शुद्धलेखन : (ऑर्थोग्राफी). भाषेच्या प्रमाण रूपाचे प्रमाण लेखन म्हणजे शुद्धलेखन, असे सामान्यपणे म्हणता येईल. समाजात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेच्या लेखनाचे संकेत हे पुढील घटकांवर अवलंबून असतात : त्या भाषेचे प्रमाण स्वरूप, तिची उच्चारणपद्धती, त्या समाजाने लेखनासाठी स्वीकारलेल्या लिपीची क्षमता, भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरणिक भेद दाखवण्यासाठी त्या समाजाने घेतलेली भूमिका, लेखनाची रूढ झालेली पद्धत इ. सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन जी समाजमान्य लेखनपद्धती अस्तित्वात येते तिला त्या समाजाच्या भाषेचे शुद्धलेखन म्हणतात. शुद्धलेखनाच्या नियमांना आणि संकेतांना धरून त्या भाषेतील लेखन व्हावे, अशी अपेक्षा असते.

भाषेचे उच्चारण व लेखन : भाषेचे उच्चारण आणि तिचे लेखन ही दोन्ही सारखीच असतात, लेखन हे बोली भाषेचा जणू आरसाच होय, या समजुती चुकीच्या आहेत. भाषा ही मानवनिर्मित मौखिक ध्वनींपासून बनलेल्या चिन्हांची सामाजिक संप्रेषणासाठी आवश्यक ठरलेली एक व्यवस्था आहे. कोणतीही चिन्ह-व्यवस्था ही मूळ वास्तवाची प्रतीकमात्र असते ती त्या वास्तवाचे एकास एक तंतोतंत जुळणारे प्रतिरूप सहसा होऊ शकत नाही. लेखन हीसुद्धा भाषिक चिन्हांचे प्रतिनिधित्व करणारी व भाषिक संदेशांना स्थैर्य देणारी अक्षररूप अशा दृश्य चिन्हांची व्यवस्था आहे. ही व्यवस्था भाषेतील शब्दांचे प्रतीक म्हणून वापरली जाते ती भाषिक वास्तवाचे हुबेहूब प्रतिरूप ठरेल, अशी काटेतोल लेखनपद्धती जगात कोणत्याही भाषेला नाही. प्राचीन काळी बोली भाषेचे हुबेहूब प्रतिरूप निर्माण करण्याच्या उद्देशाने लेखनव्यवस्था अस्तित्वात आली असे मानले, तरी ती काळाच्या ओघात तशी राहूच शकणार नाही. मौखिक भाषेच्या परिवर्तनाचा वेग हा लिखित भाषेच्या परिवर्तनाच्या वेगापेक्षा कितीतरी अधिक असतो. लिखित भाषेची प्रवृत्ती स्थैर्याकडे असून त्यामानाने बोली भाषा ही अधिक परिवर्तनशील असते. त्यामुळे दोहोत एकरूपता कधीकधी असलीच, तरी ती काळाच्या ओघात ढळते. परिणामतः लेखनव्यवस्था ही बोलीस्वरूपातील भाषाव्यवस्थेपेक्षा भिन्न होत जाते. त्यामुळे भाषा व तिची लिपी यांच्यात विसंगती निर्माण होते. अशा वेळी तडजोड स्वीकारूनच काम चालवले जाते. याबाबतीत त्या त्या समाजाचे संकेत ठरलेले असतात. ‘मुलगा’ या शब्दातील ‘ल’ हे अक्षर उच्चारणात स्वररहित असले, तरी लेखनात मात्र ते स्वरयुक्त दाखवले जाते. शब्दांचे बोलीतील रूप लेखनात ज्या रूपात व्यक्त होते, त्याला त्या शब्दाचे स्पेलिंग म्हणतात. स्पेलिंग म्हणजे शब्दलेखनाचे रूढ संकेत. प्रत्येक लिखित भाषेला स्पेलिंग अथवा शब्दलेखनसंकेत असतातच.

