टॉनी, रिचर्ड हेन्री : (३० नोव्हेंबर १८८०–१६ जानेवारी १९६२). अर्थशास्त्राच्या इतिहासाचा सुविख्यात इंग्रज मीमांसक. जन्म कलकत्ता येथे. त्याचे वडील कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्वान संस्कृत पंडित होते. टॉनीचे शिक्षण ‘रग्बी स्कूल’ आणि बेल्यल महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे झाले. लंडनच्या ‘टॉयन्बी हॉल’ मध्ये समाजकार्य केल्यानंतर, तो रॉशडेल येथील कामगार शिक्षण संस्थेचा (वर्कर्स एज्युकेशनल असोसिएशन) क्रियाशील सदस्य बनला तो त्या संस्थेचा बराच काळ अध्यक्षही होता (१९२८–४४). ऑक्सफर्ड येथे त्याने कामगारांसाठी प्रशिक्षणवर्गही चालविले. त्याच वेळी त्याने द ॲग्रेरियन प्रॉब्लेम इन द सिक्स्टींथ सेंचरी हा आपला पहिला ग्रंथ लिहिला (१९१२). अर्धविकसित अर्थव्यवस्थेतील लोकसंख्या विस्फोटन आणि किंमतींमध्ये उद्भवणारी तेजी (ऑस्ट्रेलिया, कॅनडा ह्यांसारख्या देशांत सोने व चांदी यांच्या शोधांमुळे घडून आलेली) व जमिनीचा सम्यक उपयोग ह्यांविषयीचे समग्र विवेचन या ग्रंथात आहे. हा ग्रंथ म्हणजे पुढील प्रचंड संशोधनपर लेखनाचा स्रोतबिंदूच ठरला. १९१३ साली ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’ या संस्थेमध्ये दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी उभारलेल्या ‘रतन टाटा फाउंडेशन’ चा तो संचालक झाला. पहिल्या महायुद्धकाळात तो लष्करी सेवेत असताना जबर जखमी झाला (१९१६). या अनुभवातूनच त्याने पुढे द अटॅक अँड अदर पेपर्स हा युद्धविषयक ग्रंथ लिहिला (१९५३). १९१८ मध्ये टॉनी बेल्यल महाविद्यालयाचा अधिछात्र झाला १९१९ साली ‘लंडन स्कूल’मध्ये ‘आर्थिक इतिहास’ ह्या विषयाचा प्रपाठक झाला. येथे असतानाच इकॉनॉमिक हिस्टरी रिव्ह्यू ह्या नव्या नियतकालिकाचा सहसंपादक म्हणून त्याने सात वर्षे काम केले. ‘लंडन स्कूल’ मध्ये तो १९३१–४९ या काळात आर्थिक इतिहासाचा प्राध्यापक होता १९४९ साली तो गुणश्री प्राध्यापक झाला.
टॉनीने विविध अर्थमंडळे, समित्यांवर काम केले अनेक शासकीय मंडळांचा तो आर्थिक सल्लागार होता. मजूर पक्षाचा उमेदवार म्हणून त्याने अनेकवार पार्लमेंटची निवडणूक लढविली, तथापि तो कधीही निवडून आला नाही. सामाजिक सुधारणांसाठी काढलेल्या अनेक जोरदार मोहिमा मात्र त्याने यशस्वीपणे चालविल्या. शाळा सोडण्याचे वय वाढविणे, कामगार शिक्षणाचा विस्तार करणे, किमान वेतन निर्धारित करणे ह्यांसारख्या त्याने सुचविलेल्या सुधारणा शासनाने स्वीकारल्या. द ॲक्विझिटिव्ह सोसायटी हा टॉनीचा जवळजवळ सर्वांत प्रक्षोभक व प्रभावी ग्रंथ १९२० मध्ये प्रसिद्ध झाला. टॉनीच्या मते भांडवलशाही समाजाचे संपादनतत्त्व (परिग्रहतत्त्व : ॲक्किझिटिव्हनेस) हे नीतिदृष्ट्या चुकीचे आहे. परिग्रहवृत्तीमुळे श्रीमंत आणि गरीब दोघेही भ्रष्ट होतात. मनुष्याला कामाची गरज असते ती केवळ पैसा मिळतो म्हणून नव्हे, तर कामाच्या परिपूर्तीचे समाधान तसेच त्याचे महत्त्व व त्यायोगे सिद्ध होणारा एखादा उपयुक्त हेतू, यांमुळे मनुष्य काम