व्हॅलिनाची संरचनाव्हॅलीन : (आल्फा ॲमिनो आयसोव्हॅलेरिक अम्ल २-ॲमिनो–३-मिथिल–ब्युटिरिक अम्ल). प्राण्यांची सर्वसाधारण वाढ होण्याकरिता अत्यावश्यक असलेले ॲमिनो अम्ल. प्राणी या अम्लाचे संश्लेषण (निर्मिती) आपल्या शरीरात करू शकत नाहीत. हे आहारातून मिळणे गरजेचे असते. वनस्पती आणि सूक्ष्मजीव पायरुव्हिक अम्लापासून व्हॅलिनाचे संश्लेषण करतात. बहुतेक प्रथिनांमध्ये हे अम्ल आढळते. रेणवीय सूत्र C5H11NO2. रेणुभार ११७.०९. रंग पांढरा. चव कडू.

काही प्रथिनांमध्ये असणारे व्हॅलिनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते. (ग्रॅम व्हॅलीन/१०० ग्रॅम प्रथिन) : अंड्यातील प्रथिन ७.३, केसीन ७.४, मांस प्रथिन ५.५, गव्हातील प्रथिन ४.५ आणि पेप्सीन ७.४. मानवी रक्तद्रवात (रक्तातील द्रायुरूप–द्रव व वायू रूपातील–भागात) २.७-३.४ मिग्रॅ./१०० मिलि. व्हॅलीन असते. मानवास रोजच्या आहारात ०.४ ते ०.८ ग्रॅम व्हॅलिनाची आवश्यकता असते.

एल्-व्हॅलीन समघटकांचे [त्याच मूलद्रव्यांचे तेवढेच अणू असलेल्या पण संरचनात्मक मांडणी व गुणधर्म या बाबतीत भिन्न असलेल्या संयुगांना समघटक म्हणतात → समघटकता] २५ से. तापमानाला भौतिकीय स्थिरांक खालीलप्रमाणे आहेत.

विगमन स्थिरांक 

pK1 (COOH) : २.३२

   

pK2 (NH3+) : ९.६२

समविद्युत भार बिंदू 

:

५.९६ 

प्रकाशीय वलन 

 

(aD) (पाण्यात) : + ५.६

   

(aD) (५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्लात) : + २८.३

विद्रव्यता (ग्रॅम/१०० मिली. पाणी) 

८.८५. 

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणाकरिता ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील भौतिक गुणधर्म हा परिच्छेद पहावा.

प्रथिनाचे जलीय विच्छेदन [पाण्याच्या रेणूतील H व OH यांच्या रूपाने विक्रिया घडवून प्रथिनाचे विच्छेदन करण्याची रासायनिक विक्रिया → जलीय विच्छेदन] करून व्हॅलीन मिळते. १८५६ मध्ये सर्वप्रथम व्हॉन-गोरूप बेसनेझ यांनी अग्निपिंडाच्या अर्कापासून व्हॅलीन तयार केले. जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमील हेरमान फिशर यांनी १९०१ मध्ये केसिनापसून व्हॅलीन प्रथम वेगळे काढले. १९०६ मध्ये त्यांनी या अम्लाची संरचना निश्चित केली. त्यांनी आयसोव्हॅलेरिक अम्लाची अमोनियाबरोबर विक्रिया करून डी एल-ॲमिनो आयसोव्हॅलेरिक अम्ल तयार केले. या अम्लाचे समावेशक मिश्रण करून ब्रूसिनाच्या साहाय्याने एल-व्हॅलीन व डी-व्हॅलीन हे समघटक अलग केले. आल्फा ब्रोमो आयसोव्हॅलेरिक अम्लामधील ब्रोमो घटकाच्या जागी ॲमिनो हा गट घालण्याची पद्धत हिलमन यांनी सांगितली.व्हॅलिनावर निनहायड्रिनाची विक्रिया करून आयसोब्युटिरॉल आल्डिहाइड मिळते. याची सॅलिसिलाल्डिहाइडबरोबर विक्रिया करून मिळणाऱ्या गडद रंगावरून वर्णमापनाच्या [→ वर्ण व वर्णमापन] साहाय्याने व्हॅलिनाचे प्रमाण समजू शकते.

व्हॅलिनाच्या चयापचयात्मक अपघटनामध्ये (शरीरात सतत चालणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींमध्ये म्हणजे चयापचयात्मक विघटन होण्याच्या क्रियेमध्ये) ॲमिनोनिरास [रेणूमधील ॲमिनो गट (NH2) काढून टाकण्याची क्रिया] आणि ऑक्सिकर कारबॉक्सिलनिरास [COOH हा कारबॉक्सिल गट काढून टाकण्याची क्रिया] या क्रिया होऊन आयसोब्युटिरिअल कोएंझाइम-ए तयार होते. या अपघटनामध्ये शेवटच्या टप्प्यात आयसोब्युटिरिअल कोएंझाइम-ए यापासून प्रोपिऑनिल कोएंझाइम-ए आणि कार्बन डाय ऑक्साइड ही संयुगे मिळतात.

व्हॅलीन आणि इतर ॲलिफॅटिक शाखायुक्त ॲमिनो अम्लांचा चयापचय योग्य प्रकारे न झाल्यास मॅपल सायरप मूत्ररोग होतो. शुगर मॅपल व ब्लॅक मॅपल या झाडांच्या खोडापासून मिळणारा गोड रस आटवून बनविलेल्या ‘मॅपल सायरप’सारखा वैशिष्ट्यपूर्ण असा वास असलेला उत्सर्ग पदार्थ या रोगात मूत्रावाटे बाहेर पडतो, म्हणून या रोगाला हे नाव पडले आहे.

आल्फा-ॲमिनो आयसोब्युटेन सल्फॉनिक (अम्ल), आल्फा-ॲमिनो ब्युटिरिक (अम्ल), नॉरव्हॅलीन, ल्युसीन, आयसोल्युसीन, मिथालील ग्लायसीन ही व्हॅलिनाची प्रतिरोधके आहेत.

पहा : ॲमिनो अम्ले ल्युसीन.

भनसाळी, ज. से.