शाहजहान : (१५ जानेवारी १५९२–३१ जानेवारी १६६६). दिल्लीच्या मोगल घराण्यातील पाचवा बादशाह. चौथा बादशहा ⇨जहांगीर (कार. १६०५–२७) ह्यास खुसरौ, पर्विझ, शहर्रयार आणि खुर्रम हे चार मुलगे. त्यांपैकी राजपूत बेगमपासून लाहोर येथे जन्मास आलेला चौथा मुलगा खुर्रम म्हणजे शाहजहान हा होय. त्याचे संगोपन व शिक्षण आजी रूकय्या बेगम (अकबर बादाहची पत्नी) व शिक्षक मुल्ला कासिम बेग यांच्याकडे झाले. मोगल सरदार आसफखान याची मुलगी व सावत्र आई नूरजहानची भाची अर्जुमंद बानू बेगम (मुमताजमहल) हिच्याशी त्याचा विवाह झाला (१६१२). दारा शुकोव्ह, मुराद, शुजा व ⇨औरंगजेब (कार. १६५८–१७०७) हे त्याचे चार मुलगे.
युवराज असताना त्याने अनेक लष्करी मोहिमांत भाग घेतला. दक्षिणेत सुभेदार असताना त्याने बालाघाट व ⇨निजामशाहीची राजधानी अहमदनगर काबीज केले. त्याबद्दल जहांगीरने त्याला शाहजहान ही पदवी आणि बक्षिसे दिली. पुढे त्याच्याकडे गुजरातही सुपूर्द करण्यात आला. सुरुवातीस तो सावत्र आई नूरजहान हिच्या प्रभावाखाली होता पण नंतर १६२२ मध्ये त्याने वडिलांविरुद्ध अयशस्वी बंड केले. त्यामुळे जहांगीरने त्यास दूरवर दक्षिण हिंदुस्थानात नेमले. जहांगीर १६२७ मध्ये मरण पावला. खुसरौ व पर्विझ यांच्या मृत्यूमुळे (अनुक्रमे १६२२ व १६२६) खुर्रम व शहर्रयार हे दोन वारसदार उरले. आसफखानाने खुर्रमचा, तर नूरजहानने शहर्रयारचा पक्ष उचलून धरला. आसफखानाने खुर्रमला दक्षिणेतून आग्र्याला तातडीने पोहोचण्याचा संदेश दिला. तो पोहोचण्यापूर्वी आसफखानाने शहर्रयारशी लढाई करून त्याचा नि:पात केला व त्यास आंधळे केले. त्यानंतर शाहजहान आग्रा येथे शाही इतमामाने ४ फेब्रुवारी १६२८ रोजी तख्त-नशीन (सिंहासनाधिष्ठित) झाला.
सत्तेवर आल्यानंतर प्रथम त्यास बुंदेलखंडचा राजा जुंझारसिंग याच्या बंडाचा मोड करावा लागला. दुष्काळ व साथीच्या रोगांमुळे (१६३०–३२) अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यात पत्नीच्या (मुमताजमहल) प्रसूतिकाळातील आकस्मिक निधनामुळे (बऱ्हाणपूर–७ जून १६३१) तो खचला. पुढे त्याने बंगालमधील हुगळी येथील पोर्तुगीजांची वखार लुटली (१६३२). त्यानंतर त्याने दक्षिण हिंदुस्थानात मोहीम आखली. खानदेश, बेरार व तेलंगण यांवर वर्चस्व मिळवून निजामशाही खालसा केली (१६३७). नंतर ⇨ आदिलशाही व ⇨ कुत्बशाहीतील सुलतानांना मांडलिक करून त्यांच्याकडून जबर खंडण्या वसूल केल्या (१६३७) आणि आपला मुलगा औरंगजेब यास दख्खनचा सुभेदार नेमले. आग्र्यास परत आल्यावर त्याने तिबेटवर चढाई केली (१६३७–३८). मेवाडचा राणा कर्णसिंह, अजमेरचा जगतसिंह तसेच बिकानेर, कोटा, मारवाड येथील राजपूत राजांचे शाहजहानला सक्रिय सहकार्य लाभले. मात्र कंदाहार घेण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याने मोगल साम्राज्याची राजधानी आग्र्याहून दिल्ली येथे नेली (१६३८).
