शॉलो, आर्थर लेनर्ड : (५ मे १९२१–   ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९८१ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते लेसर वर्णपटविज्ञानाच्या विकासात विशेष संशोधन कार्य केल्याबद्दल त्यांना व ⇨निकोलास ब्लोएम्बरगेन यांना हे पारितोषिक एकत्रितपणे अर्धे, तसेच इलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञानातील विशेष संशोधन कार्य केल्याबद्दल ⇨काई एम्. सीग्बान यांना अर्धे विभागून मिळाले. लेसर वर्णपटविज्ञानात लेसर प्रकाशाचा उपयोग करून आणवीय प्रणालीचे अध्ययन केले जाते.

शॉलो यांचा जन्म मौंट व्हेर्नान (न्यूयॉर्क) येथे झाला. बालपणीच ते आपल्या कुटुंबाबरोबर कॅनडाला गेले. १९४९ मध्ये त्यांनी टोराँटो विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळविली. ते कोलंबिया विद्यापीठात पोस्टडॉक्टरल फेलो आणि संशोधन सहायक होते (१९४९– ५१). तेथे त्यांनी ⇨चार्ल्स हार्ड टाउन्स यांच्याबरोबर मेसर-लेसर प्रकल्पात भाग घेतला. बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये संशोधन भौतिकीविज्ञ आणि कोलंबिया व स्टॅनफर्ड विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून त्यांनी काही वर्षे कार्य केले.

मेसर तत्त्वाचा अवरक्त (वर्णपटातील तांबडा रंगाच्या अलीकडील अदृश्य क्षेत्र), प्रकाशीय (दृश्य क्षेत्र) व जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकहील अदृश्य क्षेत्र) या विद्युत्‌ चुंबकीय वर्णपटातील क्षेत्रापर्यंत विस्तार करण्याची कल्पना १९५० च्या दशकामध्ये निर्माण झाली. या कल्पनेला मूर्त स्वरूप १९५८ मध्ये शॉलो व टाउन्स यांनी दिले. नंतर त्यांनी सैद्धांतिक व व्यावहारिक अशा अभिकल्पासाठी आवश्यक असलेल्या पूर्व अटींचे विश्लेषण करणारे कार्य प्रकाशित केले. त्यांच्या या प्राथमिक कार्यामुळे संपूर्ण गतिविषयक क्षेत्राचा प्रारंभ झाला. हे क्षेत्र लेसर म्हणजे प्रकाशीय मेसर या संकल्पनेशी संबंधित आहे. त्यांनी तीन प्रकाश शलाकांचे मिश्रण करून अपवादात्मक अशी दीर्घ किंवा लघू तरंगलांबी असलेली चौथी शलाका निर्माण केली आणि दृश्य प्रकाशाच्या पलीकडेही लेसर संशोधन मर्यादेचा विस्तार केला.

नैकरेषीय आविष्काराच्या एका प्रकारचा म्हणजे वर्णपटलेखन पद्धतीचा विकास स्टॅनफर्ड विद्यापीठात असताना शॉलो व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आणि याचा उपयोग व्यवहारात केला. डॉल्परमुक्त वर्णपटविज्ञानामध्ये अणूंच्या गतीमुळे होणारी वर्णपटरेषांची रुंदी काढून टाकण्यासाठी आणि अतिउच्च परिशुद्धी असलेल्या हायड्रोजनासारख्या साध्या द्रव्यांचे अध्ययन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. यामुळे ‘रिडबर्ग स्थिरांक’ हा महत्त्वाचा मूलभूत आणवीय स्थिरांक निश्चित करणे शक्य झाले.

शॉलो यांना अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. टाउन्स यांचे सहलेखन म्हणून त्यांनी लिहिलेले मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रोस्कोपी (१९५५) हे पुस्तक प्रसिद्ध आहे.        

सूर्यवंशी, वि. ल.