शुभ्र अभ्रक : अभ्रक गटातील हे एक खनिज आहे. याचे स्फटिक एकनताक्ष, वडीसारखे किंवा आखूड प्रचिनाकार असून त्यांची बाह्य रूपरेषा षटकोणी किंवा समचतुर्भुजी असते [→ स्फटिकविज्ञान]. याचे पातळ पत्रे पारदर्शक, लवचिक, रंगहीन, उदसर वा पांढरे असतात, तर जाड पत्रे दुधी काचेप्रमाणे पारभासी व पांढरे, लालसर वा हिरवट असतात. सुमारे 6·२५ चौ. सेंमी.हून मोठे स्फटिक चांगले मानले जातात. १ मी. किंवा अधिक व्यासाचे स्फटिक नेल्लोरजवळ (आंध्र प्रदेश) आढळले आहेत. शुभ्र अभ्रक गूढस्फटिकी व घट्ट संपुंजित रूपातही आढळते [→ खनिजविज्ञान]. ⇨ पाटन : (००१) अत्युत्कृष्ट, कठिनता २–२·५, वि. गु. २·७६–३·१, चमक काचेसारखी ते मोत्यासारखी किंवा रेशमासारखी, कस रंगहीन. रा. सं. KAl2 (AlSi3) O10 (OH)2. कधीकधी यात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, लिथियम, फ्ल्युओरीन व टिटॅनियम ही मूलद्रव्ये अल्प प्रमाणात आढळतात. याच्यावर ५६५ से. तापमानापर्यंत उष्णतेचा परिणाम होत नाही, तसेच हे उच्च विद्युत दाबाला तडा न जाता टिकते. अम्लाचा याच्यावर परिणाम होत नाही. हे बंद नळीत तापविल्यास पाणी बाहेर पडते. शुभ्र अभ्रक द्विप्रणमनी असून त्याच्या स्फटिकातील (001) या पृष्ठाला लंब असलेल्या दिशेतून त्या दिशेला लंब असलेल्या दिशेपेक्षा अधिक प्रकाश पलीकडे जातो.

शुभ्र अभ्रक हे सर्वत्र सामान्यपणे आढळणारे खनिज सर्व प्रकारच्या खडकांत आढळते. पेग्मटाइट खडकांच्या भित्तीत हे विपुलपणे आढळते. शिवाय ग्रॅनाइट, सायेनाइट, अभ्रकी सुभाजा, वालुकाश्म व इतर दलिक खडक, स्लेट, पट्टिताश्म इ. खडकांतही हे आढळते. क्वॉर्टझ, फेल्स्पार तसेच तोरमल्ली, वैदूर्य, गार्नेट, ॲपेटाइट, फ्ल्युओराइट इ. खनिजे याच्याबरोबर आढळतात. काही सुभाजा खडकांत मुख्यतः फेल्स्पार या खनिजात बदल होऊन बनलेले रेशमसारखी चमक असलेले याचे पुंजके आढळतात. त्याला सेरिसाइट किंवा व्हाइट मायका म्हणतात. पुष्कराज, स्पॉड्यूमीन, कायनाइट, अँडॅल्यूसाइट, स्कॅपोलाइट इ. खनिजांत बदल होऊनही शुभ्र अभ्रक बनते. अशा बदलांनी बनलेल्या व शुभ्र अभ्रकासारखे रासायनिक संघटन असणाऱ्या अभ्रकमय खनिजाला पिनाइट म्हणतात. पॅरागोनाइट हा शुभ्र अभ्रकाबरोबर आढळणारा त्याच्यासारखा प्रकार वेगळा ओळखू येत नाही. पॅरागोनाइटमध्ये पोटॅशियमच्या जागी मर्यादित प्रमाणात सोडियम आलेले असते [NaAl2 (AlSi3) O10 (OH)2]. 

चांगल्या शुभ्र पत्री अभ्रकाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. याच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा सु. ८०% आहे. ब्राझिल, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, आयर्लंड इ. देशांतही शुभ्र अभ्रक आढळते. भारतात, विशेषतः अभ्रकी सुभाजा खडकांना छेदणाऱ्या पेग्मटाइटच्या शिरांमध्ये चांगले शुभ्र अभ्रक आढळते. उदा., हजारीबाग व गया (बिहार), अजमेर व मेवाड (राजस्थान), नेल्लोर (आंध्र प्रदेश), या जिल्ह्यांत याचे उत्पादन होते व यांपैकी सु. ७५% उत्पादन बिहारमध्ये होते. यांशिवाय गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतही शुभ्र अभ्रक आढळते. 

शुभ्र अभ्रकाचे मोठे स्फटिक विद्युत निरोधक म्हणून विद्युतीय व इलेक्ट्रॉनीय उपकरणे, साधने व सामग्री यांत वापरतात. शुभ्र अभ्रकाचे तुकडेताकडे दाबाखाली सांधून बनविलेल्या तक्त्यांना मायकानाइट म्हणतात. हे तक्ते चकत्या, वॉशर, विद्युत निरोधक आवरणे वगैरेंसाठी वापरतात. शुभ्र अभ्रकाची पूड उष्णता निरोधक सामग्री बनविण्यासाठी वापरतात (उदा., भट्ट्या, बाष्पित्रे, शीतगृहे यांसाठी वापरण्यात येणाऱ्या विटा). रबर व प्लॅस्टिक यांच्यात भरण द्रव्य म्हणून तसेच रंगलेप व भिंतींना चिकटविण्याचे कागद चमकदार व टिकाऊ करण्यासाठी समावेशक द्रव्य म्हणून शुभ्र अभ्रकाची पूड वापरतात. तेलात ही पूड मिसळून वंगणे बनवितात. शुभ्र अभ्रकाचा आयसिंग्लास हा पारदर्शक प्रकार भट्ट्या व उपकरणे यांची दारे आणि काही विशिष्ट दिव्यांमध्ये वापरतात. पूर्वी पारदर्शक प्रकार काचेच्या तावदानांऐवजी व दिव्यांच्या चिमण्यांसाठी वापरीत. आयुर्वेदिक औषधांताही शुभ्र अभ्रक वापरतात.   

सामान्य किंवा पोटॅश अभ्रक, मिररस्टोन, मस्कोव्हाइट व मस्कोव्ही ग्लास ही शुभ्र अभ्रकाची पर्यायी नावे आहेत. पूर्वी रशियात (मस्कोव्हीमध्ये) मस्कोव्ही ग्लास या लोकप्रिय नावाने काचेऐवजी शुभ्र अभ्रक वापरीत. यावरून याचे मस्कोव्हाइट हे इंग्रजी नाव पडले असून मायका (अभ्रक) हा शब्द बहुधा चमकणे या अर्थाच्या मायकेअर या लॅटिन शब्दावरून आला असावा.

पहा : अभ्रक गट                                   

ठाकूर, अ. ना.