शिलारस१ : (मॅग्मा). ज्याच्यापासून अग्निज खडक तयार होतात, ते अंशतः किंवा पूर्णतः द्रवरूप असलेले तप्त द्रव्य म्हणजे शिलारस होय. शिलारसात द्रवरूप पदार्थाशिवाय घनरूप व वायुरूप पदार्थही असू शकतात. अभ्यासण्यात आलेले बहुतेक शिलारस सिलिकेटांचे (सिलिकेटी) द्रव असून त्यांच्यात संबंधित स्फटिक व वायूही असतात. काही अनुमानित शिलारस हे वितळलेले कार्बोनेट, फॉस्फेट, ऑक्साइड, सल्फाइड अथवा गंधक यांचे तप्त द्रव असल्याचे दिसून आले आहे.

काटेकोरपणे सांगायचे, तर ज्या नैसर्गिक द्रव्यात ठरावीक प्रमाणात तप्त द्रव असते, त्याला शिलारस म्हणता येईल. तथापि ज्या शिलारसांमध्ये घन पदार्थांचे घनफळ सु. ६० टक्क्यांहून अधिक असते, त्या शिलारसांना सर्वसाधारपणे घन पदार्थांप्रमाणे निश्चित बल व भंजनक्षमता प्राप्त होते, म्हणजे त्यांना द्रव म्हणणे अवघड असते.

पूर्णपणे द्रवरूप असलेले शिलारस हे परिकल्पित (काल्पनिक) असून घन खडक अंशतः वितळून आणि निलंबित घन पदार्थ व वायू नसलेला केवळ द्रव अलग होऊन ते बनलेले असतात. त्यांना आद्य शिलारस म्हणतात. आद्य शिलारसाचे स्फटिकीभवन होऊन आणि निलंबित घन पदार्थविरहित अवशिष्ट द्रव अलग होऊन बनलेल्या पूर्णतः द्रवरूप अशा परिकल्पित शिलारसाला द्वितीयक शिलारस म्हणतात. आद्य शिलारस व द्वितीयक शिलारस यांची निर्विवाद नैसर्गिक उदाहरणे माहीत नाहीत. मात्र त्यांच्या परिकल्पित व्याख्यांमधून अभिप्रेत होणाऱ्या संकल्पना शिलारसांच्या उत्पत्तीविषयीची चर्चा करताना उपयुक्त ठरल्या आहेत.

ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या शिलारसाला ⇨ लाव्हा म्हणतात. वाहणारा लाव्हा आणि नैसर्गिक ज्वालामुखी काच हे शिलारसाच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. बेसाल्ट व अँडेसाइट आणि डेसाइट व रायोलाइट खडकांसारखे संघटन असणारे सिलिकेट शिलारस हे शिलारसांमध्ये प्रमुख आहेत. शिवाय क्वचित आढळणारे विपुल कार्बोनेट असलेले शिलारस व गंधकाचे तप्त द्रव यांचाही शिलारसांत अंतर्भाव होतो. घटकांचे वयन किंवा पोत आणि संरचना यांतून मिळणारा तरलतेचा (प्रवाहीपणाचा) पुरावा, खनिजांद्वारे मिळणारा उच्च तापमानाचा पुरावा, तसेच तप्त द्रव व स्फटिक यांच्यामधील संतुलनाचे संबंध समजून घेण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयोगांची फले यांच्यावरून ऑक्साइड विपुल असणारे व सल्फाइड विपुल असणारे शिलारस असावेत, असे अनुमान केले जाते.

रासायनिक संघटन : लाव्हा, त्यापासून बनलेले खडक, तसेच खोल जागी खडकांतील भेगांत व पोकळ्यांत शिरलेला शिलारस थिजून बनलेले व नंतर झीज होऊन भूपृष्ठावर उघडे पडलेले अंतर्वेशी खडक यांच्या परीक्षणातून शिलारसाच्या रासायनिक संघटनाविषयी बरीच माहिती मिळते. तसेच शिलारसांच्या रासायनिक संघटनाविषयी अग्निज खडकांच्या रासायनिक संघटनावरून अनुमान करता येते. तथापि शिलारस निवून घट्ट होताना त्याच्यातील पाण्याची वाफ व इतर वायुरूप द्रव्ये निघून जातात. त्यांचा थोडाच अंश अग्निज खडकांत उरतो. असेच शिलारसांतून बाहेर पडलेले काही वायू लगतच्या खडकांत मुरतात. म्हणजे मूळच्या शिलारसात असलेले अनेक बाष्पनशील घटक त्यांपासून बनलेल्या अग्निज खडकांत नसतात. यामुळे शिलारस व अग्निज खडक ह्यांचे रासायनिक संघटन अगदी एकसारखे असत नाही. अर्थात शिलारसाच्या रासायनिक संघटनाविषयी अनुमान करण्यासाठी अग्निज खडकांचे रासायनिक संघटन उपयुक्त ठरते.

