शिरस्त्राण : (हेल्मेट). डोके सुरक्षित राखण्यासाठी वापरला जाणारा संरक्षक टोप किंवा शिरोकवच म्हणजे शिरस्त्राण, असे सामान्यपणे म्हणता येईल. सैनिकी शिरस्त्राणे फार पूर्वीपासून वापरात आहेत. आधुनिक काळात नागर समाजातही शिरस्त्राणे वापरली जातात. आधुनिक औद्योगिक क्षेत्रातील खाणकामगार, बांधकाम-कामगार तसेच अग्निशामकदलाचे कर्मचारी इ. व्यक्ती विशिष्ट शिरस्त्राणांचा उपयोग करतात. अवकाश-संशोधन क्षेत्रातील अंतराळवीरही विशिष्ट प्रकारचे शिरस्त्राण वापरतात. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीसदलातील पोलीस व अधिकारिवर्ग दंगली, निदर्शने, हरताळ यांसारख्या प्रसंगी शिरस्त्राणे वापरतात. दुचाक्यांचे वाहक, मोटार स्पर्धेतील स्पर्धक, त्याचप्रमाणे विविध क्रीडाप्रकारांतील व खेळातील खेळाडू हेदेखील विशिष्ट प्रकारची शिरस्त्राणे वापरतात. सैनिकी व नागरी क्षेत्रांत वापरण्यात येणारी शिरस्त्राणे, ही त्या त्या क्षेत्रातील शारीरिक व विशेषतः शिरोभागीय धोके लक्षात घेऊन तयार करण्यात येतात.
सैनिकी शिरस्त्राणे : युद्धात शत्रूच्या शस्त्रास्त्राच्या प्रहारापासून डोके सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर चढविलेला टोप किंवा शिरोकवच म्हणजे शिरस्त्राण होय. पूर्वीपासून वेगवेगळ्या धाटणीची अथवा आकारांची शिरस्त्राणे वापरात असल्याचे दिसून येते. इतिहासकाळातील शिरस्त्राणांचे नमुने अनेक वस्तुसंग्रहालयांमध्ये पाहवयास मिळतात. सर्वांत जुने शिरस्त्राण सुमेर संस्कृतीत (इ. स. पू. सु. १५००) आढळून आले.
सुरुवातीस शिरस्त्राणाचा उपयोग फक्त डोके सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू झाला पण नंतर अनुभवाने डोक्याबरोबर कपाळ, कानशिले, डोळे, चेहरा, हनुवटी आणि मानसुद्धा सुरक्षित राखण्याची गरज निर्माण झाली. केवळ टोपीवजा असलेल्या शिरस्त्राणाच्या रचनेत त्यामुळे सुधारणा होत गेली. युरोपातील शिरस्त्राणांत ज्या सुधारणा क्रमाक्रमाने होत गेल्या, त्यांचा अभ्यास तज्ज्ञांनी केलेला आहे.
ख्रिस्तपूर्व काळातील प्राचीन ग्रीस व रोममध्ये मेणात उकळून कडक केलेल्या चामड्यापासून अथवा पंचधातूंपासून साध्या टोपीसारखी बनविलेली शिरस्त्राणे वापरली जात. पुढे त्यांवर कोंबड्याच्या तुऱ्या सारखा मागे व पुढे लोंबणारा धातूचा तुरा बसवू लागले. हा प्रकार अथीना या ग्रीक देवतेच्या पुतळ्यामध्ये दिसून येतो. रोम शहरात नागरिकांच्या करमणुकीसाठी जी द्वंद्वे आयोजिली जात, त्यात लढणाऱ्या योद्धाची म्हणजे ग्लॅडिएटरची शिरस्त्राणे वैशिष्ट्यपूर्ण असत [→ रोमन ग्लॅडिएटर]. त्यांची कड रुंद असे व त्यावर चेहऱ्याच्या संरक्षणासाठी खालती ओढता येणारी झडप असून बघण्यासाठी तिच्यात झरोका असे.
पुढे उत्तर व पश्चिम युरोपमध्ये वापरात असलेली शिरस्त्राणे म्हणजे अर्धगोल अथवा शंकूच्या आकाराच्या टोप्या असत. प्रारंभी पंचधातू अथवा लोखंडाच्या पट्ट्यांनी मजबुती दिलेल्या चामड्यापासून बनविलेली ही शिरस्त्राणे पुढे पूर्णतया धातूंचीच बनू लागली. नाकाचा बचाव करण्यासाठी इ. स. १००० च्या सुमारास धातूची जाडी कांब त्यावर बसविण्यात आली. हा शिरटोप घालण्यापूर्वी बारीक आकाराच्या लोखंडी साखळ्यांपासून बनविलेले आवरण प्रथम डोक्यावर घालून त्यावर शिरस्त्राण चढवत असत. भारतात राणाप्रताप यांच्या तैलचित्रातील शिरस्त्राणात या प्रकारची वैशिष्ट्ये दिसतात.
