रूपांतर : (अडॅप्टेशन). परभाषेतील लेखक स्वभाषेतील वाचकांकडे आणणे तसेच परभाषेतील लेखकाकडे स्वभाषेच्या वाचकांना नेणे, या भाषांतरकाराच्या दोन भूमिका असतात. त्यानुसार भाषांतराचे तीन प्रकार संभवतात : (१) शब्दशः भाषांतर करणे. यात वाचकाला लेखकाकडे न्यायचे असते. (२) दुसऱ्या शब्दात तोच अर्थ सांगणे. यात मुळातला अर्थ विस्तारून सोपा करून सांगायचा असतो. (३) मूळ कृतीचे आपल्या भाषेच्या अंगाने अनुकरण करणे. यात लेखकाला वाचकाकडे आणायचे असते. या तिसऱ्या) प्रकारात मूळ कृतीमधील अर्थ आणि मूळ कृतीचे रूप यांना बाजूला सारून भाषांतरकार त्यात स्वतःच्या अर्थ आणि स्वतः निर्मिलेली वेगळी रूपे घालू शकतो. या तिसऱ्या प्रकारात मूळ कृती फारच दूर टाकली गेली, तर भाषांतर रूपांतराकडे झुकते.

परभाषेतील साहित्यकृतीचा आकृतिबंध साधारणपणे तसाच ठेवून बाकीचे अर्थाचे आणि रूपाचे बारकावे वगळणे, बदलणे, नव्याने आणणे म्हणजे रूपांतर. उदा., मर्फीच्या ऑल इन द राँग (अठरावे शतक, इंग्लंड) या नाटकाचे संशयकल्लोळ (१९१६) हे देवलांनी केलेले मराठी रूपांतर होते. हे रूपांतर इतके बेमालूमपणे केलेले आहे, आणि मुळचे इतके पूर्णतत्त्वाने मराठीकरण झालेले आहे, की ते रूपांतर आहे, हे ओळखताही येणार नाही. मुख्य म्हणजे मूळ नाटकापेक्षा ते सरस वठले आहे. उलट गॉल्झवर्दीच्या स्ट्राइफ (१९०९) या नाटकाचे भा. वि. वरेरकर यांनी केलेले सोन्याचा कळस हे रूपांतर, इब्सेनच्या ए डॉल्स हाउस (१८७९) या नाटकाचे मो. ग. रांगणेकर यांनी केलेले कुलवधू (१९४२) हे रूपांतर व बर्नार्ड शॉच्या पिग्मॅलीनचे (१९१२) पु. ल. देशपांडे यांनी केलेले ती फुलराणी (अप्रकाशित) रूपांतर ही सर्व मराठी वळणाची असली, तरी त्या त्या मूळ नाटकाशी तुलना करता फारच बेतांची रूपांतरे ठरली आहेत. कधी कधी मूळ साहित्यकृतीचा विषय घेऊन त्या विषयाचेच रूप बदलून दुसरी साहित्यकृती रचण्यात येते. अशा रूपांतरांत लेखक अनेकदा ‘अमुक अमुक साहित्यकृतीवर आधारित’ असा मूळ साहित्यकृतीचा प्रामाणिकपणे उल्लेखही करतो. मात्र असे काहीही न करता मूळ साहित्यकृती लपविणे किंवा रूपांतरांत मूळ साहित्यकृतीचा मुळीच उल्लेख न करणे याला वाङमयचौर्य म्हणतात. रूपांतरात रूपांतर कार्याला भरपूर स्वातंत्र्य असल्याने भाषांतरापेक्षा त्यात कलानिर्मितीला अधिक वाव असतो.

