शून्याधारित अर्थसंकल्प : एखादे अंदाजपत्रक तयार करणे याचा पारंपरिक अर्थ म्हणजे आधीच्या वर्षीच्या जमेच्या आणि खर्चाच्या रकमांचा आधार घेणे व त्यात काही ठराविक रकमेची वाढ गृहीत धरून नवे अंदाजपत्रक मांडणे. उदा., एखाद्या उद्योगसंस्थेच्या एखाद्या बाबीवर एका वर्षात रु. पंधरा लाख इतका खर्च झाला असेल, तर पुढील वर्षी तो सु. रुपये सतरा लाख असेल, असे अंदाजाने मानून सर्व आकडेवारी मांडली जाते. हा अपेक्षित जादा खर्च किंमतवाढीचा अपेक्षित दर किंवा इतर तत्सम बाबी मोघमपणे मानून हिशेबात धरला जातो. ही पद्धत व्यवहारात सोपी वाटली, तरी तीत संदिग्धपणा व व्यक्तिनिष्ठता बरीच असते. पारंपरिक पद्धतीतील दुसरा महत्त्वाचा दोष म्हणजे मंजूर झालेली रक्कम सर्व तऱ्हेचा आटापिटा करून खर्च करणे कारण जर नियत रक्कम खर्च झाली नाही, तर ती अकार्यक्षमता मानून पुढील वर्षीचा निधी इतर बाबींवर वळविला जाण्याची शक्यता राहते. त्यामुळे उत्पादन, रोजगार, तांत्रिक सुधारणा, आधुनिकीकरण अशा वास्तव घटकांना दुय्यम महत्त्व राहते व मंजूर झालेला निधी केवळ खर्च करणे, असाच कार्यक्रम शिल्लक राहतो.
डॅलस (अमेरिका) येथील टेक्सस इन्स्ट्रुमेंट कंपनीतील व्यवस्थापक पीटर पीर याने अशा जुन्या पद्धतीतील कमकुवत दुवे ओळखले व शून्याधार अंदाजपत्रक पद्धतीचा पुरस्कार हार्व्हर्ड बिझनिस् रिव्ह्यूतील एका लेखाद्वारे मांडला. कोणत्याही खर्चाला गेल्या वर्षीची रक्कम हा आधार मानण्याची गरज नाही उलट ती रक्कम शून्य मानून त्या खर्चाची गरज-निकड, त्यातून होणारा लाभ, कंपनीच्या धोरणांशी त्याची असलेली सुसंगती, त्या सर्वांचे समर्थन, त्या सर्व निर्णयांमागील अग्रक्रम, पर्यायी निर्णयांची शक्यता या सर्वांचा सम्यक् विचार करून मगच खर्चाचे वा जमेचे अंदाजपत्रक तयार करावे, असे त्याने प्रतिपादन केले. सर्व खर्चांची वस्तुनिष्ठ चिकित्सा होत असल्याने यात वाया जाणाऱ्या अनुत्पादक खर्चांस वाव रहात नसे. उद्योगसंस्थांनी पाश्चात्त्य देशांमध्ये या अंदाजपत्रक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला. कार्टर प्रशासनाने १९७८ मध्ये अमेरिकेचे वार्षिक अंदाजपत्रक या नवीन पद्धतीने मांडले. भारतात केंद्र सरकारने तसेच महाराष्ट्र सरकारने हे नवे तंत्र स्वीकारीत असल्याचे काही काळापूर्वी जाहीर केले होते परंतु प्रत्यक्षात मात्र सार्वजनिक अंदाजपत्रकासाठी भारतात याचा अद्याप वापर झाला नाही. रेगन प्रशासनाने १९८३ मध्ये या पद्धतीचा त्याग करीत असल्याचे जाहीर केले.
शून्याधार अंदाजपत्रक पद्धती ही पूर्णतः निर्दोष नाही. ही पद्धती गुंतागुंतीची, वेळ खाणारी आणि खर्चिक आहे. ही पद्धत राबविल्यास मोठी बेकारी निर्माण होईल, अशीही भीती असते. एखाद्या उद्योगसंस्थेत ही पद्धती राबविणे एकवेळ सोपे जाईल, पण सामाजिक व राजकीय परिणाम असणाऱ्या अंदाजपत्रकास ही अंदाजपत्रक पद्धती जुळणारी नाही, असे मानण्यास जागा आहे.
संदर्भ : Pyhrr, P. Zero Base Budgeting, New York, 1978.
दास्ताने, संतोष
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..