पुढे इ. स. सु. १२०० च्या आसपास, शिरस्त्राणांवर प्रहार झाला, तरी तो निसटताच व्हावा या हेतूने त्यांना गोलसर आकार देऊन त्याची खालची कड छातीच्या सुरक्षा-कवचापर्यंत लांब करण्यात आली. पुढील शतकात डोळ्यांपुढची झडप खालीवर करण्याची सोय करण्यात आली. तसेच हनुवटी व मान प्रहारापासून वाचविण्यासाठी वेगळ्या लोखंडी पट्ट्या वापरात आल्या. तांत्रिकदृष्ट्या सर्वांत महत्त्वाची अशी शिरस्त्राणातील सुधारणा इ. स. १५०० च्या सुमारास झाली. कारागिरांनी बिजागरीचा वापर करून मानेवर आणि हनुवटीखाली पक्के बसेल असे शिरस्त्राण बनवले की, जेणेकरून त्यावर आघात झाला, तरी ते डोळ्यांपासून वेगळे होणार नाही. पायदळातील सैनिकांसाठी व औपचारिक समारंभप्रसंगी वापरण्यासाठी कमी वजनाची शिरस्त्राणेही वापरात आली. रोममध्ये पोपचे अंगरक्षक अशी हलकी शिरस्त्राणे वापरताना दिसतात. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत घोडदळातील सैनिकही अशी शिरस्त्राणे वापरू लागले. युरोपमध्ये घोडदळांच्या काही तुकड्या आजही विशेष समारंभासाठी घालावयाच्या पोशाखात शिरस्त्राणांचा अंतर्भाव करतात.
पोलादापासून बनविलेल्या शिरस्त्राणाचा वापर पहिल्या महायुद्धापासून (१९१४–१८) सरसकट सुरू झाला. १९१४ साली फ्रेंच सैन्यात, १९१५ साली ब्रिटिश सैन्यात व त्यानंतर इतर युरोपीय व अमेरिकन सैन्यांत गोल आकाराची व हनुवटीखाली पट्ट्याने आवळून बसवता येतील, अशी शिरस्त्राणे वापरात आली. बंदुकीच्या गोळ्या अथवा तोफगोळ्यांचे तुकडे लागले, तरी ते बहुशः निसटून जावेत इतपत ते पोलाद कठीण असते आणि त्या पत्र्याची जाडी कमी असल्यामुळे ते हलकेही असते. ब्रिटन, अमेरिका, रशिया व जर्मनी यांची दुसऱ्या महायुद्धातील शिरस्त्राणे त्यांच्या त्यांच्या खास आकाराच्या बांधणीमुळे ओळखता येतात. सोव्हिएट रशियाला तोंड देण्यासाठी उभारलेल्या नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनच्या (नाटोच्या) फौजांकरिता एकाच नमुन्याचे शिरस्त्राण तयार करण्यात आले.
शिरस्त्राणांच्या आधुनिकीकरणामधील मुख्य घटक असे : (१) युद्धामध्ये सतत हालचाली चालू असल्या, तरी स्वतःचे व शत्रूचे निश्चित स्थान दाखविणारा तक्ता (इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले), (२) रेडिओद्वारे संपर्क साधण्याची यंत्रणा, (३) शिरस्त्राण घालूनही अधिक चांगले ऐकू येऊन तो ऐकलेला आवाज कुठून अथवा कोणत्या दिशेने येत आहे, हे कळण्याची यंत्रणा, (४) लेसर किरणांपासून व इतर दुखापतींपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी बसविलेल्या झडपा, (५) अंधाऱ्या रात्रीसुद्धा टेहळणी करण्याइतपत बघता येईल असा अवरक्त (इन्फ्रारेड) चश्मा (टेहळणी करता येईल अशी क्षमता नेत्रपटलाला देणारा चश्मा), (६) शिरस्त्राणावर बसविता येईल, असा संवेदनशील कॅमेरा. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमधील सतत होत असलेल्या प्रगतीमुळे भावी काळात सर्व क्षेत्रांत, विशेषतः नौदल आणि हवाई दलांतदेखील शिरस्त्राणांत आमूलाग्र बदल संभवतात. उच्च न्यायालयाने शिरस्त्राण वापरण्याचा आदेश दिला असून, महाराष्ट्र शासनाने त्याची कार्यवाही करण्याचा निर्धार केला आहे.
पेंडसे. के. शं.