दुसरा प्रकार म्हणजे एका भाषेतील साहित्यप्रकाराचे त्याच भाषेतील दुसऱ्या साहित्यप्रकारात रूपांतर करणे, हा होय. उदा., श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या मूळ कादंबरीचे नाटकात केलेले रूपांतर किंवा जयवंत दळवी यांच्या महानंदा या कादंबरीचे गुंतता हृदय हे या नाटकात केलेले रूपांतर. या पद्धतीचे रूपांतर एका दृष्टीने अधिक अवघड असते. कारण प्रत्येक साहित्यप्रकाराची स्वतःची खास बळस्थाने असतात स्वतःच्या खास प्रस्तुतीकरणाच्या पद्धती असतात. त्या दुसऱ्या साहित्यप्रकारात तशाच स्वरूपात सापडत नाहीत किंवा वापरता येत नाहीत. उदा., कादंबरीतले वर्णन व नाटकातले वर्णन यांत भिन्नता असते. नाटकात संवाद अपरिहार्य असतात, तर कथा-कादंबरीमध्ये ते पूर्णपणे टाळता येतात. काही साहित्यप्रकारांचे दुसऱ्या साहित्यप्रकारांत रुपांतर होऊ शकणार नाही. उदा., प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराचे नाटक होऊ शकत नाही. पाश्चात्त्य समीक्षेत कादंबरी हा सुरुवातीला महाकाव्याचा गद्य उपप्रकार मानला जाई. पुढे तो स्वतंत्र साहित्यप्रकार ठरला. त्यामुळे महाकाव्याची कादंबरी हे रुपांतर होते पण कवितेचे रुपांतर कादंबरीत होत नाही. कथा-कादंबरीचे नाटकात रुपांतर होते पण नाटकाचे कथा-कादंबरी रुपांतर होताना क्वचितच दिसते. इंग्रजीत चार्ल्स लँबने शेक्सपिअरच्या नाटकांचे कथा-रूपांत रुपांतर करण्याचा प्रयत्न केला पण तो बालवाङ्मयातच जमा होता. एखादा लेखक स्वतःच आपल्या एका साहित्यप्रकारातील साहित्यकृतीचे दुसऱ्या साहित्यप्रकारात रूपांतर करू शकतो. पण त्यामुळे रूपांतराच्या गुणवत्तेत निश्चितपणे फरक पडतो, असे दिसत नाही. एका भाषेतील एका साहित्यप्रकाराचे दुसऱ्या भाषेत दुसऱ्याच साहित्यप्रकारात रूपांतर करण्यासाठी अधिक निर्मितिक्षमतेची गरज असते. कधी कधी त्यांना रूपांतर असे म्हटलेही जात नाही. शेक्सपिअरची नाटके, कालिदासाची काही नाटके तसेच रामायण, महाभारत यांवर आधारलेल्या भारतीय भाषांतील असंख्य कृती इ. उदाहरणे या संदर्भात देता येतील.

रूपांतराचा तिसराही एक प्रकार संभवतो : तो म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या. माध्यमात होणारे रूपांतर होताना साहित्यप्रकाराप्रमाणे माध्यमही बदलते. कारण कथा-कादंबरी हा श्राव्य प्रकार आहे, तर नाटक हा दृक्‌श्राव्य माध्यमाचा प्रकार आहे. कथेचे नाटक आणि कथेचा चित्रपट करणे, ही माध्यमांवर आधारित रूपांतर ठरतात. चित्रपट-माध्यमाच्या वेगळेपणाने रूपांतर कमी-अधिक सरस ठरते. उदा., रामायण, महाभारत यांसारखी महाकाव्ये वाचून श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या विशिष्ट प्रतिमा मनात निर्माण होतात. चित्रपटांत त्यांच्या प्रत्यक्ष प्रतिमा दिसतात. त्या भिन्न, हिणकस असल्यास परिणामाला बाध येतो. काव्यातील वर्णनाचे चित्रपटमाध्यमातून दृश्यीकरण्यात येते. कवितेचे चित्रपटगीत होणे किंवा करणे हेही काही अंशी माध्यमाच्या संदर्भातील रूपांतर होय. संगीताच्या आधारे चित्रनिर्मिती किंवा मूर्तिशिल्प निर्माण करणे किंवा चित्राच्या आधारे मूर्तिशिल्पची निर्मिती करणे, ही भाषेतर माध्यम असलेल्या कलावस्तूंची रूपांतरे होत. एखाद्या रूपांतरात भाषा, साहित्यप्रकार आणि माध्यम या तीनही बाबींत बदल होतो.

याप्रमाणे भाषा, साहित्यप्रकार आणि माध्यम यांच्या बदलातून रूपांतराचे तीन प्रकार संभवतात. मात्र या तीनही प्रकारांत मूळ कृती नव्या रसिकाजवळ आणणे हा समान हेतू आहे आणि ते करताना बरेच स्वातंत्र्य घेणे ही समान प्रवृत्ती दिसून येते.

पहा : भाषांतर.

संदर्भ : 1. Proawev. S. S. Comparative Literary Studies : An Introduction, London, 1973.

2. Wellek, Rene Warren, Austin, Theory of Literature, Harmendosworth, 1963.

धोंगडे, रमेश वा.