ज्ञात असलेली बहुतेक सर्व मूलद्रव्ये अग्निज खडकांत आढळली आहेत. मात्र अग्निज खडकांचा ९९ टक्क्यांहून अधिक भाग ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम व टिटॅनियम या फक्त नऊ मूलद्रव्यांचा बनलेला आढळतो. अग्निज खडकांप्रमाणेच शिलारसांमध्येही ऑक्सिजन व सिलिकॉन ही मूलद्रव्ये सर्वाधिक प्रमाणात असतात. त्यामुळे अग्निज खडक व शिलारस हे दोन्ही मुख्यतः सिलिकेटी खनिजे व खनिज सिलिका (सिलिकॉन ऑक्साइड SiO2) यांचे बनलेले असतात. अतिशय विरळ आढळणारे काही थोडेच अपवाद वगळता बहुतेक शिलारसांत ४०–८० टक्के सिलिका असते. हजारो अग्निज खडकांचे रासायनिक विश्लेषण करून मिळालेल्या अग्निज खडकांच्या सरासरी रासायनिक संघटनांवरून हे अनुमान करता येते.

तापमाने : भूपृष्ठावर वाहणाऱ्या शिलारसांची म्हणजे लाव्ह्यांची तापमाने मोजण्यात आली आहेत. सिलिकेटी लाव्ह्यांच्या बाबतीत बेसाल्टी लाव्ह्याची तापमाने ९००°ते १,१००° से.पर्यंत (हवाई बेटांत कमाल तापमान १,१८५° से.) आढळली आहेत. मध्यम सिकत किंवा सिकत (सिलिकेचे प्रमाण जास्त असलेल्या) लाव्ह्यांचे तापमान याहून कमी असते (उदा., रायोलायटी लाव्ह्याचे तापमान ८००° से. पेक्षा थोडे अधिक). भूपृष्ठाखालील शिलारसांचे तापमान प्रत्यक्ष मोजता येत नाही परंतु अंतर्वेशित (खडकांमध्ये घुसलेल्या) शिलारसांच्या उष्णतेमुळे लगतच्या खडकांवर झालेला परिणाम अभ्यासून शिलारसांच्या तापमानांविषयी अनुमान करता येते. झीज होऊन उघडया पडलेल्या अंतर्वेशी खडकांलगतच्या अशा खडकांचे परीक्षण करून शिलारसांच्या तापमानाबद्दल अनुमान करतात. शिलारसांच्या अशा अनुमानित तापमानांमध्ये पुष्कळच तफावत आढळते व ही तापमाने लाव्ह्यांच्या नोंदलेल्या तापमानापेक्षा अधिक किंवा कमीही असतात. कारण काही अतितप्त शिलारस भूपृष्ठावर पोहोचेपर्यंत थंड होतात. तसेच पाण्याची वाफ वा बाष्पनशील द्रव्ये यांची शिलारसामधील विद्राव्यता दाबामुळे वाढते आणि गोठणाऱ्या संतुलनाचे तापमान घटते. स्फटिकीभवनात बाष्पनशील द्रव्ये मोठ्या प्रमाणात निघून जातात आणि सावकाशपणे थंड होणाऱ्या शिलारसांमधील खनिजांमध्ये परस्परक्रिया होऊ शकतात. या सर्व गोष्टींमुळे सर्वसाधारपणे अंतर्वेशी शिलारसांच्या तापमानाविषयी निश्चित अनुमान करणे शक्य नसते.

