शेंबा : (ग्लँडर्स). अश्वकुलातील (ईक्विडी) ⇨ घोडा, ⇨ गाढव आदी प्राण्यांना होणारा एक संसर्गजन्य रोग. नाकपुड्यांपासून फुफ्फुसापर्यंत, तसेच अंगावर खास प्रकारच्या गाठी येणे, हे याचे मुख्य लक्षण आहे. हा रोग प्राणघातक असून फार लवकर फैलावतो. शेंबाच्या रोगजंतूंची बाधा मनुष्यासही होऊ शकते. उत्तर अमेरिका, ग्रेट ब्रिटन, कॅनडा येथून या रोगाचे पूर्ण उच्चाटन झालेले आहे पण पूर्व युरोप, आशिया व उत्तर आफ्रिका इ. प्रदेशांत तो अजूनही आढळतो. पूर्वी युद्धकाळातील घोड्यांच्या स्थलांतरणामुळे तसेच मोठ्या शहरातील घोडागाड्यांच्या विपुलतेमुळे हा रोग लवकर फैलावत असे.
ॲक्टिनोबॅसिलस मलाय हे सूक्ष्मजंतू या रोगाला कारणीभूत आहेत. हे सूक्ष्मजंतू सूर्यप्रकाशात वा हलक्या जंतुनाशक द्रव्यात टिकू शकत नाहीत. किंचित वाकलेले हे जंतू समूहाने राहतात. रोगग्रस्त भागातून घेतलेला रंजित स्राव सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास हे जंतू सहज दिसतात.
रोगप्रसार साधारणतः दूषित अन्नपाण्यातून होतो. रोगातून थोडी बरी झालेली जनावरे नेहमीच रोगवाहक राहतात. त्यांच्या नाकातून गळणाऱ्या स्रावातून व लाळेतून रोगप्रसार चटकन होतो. हा रोग श्वसनेंद्रियांद्वारा फैलाविण्याची उदाहरणे फार थोडी आहेत. रोग्याचे जंतू आतड्यात प्रवेश मिळाल्यावरच प्रभाव दाखवितात आणि ते फुफ्फुसे, नाकपुड्या व चामडीवर स्थिर होतात.
शेंबा रोग आशुकारी तसेच चिरकारीही असतो. आशुकारी प्रकारात तीव्र प्रमाणात ताप, खोकला, गाठी व व्रण यांसारखी शारीरिक लक्षणे आढळतात. चिरकारी प्रकारात कोठे तरी एका ठिकाणी त्याची लक्षणे आढळतात. प्रथम नाकपुड्यांमधील पटलावर आतील अंगास गाठी दिसतात व मग त्यांचे व्रण होऊन वाहू लागतात. जबड्याखालच्या लसीका ग्रंथी सुजतात. व्रण बरे झाल्यास त्या जागी लांबट आकाराच्या खुणा राहतात. रोगग्रस्त जनावर क्वचित बरे झाल्यासारखे वाटले, तरी रोगवाहक बनते व नंतर लवकर मरते.
ज्या तबेल्यात रोगग्रस्त जनावर असते किंवा आढळते, त्यातील सर्व जनावरांची ‘मलीन’ चाचणी घेणे व रोगी जनावरास मारून जाळणे अथवा खोल पुरणे, हेच शेंबा रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
सोमण, वा. वि.