शुल्झ, थीओडोर : (३० एप्रिल, १९०२–२६ फेब्रुवारी, १९९८). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. अमेरिकेतील दक्षिण डकोटा संस्थानात अर्लिंग्टन येथे जन्म. विस्कॉन्सिन विद्यापीठाची पीएच्. डी. (१९३०). १९४६–१९६१ या काळात ते शिकागो विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक होते. शुल्झ यांना १९७९ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार आर्थर लेविस यांच्याबरोबर विभागून देण्यात आला.

शेती क्षेत्राचा विकास आणि सर्वसाधारण विकासाचे अर्थशास्त्र या दोन शाखांमध्ये शुल्झ यांनी चिंतन व लेखन केलेले आढळते. ॲग्रिकल्चर इन ॲन अन्स्टेबल इकॉनॉमी (१९४५), इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर (१९५३), इकॉनॉमिक ग्रोथ अँड ॲग्रिकल्चर (१९६८) ही त्यांची पुस्तके स्वतंत्र आणि मूलभूत विचारमंथनाची निदर्शक आहेत. ट्रान्सफॉर्मिंग ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर (१९६४) हे त्यांचे आणखी एक पुस्तक. नैसर्गिक परिस्थितीतील बदल, आर्थिक चढउतार यांचा शेतीच्या विकासावर कसकसा परिणाम होतो, ते त्यांनी विस्ताराने मांडले. औद्योगिकीकरणाचा सर्वत्र जेव्हा उदोउदो चालू होता, त्या काळात त्यांनी ‘शेतीविकास ही औद्योगिकीकरणाची अटळ अशी पूर्वअट आहे’, असा अभ्यासपूर्ण विचार मांडला. विकसनशील देशांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक उद्दिष्टांबाबत त्यांनी विशेष संशोधन केले. हे शेतकरी सर्वाधिक उत्पादनाची अपेक्षा ठेवतात किंवा कसे, याचा त्यांनी शोध घेतला. या देशांमधील शेतीक्षेत्रात बऱ्याच वेळेस शून्य सीमांत उत्पादन आढळते व त्यामुळे तेथे छुपी बेरोजगारी आढळते, हा प्रस्थापित विचार त्यांनी अमान्य केला.   

विकासाच्या अर्थशास्त्रातील मूलभूत योगदानाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. त्यातही त्यांनी ‘मानवी भांडवलातील गुंतवणूक’ ही संकल्पना नव्या स्वरूपात मांडली. इतर भांडवली संसाधनांप्रमाणेच मानवी भांडवलाचा विचार करायला हवा, अशी त्यांची भूमिका होती. मानवी भांडवलाच्या अभिवृद्धित आणि त्या भांडवलाच्या गुणवत्तेत जशी सुधारणा होईल, तसा आर्थिक विकासाचा दर सुधारेल आणि पऱ्यायाने गरिबी, बेरोजगारी या समस्यांची उकल होऊ शकेल, असा व्यापक विचार त्या काळी क्रांतिकारक ठरला (१९६१). शिक्षणाच्या अर्थशास्त्राबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. त्यांची द इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन (१९६३), इन्व्हेस्टमेंट इन ह्यूमन कॅपिटल (१९७१), इन्व्हेस्टिंग इन पीपल : द इकॉनॉमिक्स ऑफ पॉप्युलेशन क्वालिटी (१९८१) ही पुस्तके या संदर्भात उल्लेखनीय आहेत. या पुस्तकांमधील अनेक मुद्यांचा पुढे निरनिराळ्या विद्वानांनी पाठपुरावा केला. त्यांत प्रमुख गॅरी बेकर (नोबेल पुरस्कार सन्मानित) हे एक होते. शिक्षणातही उच्च आणि तांत्रिक शिक्षणातील गुंतवणूक कारखानदारीतील गुंतवणुकीपेक्षा अधिक सरस व उत्पादक ठरते व परिणामतः समाजातील उत्पन्नाचा दर सुधारू शकतो, हा शुल्झ यांचा मुख्य विचार सर्वत्र स्वीकारला गेला. आरोग्य, पोषण या बाबतींतही वाढती गुंतवणूक करणाऱ्याल धोरणांचे मूळ शुल्झ यांच्या विचारात आहे.

दास्ताने, संतोष