शुद्धलेखनाची व्याप्ती : शुद्धलेखनाच्या संदर्भात पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत : (१) शुद्धलेखनाचा प्रश्न फक्त प्रमाणभाषेच्याच लेखनाशी निगडित आहे. बोली भाषेच्या लेखनाला तो लागू नाही. बोली भाषेच्या लेखनात उच्चारणानुसार लेखन एवढे एकच तंत्र वापरले जाते. अर्थात तेथेही संकेत नसतातच असे नाही. मराठी साहित्यात ग्रामीण, दलित इ. साहित्यप्रकारांत वास्तवदर्शनासाठी विविध बोलींचा वापर होत असतो. तेथे शक्यतो उच्चारानुसार लेखन होत असते. शुद्धलेखनाच्या इतर नियमांकडे लक्ष द्यावे, अशी तेथे अपेक्षा नसते. वास्तविक पाहता बोली व्यवहारात शुद्ध-अशुद्ध असा भेद केला जात नाही. ज्यायोगाने संप्रेषण चांगले होईल, ते सर्व शुद्धच मानायला हवे. पण लेखनव्यवहारात मात्र आदर्शवादी भूमिका घेतली जाते. तेथे लेखन तात्कालिक व्यवहारासाठी करायचे नसते. उपस्थित-अनुपस्थित, सद्यःकालीन-भविष्यकालीन अशा सर्वच लोकांसाठी ते करावयाचे असल्याने तेथे मात्र आदर्शवादी, प्रामाण्यवादी भूमिका स्वीकारावीच लागते. (२) वर्तमानपत्रे, नियतकालिके, नभोवाणी, दूरचित्रवाणी यांसारखी प्रसारमाध्यमे शासकीय तथा न्यायालयीन कामकाज, तसेच शैक्षणिक संस्था, उद्योगव्यवहारकेंद्रे, खाजगी संस्था यांचे कामकाज जाहिराती, पाठ्यपुस्तके, वैचारिक पुस्तके इ. बाबतींत प्रमाण भाषेचाच वापर होत असतो. तेव्हा तेथे मात्र शुद्धलेखनाचीच अपेक्षा असते. (३) शुद्धलेखन विचारात केवळ लेखनाच्या संदर्भातीलच प्रश्न नसतात, तर इतरही अनेक बाबींचा विचार असतो. लेखनाचे पुनर्वाचन करताना ते अपेक्षित शब्दांपेक्षा वेगळे होऊ नये, यासाठी लेखन सुवाच्य आणि रूढ संकेतांना धरून व्हावे, अशी अपेक्षा असते. मराठी लिपीतील काही अक्षरे इतर अक्षरांशी इतकी मिळतीजुळती असतात, की त्यांमुळे खूप घोटाळे होण्याची शक्यता असते. उदा., य-थ, म-भ, र-ट, ट-ढ, ख-र व, ड-इ या अक्षरांचे लेखन सुवाच्य आणि सावधपणे केले जाणे, हा लेखनाच्या संदर्भातील प्रश्न म्हणता येईल. ऐ (ए), एै (ऐ) असे चुकीचे लेखन केवळ लेखनसंकेतांच्या अज्ञानामुळेच होते. द्ध (द्ध), न्ती (त्नी), व्द (द्व), ब्द (द्ब), त्प (प्त) या जोडाक्षरांच्या लेखनातील बारकाव्यांचे अज्ञान हा प्रश्नही लेखनाशीच निगडित आहे. शिरोरेखा, अक्षरांची वळणे, उकार, वेलांटी, रफार इत्यादींबाबतचे अज्ञान हे सर्व लेखनाच्या संदर्भातील प्रश्न आहेत. ऱ्हस्व-दीर्घ, विरामचिन्हे, काही अनुस्वार (शरणांगत, संयुक्तिक) इ. प्रश्न उच्चारणांशी संबंधित आहेत. इतर अनेक प्रश्न भाषेचे अज्ञान, व्याकरणाचे अज्ञान, व्युत्पत्तीचे अज्ञान यांच्याशी संबंधित आहेत. उपहारगृह (उपाहारगृह), पुनरावलोकन (पुनरवलोकन), कोट्याधीश (कोट्यधीश), पुनर्प्रक्षेपण (पुनःप्रक्षेपण) वगैरे संधिनियमांच्या अज्ञानामुळे होणाऱ्या चुका आहेत. पृथःकरण (पृथक्करण), अंधःकार (अंधकार), (अल्पसंख्यांक) अल्पसंख्याक इ. चुका शब्दसिद्धीच्या अज्ञानातून निर्माण होतात. सहस्त्र (सहस्र), पूर्वापार (पूर्वापर), दक्षणा (दक्षिणा) इ. चुका भाषेच्याच अज्ञानामुळे होतात. कंडॉक्टर (कंडक्टर), ओव्हरऑयलिंग (ओव्हरहाउलिंग) इ. शब्द अज्ञान अथवा अतिदक्षता यांमुळे निर्माण होत असतात. (४) शुद्धलेखन हे फक्त सुट्या शब्दांपुरतेच मर्यादित असते, ही चुकीची समजूत आहे. सुट्या शब्दांचे लेखन, शब्दान्तर्गत संधी, शब्दांचे सामान्यरूप तसेच अनेकवचनी रूप इ. विकार, समासान्तर्गत रूपे, शब्दसिद्धी यांच्याबरोबरच कर्तुपदाचा क्रियापदाशी मेळ (येथे फूले, फुलांचे हार, फुलांचे गुच्छ मिळेल). विशेषणांचा विशेष्यांशी मेळ (मोहमयी वातावरण), चुकीचे प्रयोग (असंदिग्ध बोलू नकोस, संदिग्ध बोल, माझ्या अपरोक्ष बोलू नकोस, परोक्ष बोल) संबंधी शब्दांचा असमतोल (जो-तो, जेव्हा-तेव्हा, जरी-तरी, जर-तर इ.), एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी अनुबंध नसणे, लेखनातील विचारांचा परस्परांशी ताळमेळ नसणे इ. लेखनदोषही शुद्धलेखन विचारात समाविष्ट करण्याची गरज आहे. (५) लिपिसुधारणा, लिपिज्ञान, अक्षरांची वळणे, वर्णमाला, वर्णांची आनुपूर्वी परिभाषानिर्मिती, भाषाप्रदूषण (फार्सी शब्दप्रचुर भाषा, इंग्रजी शब्दप्रचुर भाषा, संस्कृतप्रचुर भाषा, ग्राम्य शब्दप्रचुर भाषा इ.), विरामचिन्हे इ. विषय प्रत्यक्ष शुद्धलेखनाचे नसले, तरी तत्संबंधातील आहेत. भाषालेखनाच्या विचारात संलग्न ज्ञानविषय म्हणून तेही विषय शुद्धलेखनाच्या जोडीने विचारात घेतले पाहिजेत.


