शेंदाड : (फूट, कचरा, टुटी लॅ. कुकुमिस मेलॉन, प्रकार मोमोर्डिका कुल- कुकर्बिटेसी). हा ⇨ खरबुजाचा एक प्रकार असून तो खरबुजापेक्षा अधिक चिवट आहे. याची लागवड भारतात सर्वत्र होते. त्याचे दोन प्रकार असून एक पावसाळी हंगामात व दुसरा उन्हाळी हंगामात लावतात. शेंदाडाचे फळ आखूड, गुळगुळीत, अंडाकार किंवा दंडगोलाकार तसेच सु. ३०–६० सेंमी. व ७·५–१५ सेंमी. व्यासाचे असते. ते बरेचसे काकडीसारखे दिसते. कोवळे फळ गर्द हिरवे असून पिकल्यावर लिंबासारखे पिवळे होते व आपोआप फुटते. त्याचा गर पिठूळ, काहीसा बेचव व थोडासा आंबट असतो. बिया लहान असतात. अन्य शारीरिक लक्षणे ⇨ कुकर्बिटेसी (कर्कटी) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
पावसाळी लागवड मे–जुलैमध्ये व उन्हाळी लागवड जानेवारी–मार्चमध्ये करतात. वेल जमिनीवर पसरू देतात. लागवडीनंतर ३-४ महिन्यांत फळे पक्व होतात. फळांचे हेक्टरी ७ ते ८ हजार किग्रॅ. उत्पन्न येते. पक्व फळे खरबुजाप्रमाणे खातात वा कोवळ्या फळांची भाजी करतात. काकडीप्रमाणेच याचे किडीपासून रक्षण करतात.
पाटील, ह. चि.