शर्मा, शंकर दयाळ : ( १९ ऑगस्ट १९१८–२६ डिसेंबर १९९९). भारताचे नववे राष्ट्रपती. जन्म भोपाळ येथे. त्यांचे वडील प्रसिद्ध वैद्य होते. भोपाळ आणि आग्रा येथे सुरूवातीचे शिक्षण. अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. (१९३९) आणि नंतर लखनौ विद्यापीठातून एल्एल् .एम्. पुढे केंब्रिज विद्यापीठ आणि लिंकन्स इन (इंग्लंड) यांतून अनुक्रमे पीएच्. डी. व बार अँट लॉ या पदव्या मिळविल्या. भारतात परतल्यावर त्यांनी लखनौ विद्यापीठात कायदा विषयाचे प्रपाठक (१९४३ – ५२) म्हणून काम केले. केंब्रिज आणि हार्व्हर्ड या विद्यापीठांतही त्यांनी अल्पकाळ अध्यापन केले.
त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारतीय विद्यापीठे (विक्रम व भोपाळ) तसेच परदेसी विद्यापीठे (लंडन व केंब्रिज) यांनी त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या देऊन गौरविले. विशेष सार्वजनिक सेवेबद्दलचा पहिला श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आला (१९९८). काँग्रेस अँप्रोच डू इंटरनॅशनल अफेअर्स, क्रांती द्रष्टा, रूल ऑफ लॉ अँड रोल ऑफ पुलीस, सेक्युलरिझम इन इंडियन ईथॉस, टोअर्डझ अ न्यू इंडिया, अँस्पेक्ट्स ऑफ इंडियन थॉट आणि अवर हेरिटिज ऑफ ह्यूमनिझम ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
गायकवाड, कृ. म.