिका विशेष उल्लेखनीय आहेत. सद्यकालीन काश्मीरी संगीतिकांमध्ये पाश्चात्त्य ऑपेरा व बॅले नृत्य यांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आढळते.

कन्नड : संगीतकसदृश ‘गीत नाटक’ हा प्रकार कन्नडमध्ये रूढ आहे. कन्नड लोकरंगभूमीवरील ⇨ यक्षगान   ह्या पारंपरिक नृत्यनाट्य-प्रकारात आधुनिक कन्नड संगीतिकेची मुळे शोधता येतात. आधुनिक काळात ⇨ कोट शिवराम कारंत (१९0२–९७) यांनी काही पद्यनाट्ये, गीत – नाट्ये लिहून या प्रकारात मोलाची भर घातली. त्यांनी मुक्तद्वार, किसागौतमी इ. संगीतनृत्यप्रधान गीतनाटके लिहून ती गामीण रंगभूमीवर सादर केली.  त्यांचा गीतनाटके (१९४६) हा संग्रह प्रसिद्घ आहे. ⇨ पुरोहित तिरूनारायण अयंगार नरसिंहाचार्य (१९०५–    ) यांनी काही उत्कृष्ट संगीतिका लिहून या प्रकाराला नवसंजीवन दिले. त्यांनी सु. पंधरा संगीतिका ( पद्यनाट्ये ) लिहिल्या. त्यांतील अहल्ये (१९४१), कवि मत्तु दाणिय बिनद (१९४३), गोकुल निर्गमन (१९४५), शबरी (१९४६), विकटकवि विजय (१९४८), हंस-दमयंती मत्तु इतर रूपकगळु (१९६५), रामपट्टाभिषेक (१९६७) इ. विशेष उल्लेखनीय होत. हंस-दमयंती मत्तु इतर रूपकगळु या त्यांच्या संगीतिका-संग्रहास १९६७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार लाभला. 


तमिळ : ‘इसाई नाटकम्’ या नावाने तमिळनाडूमध्ये संगीतक हा प्रकार रूढ आहे. ⇨ कथाकालक्षेपम्  व यक्षगान (गेय नाटकम् ) ह्या पारंपरिक नृत्यगानयुक्त रंजनप्रकारांतून तमिळनाडूमध्ये संगीतिका हा प्रकार विकसित होत गेला. या पारंपरिक प्रभावातूनच कवी अरूणाचल कविरायर (१७११-६७) व गोपालकृष्ण भारती यांनी कथाकालक्षेपम्साठी काही उल्लेखनीय संगीतिका रचल्या. त्यांच्या संहिता लिखित रूपात उपलब्ध आहेत. गोपालकृष्ण भारती हे स्वत: उत्कृष्ट संगीतकार व कथाकालक्षेपम्-कलाकार होते. त्यांनी नंदनार चरित्र कीर्तनैगळ  हे आख्यान रचून संगीतबद्घ केले. त्यात हिंदुस्थानी व कर्नाटक संगीतशैली तसेच लोकसंगीतप्रकार यांचे रसायन साधले होते. ‘थेरूकूथु’ हा पारंपरिक लोकरंगभूमी-प्रकार स्वरूपत: संगीतिकेला जवळचा होता. एस्. जी.  किट्टाप्पा, के. बी. सुंदरम्बाळ ( अभिनेत्री ) हे कलावंत या लोकरंगभूमीच्या परंपरेतून उदयाला आले. 

तेलुगू : आंध्र प्रदेशातील संगीत रंगभूमीला प्राचीन व प्रदीर्घ परंपरा आहे. यक्षगान, बुईकथा, हरिकथा, वीथिनाटकम्  आणि समवेतगान हे लोकनाट्य प्रकार परंपरेने चालत आले आहेत. काव्य, नाट्य, नृत्य, संगीत या कलांचा मिलाफ लोकरंगभूमीवर झाल्याचे दिसून येते. या पारंपरिक लोकरंगभूमीतूनच तेलुगू संगीतिका व संगीतके विकसित झाली. त्यांतील गीतांवर संस्कृतचा प्रभाव जाणवतो. जयदेवाचे गीतगोविंद, नारायण-तीर्थांचे कृष्णलिला तरंगिणी, लिलाशुककवीचे कृष्ण कर्णामृतम्  यांतील श्लोक तेलुगू संगीतिकांत गायिले जातात. जयदेवाची पत्नी पद्मावती गीतगोविंदाच्या अष्टपदींवर नृत्य करीत असे, असे म्हटले जाते. लिलाशुककवीचा कस्तुरीतिलकम् ललाटफलके हा तरंग त्या काळी खूपच लोकप्रिय होता. हळूहळू संस्कृतच्या जागी तेलुगू पदे संगीतिकांत प्रविष्ट झाली. मात्र त्यांची पार्श्वभूमी संस्कृतचीच होती. ⇨ नन्नेचोड ( बारावे शतक ),⇨ पाल्कुरिकि सोमनाथ ( सु. १२८५–१३२३), यार्राना, श्रीनाथुडू, जक्कणा इ. कवि-लेखकांच्या साहित्यकृतींमध्ये संगीतिकांचे तत्कालीन निर्देश आढळतात. अण्णमाचार्यांची श्रीवेंकटेश्वरावरील लोकप्रिय भक्तिपदे संगीतिकांत गायिली जातात. संगीतिका-लेखकांत तल्लावज्झल शिवशंकरशास्त्री व गेय नाटिकाकर्त्यांत नारायणरेड्डी यांची नावे उल्लेखनीय आहेत.

संदर्भ : Sahitya Akademi Pub., Mohan Lal, Ed. Encyclopaedia of Indian Literature, Vol. IV, New Delhi, 1991.

 इनामदार, श्री. दे.