शून्यसंपादने : कन्नड भाषेतील प्रसिद्ध वचनसाहित्य. वीरशैव तत्त्वज्ञानात शून्य म्हणजे रिक्तता, पोकळी असा अर्थ नसून शून्य म्हणजे अंतिम सत्य, परब्रह्म, परशिव किंवा मोक्ष असा त्याचा अर्थ आहे. संपादने म्हणजे साधना. म्हणून शून्यसंपादने म्हणजे मोक्षसाधना.
बाराव्या शतकात बसवेश्वर आणि अल्लमप्रभू यांनी जी धार्मिक क्रांती घडवून आणली, तीत जातिभेद आणि स्त्रीपुरुष भेद न करता सर्वांना मुक्तीचे साधन म्हणून वीरशैव धर्माची दीक्षा देऊन त्यांना लिंगधारणा करविली. बसवेश्वरांनी कल्याण, जि. बीदर येथे ‘अनुभवमंटपा’ची स्थापना करून तेथे शून्यसिंहासन निर्माण केले व त्यावर तत्कालीन सर्वश्रेष्ठ सिद्धपुरुष अल्लमप्रभूंना अध्यक्ष म्हणून योजिले. या अनुभवमंटपात सर्व शिवशरण आणि शिवशरणी एकत्र जमून धार्मिक विषयावर चर्चा करीत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे. त्यांनाच ‘वचने’ म्हणतात. तत्कालीन वीरशैव शिवशरण-शरणींची अशी वचने पुढे संगृहीत करण्यात आली. शून्यसंपादने हे अशा तत्कालीन वचनांचे संवादरूपाने केलेले संकलन आहे.
मधुवय्या (मूळचा ब्राह्मण) या वीरशैव दीक्षित शरणाच्या मुलीचा विवाह हरळय्या (मूळचा चांभार) या वीरशैव दीक्षित शरणाच्या मुलाशी केल्याच्या प्रकरणावरून परंपराप्रिय पुराणमतवादी लोकांनी बंड करून शिवशरण-शरणींना सळो की पळो केल्यामुळे बहुतेक वीरशैवांनी कल्याण नगरीचा त्याग करून वाट फुटेल तिकडे पलायन केले. या अराजकाच्या काळात वचनसाहित्यही विखुरले गेले व बरेच नष्टही झाले परंतु पुढे विजयानगर साम्राज्याच्या काळात (सोळावे शतक) या वचनसाहित्याचे पुन्हा संकलन सुरू झाले. त्यांतील शून्यसंपादने या ग्रंथाचे मोल फार आहे. त्यात शरण-शरणींनी विचारलेल्या धर्मतत्त्वाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे अल्लमप्रभूंनी दिली आहेत. या शिवशरणांमध्ये अनिमिष देव, मुक्तायक, सिदराम, चेन्नबसवण्ण, मरुळ शंकर देव, मडिवाळ माचय्य, चंदण्या, घटिवाळण्या, अक्कमहादेवी, गोरक्ष इ. व्यक्तींशी झालेल्या संवादरूपाने ही ग्रंथरचना झाली आहे. त्याचप्रमाणे वीरशैवांच्या षटस्थल, अष्टावरण, पंचाचार या तत्त्वत्रयींबरोबरच भक्ती, ज्ञान, योग, मोक्ष इ. विषयांवर वीरशैव दृष्टिकोनातून झालेली चर्चा आहे. संकलनकाराने मूळ वचनांचा संग्रह स्वतःच्या स्पष्टीकरणात्मक टीपांसह केला आहे. आत्तापर्यंत अशी चार संकलने उपलब्ध झाली आहेत ती अशी : (१) शिवगण प्रसादी महादेवय्या (एकूण वचनसंख्या १,०१२ काल इ. स. १४००), (२) गुम्मलापूर सिद्धलिंगेश शिवयोगी (वचनसंख्या १,४३९ काल इ. स. १५८२), (३) हलगेयदेव (वचनसंख्या १,५९९ काल इ. स. १५८४), (४) गूळरसिद्धवीरण्णार्य (वचनसंख्या १,५४३ काल इ. स. १६१०). प्रथम संकलनकार शिवगण प्रसादी याने या वचनसंग्रहाला शून्यसंपादने हे नाव दिले.
गूळरसिद्धवीरण्णार्य यांच्या संकलनाचे संपादन आणि मुद्रण प्रथम डॉ. पी. जी. (फ. गु.) हलकट्टी यांनी १९३० मध्ये केले. त्याची सुधारित आवृत्ती १९५८ मध्ये प्रसिद्ध झाली. त्या आधारावर कर्नाटक विद्यापीठाने विविध विद्वानांच्या टीकाटिप्पणीसह (मूळ कन्नडवचने, त्यांचे इंग्रजी लिप्यंतर व अनुवाद) त्याचे पाच खंड १९६५ ते १९७२ या दरम्यान प्रसिद्ध केले.
कपाळे, चंद्रशेखर शि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..