मराठी शुद्धलेखन : मराठीची लेखनपद्धती गेल्या बाराशे वर्षांपासून प्रचलित असली, तरी इंग्रजपूर्व काळात तिचे स्वरूप यादृच्छिक होते. इंग्रजी राजवटीत मात्र मुद्रणकला, शिक्षणप्रसार, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, व्याकरणग्रंथांची निर्मिती, वृत्तपत्रे आणि इतर नियतकालिके इत्यादींच्या परिणामांतून मराठी लेखनाचे प्रमाणीकरण झाले आणि त्या अनुषंगाने मराठीचे शुद्धलेखन अस्तित्वात आले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्यासारखे व्याकरणकार, मेजर टॉमस कँडी यांच्यासारखे दक्ष भाषाप्रेमी अधिकारी, प्रबोधन कार्याची बांधीलकी स्वीकरलेले वृत्तपत्रकार व लेखक, हे मराठीच्या शुद्धलेखनपद्धतीचे आद्य शिल्पकार होत. एकोणिसाव्या शतकात रूढ झालेल्या या शुद्धलेखनपद्धतीला जुने शुद्धलेखन म्हणतात. तिच्यामध्ये अनुस्वारांचा फारच सुळसुळाट दिसून येतो. स्पष्टोच्चारित अनुस्वार, नासिक्य अनुस्वार, व्युत्पत्तिसिद्ध अनुस्वार, व्याकरणिक अनुस्वार, रूढीने आलेले अनुस्वार असे सर्व प्रकारचे अनुस्वार त्या पद्धतीत होते. संस्कृतातून आलेल्या इ-कारान्त आणि उ-कारान्त तत्सम शब्दांचे लेखन संस्कृतप्रमाणे ऱ्हस्वान्तच होत असे. सामान्यरूपात मात्र त्यांचे लेखन मराठी उच्चाराप्रमणे दीर्घान्त होत असे. रूढीने रुळलेल्या व्याकरणदुष्ट रचना सदोष ठरवून व्याकरणशुद्ध रचनांचा आग्रह धरला जाई. ही लेखनपद्धती दीर्घकाळपर्यंत चालू होती. तिला अधूनमधून विरोध होत असे पण खरा वाद १८९८ मध्ये सुरू झाला. श्री.साने, श्री. गोडबोले आणि श्री. हातवळणे या तीन विद्वानांनी शुद्धलेखनातील सुधारणेसंबंधाने एक विनंतिपत्रक काढले. लेखन उच्चारानुसार असावे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. अनुच्चारित अनुस्वार गाळावेत, तत्सम ऱ्हस्व इकारान्त आणि उकारान्त शब्द प्रथमेत दीर्घान्त लिहावेत इ. सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यांनी मराठी शुद्धलेखन या नावाचे एक पुस्तकही १९०० मध्ये प्रसिद्ध केले आणि शाळाखात्यातील क्रमिक पुस्तकेही त्या पद्धतीने छापली जावीत, असा प्रयत्न केला. त्यांना काही विद्वानांनी पाठिंबा दिला, पण काहींनी विरोध केला. परिणामतः परंपरावादी व परिवर्तनवादी असे दोन विरोधी गट तयार झाले. त्यांत परंपरावाद्यांची सरशी झाली. तथापि या निमित्ताने शुद्धलेखन-चळवळीत हे जे दोन पक्ष पडले, ते आजतागायत कायम आहेत. १९२८ पर्यंत ही चर्चा तात्त्विक पातळीवर चालली. न.चिं. केळकरांनी १९२८ साली आपल्या टिळकचरित्राचे दुसरा व तिसरा हे खंड एकामागोमाग एक असे प्रसिद्ध केले. ते करताना त्यांनी नवीन परिवर्तनवादी विचारसरणीप्रमाणे अनुच्चारित अनुस्वार गाळले. तेव्हापासून हे विरोधी पक्ष अधिक कृतिशील झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९३० साली आपले नवे नियम प्रसिद्ध केले. ते काही जणांनी स्वीकारले व काहींनी नाकारले. त्यामुळे मराठी शुद्धलेखनाच्या क्षेत्रात दुहेरी व्यवस्था निर्माण झाली. पुढे मुंबई विद्यापीठाने २ जानेवारी, १९४७ रोजी आपले नियम स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले. १९५३ साली महाराष्ट्र साहित्य परिषदेने शुद्धलेखनाच्या संदर्भात निर्माण झालेल्या अराजकातून मार्ग काढण्यासाठी एक शुद्धलेखन समिती स्थापन केली. या समितीने काही सुधारणा सुचविल्या पण वाद मिटला नाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले (१९६०) आणि मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात आले. या महामंडळाने १९६१ साली आपली १४ कलमी शुद्धलेखन नियमावली प्रसिद्ध केली आणि २० सप्टेंबर, १९६२ रोजी महाराष्ट्र शासनाने एका ठरावाने महामंडळाच्या या नियमावलीला मान्यता देऊन मागील सर्व नियम रद्द केले.

