शमी : (सौंदर, सवंदड हिं चौक्रा, खेजरा गु. रवीजडो, सामी क. बन्नी, पेरुम्बई सं. शमी, सक्तुफला इं. सामी ट्री लॅ. प्रॉसोपिस स्पायसिजेरा, प्रॉ. सिनेरॅरिया कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-मिसोजॉइडी). फुलझाडांपैकी एक [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] हा एक परिचित वृक्ष. याच्या प्रॉसोपिस ह्या प्रजातीत एकूण ४० जाती असून त्यांपैकी फक्त तीन भारतात आढळतात. वेदकालीन व वेदोत्तर प्राचीन संस्कृत वाड्मयात ह्या शमी वृक्षाचे धार्मिक व व्यावहारिक उपयुक्ततेच्या संदर्भात निर्देश आढळतात. याचा प्रसार भारतातील उष्ण व रूक्ष प्रदेशांत सर्वत्र आहे. कुंपणाच्या कडेने ही झाडे लावतात. हा बहुतांश सदापर्णी , काटेरी व सु. १२मी. उंच वाढणारा वृक्ष असून याचा घेर १·२ मी. असतो. याची जास्तीत-जास्त उंची १८ मी. व घेर ५·४ मी. आढळला आहे. याची साल करडी, खरबरीत असून तीवरील पातळ तुकडे सुटून निघून जातात. पाने संयुक्त, दोनदा विभागलेली व पिसासारखी असून दलांच्या दोन जोड्या व प्रत्येक २·५ X ७·५ सेमीं. दलावर ७-१२ दलकांच्या जोड्या असतात. पानांचे देठ व मध्य शिरा यांवर कीटकांच्या दंशामुळे लहान गाठी बनतात. फुलोरे बारीक व त्यांवर लहान पिवळट फुले डिसेंबर ते मार्चमध्ये येतात. शिंबा (शेंग) १०–२५ सेंमी X ५–१० मिमी., लांबट गोलसर (दंड गोलाकृती), काहीशी चपटी व गाठाळ, जाड सालींच्या बिया असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे व फुलांची संरचना ⇨ लेग्युमिनोजी कुलात (अथवा शिंबावंत कुलात) आणि मिमोजॉइडी अथवा शिरीष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.
सिंचनाखालील जमिनीवर इतर पिकांच्या लागवडीबरोबरही शमीची लागवड करता येते. वाढ प्रथम मंद असते, परंतु नंतर ४०–६० वर्षे मध्यम प्रकारे होते. ३० वर्षात त्याचा घेर सु. ८० सेमीं होतो. ह्याचे बाहेरचे लाकूड पांढरे व मध्यकाष्ठापेक्षा सापेक्षतः अधिक नरम असते. इमारतींच्या आतील बाजूस वापरण्यास व अनेक बाबतींत ते उपयुक्त असल्याचे आढळले आहे. पाळीव जनावरांना शेंगांचा व पानांचा चारा घालतात. हिरवी फळे सुकवून किंवा उकळून खातात. ती स्तंभक (आकुंचन करणारी), सूज उतरविणारी व श्वसनासंबंधीच्या तक्रारी दूर करणारी असतात. कातडी कमाविण्यास याची साल व पानांवरील गाठी वापरतात. पानांपासून हिरवे खत बनवितात. फुले साखरेबरोबरच खाल्ल्यास गर्भपात टाळण्यास मदत होते. फांद्यांच्या जखमांतून एक प्रकारचा डिंक स्रवतो. भूपृष्ठालगतचे भूमिजल शोधण्यासाठी या वृक्षाचा उपयोग होऊ शकेल, असे मत आहे.