शस्त्रसंधी : ( आर्मिस्टिस). सशस्त्र संघर्षात किंवा प्रत्यक्ष युद्धात गुंतलेल्या प्रतिपक्षांनी विशिष्ट काळापुरता केलेला युद्धविरामाचा करार. मध्ययुगाच्या अखेरीस शस्त्रसंधीची कल्पना पुढे आली पण तिला अधिकृत मान्यता हेग येथील शांतता परिषदेत (१९०७) प्राप्त झाली. सामान्यतः शस्त्रसंधीच्या अटी व मुदत यांबाबत युध्यमान पक्षांत वाटाघाटी होऊन एकमताने निर्णय घेण्यात येतात. शस्त्रसंधीच्या स्वरूपात केलेल्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या विशिष्ट काळात युद्धभूमीवरील जखमी सैनिकांना औषधोपचार करणे, मृत सैनिकांचे अंत्यसंस्कार करणे, सैनिकांना विश्रांती देणे, यांसारखी कामे पार पाडता येतात. शस्त्रसंधीत शरणागतीचा प्रश्न उद्‌भवत नाही. शस्त्रसंधीमुळे मुख्यतः युद्धाची समाप्ती करून शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सविस्तर वाटाघाटी करण्याची संधी युध्यमान पक्षांना लाभते. उदा., प्रथम शस्त्रसंधी होऊन त्यानंतर व्हर्साय येथे झालेल्या शांततेच्या तहानुसार पहिले महायुद्ध (१९१४– १८) पूर्णपणे समाप्त झाले. मात्र कोरियन युद्धाच्या वेळी (जुलै १९५१ ते जुलै १९५३) शस्त्रसंधी झाल्यानंतर चाललेल्या वाटाघाटी फिसकटल्या व शांततेचा करार होऊ शकला नाही. अर्थात प्रत्येक युद्धात आधी शस्त्रसंधी व नंतर कायमचा युद्धविराम व शांती हा क्रम असतोच असे नाही. शस्त्रसंधीची अंमलबजावणी प्रत्यक्षात रणांगणावरील दोन्ही पक्षांतील लष्करी अधिकारी करतात. युद्धबंदीच्या अंमलबजावणीवर कधीकधी शस्त्रसंधीच्या करारानुसारच तटस्थ राष्ट्रांच्या शांतिसेना निरीक्षणाचे कार्य करू शकतात.

संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पुढाकाराने ग्रेको–बल्गेरियन (१९२६), मोसूल (१९२६) व इंडोनेशियन (१९४६) या युद्धांत युध्यमान पक्षांत शस्त्रसंधीचे करार करण्यात आले. त्याचप्रमाणे सुएझ कालवा (१९५६), लेबानन (१९५८), काँगो (१९६०) येथील सशस्त्र संघर्ष टाळण्याच्या प्रयत्न शस्त्रसंधीद्वारे करण्यात आला. मात्र अशा प्रकारचे प्रयत्न मँचुरिया (१९३१), इथिओपिया (१९३५), दुसरे महायुद्ध (१९३९) आणि हंगेरी (१९५६) यांच्या प्रकरणांत अयशस्वी झाले. संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने पॅलेस्टाइन (१९४९), काश्मीर (१९४९), कोरिया (१९५३), येमेन (१९५९) व सायप्रस (१९६३) येथील सशस्त्र संघर्ष शस्त्रसंधी होऊन थांबले खरे परंतु त्यांमागील मूलभूत वादग्रस्त प्रश्न मात्र अनिर्णितच राहिले. त्यामुळे शस्त्रसंधी होऊनही व संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेना असूनही तेथे प्रसंगोपात्त युद्धप्रसंग उद्‌भवतात. १९६५ मध्ये झालेले भारत–पाकिस्तान युद्ध मात्र शस्त्रसंधी होऊन थांबले व नंतर दोन्ही देशांत ताश्कंद येथे करार झाला.

शस्त्रसंधीच्या बाबतीत हेग येथील आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेत (१९०७) काही सर्वसाधारण नियम ठरविण्यात आले. ते `लँड वॉर रेग्युलेशन्स’ या संहितेत (हेग कन्व्हेन्शन) दिलेले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा या देशांत दरवर्षी ११ नोव्हेंबर हा शस्त्रसंधी दिवस साजरा करण्यात येतो. त्या तारखेला पहिले महायुद्ध (१९१८) आणि दुसरे महायुद्ध (१९४५) शस्त्रसंधी होऊन थांबले.

पहा : युद्ध व युद्धप्रक्रिया राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्रे.        

 देशपांडे, सु. र.