शिवडा : हा खाद्य मासा ⟶ मार्जारमिनापैकी असून त्याचा समावेश सिल्युरिफॉर्म गणाच्या सिल्युरिडी कुलात होतो. शास्त्रीय नाव वॉलॅगो अट्टू. महाराष्ट्रात तो वालशिवडा, वडशिवडा, पदीन या नावांनीही ओळखला जातो. भारतातील बहुतेक सर्व नद्यांत व मुख्यत्वे यमुना, गंगा आणि कृष्णा या नद्यांत तो मोठ्या प्रमाणावर आढळतो. खाडीच्या (मचूळ) पाण्यात तो आढळतो. श्रीलंका व म्यानमार येथेही तो आढळतो.

हा मासा खादाड व उपद्रवकारक असल्याने तो गोड्या पाण्यातील शार्क म्हणून ओळखला जातो. शरीराचा रंग चंदेरी. यास खवले नसतात. शरीर दोन्ही बाजूंनी चपटे, पाठीमागची बाजू सरळ असते. डोके मोठे व जबड्यात धारदार दात असतात.  धड व शेपटी निमुळती होत गेलेली असते. लांबी १ ते २ मी. पर्यंत. साधारणपणे ९० सेंमी. लांबीचा मासा विक्रीस योग्य समजला जातो.

शिवडा  

या माशास चार स्पृशा (स्पर्शग्राही अंगे) असतात. पृष्ठपक्ष एकच असून तो डोक्याच्या पाठीमागे असतो. अंसपक्ष व श्रोणिपक्ष जवळ-जवळ असतात. पुच्छपक्षाचे दोन भाग असून वरचा भाग खालच्यापेक्षा मोठा असतो.

हा मासा मांसभक्षक असून इतर माशांची अंडी, लहान कार्प मासे व झिंगे हे त्याचे खाद्य आहे. त्याची वीण पावसाळ्याच्या सुरुवातीस होते. नवीन पिले पाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी जातात. परिस्थितीप्रमाणे त्याचे  अनुकूलन होते. 

 पाटील, चंद्रकांत प.