अखेरच्या दिवसांत त्याला वारसायुद्धास तोंड द्यावे लागले. त्यातच मूत्रकूच्छ या व्याधीने त्याला पछाडले. ज्येष्ठ मुलगा दारा शुकोव्ह यास आपल्यानंतर गादी मिळावी, अशी त्याची इच्छा होती परंतु मुराद, शुजा व औरंगजेब यांनी अंतर्गत संघर्ष उभा केला. त्यात औरंगजेबाने दाराचा पराभव करून नंतर त्याचा वध केला आणि शाहजहानला आग्र्याच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवले (२१ जुलै १६५८). पुढे तिथेच तो आठ वर्षांनी मरण पावला.
शाहजहानने किरकोळ फेरफार करून ⇨ अकबराची प्रशासनव्यवस्था पुढे चालविली मात्र रयतवारी पद्धतीऐवजी जमीनदारी पद्धत अंमलात आणली. त्याच्या कारकीर्दीत इस्लामचा प्रभाव वाढला आणि अकबराच्या सिजदा (दंडवतप्रणाम) पद्धतीऐवजी तहार-तस्लिमची पद्धत रूढ झाली. शहाजानने सुन्नी पंथाचा पुरस्कार केला. मंदिरांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवले व प्रजेवर पुन्हा तीर्थयात्राकर लादला. अल्लाबद्दल अपशब्द काढणे, हा दखलपात्र गुन्हा ठरविला. संस्कृत ग्रंथांचा फार्सीत अनुवाद करण्यास त्याने प्रोत्साहन दिले. त्याने सुलेखनकला, संगीत, चित्रकला आणि विशेषत: वास्तुकला यांना उत्तेजन दिले. त्यामुळे अनेक भव्य व मनोहर वास्तू उभारण्यात आल्या. शाहजहान लाल दगडांच्या इमारतीचा पुरस्कर्ता मानला जातो परंतु जगप्रसिद्ध ताजमहाल (मुमताजमहलचे स्मारक – थडगे) त्याने संगमरवरी पाषाणात बांधला. रेखीव महिरपीची नवी अलंकरणशैली त्याने वास्तुकलेत आणली. आग्र्यातील दिवाण-इ-आम, दिवाण-इ-खास, मोती मशीद इ. वास्तू या शैलीच्या द्योतक होत. दिल्लीचा लाल किल्ला तसेच जामा मशिदी (दिल्ली व आग्रा) यांच्या भव्य बांधकामाचे श्रेय त्याच्याकडे जाते. काश्मीरमधील शालिमार व निशात बागा आणि लाहोरनजीकची शालिमार बाग यांतून त्याची सौंदर्यदृष्टी दिसते. त्याच्या दरबारात जगन्नाथपंडित, सहाकविराय, लालखान (तानसेनचा जावई) इ. संस्कृत पंडितकवी व कलावंत होते. तसेच सुखसैन, सुरसैन हे संगीतज्ञ आणि मुल्ला अब्दुल हकिम, सीयालकूटी, मुल्ला महमूद जौनपूरी हे अरबी साहित्यिक होते. कोहिनूर हिरा बसविलेले मयूरसिंहासन (तख्त-ए-ताऊस) त्यानेच बनवून घेतले. संगमरवरी बांधकामात मौल्यवान रत्ने वापरून त्याने मोगल ऐश्वर्याचे दर्शन घडविले. उत्थित शिल्पाऐवजी किंमती खड्यांच्या जडावकामामुळे वास्तूच्या पृष्ठभागात मुलायमपणा आला. एकूण शाहजहानची कारकीर्द ऐश्वर्यशाली ठरली म्हणून तिला काही इतिहासकारांनी मोगल सत्तेचे सुवर्णयुग म्हटले आहे.
पहा : ताजमहाल मोगला कला मोगलकाळ.
संदर्भ : 1. Edwards, S. M. Garrett, H. L. O. Mughal Rule in India, Bombay, 1962.
2. Majumdar, R. C. Ed. The History and Culture of the Indian People: The Mughal Empire, Bombay, 1974.
3. Saksena, B. P. History of Shahajahan of Delhi, Allahabad, 1962.
4. Singh, Raghuvir, Shahajahan, New Delhi, 1995.
5. Subrahmanyam, Sanjay. The Mughal State १५२६-१७५० : Themes in India History, New Delhi, १९९४.
6. Taher, Mohaned, Mughal India, 2 Vols., New Delhi, 1994.
देशपांडे, सु. र. खोडवे, अच्युत