शाख्ती : रशियातील रॉस्टॉव्ह ओब्लास्ट (प्रांत) मधील एक शहर. लोकसंख्या २,२४,००० (१९८९ अंदाज). हे रॉस्टॉव्हच्या ईशान्येस ६४किमी. अंतरावर, ग्रूशेव्हका या छोट्याशा नदीच्या काठावर वसले आहे. कोळसा – खाणकामाची वसाहत म्हणून १८२९ मध्ये त्याची स्थापना झाली आणि १८८१ मध्ये त्यास शहराचा दर्जा लाभला. १९२० पर्यंत हे शहर अलिक्सांड्रफ्स्क ग्रूशेफ्स्की या नावाने ओळखले जाई. डोनेट्स खोरे या प्रसिद्ध कोळसा-क्षेत्रातील हे शहर प्रमुख कोळसाउत्पादक केंद्र असून, येथे उच्च प्रतीच्या अँथ्रॅसाइट कोळशाचे तसेच कोकचे उत्पादन होते. शहराच्या कामेनोलोम्नी या दक्षिण उपनगरात दगडाच्या खाणी आहेत. लोह-पोलाद उत्पादन, यंत्रसामग्री, कापड, पादत्राणे, लाकडी सामान, दारू गाळणे, खाद्यपदार्थ प्रक्रिया इ. उद्योगधंदे शहरात चालतात. जवळपासच्या खाणकाम केंद्रांकडे जाणाऱ्या लोहमार्गांचे हे प्रस्थानक आहे.
चौधरी, वसंत