शासनाच्या या कृतीने मराठी शुद्धलेखनाबाबतच्या वादावर कायमचा पडदा पडला, असे नाही. अनेक विद्वानांनी या नियमावलीविरुद्ध आपली मते व्यक्त केली आहेत आणि त्यांनी स्वतःचे लेखन स्वतःच्या पद्धतीने केलेले आहे. यासंबंधात प्रा. वसंत दावतर परंपरावादी आहेत. प्रा. अरविंद मंगरूळकर आणि प्रा. कृ.श्री. अर्जुनवाडकर यांना त्यांची मते मान्य नसली, तरी ते शासकीय नियमावलीच्या बाजूनेही नाहीत. डॉ. वि.भि. कोलते यांनी ऱ्हस्व-दीर्घ भेदच दुर्लक्षित करा, अशी टोकाची भूमिका घेतली. श्रीमती सत्त्वशीला सामंत आणि श्री. दिवाकर मोहनी यांनी शासकीय नियमावलीतील त्रुटी आणि विसंगती यांवर बोट ठेवून नवीन सुधारणा सुचविल्या आहेत. ही सर्व चर्चा साधारणपणे अनुच्चारित अनुस्वार, ऱ्हस्व-दीर्घ भेद, समासान्तर्गत तत्सम ऱ्हस्वान्त शब्दांचे लेखन, व्यंजनान्त शब्दांचे लेखन इ. मुद्यांवर केंद्रित झाली आहे. शुद्धलेखनाच्या जोडीने भाषिक प्रदूषणासंबंधीही मराठीत पूर्वीपासून आजतागायत अखंडपणे चर्चा होत राहिली आहे. वि.दा.सावरकर, माधवराव पटवर्धन, श्री. के. क्षीरसागर, पु. ल. देशपांडे, में. पु. रेगे यांनी या संदर्भात आपापली मते मांडली आहेत. या सर्व चर्चांमधून एवढेच निष्पन्न होते, की मराठीच्या शुद्धलेखानाचा वाद अद्याप चालू आहे. या निमित्ताने मूलभूत प्रश्नांवर जी चर्चा झाली आणि विचारमंथन झाले, तीच या वादाची फलनिष्पत्ती होय.

पहा : नागरी लिपी बोली भाषाविज्ञान भाषा भाषाशास्त्र भाषाशिक्षण मराठी भाषा मराठी (नागरी) वर्णमाला वर्णविचार वाचा विरामचिन्हांकन व्याकरण व्युत्पत्तिशास्त्र शब्दार्थविद्या.

संदर्भ : १. गोखले, द. न., शुद्धलेखनविवेक, पुणे, १९९३.

            २. दावतर, वसंत, मराठी शुद्धलेखन, मुंबई, १९९४.            ३. फडके, अरुण, मराठी लेखन कोश, मुंबई, २००१.

            ४. वाळंबे, मो. रा. मराठी शुद्धलेखन प्रदीप, पुणे, १९८१ (सुधारित २००१).            ५. सामंत, सत्त्वशीला, व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली, पुणे, १९९९.  

काळे, कल्याण वासुदेव