अग्निज खडकांसारखे अथवा त्यांच्यामधील खनिजांसारखे रासायनिक संघटन असणारे पदार्थ वितळवून त्या वितळलेल्या द्रवावर प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगांच्या आधारेही शिलारसांच्या तापमानांविषयी अंदाज करता येतात. वरील पद्धतीच्या आधारे बेसाल्टी शिलारसांचे तापमान ८००° ते ९००° से. आणि बेसाल्टापेक्षा अधिक सिकत शिलारसांचे तापमान त्याहून कमी म्हणजे ६००° ते ७००° से. पर्यंत असावे असे अनुमान आहे. [→ भूवैज्ञानिक तापमान].


घनता : सिलिकेटी शिलारसांची घनता ही त्यांचे रासायनिक संघटन व तापमान यांच्यावर अवलंबून असते. ती सामान्यपणे २·४ ते २·७ ग्रॅ. प्रती घ. सेंमी. असल्याचे मानतात. तप्त द्रव्याची घनता सामान्यपणे त्याच्यापासून बनणाऱ्या स्फटिकांच्या घनतेपेक्षा कमी असते. असे अधिक जड स्फटिक गुरुत्वाकर्षणाने द्रवाच्या तळाशी जातात. तप्त बेसाल्टी द्रायुरूप (द्रव वा वायुरूप) शिलारसात १ मिमी. व्यापाचे स्फटिक दर तासाला काही सेंमी. या त्वरेने खाली जातात. बेसाल्टाच्या ८ सेंमी. व्यासाच्या काही गिरद्यांमध्ये खालील भागात ऑलिव्हिनाचे असे स्फटिक खरोखरच साचलेले आढळले आहेत. लोखंड विपुल असलेल्या काही शिलारसांत फेल्स्पारांचे स्फटिक तरंगू शकतात. मात्र पृथ्वीवर फेल्स्पारांचे असे तरंगते स्फटिक क्वचितच आढळतात.

पुष्कळ बेसाल्टी शिलारसांची घनता खंडावरच्या भूकवचातील द्रव्याच्या घनतेपेक्षा अधिक असते. असे शिलारस खडकांमधून पुढील प्रक्रियेने वर लोटले गेले असावेत. जेथे शिलारसापेक्षा त्याला वेढणाऱ्या खडकाची घनता जास्त असते अशा प्रावरणातील द्रव्यस्थितिक शीर्षामुळे अथवा वायूच्या रेट्याने ते वर रेटले गेले असावेत. इतर बहुतेक शिलारसांची घनता खडकांच्या बहुतेक प्रकारांच्या घनतेपेक्षा कमी असते आणि पृथ्वीच्या अंतरंगात हे शिलारस सर्वत्र उत्प्लावक (उद्धरणाच्या) स्थितीत असतात.

श्यानता : सिलिकेटी शिलारसाची श्यानता (दाटपणा) अगदी भिन्न म्हणजे सु. १०० पॉइज (१० न्यूटन/चौ. मी.) ते १ लाख पॉइज (१०,००० न्यूटन/ चौ. मी.) पेक्षा अधिक एवढी असते. शिलारसाचे तापमान कमी झाले, त्यात विरघळलेल्या पाण्याचे प्रमाण घटले, त्याच्यातील स्फटिकांचा भाग वाढला अथवा त्याच्यातील सिलिकेचे प्रमाण वाढले की शिलारसाची श्यानता वाढते. नैसर्गिक शिलारसामधील बदलणारे हे घटक स्वतंत्र नसून परस्परावलंबी असतात. सिलिकेचे प्रमाण वाढले की सिलिकेटी शिलारसांची श्यानता सर्वसाधारणपणे वाढते. अधिक तरल (पातळ) किंवा कमी श्यान (दाट) बेसाल्टी शिलारसापासून सपाट पसरलेली लाव्हा क्षेत्रे निर्माण होतात. (उदा. सह्याद्री पर्वतरांगा). उलट अधिक श्यान असलेल्या रायोलाइटी शिलारसापासून उंचवटे किंवा घुमटाकार रचना निर्माण होतात. शिलारसात स्फटिकांचे प्रमाण काही थोड्या टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास त्याला निश्चित असे शरण बल प्राप्त होते.

