शरीरसौष्ठव स्पर्धा : कुमार भारत श्री २००३ चे स्पर्धक.शरीरसौष्ठव स्पर्धा : सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवाच्या व्यक्तीची निवड करून त्याचा पुरस्कारपूर्वक गौरव करण्याची स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी स्पर्धा. शरीरसौष्ठव म्हणजे मानवी शरीराचा सुडौल आणि सुबद्ध आकार होय. शारीरिक उंचीच्या प्रमाणात वजन असणे आणि खांदे, मान, छाती, कंबर, बाहू, पाय, पोटऱ्या यांची वाढ सतमोल प्रमाणात झालेली असणे, तसेच स्नायूंची प्रमाणबद्ध वाढ व पिळदारपणा या घटकांना शरीरसौष्टवात अतिशय महत्त्व आहे. बळकट, चपळ आणि बांधेसूद शरीरसौष्टवासाठी दीर्घकालीन, योजनाबद्ध व्यायामाची आवश्यकता असते. शरीरसौष्ठव-स्पर्धकास आपल्या उंचीच्या आणि अस्थिरचनेच्या प्रमाणात आवश्यक असे जास्तीत जास्त वजन प्राप्त करावे लागते. शरीरसौष्ठवासाठी प्रमुख व्यायाम म्हणजे ⇨वजन उचलणे होय. ‘टू हँड्स मिलिटरी प्रेस’ (बाहू व खांद्यांसाठी) ‘उतरत्या फळीवरचे सिटअप्स’ (कंबर, छाती यांसाठी), लँट मशीन’ (पाठ व खांदे यांसाठी), ‘डंबेल्स प्रेस’ (खांदे व दंड यांसाठी), ‘ट्रंक बेडिंग’ (बाहू व पाठीचा कणा यांसाठी) हे शरीरसौष्ठवासाठी आवश्यक असलेले, वजन उचलण्याचे काही व्यायामप्रकार होत. संपूर्ण शरीराची प्रमाणबद्धता साधण्यासाठी नियमित व्यायाम व साराव आणि योजकता यांचा मेळ साधावा लागतो. शरीराच्या कोणत्याही भागाची कमी वा जास्त वाढ होऊ नये, म्हणून व्यायाम करताना विशेष दक्षता घ्यावी लागते.

शरीरसौष्ठव स्पर्धा घेणाऱ्या दोन प्रमुख संघटना आहेत : (१) ‘नॅशनल अँमॅच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन’ (एन्.ए.बी.बी.ए) व (२) ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डर्स’ (आय्. एफ्. बी. बी). नॅशनल अँमॅच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन’ ही संघटना १९४९ साली अस्तित्त्वात आली. त्याच वर्षी त्यांनी ‘व्यावसायिक आणि हौशी’ अशा दोन्ही गटांत शरीरसौष्ठव स्पर्धा घेतल्या. त्यांत रेग पार्कने ‘मिस्टर युनिव्हर्स’ हा किताब प्राप्त केला. डौलडार व प्रमाणबद्ध शरीरसौष्ठवाचे व त्या अनुषंगाने व्यायामाचे महत्त्व मानवाला प्राचीन काळापासून ज्ञात होतेच. पण शरीरसौष्ठवास प्रदर्शनीय व स्पर्धात्मक स्वरूप एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये प्राप्त झाले. सर्कशींमधून तद्वतच रंगमंचावरून शक्तिमान पुरुषांचे शरीरसौष्ठव दाखविण्याचे व शक्तीचे प्रयोग त्या काळी केले जात. बर्नार मकफॅडन (१८६८–१९५५) या शरीरसंवर्धक व्यायामपटूने न्यूयॉर्क शहरात १९०३ मध्ये पहिली अमेरिकन शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केली. तसेच त्याने फिजिकल कल्चर हे मासिकही चालवले.    

आय्. एफ्. बी. बी. चे अध्यक्ष बॉब वेडर यांच्या मनात अशी संघटना स्थापण्याची कल्पना १९४६ साली आली. यासाठी त्यांनी ९० देशांचा दौरा केला. आपला भाऊ ज्यो वेडर यालाही ४० देशांमध्ये पाठविले. त्यांच्या प्रयत्नातून आय. एफ. बी. बी चा जन्म झाला. या संघटनेच्या शाखा आज अनेक देशांत पसरलेल्या असून त्या स्वतंत्रपणे शरीरसौष्ठव स्पर्धा घेतात. या संघटनेतर्फे केवळ हौशी खेळाडूंसाठीच स्पर्धा घेतल्या जातात. ही संघटना ‘जनरल असेंब्ली ऑफ इंटरनॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन’ शी संलग्न आहे. आय. एफ. बी. बी. ने १९४७ पासून ‘मिस्टर युनिव्हर्स या महत्त्वपूर्ण वार्षिक शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केल्या आणि त्यानंतर ‘मिस्टर ऑलिंपिया’ या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धा सुरू केल्या. १९७० च्या दशकात स्त्रियांच्या शरीरसौष्ठव स्पर्धा सुरू झाल्या. आंर्नोल्ड श्वार्झेनगर या जन्माने ऑस्ट्रियन असलेल्या अमेरिकन व्यायामपटूने अमेरिकेत शरीरसौष्टव स्पर्धांना लोकप्रियता मिळवून दिली. त्याने ‘मिस्टर ऑलिंपिया’ हा किताब एकूण ७ (सात) वेळा (१९७० ते १९७५ व १९८० ) जिंकून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला. शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी प्रदीर्घ काळाचा अनुभव व जाणकारी असलेला तज्ज्ञ पंच म्हणून कार्य करू शकतो. शरीरसौष्ठवातील एखादा दोष चटकन हेरण्याइतकी त्याची दृष्टी सरावलेली असते. संपूर्ण शरीर व शारीरिक प्रमाणबद्धता तसेच मान, खांदे, बाहू, दंड, छाती, कंबर, मांड्या व पोटऱ्या यांचे स्नायू व त्यांची सुडोलता यांवर शरीरसौष्ठव स्पर्धेत गुण दिले जातात. एन्. ए. बी. बी. ए तर्फे स्त्रियांचाही स्पर्धा याच कसोटीवर घेतल्या जातात.

भारतात शरीरसौष्ठव स्पर्धा हा एक स्वतंत्र क्रीडाप्रकार म्हणून अलीकडेच विकसित झाला. अखिल भारतीय स्तरावरही या स्पर्धा आयोजित केल्या जातात. भारतात या क्रिडाप्रकाराला वाढती लोकप्रियता लाभत असल्याचे दिसते.                       

अभ्यंकर, शंकर