करतो. भांडवलशाही समाजामध्ये (अर्थव्यवस्थांमध्ये) कामाचे अंगभूत मूल्य दुर्लक्षून ते दुसऱ्या कशाचे तरी साधन मानले जाते असे झाले म्हणजे ते केवळ काबाडकष्ट ठरतात. १५४० ते १६४० या कालखंडास ‘टॉनीचे शतक’ (टॉनीज सेंचरी) असे म्हटले जाते याचे कारण १९२४ मध्ये टॉनीने आयलीन पाउअर ह्या लेखिकेबरोबर (१८८९ – १९४०) ट्यूडर इकॉनॉमिक डॉक्युमेंट्स या नावाने ट्यूडरकालीन इंग्लंडची आर्थिक, सामाजिक स्थिती रेखाटणारे अत्यंत मौलिक असे तीन खंड संपादित केले. १९२६ मध्ये टॉनीने रिलिजन अँड द राइज ऑफ कॅपिटॅलिझम हा ग्रंथ प्रसिद्ध केला. हा ग्रंथ एक अभिजात कृती मानली जाते. या ग्रंथात टॉनीने आपला गुरू माक्स व्हेबर याच्या एका ग्रंथातील विचारांमध्ये सुधारणा केली. व्हेबरच्या मते भांडवलशाहीचा उदय कॅल्व्हिनप्रणीत धार्मिक तत्त्वांमुळे—विशेषतः नियतितत्त्वामुळे—झाला. टॉनीच्या मते व्यक्तिवाद आणि काटकसर व दीर्घ परिश्रम यांच्या योगे कार्यक्षम कामगारवर्ग व औद्योगिक संघटना ह्यांचा उदय झाला. टॉनीचे हे मत निर्विवाद नसले, तरी धर्म आणि अर्थशास्त्र ह्यांच्या संबंधाबाबतचे त्याचे विचार प्रेरक ठरले. टॉनीने चीनमध्ये जाऊन तेथील अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला व लँड अँड लेबर इन चायना हा ग्रंथ १९३२ मध्ये प्रसिद्ध केला. पंधराव्या शतकातून एकदम विसाव्या शतकात उडी घेऊ पाडणाऱ्या चीनच्या अर्थव्यवस्थेला आपल्या समस्यांच्या निरसनार्थ त्याने लोकशाही उपाय सुचविले होते. १९५८ मध्ये टॉनीने दीर्घकालापेक्षित असा लायोनेल क्रॅनफील्ड या पहिल्या जेम्सच्या कोषाध्यक्षाचा लायोनेल क्रॅनफील्ड : बिझिनेस अँड पॉलिटिक्स अंडर जेम्स फर्स्ट हा चरित्रग्रंथ लिहिला. या अभ्यासपूर्ण ग्रंथाचे सर्वत्र स्वागत झाले.
टॉनीने धार्मिक मतप्रणाली व नीतिसंकेत आणि आर्थिक विकास व शासकीय कार्यवाही ह्यांचा जवळचा कसा संबंध आहे, ते दाखवून दिले समाजाचे चारित्र्य ठरविण्याच्या संदर्भात जमीनदार व कुळे, मालक व कामगार यांच्या परस्परसंबंधांचे महत्त्व विशद केले. यूरोपच्या इतिहासात घडून आलेल्या तीन महान क्रांत्यांपैकी त्याने एकीचे (औद्योगिक क्रांतीचे) सामाजिक अर्थबोधन (भाष्य) घडविले आपल्या लिखाणामधून त्याने आर्थिक इतिहासासंबंधी कुतूहल व गोडी निर्माण केली, त्यामुळेच आर्थिक इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला पदव्युत्तर संशोधनविषय म्हणूनही त्याचे क्षेत्र विस्तारले. स्थितिशील, ग्रामीण समाजाचे जेव्हा मुद्राधिष्ठित, औद्योगिक समाजामध्ये परिवर्तन होते, तेव्हा त्या परिवर्तनामागे कोणते घटक असतात, त्यांची जाणीव टॉनीने आपल्या ग्रंथांद्वारा दिली आहे. ही त्याची कामगिरी फार मोलाची समजली जाते.
संदर्भ : 1. Ashton, Thomas S. Richard Henry Tawney, 1880–1962, London, 1962.
2. Hexter, J. H. Reappraisals in History : New Views on History and Society in Early Modern Europe, Evanston, 1961.
3. Trevor-Roper, H. R. The Gentry : 1540–1640, London, 1953.
गद्रे, वि. रा.