संरचना : सिलिकेटी शिलारस आयनी (आयनांनी युक्त विद्युत भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयन) विद्राव असतात आणि त्यांची विद्युत संवाहकता उच्च (१०० प्रती ओहम प्रती सेंमी.) असते. तथापि या आयनांची लक्षणे वा गुणधर्म ठरविणे अवघड असून त्यांचे रेणूभार वा आकारमाने यांबद्दल अगदी थोडीच माहिती आहे. सिलिका विपुल असलेले शिलारस (तप्त द्रव) अतिशय बहुवारिकीकृत (अनेक लहान अणुसमुच्चयरूपी एकके म्हणजे एकवारिके एकमेकांना जोडली जाऊन साखळीच्या रूपातील उच्च रेणुभाराची संयुगे म्हणजे बहुवारिके बनण्याची क्रिया झालेले) असतात. यामुळे त्यांची श्यानता जास्त असते. धातुमळीच्या अभ्यासात प्रचलित असणाऱ्या रीतीनुसार सिलिकामय किंवा सिलिकेचे प्रमाण अधिक असलेल्या शिलारसांना सिकत (ऑक्सिजन धनायनाची क्रियाशीलता अल्प असलेले) शिलारस म्हणतात आणि मॅग्नेशियम ऑक्साइड (MgO) व कॅल्शियम ऑक्साइड (CaO) यांच्यासारखी क्षारकीय ऑक्साइडे विपुल असलेल्या शिलारसांना अल्पसिकत (ऑक्सिजन धनायनाची क्रियाशीलता उच्च असलेले) शिलारस म्हणतात.

स्फटिकीभवन : शिलारस थंड होऊन घट्ट होताना काच तयार होईल की स्फटिक तयार होतील, हे शिलारसाचे तापमान, श्यानता, रासायनिक संघटन, त्यात विरघळलेले वायू, तो विवण्याचा वेग वगैरे गोष्टींवर अवलंबून असते. शिलारसाची ही वैशिष्ट्ये परस्परांशी निगडित असणाऱ्या अनेक भौतिकीय गुणधर्मांनुसार ठरत असतात. स्फटिक तयार होण्यासाठी शिलारसात विखुरलेले खनिजांचे घटक एकत्र येणे आणि स्फटिकांची वाढ होण्यासाठी ते घटक निर्मितीच्या केंद्राकडे येत राहणे गरजेचे असते. यासाठी विसरण होऊ (मिसळू) शकेल अशा अवस्थेत शिलारस असावा लागतो. तरल शिलारसात विसरण सहजपणे होते तर श्यान शिलारसात विसरणाला अडथळा होतो आणि शिलारसाची श्यानता त्याचे रासायनिक संघटन, तापमान व त्यामधील बाष्पनशील द्रव्यांचे प्रमाण यांवर अवलंबून असते.

घटक एकत्र येऊन स्फटिक निर्माण होण्याला काही वेळ मिळणे आवश्यक असते. शिलारस मंदपणे निवताना स्फटिक निर्मितीस पुरेसा वेळ मिळतो व त्यामुळे पूर्णस्फटिकी वा स्फटिकमय खडक निर्माण होतो. उलट शिलारस एकाएकी थंड होऊन घन झाल्यास पूर्ण काचमय खडक बनतो तर एकाएकी नव्हे पण वेगाने निवणाऱ्या शिलारसापासून स्फ्टिक व काच यांचे मिश्रण असलेला खडक निर्माण होतो.

अंतर्वेशी शिलारस बंदिस्त जागेत असल्याने त्यांतील वायू सहजपणे बाहेर पडू शकत नाहीत आणि हे शिलारस सावकाशपणे निवतात. यामुळे त्यांच्यात क्वचितच काच निर्माण होते. भूकवचातील लहानमोठ्या भेगांमध्ये व पोकळ्यांत शिलारस घुसून तो घन होतो. मोठ्या पोकळ्यांतील शिलारस लहान भेगांतील शिलारसांपेक्षा अधिक सावकाशपणे निवतो. भूकवचाच्या उथळ भागातील खडक खोल भागातील खडकांपेक्षा अधिक थंड असतात. त्यामुळे उथळ भागातील भेगा-पोकळ्यांत शिरलेला शिलारस खोल भागातील भेगा-पोकळ्यांत शिरलेल्या शिलारसापेक्षा अधिक वेगाने थंड होतो. तसेच उथळ भागात घुसलेल्या शिलारसाच्या राशीच्या शेजारच्या थंड खडकांच्या संपर्कात येणारा भाग झटपट निवल्याने तेथे काचमय खडक तयार होण्याची शक्यता असते. खोल भागातील शिलारसावर वरच्या खडकांच्या असलेल्या प्रचंड दाबामुळे त्यातील वायू बाहेर पडू शकत नाहीत तसेच तेथे शिलारस मंदपणे निवतो. त्यामुळे तेथे पूर्णस्फटिकी खडक निर्माण होतात. जे शिलारस जलदपणे (काही दशक वर्षे किंवा त्याहून कमी काळात) थंड व स्फटिकीभूत होतात, त्यांच्यात लहान (काही मिमी. व्यापाचे किंवा त्याहून लहान) स्फटिक निर्माण होतात. जे शिलारस सावकाश (म्हणजे शेकडो वा हजारो वर्षांत) थंड होऊन स्फटिकीभूत होतात, त्यांच्यात मोठे (काही सेंमी. किंवा क्वचित अनेक मी. व्यापाचे) स्फटिक तयार होतात.

शिलारस थंड होताना बोएन-विक्रियामालेच्या रूपात [→ अग्निज खडक] स्फटिक पद्धतशीरपणे तयार होतात. म्हणजे आधी तयार झालेल्या स्फटिकांची उच्च तापमानाला द्रवाशी विक्रिया घडू शकते. त्याद्वारे कमी तापमानाला इतर खनिजे बनतात. स्फटिकीभवन होत असलेल्या शिलारसातील स्फटिकांची वाढ प्रमाण-क्रिया तत्त्वांनुसार होते. या तत्त्वांनुसार सर्वांत विपुल व कमीत कमी विद्राव्य (विरघळण्यायोग्य) घटक प्रथम स्फटिकीभूत होतात. स्फटिकीभवनामुळे बहुतेक  शिलारसांत लाइमच्या (CaO) तुलनेत सोडा (Na2O) आणि मॅग्नेशियाच्या (MgO) तुलनेत फेरस लोह यांचे स्फटिक व अवशिष्ट तप्त द्रव यांच्यातील प्रमाण वाढत गेलेले आढळते. पुष्कळ शिलारसांच्या बाबतींत स्फटिकीभवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सल्फाइडाचा अमिश्रणीय (मिसळू न शकणारा) तप्त द्रव तयार होतो. तसेच गौण मूलद्रव्यांचे प्रमाण जास्त असणारी ॲपेटाइट, झिरकॉन यांसारखी खनिजे सर्वसाधारणपणे नंतर स्फटिकीभूत होतात. तथापि एका शिलारसात  सुरुवातीच्या टप्प्यात स्फटिकीभूत होणारी खनिजे इतर शिलारसांत नंतरच्या टप्प्यात स्फटिकीभूत होतात अथवा अजिबात होतही नाहीत.


अशा रीतीने स्फटिकीभवनाच्या क्रियेत अनेक प्रकारचे बदल घडून येतात. उदा., आधीचे स्फटिक द्रवापासून अलग होऊन त्या दोन्हींमधील विक्रियेला प्रतिबंध होणे विक्रिया घडून येणार नाहीत इतक्या जलदपणे शिलारस थंड होणे बाष्पनशील द्रव्ये निघून गेल्याने मूळ शिलारसातील काही घटक कायमचे निघून जाणे वगैरे. शिलारसापासून तयार होणाऱ्या खडकावर या बदलांचा परिणाम होतो. म्हणजे निर्माण होणारा खडक कोणता असेल ते या बदलांवर अवलंबून असते. [→ अग्निज खडक भूरसायनशास्त्र].

आढळ :  ज्वालामुखीक्रिया होत असलेल्या किंवा जागृत ज्वालामुखीच्या प्रदेशात भूपृष्ठाखाली शिलारस असतो, असे अनुमान करता येते. तसेच झिजलेल्या अग्निज खडकांच्या प्लूटॉनांचे (अंतर्वेशित राशींचे) आकार व आकारमान यांच्याशी तुल्य एवढे आकारमान शिलारस व्यापतो, असे गृहीत धरतात. तथापि सुटे प्लूटॉन हे एकेकाळी पूर्णपणे शिलारसाच्या रूपात अस्तित्वात होते, असे ठामपणे म्हणता येत नाही. म्हणून शिलारसाची राशी (पिंड) प्लूटॉनापेक्षा लहान असू शकेल. काही प्रचंड उद्गीरस्णांमध्ये एका अल्पकालीन (काही आठवड्यांत वा वर्षांमध्ये) घडामोडीमध्ये सु. १०० घ. किमी. घनफळाचे द्रव्य बाहेर पडलेले आढळते. त्यावरून एके काळी शिलारसाच्या काही मोठ्या राशी नक्की अस्तित्वात होत्या आणि बहुतकरून सध्याही असतील, असे म्हणता येते. ज्वालामुखीक्रिया नसलेल्या काही प्रदेशांतही भूपृष्ठाखाली शिलारस असू शकेल. कारण पुष्कळ प्लूटॉनांना भूपृष्ठापर्यंत आलेले निर्गमद्वार असल्याचे आढाळले नाही.

शिलारसाच्या राशीचे दूरपर्यंत अभिज्ञान करणे (ओळख पटविणे) अवघड असते. कारण पाण्याने किंवा पाण्याच्या वाफेने भरलेले व भंग पावलेले तप्त खडक आणि शिलारस यांचे गुणधर्म अगदी जवळजवळ एकसारखे असतात. येलोस्टोन पार्क (अमेरिका), काटमाई ट्रायडेंट (अलास्का), अलास्का, कामचाटका द्वीपकल्पातील (रशिया) अनेक प्रदेश व जपान या प्रदेशांखाली शिलारसाच्या मोठया राशी असाव्यात असे मत आहे. तेथे केलेल्या भूकंपीय, भारात्मक (वजनी) व चुंबकीय सर्वेक्षणांद्वारे मिळालेली माहिती या मताशी जुळणारी आहे.

उत्पत्ती : वेगवेगळे शिलारस अगदी भिन्न प्रकारे निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. बेसाल्टी शिलारस बहुतकरून प्रावरणात म्हणजे भूपृष्ठाच्या खाली अनेक दशक किमी. एवढ्या खोलीवर उच्च तापमानामुळे निर्माण होत असण्याची शक्यता आहे. उच्च दाबाला केलेल्या प्रयोगांच्या आधारे अनेक शास्त्रज्ञांनी पुढील निष्कर्ष काढला आहे. बहुतेक बेसाल्टी शिलारस वितळून तयार होण्याचे प्रावरणांतील ठिकाण ते त्यांच्या स्फटिकीभवनाचे भूपृष्ठामधील ठिकाण असे स्थलांतर होताना स्फटिकीभवन व स्फटिकांपासून असशिष्ट द्रव अलग होणे या दोन क्रियांनी शिलारसांत फेरबदल होतात. या स्थलांतरामध्ये निलंबित स्फटिक व न विरघळलेले खडक शिलारसामधून वाहून नेले जाऊ शकतात विरघळलेली बाष्पनशील द्रव्ये बुडबुड्यांच्या रूपात अलग होऊ शकतात आणि थोड्या द्रवाचे स्फटिकीभवनही होऊ शकते. शिलारसाचे असे स्थलांतर व अंतर्वेशन (घुसण्याची क्रिया) यांच्यावर त्याची श्यानता आणि ज्याच्यातून तो जातो त्या खडकांची भंजनविषयक वैशिष्ट्ये यांचा मोठा परिमाण होतो.

बेसाल्टी शिलारसाच्या स्फटिकीभवनाद्वारे भिन्नीभवन [→ अग्निज खडक] होऊन अथवा भूकवचांतील खडक वितळून रायोलायटी शिलारस निर्माण होत असणे शक्य आहे. बेसाल्टी व रायोलायटी शिलारसांच्या दरम्यानचे रासायनिक संघटन असणाऱ्या शिलारसांना मध्यस्थ शिलारस असे म्हणतात. मध्यस्थ शिलारस प्रावरणात निर्माण होणे शक्य आहे. तसेच बेसाल्टी शिलारसाच्या स्फटिकीभवनामधून भूकवचातील इष्ट ते खडक वितळले जाऊन शिलारसांचे मिश्रण होऊन अथवा इष्ट शिलारसात इष्ट खडकाचे सात्मीकरण होऊन मध्यस्थ शिलारस निर्माण होणे शक्य आहे.

पहा : अग्निज खडक ज्वालामुखी-२ लाव्हा शिलाप्रदेश.

संदर्भ : 1. Best, M. G. Igneous and Metamorphic Petrology, New York, 1982.

           2. Civetta, L. and others, Physical Volcanology, New York, 1974.

           3. McBireney, A. R. Ingneous Petrology, 1992.

ठाकूर, अ. ना.